'माझ्या कंपनीत पैसे गुंतवा, तीन पिढ्या बसून खातील'; वृद्धांना लुबाडून अब्जावधींची संपत्ती कमावणारी क्रिप्टो क्वीन

    • Author, टॉनी हान
    • Role, ग्लोबल चायना युनिट

चीनमधील हजारो पेन्शनर्सकडून लुबाडलेल्या पैशातून एका महिलेनी अब्जावधी पाऊंड्स कमवले. भारतीय चलनात तिने केलेल्या घोटाळ्याचा आकडा हा अंदाजे 35 हजार कोटी रुपये इतका आहे.

या लोकांकडून मिळत असलेला पैसा ही महिला बिटकॉइनमध्ये गुंतवत होती आणि त्यातूनही नफा कमवत होती.

जे लोक गुंतवणूक करत होते त्यांना सांगितलं जात होतं की तुम्ही जितके अधिक लोक आपल्या कंपनीत घेऊन याल, तितका तुम्हाला अधिक नफा मिळेल. तिच्या या बोलण्याला भुलून अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई तिच्या कंपनीत गुंतवली. सध्या ही महिला गजाआड आहे. तिच्यावर करण्यात आलेली कारवाई ही बिटकॉइन रिकव्हरीची जगातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

या महिलेला आर्थिक फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणी युकेमध्ये शिक्षा होणार आहे. तिने नेमका काय घोटाळा केला आणि हजारो लोक तिला कसे भुलले यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ही महिला चीनमधून पळून लंडनला आली. तिचं नाव कियान झिमिन आणि तिच्या ज्या कंपनीद्वारे हा स्कॅम केला त्या कंपनीचं नाव होतं, लँटियन गेरुई. लंडनला पळून आल्यानंतर कियान उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेडमधील एका आलिशान बंगल्यात राहत होती.

मेट्रोपोलिटन पोलिसांनी एका वर्षानंतर त्या बंगल्यावर छापा टाकला. त्यानंतर त्यांनी क्रिप्टोकरन्सी रिकव्हर करण्याची कारवाई केली.

चीनमधील 1 लाखांहून अधिक लोकांनी या महिलेच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी हाय-टेक उत्पादनं आणि क्रिप्टोकरन्सी मायनिंग करत असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात या महिलेनं या पैशांचा घोटाळा किंवा गैरव्यवहार केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

तिच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या लोकांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं की युकेतील अधिकाऱ्यांकडून त्यांना त्यांची थोडी रक्कम परत मिळेल अशी आशा व्यक्त केली.

दावा न केलेली रक्कम सामान्यतपणे युके सरकारकडे जमा होईल. त्यामुळे काहीजण असा अंदाज लावत आहेत की ट्रेझरी किंवा प्रशासन या घोटाळ्याच्या मालमत्तेतून फायदा मिळवू शकते.

"जर आम्ही सर्व पुरावे एकत्र करू शकलो, तर आम्हाला आशा आहे की युकेचं सरकार, क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस आणि उच्च न्यायालय सहानुभूती दाखवेल," असं या प्रकरणातील एक पीडित व्यक्तीनं मिस्टर यू यांनी म्हटलं. (नाव बदललं आहे.) मिस्टर यू हे देखील ज्येष्ठ नागरिक आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की या फसवणुकीमुळे त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ आली आहे.

या व्यक्तीचं म्हणणं आहे की या महिलेकडून जर बिटकॉइनची किंमत रिकव्हर झाली आणि त्यातले आम्हाला थोडे फार परत मिळाले तर आम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो.

चीनमधून पलायन करून युकेत आल्यानंतर ऐशोरामात जीवन

47 वर्षांच्या कियान झिमिनची चीनमधील पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर, ती सप्टेंबर 2017 मध्ये एका बनावट पासपोर्टचा वापर करून युकेमध्ये आली.

