'त्या' 3 सेकंदांच्या व्हीडिओवरून नयनतारा आणि धनुषमध्ये झालेला नेमका वाद काय आहे?

फोटो स्रोत, Facebook
- Author, नंदिनी वेल्लीचामी
- Role, बीबीसी तामिळ
चित्रपट निर्माता-अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. धनुषनं 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस दिल्याचं अभिनेत्री नयनतारा यांनी सांगितलं आहे.
नयनतारा आणि धनुष यांच्यातील हा वाद नेमका कशामुळे सुरू आहे, या वादमागचं नेमकं कारण काय आहे, हे जाणून घेऊया.
नयनतारा यांच्या नेटफ्लिक्सवरील आगामी 'नयनतारा : बियाँड द फेरीटेल' या माहितीपटात वापरलेल्या फुटेजवरून हा वाद निर्माण झाला आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानं त्याची चर्चा होत आहे.
या माहितीपटात 'नानम राऊडी धन' (Naanum Rowdy Dhaan) या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी शूट केलेला 3 सेकंदांचा व्हीडिओ वापरण्यात आला. त्यामुळे धनुषनं नयनताराला नोटीस बजावली आहे.
त्यानंतर 16 नोव्हेंबरला नयनतारा यांनी धनुष यांच्यावर विविध आरोप केल्यानं चित्रपटक्षेत्रात त्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नयनतारा यांनी केलेल्या आरोपांबाबत अभिनेता धनुष यांनी कोणतंही थेट स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, नयनतारा यांना पाठवलेल्या नोटीशीत धनुष यांचे वकील अरुण यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
या नोटीशीत म्हटलं आहे की, "नानम राऊडी धन या चित्रपटाचे हक्क वंडरबार प्रॉडक्शन्सकडं असल्याची बाब नयनतारा यांच्याकडून नाकारण्यात आलेली नाही. त्यामुळं चित्रपटाच्या चित्रिकररणाच्या वेळच्या व्हिडिओ फुटेजवर धनुष यांचीही मालकी आहे, ही गोष्ट यातून स्पष्ट होते."
या वादानंतर नयनतारा यांना अनेक अभिनेत्रींनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, नयनतारा त्यांच्या माहितीपटासाठी हा स्टंट करत असल्याची टीकाही सोशल मीडियावर होत आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेल्या या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हे पाहूया.
नेमका वाद काय आहे?
'नयनतारा : बियाँड द फेरीटेल' (Nayanthara: Beyond the Fairytale) या माहितीपटात अभिनेत्री नयनतारा यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. नयनतारा यांचं आयुष्य, प्रेम, विवाह आणि त्यांच्या करियरबद्दल त्यात मांडण्यात आलं आहे.
हा माहितीपट नेटफ्लिक्सवर 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शित होण्याआधीच हा माहितीपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.


नयनतारा यांचं दिग्दर्शक विग्नेश सिवन यांच्याशी 9 जून 2022 ला लग्न झालं. त्यानंतर नयनतारा यांच्यावरील माहितीपटाची घोषणा करण्यात आली होती. या माहितीपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला होता.
नयनतारा यांनी सोशल मीडियावर या वादासंदर्भात वक्तव्यं केलं होतं. त्यात त्यांनी अभिनेता धनुष यांच्यावर आरोप केले होते.
नयनतारा काय म्हणाल्या?
नयनतारा यांनी म्हटलं आहे की, " 'नानम राऊडी धन' या नेटफ्लिक्सवरील माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वैयक्तिकरित्या चित्रित केलेलं फक्त 3 सेकंदांचं फुटेज वापरलं होतं. त्याबाबत धनुष यांनी नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये देण्यासंदर्भातील नोटीस पाठवली. हे धक्कादायक होतं."
नयनतारा यांनी सांगितलं की, चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अनेक शुभचिंतकांनी या माहितीपटात योगदान दिलं आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या आठवणी यात आहेत.
माहितीपटाच्या ट्रेलरमध्ये दिग्दर्शक अॅटली, अभिनेत्री राधिका, अभिनेता राणा डगुपती, नागार्जुन, दिग्दर्शक विष्णूवर्धन आणि नयनतारा यांच्याबरोबर काम केलेले इतर अनेक जण नयनतारा यांच्याबद्दल बोलताना दिसतात.
