पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी

इंद्रायणी नदीवरील कोसळलेला पूल

फोटो स्रोत, UGC

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून, 51 जण जखमी झाले आहेत.

कुंडमळा हे या परिसरातील एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळं आठवड्याच्या अखेरीस याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. त्यात काल (15 जून) असल्यामुळं याठिकाणी पर्यटकांची गर्दी होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाने काय माहिती दिली?

या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी (15 जून) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या ठिकाणी 100-150 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असताना इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला आणि त्याखाली काही पर्यटक अडकले. हा पूल 30 वर्षं जुना होता.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्यासाठी स्थानिक प्रशासन, NDRF ची दोन पथकं, सीआरपीएफची पथकं, अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटलं आहे.

या घटनेत 51 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मावळ इथल्या पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

इंद्रायणी पात्रात कोसळलेला पूल क्रेनच्या मदतीने काढण्याचे काम सुरू आहे.

इंद्रायणी नदीवरील कोसळलेला पूल.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, इंद्रायणी नदीवरील कोसळलेला पूल.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की सध्या बचावकार्य सुरू आहे. NDRF चे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

"दुर्घटनेचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे," असं फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

फोटो स्रोत, x.com

तर ही दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असून कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

कोसळलेला पूल

फोटो स्रोत, UGC

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघातानंतर एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

"पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरिक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना," असं सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुर्घटनेला सरकार जबाबदार-अंधारे

आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत वाहून गेलेले पर्यटक सुखरुप वाचावे यासाठी प्रार्थना केली आहे.

आदित्य ठाकरे यांची पोस्ट

फोटो स्रोत, x.com

शिवसेना ( UBT) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले, "इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती.

वारंवार ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केलेली असताना आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.