काय असतं हे इथेनॉल? ते पेट्रोलमध्ये का मिसळलं जातं?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

इथेनॉल.. हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल.

तीच गोष्ट जी पेट्रोलमध्ये मिसळली जाते. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्टं साध्य केल्याचं भारताने जाहीर केलंय.

काय असतं हे इथेनॉल? ते पेट्रोलमध्ये का मिसळलं जातं? आणि त्याचा गाड्यांवर काही परिणाम होतो का?

सगळ्यात पहिलं ते म्हणजे इथेनाॅल काय आहे... तर एक प्रकारचं अल्कोहोल. Ethyl Alcohol (C₂H₅OH). या द्रव्याला कोणताही रंग नसतो. ते पारदर्शक असतं. बिअर आणि वाईनमध्येही एक प्रकारचं इथेनॉल वापरलं जातं. पण पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलपेक्षा ते वेगळं असतं. पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिसळलं जातं, ते पिण्यायोग्य नसतं.

ऊस, मका यापासून इथेनॉल तयार केलं जातं. पेट्रोलमध्ये ते मिसळून इंधनासारखं वापरलं जातं. याला म्हटलं जातं - Ethnol Blend Fuel

ही दोन प्रकारची असतात - E10 आणि E20

  • E10 म्हणजे 90% पेट्रोल आणि 10% इथेनॉल
  • E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल

म्हणजे एक लीटर E20 पेट्रोल घेतलंत तर त्यात 800 मिली पेट्रोल आणि 200 मिली इथेनॉल असतं.

पण इथेनॉल पेट्रोलमध्ये का मिसळलं जातं? ही भेसळ नाही का... तर नाही. हे अधिकृतपणे, अभ्यासपूर्वक केलं जातंय. त्यामागे काही कारणं आहेत.

इथेनॉलची निर्मिती मका आणि ऊसापासून केली जाते. यामुळे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागतोय. ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे अधिकचं उत्पन्न ठरतंय.

दुसरीकडे इथेनॉल हे जळताना पेट्रोलपेक्षा कमी धूर निर्माण करतं. त्यामुळे एकूणच कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चं उत्सर्जन काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते.

हवामान बदलांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. आणि अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवत उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्टं भारताने ठेवलंय. त्यादृष्टीनेही हे महत्त्वाचं आहे.

भारत सरकारने 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायला सुरुवात केली. त्यावेळी 1.5% इथेनॉल मिसळलं जाई. जून 2022 मध्ये 10% इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट गाठलं गेलं. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसण्याचं उद्दिष्ट 2023 मध्ये ठेवलं होतं.

ते साध्य झाल्याचं जाहीर करण्यात आलंय.

भारत सरकारने 2023 मध्ये वाहनांमधल्या उत्सर्जनासाठीची BS6- II स्टँडर्ड्स लागू केले होते. यानुसार निर्मिती करण्यात येणाऱ्या वाहनांची इंजिनं आणि संबंधित भाग हे E20 इंधनाच्या वापरासाठी योग्य असणं कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं.

पण यापूर्वीच्या वर्षांमध्ये तयार करण्यात आलेल्या बहुतेक गाड्या या इथेनॉल नसणारं पेट्रोल किंवा मग E10 पेट्रोलसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.

म्हणूनच 2023 पूर्वीच्या गाड्या असणाऱ्यांच्या मनात या इंधनाबद्दल साशंकता आहे. कारण या वाहनांची इंजिनं आणि सुटे भाग इथेनॉल जास्त असणाऱ्या पेट्रोलसोबत नीट काम करू शकत नाहीत. या भागांमध्ये बदल करण्याची गरज आहे.

शिवाय इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा असते. त्यामुळे कारचं मायलेज कमी होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. इंजिनच्या काही भागांमध्ये बदल करून - ट्यूनिंग करून यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. पण E20 साठी तयार करण्यात आलेल्या गाड्यांचं मायलेज फक्त 1 -2 % कमी होत असल्याचा दावा भारत सरकारने केलाय. तर इतर गाड्यांसाठी हे प्रमाण तीन ते सहा टक्के आहे.

तसेच इथेनॉल - hygroscopic आहे. म्हणजे हवेतली आर्द्रता शोषून घेतं. यामुळे इंजिनाचे भाग, फ्युएल लाईन्स आणि पेट्रोल टँकचं नुकसान होऊ शकतं वा झीज होऊ शकते. विशेषतः जुन्या गाड्यांमध्ये. परिणामी गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्च वाढतो.

पण मग गाड्या पूर्णपणे इथेनॉलवर धावू शकतात का? तर जर गाड्या खास E100 इंधनासाठी डिझाईन करण्यात आल्या, तर असं होऊ शकतं. अशा वाहनांना Flex-fuel Vehicles म्हटलं जातं. टोयोटाने अशी Toyota Corolla flex-fuel hybrid लाँच केली होती.

जगभरामध्ये आता हरित इंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जातोय. भारतात सध्या फक्त पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. पण SUV सारख्या बहुतेक मोठ्या गाड्या डिझेलवर चालतात. त्यामध्ये सध्या काहीही मिसळलं जात नाही. इतर देशांमध्ये डिझेलमध्येही इथेनॉल मिसळलं जातं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.