बेस्टचा संप मिटला, पण या 7 कारणांमुळे आहे बेस्ट तोट्यात

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली 'बेस्ट' बस ही एकेकाळी मुंबईच्या रस्त्याची शान मानली जायची. पण तीच बससेवा आता तोट्यात आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही आर्थिक तूट वाढत चालली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो आहे.
अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण यांचं कारण देत 'बेस्ट'चे कर्मचारी 9 दिवस संपावर गेले होते. पण त्यांच्यावर ही परिस्थिती कशामुळे ओढवली आणि बेस्टला तोटा का सहन करावा लागत आहे?
1. वाहतुकीचे बदलते पर्याय
बेस्टच्या स्थापनेपासूनच ती मुंबईच्या वाहतुकीचा कणा बनली. या शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेनपाठोपाठ बेस्ट बस हा आजवर सर्वांत सोयीचा आणि स्वस्तातला पर्याय होता. विशेषतः विद्यार्थी, कष्टकरी वर्ग आणि मध्यमवर्गीयांसाठी.
बेस्टच्या आकडेवारीनुसार जवळपास 28 ते 30 लाख लोक दररोज या बससेवेचा वापर करतात. मुंबईच्या दूरच्या उपनगरात राहणाऱ्यांनाही घरापासून स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी बेस्टचा पर्याय सोयीचा होता. रिक्षा किंवा टॅक्सीची संख्या तुलनेनं कमी होती आणि त्यांचे दर सर्वांनाच परवडत नसत.
पण आता परिस्थिती बदलत आहे. मेट्रो, टॅक्सी, ऑटोरिक्शा, ओला-ऊबरसारख्या सुविधा आणि खासगी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांसमोर वाहतुकीचे नवे पर्याय उपलब्ध आहेत जे बसपेक्षा जलद आहेत.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
शेअर ऑटो किंवा शेअर टॅक्सीचे दर तर बेस्टच्या दराच्या आसपासच असल्यानं स्वस्तही पडतात. त्यामुळं बसची वाट पाहण्यापेक्षा लोक टॅक्सी-रिक्षानं जाणं पसंत करतात.
2. अनियमितता आणि नियोजनाचा आभाव
बस वेळेवर न येणं, बससाठी कधी अर्धा तास वाट पाहावी लागणं आणि मग त्याच मार्गावर एकापाठोपाठ एक अशा दोन तीन बसेस लागोपाठ येणं हा अनुभव मुंबईकरांसाठी नवा नाही. अनेकदा मग पहिली बस भरून जाते, तर मागच्या बसमध्ये प्रवासीच नसतात.
प्रवासी कमी झाल्याचं कारण देत गेल्या काही वर्षांत अनेक मार्ग बंदही करण्यात आले. बेस्टनं गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या पाच वर्षांत जवळपास 18 टक्के मार्गांवरची बससेवा बंद करण्यात आली आहे.
नियोजनातल्या ढिसाळपणामुळे बेस्टवर भरवसा राहिला नसल्याचं सामान्य प्रवासी सांगतात. दरम्यान, मुंबईत रस्त्यांवरील वाढत्या ट्रॅफिकचा परिणाम बेस्ट बसच्या वेगावरही झाला आहे, असं जाणकार सांगतात.
वाहतुक तज्ज्ञ अशोक दातार यांच्याशी आम्ही याविषयी चर्चा केली.
"शहर वाढत जातं, तसं अंतर्गत रस्त्यांवरून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. छोट्या शहरात तुम्ही बाईकवरून पटकन कुठेही जाऊ शकता. पण जसं शहर पसरत जातं, तशी लांब राहणाऱ्या आणि तिथून रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत जाते. मुंबईतही तेच झालं आहे.
आधी रस्त्यांवर फारसं ट्रॅफिक नव्हतं, तेव्हा बस ताशी 40 किलोमीटरच्या वेगानं जाऊ शकत होत्या. पण गाड्यांची संख्या वाढल्यावर बसचा वेग कधी ताशी आठ ते दहा किलोमीटरवर येतो. बेस्ट बससाठी वेगळा कॉरिडॉर किंवा मार्गिका आखली असती, तर असं झालं नसतं.

