शरद पवार म्हणतात, 'नरेंद्र मोदी लोकांच्या मनातून उतरू लागले आहेत'; बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात करत असलेल्या वक्तव्यामुळं त्यांची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळं त्यांना पुरेसे संख्याबळ मिळणार नसल्याची शक्यता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' चे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत हे भाकित व्यक्त केलं आहे.

मोदींबरोबर जाण्याच्या चर्चेबाबत बोलताना शरद पवार यांनी कोणीही शहाणा व्यक्ती मोदींबरोबर जाण्याचं मान्य करणार नाही, असं म्हणत याबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

त्याचबरोबर भाजपचं राजकारण, राज्यातील पक्षफुटीच्या वातावरणानंतर निर्माण झालेली राजकीय स्थिती आणि अजित पवारांच्या संदर्भातही शरद पवारांनी या मुलाखतीत अनेक महत्त्वाची वक्तव्यं केली.

'मोदींचे बोलणे लोकांना आवडत नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 400 पारच्या दाव्यावर शरद पवारांनी परखड मत व्यक्त केलं. "निवडणुकांना सुरुवात होईपर्यंत, लोकांमध्ये मोदींबाबत एक चर्चा होती. लोक मोदी मोदी करतही होते. पण त्यानंतर मोदींच्या भाषणांमुळं लोकांची मोदींविषयीची आस्था कमी झाली", असं शरद पवार म्हणाले.

मोदी मला भटकती आत्मा म्हणाले, "उद्धव ठाकरेंना नकली शिवसेना म्हणाले, पण लोकांना अशा प्रकारचं बोलणं आवडेलेलं नाही. त्यामुळं लोकांच्या मनातून ते उतरू लागले आहेत त्यामुळं त्यांना सरकार बनवण्यापुरतेही नंबर येतील की नाही याची," शंका असल्याचं त्यांनी म्हटलं.

"या परिस्थितीमुळं 400 पार वगैरे शक्य नाही. ते स्वतः 240-280 च्या दरम्यानचा दावा खासगी बोलताना करत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यानंतर, जशी त्यांची भाषणं सुरू झाली तसा मोदींचा ट्रेंड कमी होत असल्याचं" दिसून आल्याचंही पवार म्हणाले.

'अजित, कधीही हात पसरणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीच्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी भाजपला हेच हवं होतं, अशी टीका केली आहे.

ते म्हणाले की, "हे घडलं नसतं तर आनंद झाला असता. ज्यांच्या विरुद्ध हा संघर्ष उभा केला त्या व्यक्ती कधी राजकारणात किंवा समाजकारणात नव्हत्या. माझी मुलगी तीन वेळा संसदेत निवडून गेली आहे. त्याआधी राज्यसभेत गेली होती. पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे."

पुन्हा एकत्र यायचं झाल्यास किंवा राजकारणात गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्यालं का? असा प्रश्न आम्ही शरद पवार यांना विचारला.

त्यावर उत्तर देताना, "ती वेळ येणार नाही. कारण, अजितचा स्वभाव मला माहिती आहे. तो कधीच कोणासमोर हात पसरणार नाही,"असं उत्तर शरद पवारांनी दिलं.

'आमच्यासमोर ध्रुवीकरणाचे आव्हान'

पवार म्हणाले की, "त्यांनी निवडणुकीला हिंदू मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न केला. पाच-सहा मुलं असतील त्यांना कॉंग्रेस मदत करेल, असं बोललं गेलं. त्यातून एक मेसेज गेला. जाणूनबुजून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

राहुल गांधींबद्दल त्यांनी टिंगळटवाळी केली. पण राहुल गांधींबद्दल जुनं इंप्रेशन आता तसं राहिलेलं नाही. त्यांनी देशभर यात्रा केल्यामुळे त्यांच्याबद्दलचं मत बदललं आहे. राहुल गांधीची टिंगलटवाळीही लोकांना आवडत नाही."

जातीय ध्रुवीकरणामुळे या निवडणुकीत महायुतीला फटका बसेल, असंही शरद पवार म्हणाले. पण आमच्यासमोर एक आव्हान आहे या धुव्रीकरणामुळे राज्याची सामाजिक वीण उसवली जाऊ नये, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

पक्षफोडीच्या आरोपाबाबत...

