सोलापूर ते पुणे, मावळ ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग, तिसरा टप्पा 'भावने'वर स्वार - ब्लॉग

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा येता येता महाराष्ट्रात आरोपांच्या धुरळ्यापेक्षा भावनांचा कल्लोळ जास्त झाला आहे. हमरस्त्यांवरुन आणि पायवाटांवरुन फिरतांना तो पदोपदी जाणवतो आहे. भावनांचा ओव्हरडोस या निवडणुकीत मतदारांना आहे.

त्यामागे महाराष्ट्राची नजिकच्या इतिहासातली पार्श्वभूमी आहेच, पण 'आपली कामं महत्वाची' या जाणिवेबरोबरच मतदारांचा व्यक्ती म्हणून त्यातली 'इमोशनल इन्व्हॉल्व्हमेंट' अनेकांना जाणवते आहे.

भावनांचा उच्चारव महाराष्ट्रातल्या मतदाराला नवीन नव्हे. त्यांचा निवडणुकांवरचा परिणामही इथे नवीन नाही. मात्र या निवडणुकीत मात्र दोन्ही बाजूंकडून मोठ्या शिताफीनं भावनांना हाताळण्याचा प्रयत्न होतो आहे, हे फिरतांना दिसतं आहे. त्याला प्रतिसादही मिळतो आहे.

त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकत्याच एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे बाळासाहेब ठाकरेंशी असलेले संबंध, उद्धव ठाकरेंबद्दलचं त्यांचं मत याबद्दल बोलले.

एकीकडे भाजपा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात रण पेटलेलं असतांना, पूर्वी कधी न वापरल्या गेलेल्या भाषेचा एकमेकांविरुद्ध वापर होत असतांना, दुसरीकडे 'उद्धव माझे शत्रू नाहीत', हे मोदींनी म्हणणं, याची चर्चा लगेचच सगळीकडे सुरु झाली. दोन परस्परविरोधी भावना, एकाच वेळेस खेळामध्ये आल्या.

भावनांचा या निवडणुकीमध्ये उच्चारच उद्धव ठाकरेंकडूनही होतो आहे. शिवसेना, पक्षफुटी, चिन्हं जाणं, नाव जाणं, बाळासाहेबांचं नाव या सगळ्याचा वापर ते निवडणूक जाहीर झाल्यापासून करत आहेतच, पण या प्रचारातही प्रामुख्यानं करत आहेत. त्याचा परिणाम सभेतल्या प्रतिसादावरुन दिसतो आहे.

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रति निर्माण झालेली सहानुभूती हा या निवडणुकीतला अतिशय महत्वाचा मुद्दा बनला आहे जे जमिनीवर फिरतांना बहुतांशांना जाणवतो आहे.

त्याचा प्रत्यक्ष मतदानावर परिणाम कसा होईल, हे मात्र निकालांवरुनच समजेल. पण इथं मुद्दा हा की सहानुभूतीची भावना ही या निवडणुकीचं महाराष्ट्रातलं एक त्यवच्छेदक लक्षण बनलं आहे.

वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या भावना खेळामध्ये आहेत. उदाहरणार्थ, तिस-या टप्प्यात जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे, तिथे अशी सगळीकडे परिस्थितीनुरुप वेगवेगळी स्थिती निर्माण झाली आहे.

त्या मतदारसंघांमध्ये फिरतांना, लोकांशी, त्यांना बोलतांना ते जाणवतं. त्याच्या या नोंदी आहेत. त्यावरुन आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, पण महाराष्ट्रातल्या अगोदरच्या निवडणुकांपेक्षा यंदाची वेगळी का आहे, ते समजू शकेल.

बारामती आणि कुटुंबातल्या नात्यांची ओढाताण

पवारांची बारामती म्हणून प्रस्थापित झालेला हा राजकारणातला बालेकिल्ला यावेळेस 'पवार विरुद्ध पवार' अशा कुटुंबातल्या स्पर्धेनंच देशातला या निवडणुकीतला एक सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ आहे.

ही निवडणूक रिंगणातली लढाई नणंद विरुद्ध भावजय, बहिण विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या, अशा अनेक नात्यांमधली आहे.

या नात्यांचा, त्यांच्याशी जोडलेल्या भावनांचा एक माणूस म्हणून अशा राजकारणातल्या लढाईत त्रास होतो का? विशेषत: जेव्हा अगदी काही दिवसांपर्यंत हे एकसंध राजकीय कुटुंब होतं?

हा प्रश्न आम्ही दोघांनाही मुलाखतीदरम्यान विचारतो, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना. दोघांचंही उत्तर हे की 'आम्ही राजकारण आणि कौंटुंबिक भावना' वेगळ्या ठेवू शकतो. 'पक्ष फुटला, संघर्ष चव्हाट्यावर आला, तरीही आम्ही गेल्या दिवाळीत एकत्र आलो होतो ना?' असं उदाहरण दोन्हीकडून दिलं जातं.

