जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पर्यटन केंद्रावर हल्ला

फोटो स्रोत, ANI
जम्मू काश्मीर मधील श्रीनगरमध्ये संडे मार्केट येथील पर्यटन केंद्रावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. रविवारी (3 नोव्हेंबर) ही घटना घडली.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विधी कुमार बिर्डी यांनी SHMS हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या वारंवार येत आहेत. श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’ येथे निष्पाप दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे."
"निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याच्या कृत्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणेने लवकरात लवकर हल्ले थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगू शकतील," असं मत ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं.
याआधीही दहशतवाद्यांशी चकमक
दरम्यान, शनिवारी (2 नोव्हेंबर) देखील श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी), विधी कुमार बिर्डी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये खानयार भागात लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) कमांडर चकमकीत मारला गेला.
"आता ही दहशतवादविरोधी मोहीम पूर्ण झाली आहे. यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मृत्यू झालेल्या दहशतवाद्याचे नाव उस्मान आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. या चकमकीत 4 सैनिक जखमी झाले आहेत. तो परदेशी दहशतवादी आहे. इन्स्पेक्टर मसरूर यांच्या हत्येमध्ये या दहशतवाद्याचा सहभाग उघडकीस आला आहे. या संदर्भात अधिक तपास केला जात आहे,” अशी माहिती आयजीपी बिर्डी यांनी एएनआयला दिली.

फोटो स्रोत, Getty Images
"दोन दहशतवाद्यांचा खात्मा", सुरक्षा दलाची माहिती
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हलकन गली परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर ही चकमक झाली.


"गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि श्रीनगर सेक्टर सीआरपीएफ यांनी अनंतनागमधील हलकन गली येथे एक संयुक्त मोहीम राबवली. 2 नोव्हेंबर 2024 रोजी हलकन गलीजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. यानंतर सैन्याने सतर्क होत कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याला सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला,” अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











