पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सडेतोड उत्तर देणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

फोटो स्रोत, X/ @petal_gahlot
दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका नावाची खूप चर्चा सुरू झाली आहे. ते नाव म्हणजे पेटल गहलोत.
त्यामागचं कारण आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणाला भारतानं दिलेलं उत्तर.
संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या मुत्सद्दी पेटल गहलोत यांनी भारताच्या 'राइट टू रिप्लाय' म्हणजे प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराअंतर्गत म्हटलं की, "धावपट्ट्या आणि जळालेले हँगर हाच विजय असेल, तर पाकिस्तान त्याचा आनंद घेऊ शकतो."
हवाई तळांवर विमानं ठेवण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी जी मोठी इमारत बांधलेली असते त्याला हँगर म्हणतात. याचा उपयोग विमानं आणि हेलिकॉप्टर्सचा बचाव करण्यासाठी होतो.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जे भाषण केलं, त्याता दावा केला होता की "भारताबरोबर झालेलं युद्ध पाकिस्तान जिकलं आहे. पाकिस्तानला शांतता हवी आहे."
मात्र, भारतानं स्पष्ट केलं आहे की, शांततेसाठी पाकिस्तानला आधी त्यांच्याकडे सक्रिय असलेले कट्टरतावादी कॅम्प बंद करावे लागतील आणि वाँटेड कट्टरतावाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं लागेल.
पेटल गहलोत यांच्या या उत्तराची खूप चर्चा होत आहे. भारतातील सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे.
पेटल गहलोत कोण आहेत?
दिल्लीच्या पेटल गहलोत यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि फ्रेंच साहित्यात पदवी घेतली आहे.
त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, शिक्षण घेत असताना त्या इंडियन म्युझिक ग्रुप आणि मल्हार फेस्टिव्हल सारख्या सांस्कृतिक बाबींमध्येदेखील सहभागी होत होत्या.
त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांत एमए केलं. त्यात त्यांना सुवर्णपदकही मिळालं.

फोटो स्रोत, X/@petal_gahlot
2015 मध्ये पेटल भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) दाखल झाल्या. या सेवेत आल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम केलं.
यानंतर त्यांची नियुक्ती पॅरिसमधील भारतीय दूतावासात झाली. तिथे त्यांनी थर्ड आणि नंतर सेकंड सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळली. 2020 ते 2023 दरम्यान त्या परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी होत्या.
यानंतर त्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात कौन्सुल झाल्या.
त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार जुलै 2023 पासून त्या न्यूयॉर्कमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी आहेत. सप्टेंबर 2024 पासून त्या संयुक्त राष्ट्रसंघात ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत.
यूपीएससीची तयारी, तपस्या आणि गिटार
पेटल गहलोत यांना दुसऱ्या प्रयत्नात सिव्हिल सेवा परिक्षेत यश मिळालं. यूपीएससीची तयारी करतानाचे अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच यासदंर्भात ब्लॉगदेखील लिहिला आहे.
त्यांच्या एका ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिलं आहे की ही तयारी इंग्रजीतून समजावणं कठीण आहे. त्यांच्या मते, यासाठी हिंदीत 'तपस्या' हा अचूक शब्द आहे.
यूपीएससीची तयारी करत असतानाच्या दिवसांमध्ये देखील त्यांनी त्यांचे छंद जोपासले होते. गिटार वाजवणं आणि संगीत ऐकणं हा त्यांच्या दिनचर्येचा एक भाग होता.