याशिवाय नयनतारा आणि विग्नेश सिवन यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल आणि विवाहाबद्दल यात सांगितलं आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटातील दृश्ये आणि अगदी गाण्यांचा देखील यात वापर करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नयनतारा म्हणाल्या की, दोन वर्षे वाट पाहिल्यानंतरही त्यांना धनुष यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना नानम राऊडी धन चित्रपटातील गाणी, दृश्ये आणि अगदी फोटोदेखील वापरण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी हा माहितीपट पुन्हा एडिट केला.
नयनतारा यांनी असंही म्हटलं की, चित्रपटातील गाणं वापरू दिलं नाही, म्हणून त्यांना अतिशय वाईट वाटलं.
चित्रिकरणाच्या ठिकाणी असणाऱ्यांच्या स्वातंत्र्यावर आणि आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार निर्मात्याला असतो का? असा प्रश्न नयनतारा यांनी उपस्थित केला.
त्या असंही म्हणाल्या की, "धनुष यांच्या नोटीशीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ."
इतर अभिनेत्रींकडून नयनतारा यांना पाठिंबा
नयनतारा यांनी यासंदर्भात वक्तव्यं दिल्यानंतर अनुपमा परमेश्वरम, अंजु कुरियन, ऐश्वर्या लक्ष्मी या अभिनेत्रींनी नयनतारा यांच्या पोस्टला लाईक केलं.
अभिनेत्री पार्वती यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भात एक वक्तव्यंदेखील दिलं.
नयनतारा यांनी त्यांच्या वक्तव्यात धनुष यांच्यावर आरोप केले की, "धनुष यांनी हे वैयक्तिक रागापोटी केलं आहे आणि त्याचा व्यावसायिक आणि आर्थिक बाबींशी काहीही संबंध नाही."
दरम्यान, विग्नेश सिवन यांनी ऑडिओ लाँच करण्याच्या कार्यक्रमातील धनुष यांच्या भाषणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच त्यांनी धनुष यांनी पाठवलेली नोटीसही शेअर केली आहे.

फोटो स्रोत, Netflix India
नयनतारा यांचा 'नानम राऊडी धन' चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती धनुष यांनी केली होती. हा चित्रपट हिट झाला होता. याचं दिग्दर्शन विग्नेश सिवन यांनी केलं होतं. दिग्दर्शक विग्नेश सिवन यांचा तो दुसरा चित्रपट होता.
विजय सेतुपती, राधिका, पार्थिबन, आनंदराज यांच्याही यात भूमिका होत्या. त्यावेळेस चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाचं कौतुक करताना म्हटलं होतं की, आर जे बालाजी आणि इतरांसह चित्रपटात सादर करण्यात आलेल्या विनोदानं अनेक अंगांनी नाविन्यपूर्ण अनुभव दिला.
2016 मध्ये या चित्रपटातील भूमिकेसाठी नयनतारा यांनी सर्वोत्तम तामिळ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कार स्वीकारताना नयनतारानं व्यासपीठावर विजय सेतुपती, विग्नेश सिवन, अनिरुद्ध सह चित्रपटाच्या सर्व टीमचे आभार मानले होते.
धनुषबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, "धनुष यांना चित्रपटातील माझा अभिनय आवडला नव्हता. त्यासाठी मी धनुष यांची माफी मागते." त्यावर धनुष देखील हसले होते. त्यावेळेस या प्रसंगाचा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला होता.
या वादाबाबत धनुष काय म्हणतात?
नयनतारा यांचे पती आणि दिग्दर्शक विग्नेश सिवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर, धनुष यांचे वकील अरुण यांनी दिलेली 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस शेअर केली आहे.
(सुरूवातीला विग्नेश यांनी ही तीन पानी नोटीस शेअर केली होती. मात्र नंतर त्यांनी त्यातील दोन पानं डीलीट केली होती आणि फक्त 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करणारं पान तेवढं ठेवलं होतं)
या नोटीशीनुसार, धनुष यांच्या वकिलांनी त्यात म्हटलं आहे, "चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस घेण्यात आलेले फोटो, फोटोशूट, व्हिडिओ, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसारमाध्यमांसह कोणत्याही व्यासपीठावर घेण्यात आलेले व्हिडिओ वापरण्याचा अधिकार चित्रपट निर्मात्याला असतो."
"नयनतारा यांच्याकडून नानम राऊडी धन या चित्रपटाचे कॉपीराईट वंडरबार फिल्म्सकडे आहेत ही बाब नाकारण्यात आलेली नाही. ही गोष्ट त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस घेण्यात आलेल्या व्हिडिओचा मालकी हक्क धनुष यांच्याकडे आहे हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे."
