'स्थलांतरित लोक पाळीव कुत्री खातात', ट्रम्प यांचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फेटाळला

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसरे प्रेसिडेन्शियल डिबेट आज अमेरिकेतील फिलाडेल्फिया या ठिकाणी झाले.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध विषयावर आपली मतं मांडली.

अमेरिकेत आलेले स्थलांतरित लोक आपल्या पाळीव प्राण्यांना खातात असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांचा हा दावा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फेटाळला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'प्रेसिडेन्शियल डिबेट' हे महत्त्वाचे मानले जाते.

प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमधील वादविवाद.

5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

या डिबेटमधून दोन्ही उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी आपण किती योग्य आहोत हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो.

या डिबेटमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा झाली त्यावर आपण एक नजर टाकू.

डिबेटच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अमेरिकेतील अर्थव्यवस्थेवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.

त्यावर ट्रम्प यांनी ‘तुम्हाला खरंच वाटतं का, आधीच्या चार वर्षांच्या तुलनेत अमेरिका चांगल्या स्थितीत आहे?’, असा प्रतिप्रश्न केला.

यावर उत्तर देताना कमला हॅरिस यांनी, आपण संधी निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेचं नियोजन करत असल्याचं त्या म्हणाल्या.

ट्रम्प गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही अब्जाधीश आणि व्यावसायिकांना करामध्ये सूट देण्याची योजना आखत असल्याचं हॅरिस म्हणाल्या.

ट्रम्प यांच्या योजनेवर 16 नोबल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ज्ञांनी टीका केली असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास पुढील वर्षी आर्थिक मंदी येईल, असं हॅरिस म्हणाल्या.

“डोनाल्ड ट्रम्प मंदीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगाराच्या काळात देशाला वाईट परिस्थितीत टाकून गेले आणि या परिस्थितीला आम्हाला हाताळावं लागलं,” असं हॅरिस म्हणाल्या.

‘प्रोजेक्ट 2025’ ही योजना सर्वांत धोकादायक योजना असल्याचं हॅरिस यांनी म्हटलं. ट्रम्प परत सत्तेत आल्यास ते याची अंमलबजावणी करतील, असा आरोप हॅरिस यांनी केला.

गर्भपाताच्या मुद्यावरून खडाजंगी

गर्भपात अधिकाराबाबतच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर तीव्र टीका केली.

कमला हॅरिस यांच्यावर गर्भपात अधिकाराचा नियम बदलण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. “डेमोक्रॅट्स 9 व्या महिन्यांत गर्भपात करण्याची परवानगी देऊ इच्छितात”, असं ट्रम्प म्हणाले.

"डेमोक्रॅट्स हे कट्टरवादी आहेत, कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडलेल्या टीम वॉल्ट्झ यांनी नवव्या महिन्यात गर्भपाताच्या अधिकाराला पाठिंबा दिला," असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

‘बाळाच्या जन्मानंतर त्याला मारून टाकण्याचा अधिकार’ या सरकारला द्यायचा असल्याच्या ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर देताना, असा कोणत्याच राज्यात अशाप्रकारचा नियम नसल्याचं हॅरिस म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीश, ज्यांनी दोन वर्षाआधी गर्भपाताच्या अधिकारांमध्ये बदल केले होते. त्यांची नियुक्ती ट्रम्प यांनी केली होती, असंही हॅरिस यांनी नमूद केलं.

ट्रम्प यांचा आरोप- स्थलांतरित लोक पाळीव कुत्र्यांना खातात

या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी स्थलांतरित नागरिकांवर आरोप केले. ‘ते कुत्र्यांना खातात, पाळीव प्राण्यांना खातात’, असा दावा ट्रम्प यांनी केला.

एबीसी प्रेसिडेन्शियल डिबेटचे मॉडरेटर डेविड मुइर यांनी ट्रम्प यांच्या आरोपांचं खंडन केलं.

हे आरोप स्प्रिंगफील्ड प्रशासनाने फेटाळले आहेत. 'हे सिद्ध करणारा कोणताच पुरावा नसल्याचं', स्प्रिंगफील्डच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

‘मी टीव्हीवर पाहिलंय, काही लोकांनी त्यांच्या कुत्र्याला चोरून खाल्ल्याचं सांगितलंय’, असं ट्रम्प म्हणाले. यावर कमला हॅरिस यांनी, ‘ट्रम्प अतिशयोक्तीपूर्ण बोलतात’ अशी प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणावर स्प्रिंगफिल्डच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी व्हेरिफायशी बोलताना, अशाप्रकारच्या घटना घडल्याचा कुठलाच विश्वसनीय पुरावा नसल्याचं सांगितलं.