युकेत आल्यावर ती हॅम्पस्टेड हीथच्या एका टोकाला असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहू लागली. या बंगल्याचं भाडं दरमहा 17,000 पौंडाहून (22,700 डॉलर) अधिक होतं. ते भाडं देण्यासाठी कियानला तिच्या बिटकॉईनच्या साठ्याचं रुपांतर पुन्हा पैशात करावं लागणार होतं.

मग तिने आपण एक अँटिक वस्तू, हिरे यांची संग्राहक म्हणून दाखवले. त्यानंतर तिनं फूड डिलेव्हरीचं काम काम करणाऱ्या एका व्यक्तीला स्वत:चा स्वीय सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलं.

तिनं त्या सहायकाला तिच्या क्रिप्टोकरन्सीचं रुपांतर कॅशमध्ये करण्यास आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून मालमत्ता खरेदी करण्यास सांगितलं.

बिटकॉईनची किंमत प्रचंड वाढत असल्यामुळे कियान तिच्या कंपनीनं गुंतवणुकदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण करू शकत होती.

तिच्या कंपनीनं त्यांना आश्वासन दिलं होतं की ते 'घरी निवांत बसून गडगंज श्रीमंत होऊ शकतात'.

तिची सहायक वेन जियानवर गेल्या वर्षी खटला चालला आणि त्यात तिला मनी लॉंडरिंगसाठी सहा वर्षांचा तुरुंगवास झाला.

लंडनमध्ये अलिशान घर घेताना पोलिसांकडून अटक

वेन जियान म्हणाली की कियाननं तिचे बहुतेक दिवस अंथरुणात लोळत, गेमिंग करत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्यात घालवले.

मात्र कियानच्या डायरीनुसार, ती भविष्यातील योजनांसाठी सहा वर्षांची एक धाडसी योजनादेखील आखत होती. तिच्या नोट्समध्ये या योजनेची रूपरेषा आहेत. त्यानुसार तिची योजना होती, एक आंतरराष्ट्रीय बँक स्थापन करायची, स्विडिश कॅसल विकत घ्यायचा आणि ब्रिटिश राजघराण्याची मर्जी संपादन करायची.

2022 पर्यंत लिबरलँडची राणी होणं, हे तिचं सर्वांत उद्दिष्टं होतं. लिबरलँड हा क्रोएशिया-सर्बिया सीमेवरचा एक अतिशय छोटासा देश आहे.

दरम्यान, कियाननं वेनला लंडनमध्ये खरेदी करता येईल अशा घरांचा शोध घेण्यास सांगितलं. मात्र टोटरिज कॉमन या मोठ्या आणि अतिशय एकांतातील निवासस्थानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात मोठं घर विकत घेण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे पोलीस तपासाला सुरूवात झाली. कारण वेनला हे सांगता आलं नाही की इतका पैसा कुठून आला.

पोलिसांनी कियानच्या हॅम्पस्टेडच्या भाड्याच्या घरावर छापा घातला. पोलिसांना तिथे लाखो बिटकॉईन असलेले हार्ड ड्राईव्ह आणि लॅपटॉप सापडले. युकेच्या इतिहासातील हा क्रिप्टोकरन्सीवरील सर्वात मोठा छापा आणि जप्ती असल्याचं मानलं जातं.

लँटियन गेरुई आणि हजारोंना देशोधडीला लावणारा स्कॅम

कियाननं फक्त चार वर्षांपूर्वीच चीनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातूनच लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

'लँटियन गेरुई' किंवा इंग्रजीत 'ब्लूस्की ग्रीट' असं कियानच्या कंपनीचं नाव होतं. या कंपनीनं दावा केला होता की, ती गुंतवणुकदारांच्या पैशांचा वापर नवीन बिटकॉईन मायनिंगसाठी किंवा नव्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांमध्ये गुंतवणुकीसाठी करते आहे.

युके पोलिसांनुसार हा एक मोठा घोटाळा आहे. कियानची कंपनी या योजनेत अधिकाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड नफ्याची आश्वासनं देत होती.