पण भाषणांमधली भावनिक आव्हानं, 'सून आतली की बाहेरची', एकूण परिवारातली किती कुटुंबं कोणाच्या बाजूला, ही कोणाची शेवटची निवडणूक हे वाद पाहता आलेला ताण समोर बसलेल्या मतदारांनाही जाणवतो. 'मतदान करतांना भावनिक होऊ नका' असं भाषणातून आवाहन करतांनाही, त्यातही असलेलं भावनिक आवाहन लपत नाही, हे समोरच्या श्रोत्यांनाही जाणवतं.

इथल्या मतदारांच्या बाजूनं बघितलं तर ही त्यांच्यासाठी ही यापेक्षा वेगळी भावनिक लढाई आहे. अनेक वर्षं प्रस्थापित असलेल्या पवार कुटुंबाबद्दल इथं प्रत्येकाच्या काही भावना आहेत.

या पट्ट्यात फिरतांना, लोकांशी बोलतांना ते दिसतं. घरांमध्येही पिढ्यांमध्ये तो फरक दिसतो. गेल्या पिढीतले, ज्यांनी जुन्यापासून राजकारण पाहिलंय आणि नव्या पिढीतले, असा तो फरक आहे.

'वय झालं म्हणून घरातल्या वयस्कांना बाहेर जायला सांगायचं का' किंवा 'नव्या पिढीत ऊर्जा असूनही त्यांना का सतत दाबून ठेवलं, त्यांना संधी मिळायला पाहिजे होती' अशी परस्परविरोधी मतं चौकात गप्पा मारत थांबलं तरी ऐकायला मिळतात.

'आपल्या कुटुंबासाठी लढणारा मुलगा' किंवा 'वडीलांसाठी लढणारी लेक' अशा चर्चांनी त्यानं एक भावनिक नरेटिव्ह तयार झालंय. कुटुंब हा मध्यवर्ती घटक बनल्यानं, घराघरात पहिल्यापासून रुजलेल्या ज्या पारंपारिक कौटुंबिक भावना असतात, त्या आपोआपच इथल्या राजकीय मतांवर प्रभाव टाकत आहेत. जे काही वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबातल्या संघर्षानंतर मुंबईत झालं होतं.

"कोणालाही मत दिलं तरी ते एकाच घरात जाणार आहे ना? मग आपल्याला काय? एकाच दगडात दोन पक्षी मारायचे," वेल्हे गावातली शरद पवारांची सभा लांबच्या पारावरुन ऐकत बसलेले, सत्तरी ओलांडलेले एक आजोबा आम्हाला सांगतात.

"लोकांना सगळं कळतंय. अजितदादाला आपल्या बायकोला बहिणीपुढे उभं करायचं नव्हतं. भाजपानं त्यांना भरीला घातलं. गावात लोकांना सगळं कळतंय," ते आम्हाला पुढे सांगतात.

या उदाहरणावरुन लोकमत काय आहे हा निष्कर्ष काढता येणार नाही, पण भावना जोडल्या गेल्या असल्यानं गावखेड्यातल्या लोकांनी आपापल्या परीनं कसा अर्थ लावलाय याचा अंदाज येईल.

ज्या गावात सभेअगोदर जाऊन लोकांशी आम्ही बोलतो ते वास्तविक भोर तालुक्यातलं. हा कॉंग्रेसचा पट्टा आणि थोपटे कुटुंबाचं इथं वर्चस्व. एका जिल्ह्यात असूनही थोपटे आणि पवारांमध्ये फारसं सख्य नव्हतं. कधी सुप्त, कधी उघड राजकीय संघर्ष होता.

त्यामुळे या राजकीय भावनाही इथं काम करतात. शरद पवार अनेक वर्षांनंतर अनंतराव थोपटेंना भेटायला गेले याच्या बातम्या झाल्या होत्या. "पवारांबद्दलचा राग कायम आहे, पण संग्रामदादा म्हणाले म्हणून ताईंचं काम करतोय," संग्राम थोपटेंचा एक कार्यकर्ता सांगतो. "कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी ते एकाच कुटुंबात असणार आहे," तो दाखवून देतो.

मान गादीला... आणि मत?

केवळ कौटुंबिक, नात्यांच्या भावनाच निवडणुकीत आहेत असं नाही. आम्ही कोल्हापूरमध्येही फिरतो. इथं राजघराण्याचे प्रमुख असलेले शाहू महाराज छत्रपती पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत आणि मतदारांची स्थिती काहीशी दोलायमान झाली आहे.