फोटो स्रोत, ANI/@petal_gahlot
पेटल गहलोत यांना संगीताची खूप आवड आहे. त्यांना गिटार वाजवण्याची आणि गाणं ऐकण्याचा छंद आहे.
पेटल गहलोत यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेक व्हीडिओ दिसतात. ज्यात त्या गिटारवर, 'व्हाईट फ्लॅग', 'लेविटेटिंग', 'हुस्न' आणि 'डँडेलियन्स' सारखी लोकप्रिय गाणी गाताना दिसतात.
त्यांना वाटतं की, संगीत त्यांच्यासाठी फक्त छंदच नाही, तर जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.
पेटल गहलोत यांचे वडील कॅप्टन संजय गहलोत भारतीय सैन्यात कॅप्टन होते. त्यानंतर ते 1991 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी झाले आणि सीमाशुल्क विभागात प्रिन्सिपल कमिश्नर पदापर्यंत पोहोचले.
ते 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी संगीतालाच जीवन मानलं. तसंच यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मेंटॉर म्हणूनही ते काम करतात.
सोशल मीडियावर चर्चा
पेटल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला उत्तर दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक होतं आहे. वेगवेगळ्या यूझर्सनं याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अडोरेबल नावाच्या एका एक्स अकाऊंटवर लिहिलं आहे की, "मी सर्वसाधारणपणे शनिवारी आणि रविवारी उशिरा उठते. उठताच सर्वात आधी पेटल गहलोत यांनी यूएनजीएमध्ये पाकिस्तानला दिलेलं उत्तर पाहिलं."
मनीषा यादव नावाच्या युजरनं लिहिलं आहे, "वाह, पेटल गहलोतनं तर यूएनमध्ये कमाल केली. त्यांनी शहबाज शरीफ यांची नौटंकी बंद केली.
ओसामा बिन लादेनला लपवण्याचं सत्य समोर ठेवलं आणि स्पष्ट म्हटलं की पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात खरी पावलं उचलली पाहिजेत."
मंजित सिन्हा नावाच्या युजरनं लिहिलं, "पेटल गहलोत, ज्या गिटार वाजवतात आणि फ्रेंच भाषा अस्खलित बोलतात, त्यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उत्तमपणे उघडा पाडला. त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त आहे."
फ्लाईट लेफ्टनंट अनुप वर्मा (सेवानिवृत्त) नावाच्या यूझरनं लिहिलं की, "पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमक्यांमधील पोकळपणा उघड केला. त्यांनी जगाला स्पष्टपणे सांगितलं की भारत-पाकिस्तानमधील खरा मुद्दा दहशतवाद आहे."
पेटल पाकिस्तानला उत्तर देताना काय म्हणाल्या?
शहबाज शरीफ यांच्या भाषणाला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी असलेल्या पेटल गहलोत म्हणाल्या की, "या सभेनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नौटंकी पाहिली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन दिलं, जे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा मूळ भाग आहे."
त्या म्हणाल्या की कोणत्याही स्तरावरील नाटक आणि खोटेपणा, सत्य लपवू शकत नाहीत.
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना गहलोत म्हणाल्या, "हा तोच पाकिस्तान आहे, ज्यानं 25 एप्रिल 2025 ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडाच्या जबाबदारीपासून रेझिस्टन्स फ्रंटला (दहशतवादी संघटना) वाचवलं."
गहलोत पुढे म्हणाल्या, "हा तोच पाकिस्तान होता ज्यानं ओसामा बिन लादेनला एक दशकभर लपवून ठेवलं. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान दहशतवादाविरोधातील युद्धात भागीदार असल्याचा देखावा करत होता."

फोटो स्रोत, Getty Images
पेटल गहलोत म्हणाल्या, "आधीप्रमाणेच, भारतातील निर्दोष नागरिकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच जबाबदार आहे, हे सत्य आहे."
त्या म्हणाल्या, "पाकिस्तानच्या मंत्र्यांनी अलीकडेच हे कबूल केलं आहे की, त्यांचा देश अनेक दशकांपासून दहशतवादी कॅम्प चालवतो आहे."
पेटल गहलोत म्हणाल्या, "यामध्ये कोणतंही आश्चर्य नाही की, पुन्हा एकदा पाकिस्तानचा ढोंगीपणा समोर आला आहे. यावेळेस तो पंतप्रधानांच्या पातळीवर दिसला आहे."
"एका फोटोमधून हजार शब्द व्यक्त होतात. यावेळेस आम्ही बहावलपूर आणि मुरीदकेमधील दहशतवादी परिसरांमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे अनेक फोटो पाहिले."
ते म्हणाले, "आम्ही पाहिलं की पाकिस्तानच्या सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उघडपणे भयानक दहशतवाद्यांना समर्थन देत त्यांना श्रद्धांजली देत होते. हे सरकार कोणाच्या बाजूनं आहे, याबाबत आता कोणतीही शंका शिल्लक राहिली आहे का?"
याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर पहलगामच्या घटनेचा राजकीय वापर करण्याचा आरोप केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, "पाकिस्तान बाहेरील आक्रमणापासून स्वत:चं पूर्ण संरक्षण करेल."
ते म्हणाले होते, "आम्ही भारताबरोबरचं युद्ध जिंकलो आहोत. आता आम्हाला शांतता हवी आहे. पाकिस्तान सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताबरोबर व्यापक आणि प्रभावी चर्चा करण्यासाठी तयार आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











