You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रोएशियाला तिसरं स्थान; मोरोक्कोवर केली मात
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिष्ठेच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत क्रोएशियाने मोरोक्कोवर 2-1 असा विजय मिळवत बाजी मारली.
सामना सुरु झाल्यानंतर दहा मिनिटातच दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली. सेमी फायनलच्या लढतीत अर्जेंटिनाविरुद्ध निष्प्रभ ठरलेल्या क्रोएशियाने या लढतीत मात्र जोरदार खेळ करत चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा राखला.
42व्या मिनिटाला मिस्लाव्ह ओर्सिचने केलेला गोल क्रोएशियासाठी निर्णायक ठरला. मोरोक्कोने सातत्याने गोल दागण्याचे प्रयत्न केले पण क्रोएशियाच्या बचावफळीने दाद लागू दिली नाही.
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत थर्ड प्लेस लढतीत क्रोएशिया आणि मोरोक्कोने यांनी आक्रमक सुरुवात केली आहे. 10 मिनिटातच दोन्ही संघांनी एकेक गोल दागला आहे.
क्रोएशियातर्फे ग्वार्डियोलने गोल केला. अवघ्या काही मिनिटात मोरोक्कोच्या दारीने दिमाखदार हेडर केला. अफलातून टायमिंगसह गोल करत दारीने मोरोक्कोला बरोबरी साधून दिली.
विश्वविजेतेपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलेले दोन संघ थर्ड प्लेस लढत जिंकून स्पर्धेची विजयी सांगता करण्यासाठी उत्सुक आहेत. क्रोएशिया आणि मोरोक्को आमनेसामने आहेत. यानिमित्ताने क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिकचा हा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.
क्रोएशिया आणि मोरोक्को या दोन्ही संघांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली मात्र सेमी फायनलच्या लढतीत अर्जेंटिनाने क्रोएशियाचे आव्हान 3-0 असे परतावून लावले तर फ्रान्सने मोरोक्कावर 2-0 असा विजय मिळवला.
क्रोएशियाने प्रत्येक वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक असतं. दुसरीकडे मोरोक्को यंदाच्या वर्ल्डकपचं वैशिष्ट्य ठरला. मोरोक्कोचा संघ प्रस्थापितांना धक्का देणार असं चित्र होतं. मोरोक्काच्या बचावाला सगळ्यांनीच वाखाणलं. क्रोएशिया आणि मोरोक्को साखळी फेरीत समोरासमोर आले होते पण हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता.
क्रोएशियाच्या 37 वर्षीय कर्णधार ल्युका मॉड्रिचसाठी स्पर्धेचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. जेतेपदाविनाच त्याला परतावे लागत आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये मॉड्रिचला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. बाद फेरीत मॉड्रिचच्या खेळाच्या बळावर क्रोएशियाने आगेकूच केली होती.
थर्ड प्लेस सामन्याचं महत्त्व काय?
जेतेपदापासून दुरावलेल्या संघांमध्ये सामना का खेळवण्यात येतो असा प्रश्न नेहमी विचारला जातो. या सामन्याच्या माध्यमातून फिफाला खणखणीत महसूल मिळतो. याव्यतिरिक्त थर्ड प्लेस लढत जिंकणाऱ्या संघाला 2 कोटी 70 लाख डॉलर बक्षीस रकमेने गौरवण्यात आलं. या सामन्यात पराभूत संघाला 2 लाख डॉलर कमी मिळतील.
जागतिक क्रमवारीत मोरोक्कोचा संघ 22व्या स्थानी आहे. मोरोक्कोने बेल्जियम आणि कॅनडावर मात केली. त्यानंतर त्यांनी स्पेन आणि पोर्तुगाल या मोठ्या संघांना नामोहरम केलं. वर्ल्डकपची सेमी फायनल गाठणारा मोरोक्को पहिलाच अरब देश ठरला.
सेमी फायनलच्या लढतीत मोरोक्कोने फ्रान्सविरुद्ध कडवी टक्कर दिली पण गोल करण्याच्या संधी त्यांनी गमावल्या.