त्याशिवाय, "चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी व्हिडिओ घेणारा माणूस आम्हीच नियुक्त केलेला होता. (व्हिडिओचा मालकी हक्क तो व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा असतो, त्या चित्रपटात काम करणाऱ्यांचा नाही). 22 ऑक्टोबर 2015 ला हे व्हिडिओ वंडरबार फिल्म्सच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते."
दहा वर्षांपासून हे व्हिडिओ वंडरबार फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर होते, हे माहिती असल्याची बाब नयनतारा नाकारू शकत नाहीत. "असं करून नयनतारा 'नेटफ्लिक्स इंडिया'ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं त्या नोटीशीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, VigneshShivN/Twitter
धनुष यांच्या वकिलानं नोटीशीत म्हटल्यानुसार, चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा मालकी हक्क फक्त धनुष यांच्याकडेच आहे.
"वंडरबार फिल्म्सनं हे व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणूक केली नव्हती हा विरोधकांचा दावा निरर्थक आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस ज्या व्यक्तीनं व्हिडिओ काढलेले असतात त्याचाच त्या व्हिडिओवर अधिकार असतो असं म्हणणं हे खूपच उथळपणाचं आहे. त्या व्हिडिओंची मालकी निर्मात्याकडे असते," असं त्या नोटीशीत म्हटलं आहे.
म्हणूनच धनुष यांच्या वकिलांनं म्हटलं आहे की तो व्हिडिओ 24 तासांच्या आत हटवण्यात आला पाहिजे. नाहीतर त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली जाईल.
कायद्यात काय म्हटलं आहे?
बीबीसीशी बोलताना वकील वेत्रीचेल्वन यांनी कॉपीराईट अॅक्ट 1957 (Copyright Act 1957) बद्दल सांगितलं.
"कलात्मक आणि साहित्यिक कामांना कॉपीराईट दिले जाऊ शकतात. पुस्तकं, संगीत आणि दृश्यं यासाठी वेगवेगळे कॉपीराइट असतात."
"या प्रकरणात, जरी हे व्हिडिओ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस घेतलेले असले तरी कायद्यानुसार चित्रपटाच्या निर्मात्याला तसं करण्याचा अधिकार आहे," असं ते पुढे म्हणाले.
"कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा परदेशात प्रसारण केलं जातं तेव्हा चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्यांना त्यासाठी दरवर्षी एक विशिष्ट रक्कम किंवा टक्केवारी दिली पाहिजे. मात्र, भारतात या कायद्यांमध्ये तितक्या बारकाईनं तरतूद करण्यात आलेली नाही," असं वेत्रीचेल्वन म्हणतात.

फोटो स्रोत, NAYANTHARA/Instagram
मात्र ते एक गोष्ट लक्षात आणून देतात की, अलीकडच्या काळात चित्रपटाच्या बाबतीत प्रत्येक निर्माता करारामध्ये सर्व व्यासपीठांवरील कॉपीराईटचा स्पष्टपणे उल्लेख करतो.
यानुसार, 'नानम राऊडी धन' या चित्रपटाशी निगडीत सर्व कॉपीराईट किंवा अधिकार चित्रपटाचे धनुष यांच्याकडेच असण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.
"मात्र कॉपीराईट कायद्याला काही अपवाद (योग्य वापरासाठी) आहेत. साहित्यिक, संशोधन कामासाठी, गाणी किंवा व्हिडिओ फुटेजचा 30 सेकंदांचा भाग कोणत्याही परवानगी किंवा मंजूरीशिवाय वापरला जाऊ शकतो. मात्र त्या गाणी किंवा व्हिडिओचा व्यावसायिक वापर केल्यास नियमाचं उल्लंघन होईल," असं ते पुढे म्हणाले.
वेत्रीचेल्वन म्हणतात की. या वादात हे 3 सेकंदांचं व्हिडिओ फुटेज संशोधन कामासाठी वापरण्यात आलं आहे की नाही याबद्दल स्पष्टता नाही. स्वत:वरील माहितीपटासंदर्भात नयनतारा त्यांची बाजू मांडू शकतात.
ते पुढे म्हणतात की, नयनतारा हा मुद्दा मांडू शकतात की माहितीपटात फक्त 3 सेकंदांच्या छोट्या व्हिडिओ फुटेजचा वापर करण्यात आला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