"आम्हाला तिच्या सहभागाबद्दल जितकी अधिक माहिती मिळाली की तीच प्रत्यक्षात या घोटाळ्याची प्रमुख होती, ती काही त्यातील लहान सहान सदस्य नव्हती, त्यातून हे स्पष्ट झालं की ती अतिशय हुशार, धूर्त आहे. ती खूप सक्रिय आहे, अतिशय लबाड आणि अनेक लोकांना पटवून देण्यात सक्षम आहे," असं मेटमधील डिटेक्टिव्ह कॉन जो रायन यांनी बीबीसीला सांगितलं.

मिस्टर यू हे कियानच्या गुंतवणुकदारांपैकी एक आहेत. ते म्हणतात की, त्यांना कधीही काहीही चुकीचं असल्याचा संशय आला नाही. कारण कंपनी त्यांना त्यांच्या कमाईचा एक भाग म्हणजे फक्त 100 युआन (14 डॉलर, 10 पौंड) देत होती.

"यामुळे प्रत्येकालाच छान वाटत होतं. किंबहुना त्यामुळे आमच्यामध्ये या कंपनीत आणखी गुंतवणूक करण्यासाठी थोडं अधिक कर्ज घेण्याचा आत्मविश्वासदेखील आला," असं ते म्हणाले.

ते आणि त्यांच्या बायकोनं सुरूवातीला 60,000 युआन (8,429 डॉलर, 6,295 पौंड) गुंतवले होते. ते म्हणतात की, अडीच वर्षातच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर 200 टक्के नफा मिळेल असं त्यांना सांगण्यात आलं. लवकरच अधिक गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी अगदी 8 टक्क्यांपर्यत व्याजदरानं हजारो पौंडांचं कर्ज काढलं.

त्याशिवाय, मिस्टर यू यांनी त्यांना या गुंतवणुकीतून दररोज मिळणारे पैसेदेखील पुन्हा त्याच कंपनीत गुंतवले.

ते पुढे म्हणाले, "तुम्हाला मिळालेला नफा पुन्हा त्याच कंपनीत गुंतवायचा असा कोणताही नियम नव्हता. मात्र मला वाटलं की ते टाळण्याइतकं धैर्य आमच्यात नव्हतं. त्यांनी आमच्या स्वप्नांना आणखी फुलवलं. जोपर्यंत आम्ही आत्मसंयम, सर्व विचार करण्याची क्षमता गमावली तोपर्यंत हे झालं."

नेमकी कशी झाली फसवणूक? कियानची कार्यपद्धती

गुंतवणुकदारांना दिसलं की त्यांनी या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी आणलेल्या प्रत्येक नवीन व्यक्तीसाठी त्यांना मिळणारे रोजचे पैसे वाढत होते. यामुळे हा घोटाळा अनेक लोकांपर्यंत पोहोचला.

कंपनीच्या अधिकृत प्रवर्तकांवरील चीनमधील खटल्याच्या कागदपत्रांनुसार, हा घोटाळा चीनमधील जवळपास प्रत्येक प्रांताताली जवळपास 1,20,000 लोकांपर्यंत पोहोचला.

कंपनीकडे असलेल्या ठेवींची एकूण रक्कम 40 अब्ज युआनपेक्षा (5.6 अब्ज डॉलर, 4.2 अब्ज पौंड) अधिक होती, असं युकेच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसला (सीपीएस) आढळलं.

या कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं नंतर साक्ष दिली की नवीन गुंतवणुकदारांच्या पैशांमधून गुंतवणुकादारांना दररोज पैसे दिले जात होते. ते काही क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगमधून मिळणारे पैसे नव्हते.

लँटियन गेरुईच्या मार्केटिंगनं अनेक मध्यवयीन आणि वृद्ध चिनी लोकांच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेतला. कियाननं सामाजिक बांधिलकीबद्दल कविता लिहिल्या. त्याच्या काही ओळी अशा होत्या, "पहिल्या प्रेमाच्या उत्कटतेप्रमाणे आपण वृद्धांवर प्रेम केलं पाहिजे."