पक्षफोडीच्या मुद्द्यावरून केल्या जाणाऱ्या टीकांना उत्तर देताना शरद पवारांना अनेकदा पुलोद आणि त्यांनी केलेल्या बंडखोरी किंवा त्यांच्यामुळं फुटलेले पक्ष याची आठवण करून दिली जाते. त्यावरही पवारांनी या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं.

"पुलोदच्या वेळी स्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींबद्दलची अस्वस्थता होती, त्यामुळं पुलोदची निर्मिती झाली. त्यावेळी आजच्यासारखी स्थिती नव्हती. सर्वांनी विचार करून निर्णय घेतला होता. आणीबाणी नको, लोकशाहीचा अधिकार टिकावा यावर पुलोद आधारित होतं," असं पवारांनी म्हटलं.

छगन भुजबळांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, "भुजबळांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला संपर्क केला. त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता. भुजबळ आणि नंतर आठ-दहा लोक आले. भलेही ते माझ्याबाबत बोलत असतील, पण त्यांनी आजही त्यांची विचारसरणी कायम ठेवली.

त्याउलट फडणवासांनी पक्ष फोडण्याबाबत जाहीरपणे कबुली दिली आहे. मी दोन पक्ष फोडून आलो आहे, असं ते सांगत आहेत. त्यामुळं इतरांना नावं ठेवण्याचं कारण नाही. हा भाजपचा थेट विचार आहे," अशी टीका पवारांनी केली.

'वेगळे झालो तरी विचारसरणी तीच'

"राज्यातील सरकारची आजची स्थिती पाहिली तर, ते निव्वळ भाजपचं सरकार आहे असं दिसत नाही. त्यातले अर्धे लोक शिवसेनेतून फुटून आलेले आहेत. अजित पवार वगैरे आमच्यातून फुटून गेले आणि या सगळ्याला फोडण्यात देवेंद्र फडणवीसांचं योगदान आहे, असं असं ते स्वतःच सांगतात. त्यामुळं आपण जे केलं ते दुसऱ्यावर ढकलण्याचं काम करू नये", असा सल्ला शरद पवारांनी दिला.

"गांधी-नेहरू ही काँग्रेसची विचारसरणी आहे. ती अनेकांच्या मनात आहे. मी गांधी नेहरूंचा पुरस्कार करतो. आम्ही फक्त भाजपच्या विरोधासाठी एक आहोत असं नाही, तर आम्ही गांधी नेहरूंचा विचार पुढे नेला आहे. काही कारणांमुळं मतभेद झाल्यानं आम्ही वेगळे झालो असलो तरी आमची विचारसरणी एकच आहे", असं पवारांनी स्पष्ट केलं.

"आज मी, खरगे आम्ही इंडिया आघाडीत आहोत. तीच आमची विचारसरणी आहे. कार्यकर्त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून आधार दिला पाहिजे, याबाबत आम्ही चर्चा केली. त्यादिशेनचं आम्ही पावलं टाकत आहोत."

'मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपात विलिन होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना, "पक्ष एक होईल की नाही, हे मी आता सांगू शकत नाही. पण विचारसरणीची दिशा मात्र तीच आहे", असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी त्यांना मोदींकडून महायुतीबरोबर येण्याची ऑफर असल्याच्या मुद्द्यावरही उत्तर दिलं.

"ज्याच्याकडं शहाणपण आहे, ज्याला राजकारणातलं कळतं ती व्यक्ती कधीच मोदींबरोबर जाणार नाही. त्यांनी मला आमंत्रण दिलं असेल ते ठिक आहे, पण मोदी हे देशातले असे पहिलेच पंतप्रधान आहेत जे देशाच्या धार्मिक सामाजिक, ऐक्याला धक्का देत आहेत.

समाजाच्या लहान घटकांबद्दल विद्वेश पसरवण्याचं काम करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. या व्यक्तीच्या हातात देशाचं नेतृत्व सुरक्षित नाही, अशा व्यक्तीच्या आसपास जायचं नाही. व्यक्तीगत संबंध असतील याचा अर्थ वैचारिक दृष्टीनंही एकत्र काम करणं असं नाही," असं पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?