भंडाऱ्यात ईव्हीएममधून उमेदवाराचं नाव गायब झाल्याचे प्रकरण काय? 7 अधिकारी निलंबित

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्यामुळं यावर वारंवार चर्चा होत असते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एक प्रकार समोर आलेला आहे.

ईव्हीएममध्ये एक गोंधळ झाल्याचा प्रकार भंडारा नगरपालिका निवडणुकीत घडला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला? हा प्रकार समोर कसा आला? आणि कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली? पाहुयात.

ईव्हीएममधून उमेदवाराचं नाव गायब

राज्यभरातील नगरपालिकांबरोबरच नुकतीच भंडारा नगरपालिकेचीही निवडणूक पार पडली. 21 डिसेंबरला मतमोजणी झाली.

पण, मतमोजणीच्या वेळी लक्षात आलं की, एका उमेदवाराच्या नावासमोरचं तसंच नोटाच्या समोरचं बटन गायब आहे.

या उमेदवार होत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या करुणा राऊत. त्या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत होत्या.

मतमोजणीच्या वेळी त्यांची मतं दाखवली जात नव्हती. त्यांचं नावही सुद्धा मशिनवरून गायब होतं. त्यामुळं त्यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी आक्षेप घेतला.

भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष सावन कुमार यांना पत्र लिहून संबंधित उमेदवारानं तक्रार केली. मतदानाच्या वेळी उमेदवाराचं नाव होतं आणि नंतर ते कसं गायब झालं? असा सवाल चरण वाघमारे यांनी उपस्थित केला.

त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून सात अधिकाऱ्यांना शासकीय कामात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे कसूर केल्याच्या आरोपाखाली निलंबित केलं आहे.

यामध्ये तीन शिक्षक आणि तीन इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की "सदस्य 3 अ पदासाठी एकूण 5 उमेदवार आणि 1 नोटा असे सहा पर्याय असणं आवश्यक होतं. पण, मतदान यंत्र ( बॅलेट युनिट) तयार करताना उमेदवार क्रमांक 5 व 6 ची नावं झाकली गेली. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान फक्त चार उमेदवारांसाठी उपलब्ध झालं.

ही गंभीर चूक असून हे संबंधित प्रक्रिया हातळणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली."

मतदानाच्या वेळी नाव होतं, उमेदवाराचा दावा

"प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी करुणा राऊत या उमेदवाराचं नाव होतं. मॉक पोल वेळी सुद्धा त्यांचं नाव होतं.

आमच्या उमेदवारांनी सर्व चौकशी करून मॉक पोलच्या वेळी सहीदेखील केली. मग, मतमोजणीच्या वेळी नाव अचानक गायब कसं झालं?" असा सवाल चरण वाघमारे यांनी केला आहे.

तसेच उमेदवार करुणा राऊत यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दावा केला की, "ज्या बूथवरील मशीनवर अशी गडबड झाली तिथं माझं नाव होतं. माझ्या नातेवाईकांनी मला मतदान केलं आहे.

त्यावेळी नाव दिसलं नसतं तर आम्ही तेव्हाच आक्षेप घेतला असता. त्यावेळी नाव होतं म्हणून आम्ही आक्षेप घेतला नाही. मतदान झाल्यानंतर नाव गायब करण्यात आलं असाही आरोप त्यांनी केला.

"मशीन तयार करताना किंवा बॅलेट पेपर लावताना चूक"

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.

"मतदानाच्या वेळी उमेदवाराचं नाव आणि नोटा दोन्ही नावं नव्हती. त्यावेळी कोणी आक्षेप घेतला असता तर आमच्याही ते लक्षात आलं असतं.

त्या उमेदवाराला मतदान करणारे अधिक नसतील त्यामुळे कोणी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आमच्याही ते लक्षात आलं नाही.

मतदानानंतर नाव काढून टाकणं शक्यच नाही. तसेच मॉक पोलनंतर सुद्धा बॅलेट पेपरसोबत छेडछाड केली जात नाही," असं ते म्हणाले.

"मतदानाच्या 15 दिवसांपूर्वी ईव्हीएमची सेटींग आणि सिलिंग होते. त्यानंतर मतदानाच्या दोन दिवसांआधी हे मशीन मतदान केंद्रावर जातात.

ईव्हीएमची सेटींग, सिलिंग करताना किंवा बॅलेट पेपर लावताना चूक झालेली असू शकते. कारण, एकाच ईव्हीएमवर दोन प्रभागाचे मतदान सुरू होते. वर एक बॅलेट पेपर लावला होता आणि नोटानंतर एक जागा सोडून खाली दुसरा बॅलेट पेपर लावला होता. तर खालच्या एका उमेदवाराचं नाव आणि नोटा गायब होतं," असं त्यांनी म्हटलं.

चरण वाघमारे यांनी हा निकाल थांबवून ठेवण्याचीही मागणी केली होती. निवडणूक पुन्हा घ्या अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पण, या उमेदवाराला एकूण 467 मतं मिळाली आहेत. तर दुसरे उमेदवार 1 हजाराच्या मार्जिनने जिंकले आहेत. त्यांच्या मतांचा निकालावर काही परिणाम होईल असं दिसलं नाही.

त्यामुळं राज्य निवडणूक आयोगानंही आम्हाला निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आणि अशी चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आम्ही सात जणांवर कारवाई केली असं जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

या प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष इतर पक्षांसोबत मिळून भंडाऱ्यात मोर्च सुद्धा काढणार आहे. तसेच कोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

एका ठिकाणी ईव्हीएममध्ये अशी गडबड झाली तर दुसऱ्या ठिकाणीही झाली असेल याची शक्यता नाकारला येत नाही. त्यामुळे इथं पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी पक्षाच्या भंडाऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.