चोरी झालेला मोबाईल फोन गुगल मॅपच्या मदतीने 3 तासांत असा शोधला गेला

    • Author, थंगादुरई कुमारपांडियन
    • Role, बीबीसी तमिळ

कन्याकुमारीतील एका मुलानं वडिलांचा चोरी झालेला फोन गुगल मॅपच्या मदतीनं 3 तासांत शोधून काढला.

हा फोन रेल्वे प्रवासादरम्यान नेल्लईजवळ चोरी झाला होता. त्यांनंतर त्यांनी नागरकोइल बस स्थानकावर चोराला पकडलं आणि त्याच्याकडून फोन परत मिळवला.

पण हे कसं शक्य झालं? तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेला फोन सहज परत मिळवता येऊ शकतो का?

नेमकं काय घडलं?

कन्याकुमारी जिल्ह्याच्या नागरकोइलच्या वल्लालरनगर मधील बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी पलानीस्वामी गेल्या रविवारी (4 फेब्रुवारी) ला सकाळी-सकाळी नागरकोइलहून त्रिचीला जाण्यासाठी कांचीपुरमच्या रेल्वेत बसले होते.

रेलवे नेल्ली रेल्वे स्टेशनजवळून जात होती, त्यावेळी त्यांची हँडबॅग आणि मोबाईल फोन चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यांच्या मुलानं गुगल मॅपच्या ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून चोराला पकडलं आणि चोरी झालेल्या फोनसह सर्व सामानही परत मिळवलं.

हे सगळं कसं घडलं? चोराला पकडण्याच्या या रंजक घटनेबाबत राज भगत यांनी X साइटवर पोस्ट केली. अनेकांचं लक्ष या पोस्टनं आणि त्यातील संपूर्ण घटनाक्रमानं वेधून घेतलं.

चालत्या रेल्वेत फोनची चोरी

घटनेबाबत बीबीसीबरोबर बोलताना राज भगत यांनी म्हटलं की, "मी 4 फेब्रुवारीला पहाटे 1:43 वाजता वडिलांना सोडायला गेलो होतो. ते त्रिचीला त्यांच्या खासगी कामासाठी चालले होते. त्यांना नागरकोइल स्थानकावर कांचीपुरम एक्सप्रेसमध्ये बसवून राज घरी आले.

"पहाटे रेल्वे स्थानकांवर फार गर्दी नसते. पहाटे 03.51 वाजता मला दुसऱ्या नंबरवरून वडिलांचा फोन आला.

वडिलांनी त्यांचा फोन आणि हँडबॅग चोरी झाली असून रेल्वेत सापडत नसल्याचं सांगितलं. तसंच नागरकोइल रेल्वे स्थानकावर जो व्यक्ती त्यांच्याबरोबर रेल्वेत बसला होता. तोही नसल्याचं वडिलांनी सांगितलं."

मोबाईल फोन बँक खात्यांशी लिंक असल्यामुळं पैसे चोरी होण्याची शक्यता वडिलांनी व्यक्त केल्याचं राज म्हणाले.

कुटुंबातील सदस्य Google Maps द्वारे संपर्कात

ते असंही म्हणाले की, "आमच्या कुटुंबातील सदस्य कायम गुगप मॅप्सद्वारे एकमेकांचं लोकेशन एकमेकांशी शेअर करत असतात. या द्वारे(Google Map permanent location sharing) आम्हाला सदस्य नेमके कुठं आहेत, हे समजायला मदत मिळते. त्यामुळं जेव्हा वडिलांनी त्यांचा फोन हरवल्याचं सांगितलं तेव्हा मी, Google Map अॅपवर गेलो."

"त्यावेळी माझ्या वडिलांचा फोन तिरुनेलवेली मेलपालयम रेल्वे ट्रॅकवर असल्याचं समजलं. मला वाटलं की कदाचित फोन पडला असेल. पण काही वेळानं फोनचे सिग्नल पुन्हा रेल्वे ट्रॅकवरून पुढं जाताना दिसले," असं ते म्हणाले.

"फोन चोरी करणारा व्यक्ती दुसऱ्या रेल्वेत बसून नागरकोइलला परत येत असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पोलिसांना तशी माहिती दिली."

"रेल्वे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, कन्याकुमारीला जाणारी रेल्वे येणार आहे. त्यामुळं मी मित्राबरोबर रेल्वे स्टेशनला गेलो आणि रेल्वेची वाट पाहू लागलो. कन्याकुमारी एक्सप्रेस नागरकोइल स्टेशनला पोहोचली तेव्हा खूप प्रवासी उतरले. मी मुख्य दाराजवळ उभा राहिलो आणि वडिलांच्या बॅगचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी मी गुगप मॅपवर दाखवलं जाणारं लोकेशनही पाहत होतो."

