पश्चिम आशियातील अस्थिरतेचा भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर काय परिणाम होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रेरणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"जर इराणमधून निर्यात होत असलेल्या कच्च्या तेलावर निर्बंध लादण्यात आले, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा एक थेंबदेखील जाऊ शकणार नाही."
2011 मध्ये इराणचे तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जनरल मोहम्मद रजा रहीमी यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियनला हा इशारा दिला होता.
2011 च्या डिसेंबर महिन्यातच अमेरिका आणि युरोपियन युनियननं इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात कठोर आर्थिक निर्बंध लागू केल्याचं जाहीर केलं होतं. यातील सर्वात प्रमुख निर्बंध म्हणजे इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर बंदी घालणं.
इराणच्या नेत्यांनी या निर्बंधांना विरोध करत स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र हळूहळू हे प्रकरण शांत होत गेलं आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा देण्याची ही काही एकमेव वेळ नव्हती. वेळोवेळी इराण या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत आला आहे. मात्र त्याच्यापुढे काहीही झालं नाही.
आता पुन्हा एकदा जगातील सर्वात प्रमुख सागरी मार्गांपैकी एक मानला जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संकटाचे ढग गोळा झाले आहेत.
इराणच्या सरकारी टीव्हीनं माहिती दिली आहे की, इराणच्या संसदेनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.
यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी चीनला आवाहन केलं आहे की, त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यापासून रोखावं.
अर्थात जोपर्यंत इराणची सर्वोच्च नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल या निर्णयावर शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत इराणच्या संसदेच्या या निर्णयाला अंतिम स्वरुप मिळणार नाही.
असं असताना, आतापासूनच प्रश्न उपस्थित होत आहेत की जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, तर भारतासह संपूर्ण जगावर त्याचा काय परिणाम होईल? भारताच्या कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे? भारत या सागरी मार्गावर किती अवलंबून आहे?
होर्मुझची सामुद्रधुनी काय आहे आणि ती महत्त्वाची का आहे?
जगात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी ज्या प्रमुख सागरी मार्गांचा वापर केला जातो, त्यातील एक मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनीतून जाणारा मार्ग.
कच्च्या तेलाच्या साठ्यांनी समृद्ध असलेल्या पश्चिम आशियातील देशांना होर्मुझची सामुद्रधुनी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेसह जगाच्या इतर भागांशी जोडते.
पर्शियन आखात आणि ओमानचं आखात याच्यामध्ये ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. ती इराण आणि ओमानच्या सागरी सीमेच्या आत येते. हा एक चिंचोळा सागरी मार्ग असून तो फक्त 33 किलोमीटर रुंद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीरात, कुवैत आणि इराण सारख्या देशांमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होऊन नंतर ते इतर देशांपर्यंत पोहोचतं.
याशिवाय, जगातील सर्वात जास्त लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) कतारमधून होते. कतारदेखील त्यांच्या निर्यातीसाठी याच सागरी मार्गावर अवलंबून आहे.
अमेरिकेची ऊर्जा माहिती एजन्सीच्या (ईआयए) अंदाजानुसार, 2023 च्या पहिल्या सहामाहीत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज जवळपास दोन कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक झाली.
याचा सरळ अर्थ असा आहे की या एका सागरी मार्गातून दरवर्षी जवळपास 600 अब्ज डॉलर किंमतीच्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा व्यापार होतो.
जगातील एकूण कच्च्या तेलापैकी जवळपास एक पंचमांश कच्चे तेल याच सागरी मार्गातून जातं.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास काय परिणाम होईल?
होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या निव्वळ भीतीमुळे किंवा शंकेमुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गगनाला भिडू लागते.
अशा परिस्थितीत जर खरोखरच हा सागरी मार्ग बंद झाला, तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर होऊ शकतो.
याचा थेट अर्थ असा आहे की त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होईल आणि परिणामी महागाईदेखील प्रचंड वाढेल.
चीन, भारत आणि जपानसारख्या जगातील काही मोठ्या अर्थव्यवस्थांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण हे देश कच्च्या तेलाच्या आयातीसाठी याच सागरी मार्गावर अवलंबून आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर भारत किती अवलंबून?
भारत स्वत:च्या आवश्यकतेच्या 85 टक्के कच्चे तेल आणि 50 टक्क्यांहून अधिक नैसर्गिक वायू इतर देशांमधून आयात करतो.
त्यातही भारतात आयात होणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 60 टक्के कच्च्या तेलाची आयात सौदी अरेबिया, इराक आणि संयुक्त अरब अमीरात या देशांकडूनच होते.
प्राध्यापक रेशमी काजी या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनच्या फॅकल्टी मेंबर आहेत.
त्या सांगतात की, "भारत दररोज जवळपास 50 लाख बॅरलहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. यातील जवळपास 20 लाख बॅरल कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतं."

फोटो स्रोत, AFP
त्यांच्या मते, "सौदी अरेबिया, इराकसारख्या आखाती देशांमधून आयात होणारं कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीमधूनच भारतात येतं. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सातत्यपूर्ण विकासासाठी कच्चे तेल खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळेच होर्मुझची सामुद्रधुनी सुरू राहिली पाहिजे."
अर्थात, इराणच्या संसदेनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी आल्यानंतर, भारताचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की, याचा भारतावर जास्त परिणाम होणार नाही.
ते म्हणाले, "गेल्या दोन आठवड्यापासून पश्चिम आशियातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या कच्च्या तेलाच्या आयातीत वैविध्य आणलं आहे. आता आपल्या आयातीचा एक मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही."