कोल्हापूरच्या गादीबद्दल आदर आहे, अभिमान आहे, कारण त्याला एक मोठा इतिहास आहे. 'मान गादीला आणि मतही गादीला' असा प्रचारच इथं सुरु आहे.

प्रचारात अगदी थोरल्या शाहू महाराजांपासून, राधानगरीच्या धरणापासून सगळा इतिहास ऐकू येतो. त्यामुळेच या आदराच्या भावनेचं निवडणुकीच्या लढाईतलं अस्तित्व नाकारता येत नाही.

त्याला उत्तर देण्यासाठी समोरच्या स्पर्धकांनी काही दशकं जुन्या दत्तक प्रकरणापर्यंत चर्चा नेली आहे. पण त्यामुळे इतिहासाविषयीच्या भावनांचा कल्लोळ हे कोल्हापूरच्या निवडणुकीचं यंदाचं वैशिष्ट आहे.

दोन्ही बाजूंकडून बोलणारे सामान्य नागरिक भेटतात. काही आदरातून आता राजघराण्याची परतफेड करण्याची भावना बोलून दाखवतात, तर काही प्रश्न विचारतात की महाराज इतर लोकप्रतिनिधींसारखे कधीही उपलब्ध असणार आहेत का? भावना आणि व्यवहार, अशी ही जुगलबंदी आहे.

एस टी बसस्थानकाबाहेर एका रिक्षावाल्यांना याबद्दल विचारलं तर म्हणाले, "जिंकले काय हरले काय, महाराज हे आमच्यासाठी महाराजच राहणार आहेत. जे काम करणारे असतील त्यांच्यासाठीच लोक मत देतील."

शाहू महाराज छत्रपती जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की ही जी महाराज असण्याबद्दलची लोकांची पहिल्यापासूनची भावना आहे, ती मतदारांमध्ये उमेदवार म्हणून फिरतांना कशी जाणवते? "एखाद्याची पार्श्वभूमी जी आहे ती जाऊ शकत नाही, पण निवडणुकीत सगळे सारखेच असतात," ते म्हणतात.

इतिहासातून चालत आलेला आदर आणि पाच वर्षांसाठी असलेली निवडणूक, याचा विचार करतांना मतदार भावना आणि व्यवहार हे वेगळे कसे करतात याची अनेक उदाहरणं आहेत. देशात राजघराण्यातल्या अनेक उमेदवारांना संमिश्र अनुभव आला आहे.

शेजारी साता-यामध्ये उदयनराजे भोसले निवडून आलेही आणि गेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा ते पुन्हा साता-यात निवडणुकीला उभे आहेत. सातारा आणि कोल्हापूर, दोन्हीकडचे मतदार आदराची ऐतिहासिक भावना आणि निवडणुकीचा व्यवहार यांचा एकत्र विचार कसा करतात हे महत्वाचं ठरेल.

नोंदीतलं एक वाक्य मात्र न विसरता येण्यासारखं. कागलच्या सभेत आणि भोवताली वातावरण काय आहे हे पाहण्यासाठी गेलो असतांना, तिथं चौकात भेळेची गाडी चालवणारा एक तरुण गप्पा मारत होता. राजकारणाच्या गप्पा झाल्यावर शेवटी तो एकच वाक्य म्हणाला, "काही झालं तरी शेवटी आपल्याला भेळच करायची आहे ना?"

सांगली: अन्यायाची भावना

भावनेनी भारलेली वाटावी अशी पश्चिम महाराष्ट्रातली अजून एक लढत म्हणजे सांगलीची. सांगली ही वास्तविक सरळ लढतींची जागा. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा अशाच नजीकच्या इतिहासात इथं लढती झाल्या आहेत.

पण यंदा महाविकास आघाडीत आणि कॉंग्रेसमध्ये इथं जे काही घडलं, त्यानं या मतदारसंघातलं वातावरण एकदम बदलून गेलं आहे आणि त्यामुळे अन्यायाची भावना इथं एकमद केंद्रस्थानी आली आहे.

वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इथल्या लोकसभेच्या जागेसाठी ब-याच काळापासू तयारी करत होते. गेली निवडणूक त्यांनी लढवलीही होती, पण ते पराभूत झाले.

यंदा ते कॉंग्रेसचे उमेदवार असतील असंच चित्र होतं. सांगली हा कॉंग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असल्यानं, पक्षाची ताकद असल्यानं, ती जागा त्यांनाच मिळेल असा कयास होता.

पण शिवसेनेनं कोल्हापूरच्या जागेवरचा दावा शाहू महाराज छत्रपतींसाठी सोडल्याचं निमित्त झालं आणि सेनेनं सांगलीवर दावा केला. नुसताच दावा केला नाही, तर उमेदवारही घोषित केला.