कंपनीनं त्यांच्या गुंतवणुकदारांसाठी आणि संभाव्य गुंतवणुकदारांसाठी सामूहिक सहली आणि मेजवान्यादेखील आयोजित केल्या. त्यांचा वापर आणखी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आला. त्यासाठीचे स्लाईडशो आणि कार्ड मशीन तयार होते.

लँटियन गेरुईनं चीनवरील त्यांच्या राष्ट्रप्रेमाचाही गाजावाजा केला. वृद्ध लोकांना आकर्षित करण्याची ती आणखी एक चाल होती.

"आमची देशभक्ती आमचा हळवा कोपरा ठरली, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. त्यांनी सांगितलं की त्यांना चीनला जगात नंबर वन बनवायचं आहे," असं मिस्टर यू म्हणाले. ते आता त्यांच्या वयाच्या साठीत आहेत.

अनेक वक्त्यांनी या कंपनीचं कौतुक केलं, प्रचार केला. यात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे संस्थापक, दिवंगत चेअरमन माओ यांचे जावईदेखील होते, असं मिस्टर यू म्हणाले.

"आमच्या पिढीतील आम्ही सर्वजण चेअरमन माओ यांना मानत होतो. त्यामुळे त्यांचे जावई जरी त्याबद्दल हमी देत असतील, तर आम्ही त्यावर विश्वास का ठेवणार नाही?" असं ते पुढे म्हणाले.

या कंपनीनं अगदी ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये देखील एका कार्यक्रम आयोजित केला होता. याच हॉलमध्ये चीनच्या कायदेमंडळाची किंवा लोकप्रतिनिधींची बैठक होते, अशी माहिती या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एका गुंतवणुकदारानं आणि आणखी दोन जणांनी आमच्याशी बोलताना दिली.

"कंपनीच्या प्रवतर्कांचा तो गट काहीतरी लाल रंगाचं घेऊन ते पांढरं असल्याचं तुम्हाला पटवून द्यायचा. मग काळ्या रंगाचं घेऊन तो लाल असल्याचं पटवून द्यायचं," असं मिस्टर यू म्हणाले.

मोठाली स्वप्नं दाखवणारी, मात्र अतिशय सावध वागणारी कियान

या हाय-प्रोफाईल कंपनीचं नेतृत्व करूनदेखील कियान अतिशय गुप्त, गोपनीय राहत होती. तिच्या गुंतवणुकदारांना ती फक्त हुआहुआ किंवा लिटल फ्लॉवर या नावानंच परिचित होती. ती तिच्या गुंतवणुकदारांशी मुख्यत: तिच्या ब्लॉगवर पोस्ट केलेल्या कवितांद्वारेच संवाद साधत असे.

मात्र जेव्हा बडे गुंतवणुकदार पैसे गुंतवत असत तेव्हा ती समोर यायची. असे गुंतवणुकदार जे किमान 60 लाख युआन (8,42,000 डॉलर, 6,28,000 पौंड) इतकी रक्कम गुंतवत असतं. ती त्यांना अगदी खासगी किंवा छोटेखानी कार्यक्रमात बोलत असे, अशी माहिती या कंपनीच्या गुंतवणुकादारांपैकी एक असलेल्या मिस्टर ली यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, "तुम्ही म्हणू शकता की आमच्यापैकी जे उपस्थित होते ते अतिशय थक्क किंवा प्रभावित झाले होते. आम्ही सर्वजण तिच्याकडे पैशांची देवता म्हणून पाहत होतो."

ते म्हणाले, "ती आम्हाला मोठाली स्वप्नं पाहण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागली...ते असं की फक्त तीन वर्षांतच, ती आम्हाला इतके पैसे कमावून देईल की ती आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांना पुरेल."

मिस्टर ली, त्यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ, यांनी एकूण जवळपास 1 कोटी युआन (13 लाख डॉलर, 10 लाख पौंड) इतकी प्रचंड रक्कम गुंतवली होती.

चीनमधील पोलिसांनी 2017 च्या मध्यास लँटियन गेरुई प्रकरणात तपास सुरू केला होता. त्या तपासातून कियानच्या या घोटाळ्याचा शेवट होण्याचे संकेत मिळाले.

