कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषी पप्पू शिंदेची येरवडा तुरुंगात आत्महत्या

    • Author, नितीन नगरकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे यानं पुण्यातील येरवडा तुरुंगात आत्महत्या केली. पप्पू शिंदे हा 32 वर्षांचा होता.

आज (10 सप्टेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली.

2017 पासून पप्पू शिंदे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. कोपर्डी बलात्कार प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पप्पू शिंदे याला 29 नोव्हेंबर 2017 रोजी शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात आणण्यात आलं.

पप्पूला फाशीची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती.

नेमकं काय झालं?

या संपूर्ण घटनेविषयी येरवडा मध्यवर्ती कारागृहानं तुरुंग अधिकारी एस.आर. साळवे यांच्या स्वाक्षरीसह काढलेलं पत्रक समोर आलं आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर 2023 रोजी सुरक्षा क्र. 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये पप्पू शिंदेने जीवन संपवलं.

पहाटे 5 वाजून 58 मिनिटाच्या सुमारास सुरक्षा रक्षक निलेश कांबळे यांना पप्पूचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी संबंधितांना कळवलं. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांनी कारागृह रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, पप्पूचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पप्पूच्या मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानं नियमित औषधोपचार सुरू होते.

कोपर्डी बलात्कार प्रकरण

13 जुलै 2016च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले होते. घटनेच्या 16 महिन्यानंतर विशेष न्यायालयानं तिघांना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.

आरोपी क्रमांक 1 जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, आरोपी क्र. 2 संतोष भवाळ आणि आरोपी क्र. 3 नितीन भैलुमे अशी त्यांची नावे आहेत.

तिन्ही आरोपी कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. त्यापैकी दोघेजण हे कोपर्डीचेच राहणारे होते. तर संतोष हा दुसऱ्या गावचा होता.

अहमदनगर विशेष न्यायालयानं तिघांना IPCच्या 376 (2) (i) (m); 302, 354 - A (1) (i) नुसार शिक्षा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त तिघांनाही 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

या प्रकरणात न्यायालयानं 31 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती.

कोपर्डी प्रकरणाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

  • 13 जुलै 2016: 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला.
  • 15 जुलै 2016: अहमदनगर पोलिसांनी आरोपी जितेंद्र शिंदेला श्रिगोंद्याहून ताब्यात घेतलं.
  • 16 जुलै 2016: दुसरा आरोपी संतोष भवळला कर्जतहून पोलिसांनी ताब्यात घेतलं.
  • 17 जुलै 2016: तिसरा आरोपी नितिन भैलुमेला पुण्यातून ताब्यात घेतलं.
  • 24 जुलै 2016: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवला जाईल असं सांगण्यात आलं.
  • 7 ऑक्टोबर 2016 - 3 महिन्यानंतर पोलिसांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात 350 पानी चार्जशीट दाखल केलं.
  • 18 नोव्हेंबर 2017 - विशेष न्यायालयानं अल्पयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप निश्चित केला.
  • 29 नोव्हेंबर 2017 - न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)