"आपल्या पेट्रोलियम कंपन्यांकडे या आठवड्यासाठी आवश्यक असलेलं कच्चं तेल आहे आणि आवश्यक असणारं कच्चं तेल इतर मार्गांनी आणलं जात आहे."
होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याचा काय परिणाम होणार?
रेशमी काजी म्हणतात की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास त्याचा भारताला मोठा फटका बसेल.
त्यांच्या मते, "होर्मुझची सामुद्रधुनी हा भारतासाठी एक खूपच किफायतशीर मार्ग आहे. त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला, तर आयातीवरील भारताचा खर्च खूपच वाढेल. कारण त्यामुळे भारताला दुसऱ्या एखादा मार्गाचा वापर करावा लागेल. त्यातून वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल."
"याचा परिणाम देशातील पेट्रोलियम उत्पादनांवर होईल. पेट्रोल, डिझेलसारखं इंधन महाग होईल. आखातातील देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. त्यांनादेखील व्यापार करण्यात अडचण येईल."
अर्थात, सौदी अरेबिया लाल समुद्राशी, युएई-फुजैरा रूटशी आणि ओमान थेट हिंदी महासागराच्या किनाऱ्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी हे देश या पर्यायांचा वापर करू शकतात.
मात्र, कुवैत, बहारीन आणि कतार या देशांकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय निर्यातीसाठी दुसरा मार्ग नाही. इतकंच काय इराण आणि इराककडे देखील थेटपणे दुसरा कोणताही सोपा मार्ग नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तलमीज अहमद, सौदी अरेबियात भारताचे राजदूत राहिले आहेत. 2004-06 दरम्यान ते भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचे अतिरिक्त सचिव देखील होते.
बीबीसीनं त्यांना विचारलं की गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत इतकी विविधता आली आहे का, की जेणेकरून होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही?
याला उत्तर देताना ते म्हणाले की, "कच्च्या तेलासाठी अजूनही भारत आखातातील देशांवर अवलंबून आहे आणि पुढेदेखील आखाती देशांवर अवलंबून राहील. आखाती देश आपल्यापासून जवळ आहेत. वाहतुकीचे दर स्वस्त आहेत."
"भारताच्या रिफायनरीला आखाती देशांमधून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाची सवय आहे. तसंच भारताचा या देशांबरोबर दीर्घकालीन पुरवठ्याचा करार (लाँग-टर्म कॉन्ट्रॅक्ट) आहे."
"कच्च्या तेलाच्या आयातातील वैविध्याचा मुद्दा लक्षात घेता, आपल्याला जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा आपण नायजेरिया, रशियासारख्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात केली आहे. मात्र कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात दीर्घकालीन कराराअंतर्गत होते."
मात्र ते हा मुद्दादेखील नमूद करतात की गेल्या काही वर्षांमध्ये आखाती देशांबरोबरील दीर्घकालीन करार कमी करण्यात आले आहेत.
ते म्हणतात, "आधी आपण 80-90 टक्के दीर्घकालीन कराराचा वापर करायचो. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सध्या हे प्रमाण 60-70 टक्क्यांवर आलं आहे. मात्र अजूनही इतर देशांकडून कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू विकत घेण्याचं प्रमाण फक्त 30 टक्केच आहे."
भारताकडे काय पर्याय आहेत?
भारत सरकारनं कच्च्या तेलाच्या आयातीला जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. म्हणजेच एकाच देशाकडून किंवा प्रदेशातून कच्च्या तेलाची आयात करण्याऐवजी, विविध ठिकाणाहून आयात करण्यावर भर देणं.
मात्र असं असूनदेखील गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं आखाती देशांव्यतिरिक्त ज्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात केली आहे, त्यामध्ये रशिया, नायजेरिया, गयाना, अमेरिका यांचा समावेश आहे.
रिलायन्स कंपनी व्हेनेझुएलामधून देखील कच्च्या तेलाची आयात करते. मात्र हे सर्व देश भारतापासून लांब अंतरावर असल्यामुळे तिथून कच्च्या तेलाची आयात केल्यास खर्च वाढतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय, भारत प्रामुख्यानं ज्या सागरी मार्गांचा वापर करतो, त्यात लाल समुद्र, सुएझ कालवा आणि हिंदी महासागर यांचा समावेश आहे.
इराण खरंच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणार का?
या लेखात सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे, इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिल्याचे किंवा इशारा दिल्याचे अनेक प्रसंग आधीदेखील आले आहेत. मात्र इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली नाही.
आम्ही तलमीज अहमद यांना विचारलं की सध्याच्या परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी बंद होईल की नाही, याबाबत त्यांना काय वाटतं?
त्यावर त्यांनी उत्तर दिलं की हे शक्य नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचं शक्तीशाली नौदल आणि अमेरिकेच्या हवाई दलाची चांगली उपस्थिती आहे. ते होर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊ देणार नाहीत.
"दुसरं असं की इराणला देखील याचा काहीही फायदा होणार नाही. इराण आधीच अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी लावलेल्या कडक निर्बंधाचा सामना करतो आहे."
"कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी इराण स्वत:देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करतो. आखातातील अनेक देश, ज्यांचे इराणशी चांगले संबंध आहेत, ते देखील याच सागरी मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत इराण मित्रराष्ट्रांना नाराज करण्याचा धोका पत्करू शकत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