मिस्टर यू म्हणतात, "आम्हाला दररोज मिळणारे पैसे मिळणं थांबलं. कंपनीनं सांगितलं की पोलीस काहीतरी तपास करत आहेत. मात्र आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला पुन्हा पैसे मिळू लागतील."

या सर्व गोंधळात गुंतवणुकदार सुरूवातीला शांत होते. कारण कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की ही एक तात्पुरती समस्या आहे. त्यांनी पोलिसांकडे जाऊ नये असं आवाहनदेखील व्यवस्थापकांनी केलं होतं, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणतात की चीनच्या न्यायालयातील खटल्यांमधून नंतर त्यांना असं आढळून आलं की गुंतवणुकादारांना शांत करण्यासाठी कियाननं त्या वरिष्ठ पैसे दिले होते. दरम्यान ती सर्व पैसे घेऊन युकेला पळून गेली होती.

कियानचं लंडनमधील आयुष्य

कियान तिच्या गुंतवणुकदारांच्या दुर्दशेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ नव्हती.

तिनं तिच्या डायरीत एक योजना लिहून ठेवली होती. त्यानुसार बिटकॉईनची किंमत 50,000 पौंड झाल्यावर ती चीनमध्ये तिच्यावर असणारं कर्ज फेडणार होती.

मात्र तिच्या डायरीतून हे स्पष्ट होतं की तिचं प्राधान्य लिबरलँडवर राज्य करण्यास आणि ते विकसित करण्यास होतं. या प्रकल्पासाठी तिनं लाखो पौंड बाजूला राखून ठेवले होते.

अखेर गेल्या एप्रिलमध्ये कियानला इंग्लंडच्या उत्तर भागातील यॉर्कमध्ये अटक करण्यात आली. त्यावेळेस पोलिसांना तिथे घरात आणखी चारजण सापडले, असं साऊथवार्क क्राऊन कोर्टात सोमवारी (10 नोव्हेंबर) कियानच्या शिक्षेच्या सुनावणीच्या सुरुवातीला सांगितलं.

या चारही जणांना तिने खास प्रयत्न करून युकेमध्ये आणलं होतं.

कियानसाठी शॉपिंग करणं, स्वच्छता राखणं आणि तिची सुरक्षा पाहणं या कामांसाठी त्यांना आणण्यात आलं होतं. हे सर्वजण बेकायदेशीरपणे काम करत होते, असंही न्यायालयासमोर सांगण्यात आलं.

कियानला अटक करण्यात आली तेव्हा तिनं सर्व आरोप नाकारले होते. तसंच तिनं दावा केला होता की चीनच्या सरकारच्या क्रिप्टो उद्योजकांवर केलेल्या कारवाईपासून पळून ती तिथं आली आहे. तसंच तिनं चीनच्या पोलिसांनी दिलेल्या पुराव्यांबद्दल वादही घातला.

मात्र, नंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा तिच्यावर खटला चालला. तेव्हा अनपेक्षितपणे तिनं बेकायदेशीरपणे क्रिप्टोकरन्सी मिळवल्याचा आणि बाळगल्याचा गुन्हा कबूल केला.

कियाननं फसवलेल्या लोकांचे दावे आणि त्यांच्यासमोरील अडचणी

मिस्टर ली यांनी बीबीसीला सांगितलं की यामुळे या घोटाळ्याच्या पीडितांसमोर या प्रकरणाबाबत 'प्रकाश पडला'.

कियाननं युकेमध्ये जी क्रिप्टोकरन्सी आणली होती. त्याचं मूल्य ती आल्यापासून 20 पटीनं वाढलं आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला सुरू होणाऱ्या दिवाणी खटल्यात त्याचं भवितव्य ठरणार आहे.

या प्रकरणात हजारो चिनी गुंतवणुकदार दावा करू इच्छितात, असं पीडितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन फर्मच्या वकिलांचं म्हणणं आहे. मात्र हे सोप असणार नाही, असं त्यातील एका वकिलानं आम्हाला सांगितलं. तो एक चिनी वकील असून त्यानं त्याचं नाव गुप्त ठेवण्यास सांगितलं.

