सुप्रीम कोर्टाचा सवाल, 'अजित पवार तुमचा पक्ष वेगळा आहे तर शरद पवारांचा फोटो का वापरता?'

अजित पवार तुमचा पक्ष वेगळा आहे तर शरद पवारांचा फोटो का वापरता? कोर्टाचा दादांना प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images

अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील पक्षासंदर्भातील खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

न्या. सूर्यकांत यांच्यासमोर आज या याचिकेची सुनावणी झाली. यावेळेस कोर्टानं काही निरीक्षणं मांडली.

यात न्यायाधीश म्हणाले, “तुम्ही वेगळा पक्ष आहात, मग त्यांचे (शरद पवारांचे) फोटो का वापरता? तुम्ही त्यांची साथ सोडलेली आहे.

आता तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा लागेल. निवडणुका आल्या की तुम्हाला त्यांच्या नावाची गरज पडते आणि निवडणुका नसल्या की नाही. आता तुमची स्वतंत्र ओळख असल्याने तुम्ही फक्त तीच वापरली पाहिजे. तुम्ही कोर्टाला असं अंडरटेकिंग द्या की तुमच्या आणि त्यांच्या पक्षात ओव्हरलॅप नाही. तुमचा त्यांच्याशी संबंध नाही आणि तुमची राजकारणात काय ओळख असेल याबद्दल तुम्ही एक प्रसिद्धीपत्रक काढा. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध आमच्याकडे अपील प्रलंबित आहे. उद्या आम्ही निवडणुकीदरम्यान तो निर्णय रद्द केला तर? तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही घड्याळाशिवाय एखादं चिन्ह निवडा आणि त्याचा निवडणुकांमध्ये वापर करा. जेणेकरून तुम्हालाही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कुठला त्रास होणार नाही.

18 मार्चला ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेतली जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच हे सांगताना राहुल नार्वेकरांनी दिले 'हे' कारण

अजित पवार

विधिमंडळ गटात अजित पवार यांचं पाठबळ जास्त असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार केवळ सरकारमधून, पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. पक्षात शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीचा निकालही आज गुरुवारी (15 फेब्रुवारी) लागला आहे. यावेळेस राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा आहे असं निरीक्षण व्यक्त केलं. विधिमंडळ गटात अजित पवार यांचं पाठबळ जास्त असल्यामुळे असा निकाल दिल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच अजित पवार गटाचे आमदार पात्र ठरल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

या निकालात त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचं स्पष्ट केलं. पक्षांतर्गत लढाई, किंवा कलह पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत येत नाही. त्यासाठी पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. पक्ष संबंधितांना निलंबित करण्यापर्यंत कारवाई करू शकतं. परंतु त्याचा विधिमंडळात सदस्यत्वाशी संबंध नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

निकाल वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, 30 जून 2023 रोजी पक्षात फूट पडली. या दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. या दोन्ही गटांनी आपणच खरा पक्ष असल्याची बाजू मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समित्यांची बाजूही लक्षात घेतली. या समित्यांत तळागाळातले कार्यकर्ते असतात.नेतृत्वरचनेसाठी पक्षाची घटना लक्षात घेतली. दोन गटांपैकी एकाने शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत असा दावा केला तर दुसऱ्या गटाने अजित पवार हे अध्यक्ष आहेत असा दावा केला होता. निर्णय घेताना कार्यकारिणी आणि अध्यक्षांचे अधिकार विचारात घेतले. महत्त्वाचे राजकीय निर्णय अध्यक्ष घेतील असं पक्षघटनेत लिहिलं आहे. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही असा दावा दोन्ही गटांनी केला होता. अजित पवार यांची 30 जून रोजी 2023 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ते 2 जुलै रोजी राज्य सरकारमध्ये सहभागी झाले.

