लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबेटिसचा धोका का वाढतोय? शास्त्रज्ञांनी शोधलं नवं कारण

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

टाईप 1 डायबेटिस लहान मुलांमध्ये अधिक गंभीर आणि आक्रमक का असतो? याचं कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.

टाईप 1 डायबेटिस हा आपल्याच रोग प्रतिकारशक्तीने पॅन्क्रियाजमधील (स्वादुपिंडातील) रक्तातील साखरेचं नियंत्रण करणाऱ्या पेशींवर हल्ला केल्यामुळे होतो.

संशोधन करणाऱ्या टीमने दाखवून दिलं की, स्वादुपिंडाचा विकास बालपणात, विशेषतः सात वर्षांखालील वयात सुरू असतो, त्यामुळे त्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

त्यांचं म्हणणं आहे की, नव्याने विकसित झालेल्या औषधांमुळे रुग्णांना स्वादुपिंड परिपक्व होण्यासाठी वेळ मिळू शकतो आणि रोगाचा उशीर होऊ शकतो.

डायबेटिसचे दोन प्रकार

टाइप वन डायबेटिस- या प्रकारात इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींवर शरीरातील प्रतिकारक्षमता हल्ला करते.

टाइप टू डायबेटिस- यामध्ये शरीर पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. या प्रकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात.

गरोदरपणामध्ये काही महिलांच्या रक्तात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे त्यांचे शरीर ते सामावून घेण्यासाठी पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही. त्याला जेस्टेशनल डायबेटिस (Gestational Diabetes) म्हटलं जातं.

अनेक लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा दिसते. परंतु त्याला डायबेटिस म्हणण्या इतकी ती वाढलेली नसते. या अवस्थेला प्री-डायबेटिस असं म्हणलं जातं.

जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रुपांतर होत असतं.

परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलीन तयार करण्याची क्षमता 50 टक्के कमी झालेली असते. उरलेली 50 टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.

यूकेमध्ये सुमारे 4 लाख लोकांना टाईप 1 डायबेटिस होतो.

मर्सीसाइड येथील आठ वर्षांची ग्रेसी 2018 च्या हॅलोवीनला अचानक आजारी पडली. सुरुवात साध्या सर्दीने झाली, पण ती झपाट्याने वाढली.

"ती एक आनंदी मुलगी होती, ती शाळेत जायची, नाचायची, गाणं गायची, आणि एकदा सरळ 48 तासांत जवळजवळ मृत्यूच्या दारात पोहोचली," असं वडील गॅरेथ सांगतात.

"तिच्या आजाराचं निदान झालं तो क्षण आमच्या आयुष्यातला सर्वात वाईट क्षण होता. अचानक आम्ही गृहीत धरलेली प्रत्येक गोष्ट 10-20 पट कठीण झाली," असं ते म्हणतात.

तिच्या कुटुंबाला या नव्या बदलाशी पटकन जुळवून घ्यावं लागलं, ग्रेसीने काय खाल्लं किंवा प्यायलं यावर लक्ष ठेवणं, रक्तातील साखरेची पातळी तपासणं आणि शरीराला रक्तातील साखर शोषण्यासाठी इन्सुलिन देणं, अशा गोष्टी सुरू झाल्या.

आता ग्रेसीकडे ग्लुकोज मॉनिटर आणि इन्सुलिन पंप आहे आणि ती "डायबेटिसवर मात करत आहे," असं तिचे वडील सांगतात.

"ग्रेसी एक सुपरस्टार आहे," असं ते म्हणतात.

पण ग्रेसीसारख्या लहान वयात, विशेषतः सात वर्षांखालील मुलांमध्ये, हा रोग किशोरवयीन किंवा नंतर निदान झालेल्यांपेक्षा अधिक आक्रमक का असतो? हे अद्याप गूढ होतं.

सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, यामागचं कारण पॅन्क्रियाजमधील बीटा पेशींच्या विकासाशी संबंधित आहे.

या पेशी रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर इन्सुलिन हे हार्मोन (संप्रेरक) सोडतात.

युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या संशोधकांनी 250 दात्यांच्या पॅन्क्रियाजच्या नमुन्यांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना बीटा पेशींचा सामान्य विकास आणि टाईप 1 डायबेटिसमध्ये काय होतं हे पाहता आलं.

लहान वयात या बीटा पेशी लहान गटांमध्ये किंवा स्वतंत्र पेशी म्हणून अस्तित्वात असतात, पण वयानुसार त्या वाढतात आणि मोठ्या गटांमध्ये परिपक्व होतात. त्यांना आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतात.

त्यांच्या अभ्यासानं दाखवलं की, रोग प्रतिकारशक्तीने रुग्णाच्या स्वतःच्या बीटा पेशींवर हल्ला केल्यानंतर काय होतं. रोग

प्रतिकारशक्तीच्या या वर्तनामुळे लहान गटांतील बीटा पेशी नष्ट होतात आणि त्यांना परिपक्व होण्याची संधी मिळत नाही.

मोठ्या आयलेट्समधील पेशींवरही हल्ला होतो, पण त्या अधिक टिकाऊ असतात. यामुळे रुग्णांना कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करता येतं आणि रोगाची तीव्रता कमी होते.

"मला वाटतं की हा टाईप 1 डायबेटिससाठी खूप महत्त्वाचा शोध आहे, या संशोधनामुळे मुलांमध्ये हा रोग अधिक आक्रमक का असतो? यावर प्रकाश पडतो," असं युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या डॉ. सारा रिचर्डसन यांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांनी सांगितलं की "टाईप 1 निदान झालेल्या मुलांसाठी भविष्य अधिक उज्ज्वल आहे."

यामध्ये निरोगी मुलांची तपासणी करण्याची शक्यता आणि रोगाचा उशीर करण्यासाठी नवीन इम्युनोथेरपी औषधांचा समावेश आहे.

यूकेने टेप्लिझुमॅब या इम्युनोथेरपीला परवानगी दिली आहे. ही उपचारपद्धती रोग प्रतिकारशक्तीला बीटा पेशींवर हल्ला करण्यापासून थांबवू शकते आणि त्यांना परिपक्व होण्यासाठी वेळ देऊ शकते.

डॉ. रिचर्डसन सांगतात, "कारण आमच्याकडे मुलांमधील टाईप 1 डायबेटिसच्या उपचारासाठी नवीन औषधं आहेत, ही औषधं तरुणांमध्ये रोगाची सुरुवात रोखू किंवा उशीर करू शकतील, अशी आम्हाला आशा आहे." असं डॉ. रिचर्डसन म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)