You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पूर्ण जग दुचाकीवरुन फिरण्याचे स्वप्न घेऊन मुंबईतून निघालेल्या मराठी मुलाची बाईक UKमध्ये चोरीला
- Author, टॉम ओकले
- Role, बीबीसी न्यूज
- Author, अॅश गेनी
- Role, बीबीसी न्यूज
जगभर दुचाकीवर फिरण्याचं स्वप्न आणि आव्हान घेऊन युनायटेड किंगडममध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्रियन मोटारसायकल स्वाराची बाईक चोरीला गेली आहे. या दुचाकीस्वारानं आतापर्यंत 15,000 मैल (24,140 किमी) प्रवास केला होता. परंतु, ज्या बाईकवरून त्याने आतापर्यंत इतका प्रवास केला तीच युनायटेड किंगडममध्ये (UK) चोरीला गेली आहे.
महाराष्ट्रियन योगेश आलेकरीने 1 मे रोजी मुंबईहून आपल्या मोटारसायकल चॅलेंजची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आशिया आणि युरोपमधील 17 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता.
33 वर्षीय योगेशने सांगितलं की, त्याची केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईक UKच्या नॉटिंगममधील वॉलेटन पार्कमध्ये पार्क केली होती. त्या बाईकसोबत बरंच सामानही होतं. त्या ठिकाणाहून गुरुवारी सकाळी साधारण 11 वाजता बाईक आणि साहित्याची चोरी झाली.
योगेशचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो त्याच्या प्रवासाची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यानं एका पोस्टमध्ये ही चोरी 'खूप वेदनादायी' होती आणि त्यामुळे तो 'खूप दुखावला' असल्याचं म्हटलं आहे.
योगेशच्या अनेक पोस्ट या मराठीत देखील आहेत. आतापर्यंत 47 देशांना भेट दिल्याचे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बायोमध्ये लिहिले आहे.
योगेश UK तून जाणार होता आफ्रिकेत
योगेशने आतापर्यंत इराण, नेपाळ, चीन, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानसारख्या देशांमधून बाईकवर प्रवास केला होता. त्यानंतर युरोपमध्ये जाऊन त्यानं जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रान्ससह अनेक देशांना भेट दिली होती.
यूकेतून त्यानं आफ्रिकेतून जाण्याचं नियोजन केलं होतं. परंतु, तो आता UKमध्ये अडकला आहे. त्याच्याकडे फक्त कपडेच राहिले आहेत. उरलेलं त्याचं सर्व सामान बाईकबरोबर चोरीला गेलं आहे.
आता पुढं काय करायचं, हे सध्या ठरवत असल्याचं योगेशनं म्हटलं आहे.
योगेश म्हणाला की,"मी नॉटिंगममध्ये एका बाइकर इव्हेंटसाठी थांबलो होतो आणि ऑक्सफर्डकडे निघण्याचा तयारीत होतो. मी इथं थांबलो आणि वॉलेटन पार्कमध्ये माझी बाईक पार्क केली."
"मी बाईक लॉक केली होती आणि तेथे बरेच लोक आणि खेळणारी लहान मुलं होती, त्यामुळे मला वाटलं की, ही जागा सुरक्षित आहे," असं योगेशने म्हटले.
नाश्ता करून परतेपर्यंत बाईक चोरीला...
"मी रस्ता पार करून नाश्ता करण्यासाठी गेलो, आणि एका तासाच्या आत परतही आलो पण सर्व काही गायब झालं होतं," असं योगेश म्हणाला.
पार्कमध्ये असलेल्या एका व्यक्तीने घेतलेल्या व्हीडिओत योगेश आलेकरीची बाईक मोपेड स्कूटरवर आलेले काही माणसं पळवून नेताना दिसले.
पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर असलेल्या योगेशचे 1 लाख 80 हजारपेक्षा जास्त इन्स्टाग्राम आणि सुमारे 16 हजार फेसबुक फॉलोअर्स आहेत. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत 15 हजार पाऊंडपेक्षा (अंदाजे 15 लाख रुपये) जास्त असल्याचे त्यानं सांगितलं.
त्यानं सांगितलं की, त्यांच्या बाईकवरील स्टोरेज बॉक्समध्ये त्यांचा मॅकबुक लॅपटॉप, एक अतिरिक्त मोबाइल, दोन कॅमेरे, रोख रक्कम आणि पासपोर्ट तसेच कपड्यांसारख्या इतर वस्तूही होत्या.
'मी सर्व काही गमावून बसलो...'
"मला प्रचंड धक्का बसला आहे. जे घडलं ते समजल्यावर मी खचलो आणि रडू लागलो," असं त्यानं पुढं सांगितलं.
"त्यांनी माझी बाईक चोरली, पण ती फक्त बाईक नव्हती. ते माझं घर, माझं स्वप्न आणि प्रवासी म्हणून माझं सगळं काही होतं," असं योगेश म्हणाला.
"हे कसं घडू शकतं? अचानक मी सर्व काही गमावलं आहे."
योगेश म्हणाला, "मी पोलिसांना कॉल केला, पण ते फार विचित्र वाटलं कारण त्यांनी फक्त मला एक गुन्हा क्रमांकच (क्राइम नंबर) दिला."
"त्यांनी मला सांगितलं की, ते मला परत कॉल करतील आणि मी पार्कमध्ये त्यांची वाट पाहत होतो, पण त्यांनी कधीच कॉल केला नाही."
त्यानं पुढे सांगितलं की, "मला स्पेनहून मोरोक्कोला जायचं होतं, नंतर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे, केपटाऊनपासून केनियापर्यंत प्रवास करायचा आणि नंतर भारतात परत जायचं, असं नियोजन होतं."
'मला तिथं सुरक्षित वाटलं पण यूकेत मात्र...'
"मोटारसायकलवर जगभर फिरण्याचं माझं स्वप्न आहे. मी इथे येण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत आणि मला आता थांबायचं नाही."
"मी भारतातून इथंपर्यंत प्रवास केला आणि इराण आणि तुर्कीयेसारख्या ठिकाणी गेलो, जिथे लोक म्हणायचे की ते देश सुरक्षित नाहीत. पण मला तिथे सुरक्षित वाटलं."
"लोकांनी मला यूकेबद्दल इशारा दिला होता, पण मला वाटलं की मी लंडनपासून दूर आहे आणि नॉटिंगहममध्ये सगळं ठीक असेल."
"माझ्या प्रवासात मला अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेचा अनुभव आला नाही."
नॉटिंगमशायर पोलिसांनी सांगितलं की, त्यांचं पथक 'स्थानिक चौकशी' करत आहे, पण अद्याप ते बाईकही शोधू शकलेले नाहीत.
सार्जंट डॅनियल शेस्बी यांनी याबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, "या घटनेमुळे बाईक मालकाला किती दुःख झालं असेल, याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. पण आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो की, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे आणि त्यांची मालमत्ता परत मिळविण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते आम्ही करत आहोत."
प्रतिक्रियेसाठी नगर परिषदेशी संपर्क साधण्यात आला आहे.
(विराज सोनी यांचं अतिरिक्त वार्तांकन)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.