त्यानंतर विशाल पाटील, विश्वजित कदम, नंतर कॉंग्रेसचे राज्यातले काही नेते यांनी बरेच प्रयत्न केले. पण सेना मागे हटली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी बंड केलं आणि ते इथून अपक्ष उमेदवार आहेत.

त्यांच्यावर झालेला अन्याय ही अचानक सांगलीच्या निवडणुकीची थिम बनली आहे. सांगलीच्या रस्त्यांवरही ते जाणवतं, दिसतं. कॉंग्रेसचं स्थानिक केडरही त्यांच्यासोबत प्रचारात आहे, असं चित्र आहे. अनेक नगरसेवक, काही इतर पक्षातलेही, पाटील यांच्या प्रचारात आहेत.

स्थानिक पत्रकार सांगतात की अन्यायाची ही भावना काही दिवसांपूर्वीपर्यंत नव्हती. पाटील पक्षाचे अधिकृत उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती. पण ज्या प्रकारे त्यांना बाजूला केलं गेलं, ते पाहून इथली निवडणूक एकदम भावनिक झाली.

अर्थात भावनेवरच निवडणूक पूर्णपणे अवलंबून असेल असं नाही. इथं भाजपाचीही मोठी ताकद आहे. शिवाय राष्ट्रवादी काही तालुक्यांमध्ये आहे. तिरंगी लढतीमध्ये कोण किती मतं घेतो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

अशाच काहीशा भावनेची अपेक्षा शेजारच्या हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी करत असतील. शेट्टी जेव्हा २००९ मध्ये पहिल्यांदा इथून खासदार झाले तेव्हा प्रस्थापित साखर कारखादारांविरोधातल्या त्यांच्या आंदोलनांतून एक जनभावना तयार झाली होती. लोकांनी वर्गणी काढून त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि त्यांनी आश्चर्यकारक निकालही दिला.

पण नंतरच्या राजकारणात त्यांच्याबद्दलची, आंदोलक नेत्याबद्दलची, भावना कमी झाली आणि त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. अगोदर भाजपा, नंतर महाविकास आघाडी, यांच्यासोबत जाण्यानं आता आपण प्रस्थापितांविरोधान नाही असा जनतेचा गैरसमज झाल्याचं आणि त्याचा फटका बसल्याचं राजू शेट्टीही बोलतांना मान्य करतात. त्यामुळेच यंदा ते स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.

उद्धव ठाकरेंनी 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवण्याची घातलेली गळ त्यांनी झिडकारली. पण शेतकरी आंदोलनातून तयार झालेली त्यांच्याविषयीची सामान्य शेतक-यांची भावना त्यांना यंदा पुन्हा तारेल का, याचं उत्तर निकालानंतर मिळेल.

दुष्काळापासून शेतीप्रश्नापर्यंत, आरक्षणापासून नोक-यांपर्यंतचे अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडलेले संघर्षाचे प्रश्न या निवडणुकीत आहेत. ते नाकारता येत नाहीत.

पण त्याबरोबरच, जी राजकीय परिस्थिती गेल्या काळात महाराष्ट्रात तयार झाली, त्यातून आलेली काहींना उद्विग्नता, काहींना अलिप्तता आणि काहींना चीड यांच्या मिश्रणातून भावना हा एक महत्वाचा फोर्स चालू निवडणुकीत आहे.

पक्षांतरं, पक्षफुटी, आघाड्यांची जुळवाजुळव, यंत्रणांच्या कारवाया, त्यातून तयार झालेलं राजकारण हे सगळे विषय गावखेड्यांपर्यंत, वस्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्याबद्दल लोकांची मतं तयार झाली आहेत.

त्यात सोशल मीडियानं मोठी भूमिका वठवली आहे. सध्या प्रचाराच्या काळातही समाजमाध्यमांतल्या भाषेवरुन ते लक्षात येईल. भावनांचा हा खेळ मात्र निकाल कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे मात्र सांगण अनेकांसाठी कठीण आहे.

गेल्या दशकभराच्या काळात भाजपाची हिंदुराष्ट्रवादाची भूमिका, त्यातून निर्माण झालेल्या आक्रमक भावना आणि निवडणुकांच्या निकालावरचा परिणाम हा मुद्दाही या निवडणुकीत आहे.

विशेषत: राम मंदिराच्या उद्घाटनानंतर श्रद्धेच्या भावनेनं त्याकडे बघणा-यांच्या राजकीय मतांवर परिणाम होणार, हेही निरिक्षण अनेकांनी नोंदवलं आहे. याशिवाय प्रचारातले मुस्लिम आरक्षणापासून समान नागरी कायद्यापर्यंत मुद्द्यांचा परिणामही शक्य आहे.

भावनांच्या आणि वास्तवातल्या व्यवहारांच्या दरम्यान सध्याची निवडणूक झोके घेते आहे. त्यामुळेच ती एवढी चुरशीची बनली आहे.