You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंदुरीकर महाराज म्हणतात, 'तिने 3 गाणी वाजवून 3 लाख घेतले, आम्ही 5 हजार जास्त मागितले, तर …'
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'तिने 3 गाणी वाजवून 3 लाख घेतले, आम्ही 5 हजार जास्त मागितले, तर …'
आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
“तिने 3 गाणी वाजवून 3 लाख रुपये घेतले आणि आम्ही 3 हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं,” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली.
बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “तिने (गौतमी पाटीलने) 3 गाणी वाजवली आणि 3 लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही 5 हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली असे म्हणतात.”
ज्या भागात इंदुरीकर महाराज कीर्तन करत होते, त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्या कार्यक्रमामध्येही प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. लोकांची धावपळ उडाली होती. या घटनेत काही लोक जखमी देखील झाले होते. गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी या घटनेचा संदर्भ दिला.
2. संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही, असेही ते म्हणाले. लोकसत्तानं ही माहिती दिली आहे.
“संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगासंदर्भात खुलासा देण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. याबाबत त्यांनी खुलासा सादर केला आहे. त्यांनी केलेल्या खुलासावर मी विचार केला. पण त्यांचा खुसाला समाधानकारक वाटला नाही. त्यामुळे याप्रकणात हक्कभंग झाला आहे, या निर्णयापर्यंत मी पोहोचलो आहे,” अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.
3. दादा भुसेंच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज (26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे.
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून मागील दोन दिवसात राजकीय वातावरण तापलं असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एक मंत्रीपदाचा कार्यभार देखील ते सांभाळत आहेत.
मात्र शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट एकाकी पडला होता.
अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे.
4. राजघाटावर राहुल गांधी यांचा आज सत्याग्रह
लोकसभेचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस रविवारी दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह करणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा सत्याग्रह चालेल. लोकमतनं ही बातमी दिलीय.
याचबरोबर काँग्रेस पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही सर्व प्रदेशाध्यक्षांनाही दिल्लीतून कार्यक्रम तयार करून पाठवला आहे. सर्व राजधान्यांमध्येही दिल्लीच्या धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
5. मनरेगाच्या मजुरी दरात 2 ते 10 टक्क्यांदरम्यान वाढ
केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2023-24 साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, 2005 अंतर्गत अकुशल कामांसाठी नवीन वेतन दर अधिसूचित केले आहेत.
त्यानुसार, राजस्थानमध्ये सध्याच्या मजुरीच्या दरापेक्षा 10.39 % कमाल वाढ झाली आहे तर गोव्यात सर्वात कमी 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
हे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
अधिसूचनेनुसार, मनरेगाच्या मजुरीचा सर्वोच्च दर 357 रुपये प्रतिदिन हरियाणासाठी निश्चित करण्यात आला आहे, तर सर्वात कमी 221 रुपये प्रतिदिन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसाठी निश्चित करण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)