रेल्वेतून उतरून बसमध्ये जाणाऱ्या चोराला असं पकडलं

राज भगत म्हणाले की, सर्व प्रवासी गेले तरी त्यांना चोर सापडला नाही.

"नंतर पुन्हा त्यांना गुगल मॅप्सच्या माध्यमातून वडिलांच्या फोनबाबत माहिती मिळाली. त्यात नागरकोइल अण्णा बस स्थानकाचं लोकेशन दाखवलं. जेव्हा रेल्वे आली होती, तेव्हाच एक बस प्रवाशांना घेऊन रेल्वे स्थानकावरून निघाली होती. चोर बसमध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही बसचा पाठलाग केला."

"आम्ही पहाटे जवळपास 5 वाजता नागरकोइलच्या अण्णा बस स्थानकावर पोहोचलो. त्यावेळी स्थानकावर जवळपास 200 लोक होते. त्यामुळं आम्हाला परत शोधणं कठिण झालं," असं राज भगत म्हणाले.

ते पुढं म्हणाले की, "गुगल मॅपमुळं आम्हाला समजलं की, आम्ही जिथं उभं होतो तिथून अवघ्या दोन मीटर अंतरावर फोन होता. त्याठिकाणी एका दुकानासमोर बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. आणखी एक संशयास्पद व्यक्तीही होता. मी त्याच्याजवळ गेलो तेव्हा, त्याच्याकडं वडिलांचा फोन आणि बॅग होती."

"मी आणि माझ्या मित्रानं चोराला पकडलं आणि उलट तोच चोर-चोर असं ओरडू लागला. नंतर लोक जमले तेव्हा आम्ही वडिलांचा फोन त्याच्या बॅगमधून काढला. त्याच्याकडं बाकीचं सामान नसल्याचं तो म्हणाला."

पोलिसांच्या तपासात मिळालं इतर सामान

चोर पकडल्या गेल्यामुळे पोलिसही त्याठिकाणी पोहोचले होते. त्याची पोलिसांनी चांगलीच चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडं मोबाईल फोन, 1000 रुपये रोख, कारची किल्ली आणि ब्लूटूथ हेडफोनही मिळाले. ते त्यानं लपवून ठेवलं होते.

आम्ही चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि घरी आलो, असं ते पुढं म्हणाले.

राज भगत हे एका खासगी कंपनीत काम करतात. तांत्रिक कामाची माहिती असल्यानं त्यांना गुगल मॅप्सचा वापर करून सर्व समजणं आणि फोन शोधणं सोपं गेलं.

"सामान्य व्यक्तीला सुरुवातीला याचा वापर करणं कठिण ठरू शकतं. पण एकदा सवय झाली, तर अशा काळात ही सेवा फायद्याची ठरू शकते," असं त्यांनी म्हटलं.

हरवलेला फोन परत मिळणं शक्य आहे का?

आम्ही सायबर सोशल अॅक्टिव्हिस्ट विनोद अरुमुगथ यांना विचारलं की, मोबाईल फोन हरवल्यास तो शोधण्याचा मार्ग आहे का?

बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले की, "तुमचा फोन हरवला तर शोधता येईल याची 100 टक्के खात्री नाही. पण काही मार्गांनी आपण त्या फोनचे लोकेशन मिळवू शकतो."

"तुम्हाला Google Map या अॅपद्वारे जवळच्या मित्रांबरोबर तुमचं लोकेशन शेअर करावं लागेल. त्यामुळं तुमचा फोन हरवला तर या माध्यमातून त्याचं लोकेशन समजू शकतं."

त्याशिवाय तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून गुगल फाइंड माय डिव्हाइस डाऊनलोड करून आणि ई मेलची माहिती देऊन तुमचा फोन कुठे आहे, याची माहिती मिळवू शकता.

त्याचप्रकारे केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं फोन चोरीचा शोध लावण्यासाठी एक इंटरनेट सेवा सुरू केली आहे. त्याच्या https://www.ceir.gov.in वेबसाइटवर जावं. त्याठिकाण हरवलेला फोन, वेळ, तारीख, मॉडेल, चोरीचे ठिकाण, IMEI नंबर, पोलिस तक्रारीचा क्रमांक याबाबत माहिती द्या. त्यावरून IMEI नंबर शोधला जाईल.

जर तुमचा फोन बंद असेल तर तो शोधला जाण्याची शक्यता नाही. तुमच्या फोनमध्ये दुसरं सिम टाकलं किंवा त्याचा पुन्हा वापर झाला तरच फोन शोधणं शक्य होतं, असंही ते म्हणाले.