त्यांना त्यांचे दावे सिद्ध करावे लागतील. तसंच अनेक प्रकरणांमध्ये गुंतवणुकदारांनी त्यांचे पैसे थेट कियानच्या कंपनीत हस्तांतरित केलेले नाहीत. तर त्यांनी त्यांचे पैसे स्थानिक प्रमोटर्सच्या खात्यात जमा केले होते आणि मग त्यांनी ते पैसे साखळीद्वारे हस्तांतरित केले होते.

जर पीडितांना त्यांच्या दाव्यात यश आलं, तर त्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची मूळ रक्कम मिळेल की बिटकॉईनच्या बाजारमूल्याप्रमाणे पैसे परत मिळतील हे अद्याप स्पष्ट नाहीये.

गुन्ह्यांमधून मिळालेल्या मालमत्तेवरील कायदेशीर कारवाईच्या इतर प्रकरणांप्रमाणे, या प्रकरणात उरलेले पैसे सामान्यपणे युके सरकारच्या ताब्यात जातील. बीबीसीनं युकेच्या ट्रेझरीला विचारलं की या प्रकरणातील उरलेल्या पैशांचं ते काय करणार आहेत. मात्र त्यांनी यावर उत्तर दिलं नाही.

गेल्या महिन्यात सीपीएसनं स्वतंत्रपणे सांगितलं होतं की दिवाणी प्रकरणात प्रतिनिधित्व नसलेल्यांना भरपाई देण्याचा ते विचार करत आहेत. आम्ही सीपीएसला विचारलं की या पर्यायी योजनेसाठी कोणत्या पातळीचे पुरावे आवश्यक असतील. मात्र त्यांनी आम्हाला सांगितलं की या टप्प्यावर त्यांना कोणतेही तपशील देता येणार नाहीत.

मिस्टर यू आणि त्यांच्याप्रमाणेच उद्ध्वस्त झालेले असंख्य लोक

मिस्टर यू आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्यासोबत गुंतवणूक केली होती. या फसवणुकीमुळे मिस्टर यू यांच्यावर फक्त आर्थिकच परिणाम झालेला नाही. तर त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे. यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन घटस्फोटाच्या टप्प्यावर येऊन पोहचलं. त्यांच्या मुलाशी त्यांचा संपर्क फारच कमी झाला आहे, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

तरीदेखील, ते स्वत:ला तुलनात्मकरीत्या सुदैवी मानतात. आम्ही ज्या वकिलाशी बोललो, ते म्हणाले की कियानच्या अनेक गुंतवणुकदारांकडे अन्न किंवा औषधासाठी देखील पैसे शिल्लक राहिले नव्हते.

मिस्टर यू अशा एका व्यक्तीला ओळखतात. ती व्यक्ती चीनच्या उत्तर भागातील तियानजिनमधील आहे. या फसवणुकीमुळे त्या महिलेकडे पैसेच उरले नव्हते. तिला स्तनाचा कर्करोग झाला होता.

मात्र पैसे नसल्यामुळे तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि स्तनाच्या कर्करोगानं तिचं निधन झालं. कारण तिला ते उपचार परवडत नव्हते.

"ती मृत्यूच्या दारात होती. तिला माहित होतं की मला लिहिता येतं. म्हणून जर काही सर्वाधिक वाईट गोष्ट घडली तर तिनं मला तिच्यासाठी एक शोकगीत लिहिण्यास सांगितलं होतं," असं मिस्टर यू म्हणतात.

मिस्टर यू पुढे म्हणाले की त्यांनी त्यांचा शब्द पाळला. त्यांनी तिच्या स्मरणार्थ एक कविता लिहिली आणि ती ऑनलाइन पोस्ट केली. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत, "मेंढ्या होण्याऐवजी आपण आकाशाला धरून आधारस्तंभ होऊया, जे वाचतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी - अधिक प्रयत्न करूया, आपण हा गंभीर अन्याय दूर करूया."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.