फोटो स्रोत, Sharad Badhe /BBC
विशेषतः शहरातल्या प्रमुख महामार्गांवर अशी व्यवस्था असायला हवी होती. दाट लोकवस्तीच्या शहरात एकाचवेळी 40-45 जणांना घेऊन जाणारी बस महत्त्वाची ठरते. तुर्कस्तानातील इस्तंबूल, चीनमधील ग्वांग्झू शहरांत अशा विशेष मार्गिकेमुळं मोठा फरक पडला आहे. अशा मार्गिकेवरून एखाद्या रस्त्यावरून तासाला 60 ते 100 बस प्रवास करू शकतात. पण सध्या मुंबईत केवळ 15 ते 20 बसेस जाऊ शकतात."
3. नव्या गुंतवणुकीचा अभाव
अशोक दातार सांगतात "मेट्रो आणि रेल्वेसाठी वेगळी सुविधा उभारावी लागते. बसचं तसं नाही. आहे त्याच रस्त्यांवरून बस प्रवास करू शकते. पण केवळ बससाठी वेगळी अशी संरचना (infrastructure) असेल, तर बेस्टची वाहतूक आणखी सुरळीत होऊ शकते."
बेस्ट सेवेसाठी नव्या विचारांइतकीच नव्या गुंतवणुकीचीही गरज आहे. पण सरकारी मालकीच्या कंपनीप्रमाणे चालणाऱ्या बेस्ट महामंडळात गेल्या कित्येक वर्षांत अशी मोठी गुंतवणूक झालेली नाही. रस्त्यावरच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल बेस्टच्या ताफ्यात आधुनिक गाड्या येणंही गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
पण मुंबई विकास समितीचे कार्यकारिणी सदस्य अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार भंगारात काढलेल्या गाड्यांच्या जागी नव्या गाड्या येण्याचं प्रमाण कमी आहे.
4. बीएमसीकडून अनुदान नाही
लोकांना स्वस्तात वाहतुकीची सुविधा पुरवणं हे बेस्टसारख्या सरकारी कंपनीचं मुख्य उद्दिष्ट्य असतं. त्यामुळं कोणत्याही सार्वजनिक वाहतुक यंत्रणेसारखाच बेस्टला तोटा होणं स्वाभाविक आहे.
अनुदानाच्या माध्यमातून किंवा बेस्टचं महापालिकेत विलिनीककरण करून हा तोटा भरून काढला जाऊ शकतो, असं मत जाणकारांनी मांडलं आहे. कर्मचारीही हीच मागणी घेऊन संपावर गेले आहेत.
अनिल गचके सांगतात, "बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात आहे, पण वीज विभागाला तशी अडचण नाही. वीज विभागाने हा तोटा भरून काढण्यासाठी वीजदर वाढवले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वीजदर कमी करण्यात आले.

फोटो स्रोत, Sharad Badhe / BBC
बेस्टचा तोटा 800 कोटींचा आहे. महानगरपालिकेला हा तोटा भरून काढणं कठीण नाही. मात्र त्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. विलिनीकरणाची आवश्यकता नाही कारण बेस्ट स्वायत्त असली तरी महानगरपालिकेचाच भाग आहे."
5. पगार आणि निवृत्तीवेतनाचा बोजा
डिसेंबर 2018 मध्ये बेस्टची एकूण कर्मचारी संख्या 38,263 इतकी होती. त्या सर्वांचा पगार तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन याचा वार्षिक खर्च बेस्टलाच उचलावा लागतो, त्यासाठी वेगळी तरतूद नाही.
बेस्टच्या मासिक खर्चापैकी किमान 43 ते 45 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या किमान पगारावर खर्च होते. पण ड्रायव्हर आणि कंडक्टरला मिळणारा पगार तुटपुंजा असून, तोही देताना बेस्टच्या नाकी नऊ येतात. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी बेस्टला बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
6. एकहाती कारभार नाही
"बेस्ट उपक्रमाचा जनरल मॅनेजर हा सर्वेसर्वा झाला आहे. पण या पदावर आयएएस अधिकारी असतो. जनरल मॅनेजर हा पूर्वी बेस्टच्याच कर्मचाऱ्यांपैकीच एक असे. मात्र आयएएस लॉबीच्या दबावामुळे जनरल मॅनेजरपदी आयएएस अधिकारी असतो.
या माणसाला बेस्टचा व्याप समजून घेण्यात एक वर्ष जातं. तीन वर्षांनंतर त्यांची बदली होते. याऐवजी बेस्ट प्रशासनातील खाचाखोचा माहिती असलेला माणूसच जनरल मॅनेजरपदी असायला हवा.
मागण्या पूर्ण झाल्यास बेस्ट कर्मचारी संतुष्ट राहून काम करू शकतात. त्यासाठी चांगलं प्रशासन आवश्यक आहे," असं मुंबई विकास समितीचे कार्यकारिणी सदस्य अनिल गचके यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
7. इच्छाशक्तीचा अभाव
"मुख्य कारण म्हणजे सरकारकडे इच्छाशक्तीच नाही. National urban transport policy ही २००६ साली आली, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं आणि खासगी वाहनांना पाठिंबा दिला जातो. त्यामुळे गाड्यांची संख्या प्रचंड वाढते आणि बसचा वेग कमी होतो, फेऱ्या कमी होतात आणि तोटा वाढतो. हे धोरणात्मक पातळीवर निर्माण केलंल दृष्टचक्र आहे.
फक्त महापालिकाच नाही तर राज्य आणि केंद्र सरकारही याला जबाबदार आहे. सार्वजनिक वाहतूक हा लोकशाहीवादी (डेमोक्रॅटिक) पर्याय नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. बस स्टॉपही असे असतात जिथे काही सुविधा नाहीत- सगळं वातावरणच असं निर्माण केलं आहे की लोक बसपासून दूर जातील," असं आमची मुंबई, आमची बेस्टचे विद्याधर दाते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








