You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत मद्यपान, तणाव कमी करण्याच्या गोळ्याही दिल्या'; मुंबईतील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण काय?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षिकेनेच अत्याचार केल्याची घटना मुंबईतील दादर परिसरात घडली आहे.
16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या 40 वर्षीय शिक्षिकेला दादर पोलिसांनी अटक केली आहे.
दादरमधील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला.
शिक्षिकेविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली.
गुरुवारी (3 जुलै) शिक्षिकेला मुंबई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर परिसरात एका नामांकित शाळेतील शिक्षिकेनं आपल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार कुटुंबियांनी 29 जून 2025 ला दिली.
या शिक्षिकेवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गंत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षिकेला 30 जून 2025 ला अटक करण्यात आली.
पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून शिक्षिका पीडित विद्यार्थ्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होती. ही शिक्षिका विवाहित असून तिला दोन मुलं आहेत.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पालकांनी सांगितले आहे की, डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात हा 16 वर्षीय विद्यार्थी शिक्षिकेच्या संपर्कात आला. त्यानंतर काही महिने त्यांचं नियमित बोलणं व्हायचं.
वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप
दरम्यान, जानेवारी 2024 मध्ये गाडीतून जात असताना शिक्षिकेनं या विद्यार्थ्यावर आपल्या गाडीतच पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला असल्याचं पालकांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर ही शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबई आणि विमानतळ परिसरातील मोठमोठ्या हॉटेलात घेऊन जात तिथं त्याच्यावर वारंवार अत्याचार करत होती, असा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबानं आरोपी शिक्षिकेवर केला आहे.
हळूहळू या विद्यार्थ्यानं स्वत:ला शिक्षिकेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ही शिक्षिका इतर विद्यार्थी आणि अन्य एका शिक्षिकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्याच्या संपर्कात होती.
या सर्व प्रकारामुळं पीडित विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात होता.
ही शिक्षिका विद्यार्थ्यासोबत मद्यपान करायची आणि त्याला तणाव कमी करण्याच्या गोळ्याही द्यायची, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली.
या सर्व प्रकारामुळे पीडित विद्यार्थी अबोल झाला होता. मित्र, कुटुंबापासून तो हळूहळू दुरावू लागला. विद्यार्थी आणि पालक यांच्यात संवाद कमी झाला होता.
मुलाची परिस्थिती लक्षात आल्यावर कुटुंबाने त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांनं आपल्या आईवडिलांकडे या संबंधांची कबुली दिली आणि त्रास झाल्याचं सांगितलं.
शाळा संपल्यानंतरही त्रास
सुरुवातीला मुलाचं दहावीचं वर्ष असल्यानं कुटुंबानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. शाळा संपल्यानंतर शिक्षिका आपल्या मुलाला त्रास देणार नाही, अशी त्यांना आशा होती.
मात्र, मुलगा उत्तीर्ण होऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतरही शिक्षिकेनं त्याचा पाठलाग करत त्याला त्रास देणं सुरू ठेवलं.
त्यामुळे अखेर पालकांनी नाईलाजानं दादर पोलीस ठाण्यात याची रितसर तक्रार दिली. तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आणि हे प्रकरण उघडकीस आलं.
प्रकरण संवेदनशील असल्यानं पोलिसांची गुप्तता
पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यातील कलम 4, 6 आणि 17 सह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करत आहेत.
या संदर्भात दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्याशी बीबीसी मराठीच्या टीमने संपर्क साधला. मात्र, हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
या प्रकरणामध्ये शनिवारी (28 जून) गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दोन दिवसांनी या शिक्षिकेला दादर पोलिसांनी अटक केली. 3 जुलैला या प्रकरणी आरोपी शिक्षिकेला मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
यावेळी दादर पोलीस, सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांची बाजू ऐकून घेऊन कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी आरोपी शिक्षिकेला सुनावली.
पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी तिला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती.
बुधवारी (2 जुलै) झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपी शिक्षिकेच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटलं की, या शिक्षिकेवर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत.
गुरुवारी (3 जुलै) या महिलेची एका मानसोपचार तज्ज्ञांकडे आधीपासूनच वेळ घेतलेली आहे, अशी माहिती तिच्या वकिलांनी एका अर्जाद्वारे न्यायालयापुढं सादर केली.
याची नोंद घेत मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी शिक्षिकेला फक्त एक दिवसीय पोलीस कोठडी दिली.
शिक्षिकेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
एक दिवसीय पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी (3 जुलै) पुन्हा एकदा सत्र न्यायालयात पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला कोर्टात हजर केले.
दरम्यान सर्व बाजूच्या युक्तिवादानंतर कोर्टानं शिक्षिकेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणासंदर्भात आरोपी शिक्षिकेची आणि तिच्या वकिलांची बाजू जाणून घ्यायचा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. मात्र केलेल्या संपर्काला त्यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे उत्तर दिले नाही.
त्यामुळे आरोपी शिक्षिका किंवा त्यांचे वकील यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यास यात अपडेट करण्यात येईल.
मात्र, या प्रकरणी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी शिक्षिकेच्या जामिनासाठी त्यांचे वकील अर्ज करणार असल्याची माहिती आहे. शिक्षिकेवर होणारे आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळलेले आहेत.
पॉक्सो कायदा काय आहे?
2012 मध्ये पारित झालेला पॉक्सो म्हणजेच Protection of Children from Sexual Offence कायदा खास अल्पवयीन मुली/मुलांच्या बाबतीत होणारी लैंगिक हिंसा आणि लैंगिक छळ यांची व्याख्या, त्या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आणि शिक्षा निश्चित करतो.
बालकांच्या हितांचे संरक्षण करून लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरिता भारत सरकारने 2012 साली हा कायदा मंजूर केला.
पॉक्सो कायद्याच्या कलम 7 नुसार, "जर कोणी व्यक्ती लैंगिक उद्देशाने लहान मुलांची गुप्तांगं किंवा त्यांच्या छातीला जबरदस्ती हात लावत असेल किंवा अशा प्रकारची क्रिया करत असेल ज्यात पेनिट्रेशनशिवाय शारीरिक संबंध घडत असतील, तर अशा व्यक्तीला लैंगिक छळाचाच दोषी समजलं जाईल."
या कायद्यानुसार किमान शिक्षा 10 वर्षे तर कमाल जन्मठेपेची (प्रसंगी फाशी) तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात जामीन मिळणेही कठीण आहे. शिवाय जलदगती न्यायालयात खटला चालविला जात असल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊन या कायद्याची जरब निर्माण झाली आहे.
पॉर्नोग्राफीच्या संदर्भात बालकांचा समावेश असलेली पॉर्नोग्राफी पाहणे किंवा तत्सम कंटेंट जवळ बाळगणे हा सुद्धा या कायद्यान्वये गुन्हा ठरवण्यात आला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)