सौदी अरेबिया-पाकिस्तान करारानंतर भारताबरोबरच्या संबंधाबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलं?

फोटो स्रोत, Pakistan PM office
अलीकडेच पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला. दोन्ही देशांनी हा एकमेकांबरोबरचा संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा राजनयिक करार असल्याचं म्हटलं.
या दोनपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर त्याला दुसऱ्या देशावरील हल्ला म्हणून पाहिलं जाईल, असं या करार म्हटलं आहे. त्याची सर्वाधिक चर्चा झाली.
मे महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक विश्लेषक याकडं पाहत आहेत.
तर पाश्चात्य देशांमधील विश्लेषक याकडं काही दिवसांपूर्वी कतारमधील हमासच्या कथित तळांवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाहत आहेत.
बीबीसीच्या 'द लेन्स' या साप्ताहिक कार्यक्रमात, कलेक्टिव्ह न्यूजरुमचे डायरेक्टर ऑफ जर्नलिझम मुकेश शर्मा यांनी पाकिस्तान-सौदी अरेबियामधील या करारावर तज्ज्ञांशी चर्चा केली.
या कराराचा प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे काय अर्थ आहेत? हा करार म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांमधील एक महत्वाचा टप्पा आहे का?
अमेरिकेची भूमिका लक्षात घेऊन सौदी अरेबिया नव्या भागीदाराच्या शोधात आहे का? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, या करारामुळे सौदी अरेबियाबरोबरच्या भारताच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल का?
या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी दुबईतून वरिष्ठ पत्रकार एहतेशाम शाहिद आणि दिल्लीतील कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या सहाय्यक प्राध्यापक कनिका राखरा यांच्याशी संवाद साधण्यात आला.
या कराराकडे कशाप्रकारे पाहायला हवं?
दुबईतील वरिष्ठ पत्रकार एहतेशाम शाहीद या करारातील दोन बाबींचा उल्लेख करतात. एक म्हणजे सुरक्षा आणि दुसरा आर्थिक बाजू.
सौदी अरेबियेसाठी सुरक्षा आणि पाकिस्तानसाठी आर्थिक मदत यांचा संदर्भ देत ते म्हणतात की, दोन्ही देशांच्या गरजाच अशा आहेत की त्यांना एकमेकांची साथ द्यावी लागेल.
एहतेशाम शाहीद यांच्या मते, "सौदी अरेबियासाठी सद्यपरिस्थितीत सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीत खूप गुंतागुंतीची आहे. इराण आहे, इस्रायलचा एक फॅक्टर आहे. काही दिवसांपूर्वीच कतारवर हल्ला झाला आहे."
"तसंच या प्रदेशात अमेरिकेची एक सिक्युरिटी गॅरंटरची जी भूमिका राहिली आहे, त्यात कमतरता असल्याचं या प्रदेशातील देशांना वाटतं."
"अशा परिस्थितीत, एक पर्यायी सुरक्षा व्यवस्था असणं सौदी अरेबियासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीकोनातून पाकिस्तान हा सौदी अरेबियासाठी अतिशय योग्य पर्याय ठरतो."
ते पुढे म्हणतात की, "पाकिस्तान एक लष्करी शक्ती आहे आणि त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. या करारामुळं आर्थिक पातळीवर पाकिस्ताला नक्कीच फायदा होईल. आर्थिक मदत मिळवण्यास पाकिस्तानचं पहिलं प्राधान्य आहे."
अमेरिकेच्या भूमिकेतील बदल हेही कारण?
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेता अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांचा अमेरिकेवरचा विश्वास कमी झाला आहे.
सौदी अरेबिया त्याच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहिला आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य होत राहिलं, असं दोन्ही देशांच्या संबंधांबाबत कायम म्हटलं गेलं आहे.
मात्र इस्रायलनं हमासचं कारण दाखवत कतारवर हल्ला केल्यानं सौदी अरेबियाला चिंता वाटत आहे. दुसऱ्या बाजूला सौदी अरेबियाचे इराणबरोबर तणावापूर्ण संबंध आहेत.

फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images
अशाप्रकारे, अमेरिकेचा कथित मित्र देश आणि कथित शत्रू देश, दोन्हीही सौदी अरेबियासाठी चिंतेचं कारण ठरत आहेत.