कॅपिटल हिलमधील दंगलीवरील आरोपांबाबत ट्रम्प काय म्हणाले?

दि एबीसी न्यूज प्रेसिडेंशियल डिबेटदरम्यान कॅपिटल हिलवरील दंगलींबाबत प्रश्नोत्तरांवरून वाद रंगला. हल्ल्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील त्यांच्या भाषणात त्यांनी समर्थकांना कॅपिटॉलकडे मोर्चा काढण्यास सांगितलं आणि टीव्हीवर हल्लाही पाहिला. त्यानंतर, दंगेखोरांना तेथून निघून जाण्याचं आवाहन करणारं ट्वीट केलं. या आरोपांवर आपली भूमिका काय? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला.

त्यावर, ‘भाषणादरम्यान शांतीपूर्वक आणि देशभक्तीच्या उद्देशा'ने आपण तसं बोललो, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

मात्र, भाषणात आपण हिंसाचारासाठी कोणतंही आवाहन केलं नसल्याचंही ट्रम्प म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यावर मॉडरेटर यांनी, ‘तुम्ही त्यादिवशी जे काही केले, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला असता ट्रम्प यांनी ‘त्यांनी मला भाषण देण्यास सांगितलं, याव्यतिरिक्त माझा याच्याशी काही संबंध नाही’ असं उत्तर दिलं.

तसंच, सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचं म्हणत डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना घटनेसाठी जबाबदार ठरवलं.

6 जानेवारी 2021 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर धावा केला होता. ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिलवरील दंगली भडकावण्याचे आरोप आहेत.

परंतु, हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. या घटनेत 1200 हुन अधिक लोकांना अटक करण्यात आली असून शेकडो लोकांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

'हॅरिस सत्तेत आल्यास दोन वर्षांत इस्रायलचं अस्तित्व संपुष्टात येईल'- ट्रम्प

‘दि एबीसी न्यूज प्रेसिडेन्शियल डिबेट’दरम्यान कमला हॅरिस यांनी इस्रायल-गाझा युद्धावरून प्रश्न उपस्थित केले.

त्या म्हणाल्या, “इस्रायलला स्वत:च्या सुरक्षेचा अधिकार आहे. मात्र, इस्रायल हे कसं करत आहे हे ही बघणं महत्वाचं आहे.” हे युद्ध त्वरित थांबायला हवं, अशी भावना हॅरिस यांनी व्यक्त केली.

यावर ट्रम्प यांनी म्हटले की, आपण राष्ट्राध्यक्षपदी असतो तर हा संघर्ष सुरू झाला नसता.

पुढे ट्रम्प म्हणाले, “हॅरिस इस्रायलचा द्वेष करतात. जर त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर इस्रायल दोन वर्षांत संपुष्टात येईल.”

'मी या समस्येचं त्वरीत निदान करू शकतो', असं ट्रम्प म्हणाले.

'पुन्हा निवडून आल्यास रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणू', असंही त्यांनी म्हटलं.

हॅरिस यांनीही इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा देण्याचा देण्याच्या दाव्यांचा वारंवार उल्लेख केला.

तसंच ट्रम्प यांनी केलेले दावे फेटाळून लावत ‘जनतेला भरकटवून त्यांची दिशाभूल’ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप हॅरिस यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या, “त्यांना हुकूमशहा आवडतात, त्यांनाही हुकूमशहा व्हायचे होते. ते ही अगदी पहिल्या दिवसापासून.”

तर, लष्करी नेत्यांनी ट्रम्प यांना ‘लज्जास्पद’ असे म्हटल्याचंही हॅरिस यांनी सांगितलं. दोघाही उमेदवारांदरम्यानची ही बैठक अत्यंत तणावपूर्वक होती.

'मला काही फरक पडत नाही'

या चर्चेदरम्यान कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीकाही केली. हॅरिस यांनी ट्रम्पविरोधात सुरू असलेले खटले आणि 2020 च्या निवडणुकांवरून ट्रम्पवर निशाणा साधला.

चर्चेदरम्यान, मॉडरेटर्सनी ट्रम्प यांना हॅरिस यांच्या वर्णावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर प्रश्न उपास्थित केला मात्र ट्रम्प यांनी उत्तर देण्याचे टाळले. ‘मला काही फरक पडत नाहीत, की त्या काय आहेत?’ असं ट्रम्प म्हणाले.

यावर हॅरिस यांनी उत्तर देताना, 'ही एक शोकांतिका' असल्याचं म्हटलं. “ज्या व्यक्तीने अमेरिकेला वांशिक आधारावर विभाजित करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, त्यांना आज राष्ट्राध्यक्ष व्हायचे आहे,” अशी टीका हॅरिस यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)