rahul narvekar

फोटो स्रोत, Video Grab

राहुल नार्वेकर निकालात पुढे म्हणाले, शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी देणे, किंवा त्यांच्या निर्णयाला विरोध करणं हे कृत्य पक्षाविरोधात आहे असं म्हणता येत नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच हा निर्णय देण्यापूर्वी काही निरिक्षणं नोंदवली. ते म्हणाले, पक्ष कार्यकारिणीतील बहुतांश सदस्य जरी शरद पवार यांना पाठिंबा देत असले तरी त्यांची नेमणूक पक्षाच्या घटनेला धरुन झालेली नाही. त्यामुळे तिचा विचार करता येत नाही. पक्षाची रचना आणि कार्यकारिणी यावरुन निर्णय घेता येत नसल्यामुळे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा कोणाला आहे याचा विचार करावा लागेल. विधानसभेत 53 पैकी 42 सदस्यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. यासंदर्भात अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजाला शरद पवार गटाने आव्हान दिलेले नाही. त्यामुळे बहुतांश सदस्यांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सिद्ध होतं. त्यामुळेच पक्षाचे तेच नेते आहेत असा निष्कर्ष निघतो.

15 फेब्रुवारीलाच का निकाल?

पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून विरोधी गटांतील आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं अर्ज सादर करण्यात आले.

या प्रकरणी सुनावणीला विलंब होत असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 जानेवारीपर्यंत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार करून ही सुनावणी घेण्यात आली. यामध्ये दोन्ही गटांचं म्हणणं विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतलं.

दोन्ही गटांच्या आमदारांची उलटतपासणी झाली. साक्षी नोंदवण्यात आल्या. पण जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत हेच सर्व सुरू होतं.

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाकडं निकाल देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचा आदेश दिला होता.

हा निर्णय कॉपी पेस्ट - सुप्रिया सुळे

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. हा निर्णय अदृश्य शक्तीने दिला तो अध्यक्षांनी कॉपी पेस्ट केला असं त्या म्हणाल्या आहेत. राहुल नार्वेकर यांच्याकडून अपेक्षा केली नव्हती. प्रादेशिक पक्षांची भाजपाकडून गळचेपी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रादेशिक पक्षाने संपवण्याचा प्रयत्न लावला आहे. असंही त्या म्हणाल्या.

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला होता?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हासाठीची सुनावणी सुरुच होती.

निवडणूक आयोगानं 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर 6 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय सुनावला.

निवडणूक आयोगाने निर्णय देताना तीन कसोट्यांचा विचार केला. एक म्हणजे पक्षाच्या घटनेची उद्दिष्टं आणि लक्ष्यं, पक्षाची घटना आणि तिसरी म्हणजे बहुमताची कसोटी.

पक्षाच्या घटनेची उद्दिष्टं आणि लक्ष्यं यांचं आम्ही पालन करत आहोत आणि दुसऱ्या गटाकडून त्याचं उल्लंघन केलं गेलं असा दावा कोणत्याही पक्षाकडून केला गेला नाही. त्यामुळे ती कसोटी या प्रकरणात लावण्यात आली नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं.

दुसरी कसोटी होती पक्षाच्या घटनेची. पण या प्रकरणी समोर आलेले मुद्दे तपासले. त्यानंतर घटनेची कसोटी लावू शकत नाही असं स्पष्ट केलं. दोन्ही बाजूंकडून घटनेचं उल्लंघन झाल्याचं दिसत आहे, असं कारण निवडणूक आयोगानं दिलं.

या दोन्ही कसोट्या रद्दबातल ठरवल्यानंतर आयोगानं संख्याबळाच्या कसोटीचा आधार घेत पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलं.

यानंतर शरद पवार यांच्या गटानं सुचवलेल्या तीन नावांपैकी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गट' असं नाव त्यांना नवीन पक्षासाठी देण्यात आलं.

दरम्यान, शरद पवार यांच्या गटानं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर लवकर सुनावणी सुरू होण्याची अपेक्षा आहेत.