मग पाकिस्तानबरोबर अलीकडेच झालेल्या संरक्षण कराराकडे सौदी अरेबिया त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठीचा दुसरा पर्याय म्हणून पाहतो आहे का?
कनिका राखरा म्हणतात की, पश्चिम आशियात अमेरिकेची भूमिका कमी आणि खराब होत चालली आहे.
त्या म्हणतात, "ज्याप्रकारे इस्रायलनं कतारमध्ये हमासवर हल्ला केला, तो एक टप्पा आहे. 7 ऑक्टोबरपासून आपण जे पाहत आहोत, ज्याप्रकारचा पाठिंबा इस्रायलला मिळतो आहे आणि गाझामध्ये जे घडतं आहे, ते खूपच दुर्दैवी आहे."
कनिका राखरा यांच्या मते, अशा परिस्थितीत पश्चिम आशियातील देश त्यांच्यासाठी पर्यायी सुरक्षा व्यवस्था पाहत आहेत. मात्र सौदी अरेबियासाठी पाकिस्तान हा अमेरिकेचा पर्याय ठरू शकत नाही.
एहतेशाम शाहीद यांच्या मते, "ट्रम्प सत्तेत येण्याबरोबरच अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य माघारी जाणं हा एक महत्त्वाचा टर्निग पॉईंट समजायला हवा.
पश्चिम आशियातील अमेरिकेचा भूमिका कमी होण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातच सुरुवात झाली होती."
सौदी अरेबिया - भारताच्या संबंधांचं काय?
दोन्ही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला संरक्षण करार ही भारतासाठी चिंतेची बाब नाही.
कनिका राखरा यांच्या मते, "सौदी अरेबियाबरोबरचे भारताचे संबंध पाकिस्तानवर अवलंबून नाहीत. पश्चिम आशियात भारत प्रत्येक देशाशी द्विपक्षीय संबंध बनवतो, भारत डायनॅमिक्स लक्षात घेऊन संबंध बनवत नाही."
एहतेशाम शाहीद यांच्या मते, "सौदी अरेबियाचे भारताशी जे संबंध आहेत, ते अनेक पातळ्यांवरील आहेत. यात ऊर्जेच्या बाबतीत एकमेकांवर अवलंबित्व आहे. तसंच आर्थिक बाबतीतही आहे."
ते म्हणतात की, "या प्रदेशात भारतीय लोकही मोठ्या संख्येनं काम करतात. हे सर्व संबंध खराब करण्याची सौदी अरेबियाला आवश्यकता नाही."
"शिवाय त्यांनी असं काहीही म्हटलेलं नाही की, ज्यामुळं सौदी अरेबियाला भारताबरोबरचे संबंध खराब करून पाकिस्तानबरोबर जवळीक वाढवायची आहे, असं वाटेल."
जेव्हा मोहम्मद बिन सलमान भारतात आले होते, तेव्हा ते स्पष्टपणे म्हणाले होते की भारत-सौदी अरेबिया संबंधांचा पाकिस्तान-सौदी अरेबिया संबंधांशी काहीही संबंध नाही, असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तान-सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या संरक्षण करारात एकमेकांना सुरक्षेची गॅरंटी देण्यात आल्याची चर्चा आहे. त्याकडं जर भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर, त्याचे काय अर्थ होतात?
यावर कनिका राखरा म्हणतात की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये जो करार झाला आहे, त्याचा मसुदा कुठेही समोर आलेला नाही. दोन्ही देश एकमेकांना कशाप्रकारे पाठिंबा देतील हे समोर आलेलं नाही.
त्या म्हणतात, "आपण या कराराकडे भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात पाहत आहोत. पण त्यातही सौदी अरेबिया-इराणमध्ये युद्ध झालं, तर अशा स्थितीत पाकिस्तान कोणाची बाजू घेईल, यावरही चर्चा केली जात आहे."
"कारण त्याचे इराण आणि सौदी अरेबिया या दोघांशी संबंध आहेत. मग पाकिस्तान त्याचा शेजारी असलेल्या इराणवर हल्ला करेल, असा त्याचा अर्थ होतो का?"
एहतेशाम शाहीद यांना वाटतं की, या करारामागे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांपेक्षा पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीत झालेले बदल हे प्रमुख कारण आहे.
त्यांच्या मते, सध्या अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही ज्यामुळं भारत आणि सौदी अरेबियामधील संबंध खराब होतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











