राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत कारण... #5मोठ्याबातम्या

राहुल गांधी

फोटो स्रोत, AICC

आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या ठळक बातम्यांचा सारांश खालीलप्रमाणे –

1. राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत कारण...

काँग्रेसची 'भारत जोडो’ यात्रा लवकरच श्रीनगरमध्येही पोहोचत आहे. पण यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या ऐतिहासिक लाल चौकात भारताचा तिरंगा ध्वज फडकवणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या अखिल भारतीय काँग्रेस कमेटी (एआयसीसी) प्रभारी आणि पक्षाच्या खासदार रजनी पाटील मंगळवारी बोलताना म्हणाल्या, राहुल गांधी 30 जानेवारीला लाल चौकात नव्हे, तर श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात भारतीय ध्वज तिरंगा फडकवतील. एवढेच नाही, तर लाल चौकात तिरंगा फडकवणे हा आरएसएसच्या अजेंड्याचा भाग होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधीच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात विचारले असता पाटील म्हणाल्या, "लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या आरएसएसच्या अजेंड्यावर आमचा विश्वास नाही. तेथे तो (तिरंगा) आधीच डौलाने फडकत आहे."

या यात्रेच्या समारोपाचा मुख्य कार्यक्रम शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC), श्रीनगर येथे आयोजित करण्यात येईल.

2. सरकारी वकीलावर सव्वा कोटीची खंडणी उकळल्याचा आरोप, गुन्हा दाखल

विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस ज्यांच्यावर पेन ड्राइव्हचा `बॉम्ब`टाकून दहा महिन्यांपूर्वी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती, ते विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर सव्वा कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

ही बातमी सरकारनामाने दिली आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरच्या दीड वर्षानंतर फडणवीस हे गृहमंत्री असताना हा गुन्हा नोंद झाला आहे.

बीएचआर प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहे.

प्रवीण चव्हाण

फोटो स्रोत, Social Media

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात आणि आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.

त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी बीएसआर प्रकरणात विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता.

त्याशिवाय त्यांच्याकडे इतर अनेक महत्त्वाच्या विशेषत: आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातील खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

त्यात प्रामुख्याने पुण्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे मोक्का केसेस, एज्युकेशन स्कॅम रमेश कदम, महेश मोतेवार फसवणूक अशा 22 गुन्ह्यांमध्ये ते विशेष सरकारी वकील होते.

3. धैर्यशील मानेंना कर्नाटक पोलिसांची बेळगावात प्रवेशबंदी, आंतरराज्य सीमेला आले छावणीचे स्वरूप

सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावला जाणार होते. याबाबत माहिती कळताच कर्नाटकाने ताबडतोब त्यांना बेळगाव प्रवेशबंदी लागू केली.

ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

तरीही माने हे बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी नाका परिसरात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

4. कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी; मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक केली असून बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

ही बातमी TV9 मराठीने दिली आहे.

जिल्हा पोलीस पथकाकडून ही गर्भलिंग निदान करण्याचे यंत्र आणि गर्भपाताची औषधे सापडली असून याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्दमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती.

त्यानंतर त्यांच्याविरोधा सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर यांच्याकडे गर्भलिंग तपासणीसाठी एका महिलेला पाठवण्यात आले, त्यानंतर कोळस्कर याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

5. जम्मू काश्मीरमध्ये नदी नाले गोठले, लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

देशाच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे.

थंडी

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू काश्मीरमध्ये तर तापमानाचा पारा उणेमध्ये गेला आहे. लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

सर्वत्र रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे पिण्याच्या पाण्याच्या सर्व पाईपलाईन गोठल्या आहेत.

हेही वाचलंत का?