'सायबर हेल्पलाईनमधून बोलतोय', कर्मचारी असल्याचं भासवून फसवणूक झालेल्यांची पुन्हा ऑनलाईन लूट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या लोकांना हेरून, त्यांची मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनच पैसे उकळणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आली आहे.
ऑनलाईन व्यवहारांसाठी असलेल्या बँकिंग सुविधा, विविध अॅप किंवा सोशल मीडियासारख्या गोष्टींचा वापर करून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक कशी करतात हे अनेकदा आपल्या कानावर येतच असतं.
पण आता, आधीच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्याच अडकलेले लोक हे पुन्हा सायबर गुन्ह्याचे शिकार होत आहेत, हेच या प्रकरणातून समोर आलं आहे.
आरोपी सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या लोकांची माहिती मिळवून त्यांना पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडा घालत असे.
मात्र या आरोपीनं लोकांना असं कसं फसवलं? हे संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.
अशी केली फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पनवेलमधील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय आरोपीने पोलिसांकडे दाखल असलेल्या सायबर गुन्ह्यांची माहिती मिळवत याची सुरुवात केली.
आरोपी संबंधित तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांना तो 1930 सायबर हेल्पलाईन आणि नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (14C) चा कर्मचारी असल्याचं सांगत असे.
त्यासाठी आरोपी पीडितांना व्हॉट्सअॅपवर बनावट ओळखपत्र (आय-कार्ड) पाठवत असे. त्यामुळं पीडित सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकत असत.

फोटो स्रोत, Getty Images
ओळखपत्रावर,'भारत सरकार, गृह मंत्रालय National Cyber Crime Reporting, Portal (14C), भारताची राजमुद्रा, Anil Darekar - Cyber Legal & Technical' असं नमूद केलेलं असायचं.
त्यामुळं पीडितांचा त्याच्यावर सहज विश्वास बसायचा.
पीडितांचा आपल्यावर विश्वास बसलाय हे पाहून हळूहळू आरोपी न्यायालयीन कामकाज, कागदपत्रांचा खर्च, वकिलाची फी इत्यादी वेगवेगळी कारणं देऊन त्यांच्याकडे पैसे मागत असे.
त्यासाठी आरोपी त्याचे बँक अकाऊंट नंबर्स किंवा यूपीआय नंबर त्यांना पाठवत असे.
सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळतील या आशेनं पीडितही आरोपीला पैसे देत असत.
मात्र, आपली पुन्हा फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच पीडितांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.
तपासात काय आलं समोर?
मुंबई पोलिसांना अशा अनेक प्रकरणांच्या तक्रारी मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटवून पनवेलमधील राहत्या घरातून सायबर पोलिसांच्या पथकानं 10 जुलैला त्याला अटक केली.
अटक केलेल्या आरोपीकडून पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यात एक मोबाईल फोन, डेबिट कार्ड व 'भारत सरकार, गृह मंत्रालय National Cyber Crime Reporting, Portal/ 14C व भारताची राजमुद्रा' अशी माहिती असलेल बनावट ओळखपत्र यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 319(2), 336 (2), 336(3), 338, 340(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT कायदा) कलम 66 (क), 66 (ड) अंतर्गत बनावट ओळख निर्माण करुन फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानं महाराष्ट्रातील अनेक लोकांची फसवणूक केली असल्याचं या तपासातून समोर आलं आहे.
त्यानं अजून किती लोकांना अशाप्रकारे गंडा घातलाय, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
या प्रकरणातून असं दिसून येतं, की गुन्हेगार आता पीडितांच्या असहाय्यतेचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.
मुंबई पोलिसांनी सामान्य नागरिकांना आवाहन केलं आहे, की जर कोणी सरकारी संस्थेचा सदस्य असल्याचं सांगून पैसे मागत असेल तर त्याची नीट चौकशी करा. संशय आल्यास ताबडतोब सायबर हेल्पलाइनवर तक्रार दाखल करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार -
14C व 1930 सायबर हेल्पलाइनकडून अशा प्रकारची माहिती घेतली जात नाही.
14C चा कर्मचारी व 1930 सायबर हेल्पलाइनमधून बोलणारा व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे याबाबत खात्री न करता कोणाचंही ऐकून ऑनलाईन रक्कम पाठवू नये.
व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर '14C चा कर्मचारी व 1930 सायबर हेल्पलाइन' असा प्रोफाईल फोटो असलेल्या अनोळखी मोबाईल क्रमांकाची पडताळणी करूनच त्याला प्रत्युत्तर द्यावं.
असा प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 शी संपर्क साधावा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











