बाळाला जन्म देण्यासाठी तिने उंटावरून केला 7 तासांचा प्रवास

मोना आणि तिचा मुलगा जेरार्ह त्यांच्या राहात्या घरी

फोटो स्रोत, SADAM ALOLOFY/UNFPA

फोटो कॅप्शन, मोना आणि तिचा मुलगा जेरार्ह त्यांच्या राहात्या घरी
    • Author, चार्लीन अॅन रॉड्रिगज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जेव्हा मोनाचे दिवस भरले आणि कळा सुरू झाल्या तेव्हा एक उंट तिची लाईफलाईन बनला.

19 वर्षांच्या मोनाला वाटलं होतं की दवाखान्यापर्यंत पोहोचण्याच्या पर्वतीय प्रदेशातल्या 40 किलोमीटर प्रवासाला तिला 4 तास लागतील पण रस्ता नाही, गरोदरपणाच्या कळा, वाईट हवामान या सगळ्यामुळे तिला 7 तास लागले.

“उंटाच्या प्रत्येक पावलाला मला असह्य वेदना होत होत्या,” ती म्हणते.

जेव्हा उंटही पुढे जाऊ शकला नाही तेव्हा मोना खाली उतरली आणि तिच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा तिने तिच्या नवऱ्यासोबत पायी जात पूर्ण केला.

येमेनच्या वायव्य भागातल्या माहवीत प्रांतात बानी साद हॉस्पिटल हे एकमेव आरोग्य केंद्र उरलं आहे. मोनाच्या अल-माकारा गावापासून तिथपर्यंत पोहचायचं झालं तर धोकादायक डोंगराळ वाटेवरून उंटावर बसून किंवा चालत येणं हा एकमेव पर्याय आहे.

या प्रवासात उंटाला घट्ट धरून बसलेल्या मोनाला तिच्या आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या जीवाची भीती वाटत होती.

“तो रस्ता खडकाळ आहे. तो प्रवास तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवून टाकतो,” ती म्हणते.

“संपूर्ण प्रवासात मी अनेकदा देवाला प्रार्थना केली की देवा माझ्या बाळाला वाचव पण मला ने, म्हणजे माझी या असह्य वेदनेतून सुटका होईल.”

आपण दवाखान्यात कधी पोचलो हे मोनाला आठवत नाही पण तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर मनात आशा आणि आनंद भरल्याचं आठवतं.

तिने आणि तिच्या नवऱ्याने तिच्या मुलाचं नाव जरार्ह ठेवलं. याच नावाच्या सर्जनने तिचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचवला. त्याचीच कृतज्ञता म्हणून त्यांनी आपल्या मुलाचंही तेच नाव ठेवलं.

आसपासच्या खेड्यांमधून या दवाखान्यात येणारे रस्ते अरुंद आणि निमुळते आहेत. काही रस्ते गेली 8 वर्षं चाललेल्या गृहयुद्धामुळे एकतर नष्ट झालेत किंवा त्यात अनेक अडसर निर्माण झालेत.

येमेनमध्ये सरकारी बाजूच्या फौजा, ज्यांना सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे, आणि बंडखोर हौथी ज्यांना इराणचा पाठिंबा आहे, यांच्यात अनेक वर्षं युद्ध सुरू आहे.

महिलांना इथपर्यंत पोचायचं असेल तर कुटुंबातल्या महिला, इतर नातेवाईक किंवा नवऱ्यांची मदत घ्यावी लागते.

दवाखान्यात यायचं म्हटलं तर इथल्या गरोदर महिलांना उंटावर बसून प्रवास करावा लागतो

फोटो स्रोत, SADAM ALOLOFY/UNFPA

फोटो कॅप्शन, दवाखान्यात यायचं म्हटलं तर इथल्या गरोदर महिलांना उंटावर बसून प्रवास करावा लागतो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सलमा लहान बाळं आणि गरोदर महिलांसाठी मदतीची याचना करतात.

“आम्हाला रस्ते, दवाखाने, औषधांची दुकानं यांची गरज आहे. आमचा जगाशी संपर्कच तुटलाय. ज्या बायका नशिबवान असतात त्या आपल्या मुलांना सुरक्षितपणे जन्म देऊ शकतात. इतर महिला मरतात पण हा खडतर प्रवास कोणालाट चुकत नाही,” सलमा म्हणतात.

काही कुटुंबांकडे दवाखान्याचं बिल भरण्याइतके पैसे असतात पण तिथपर्यंत पोहचण्यासाठी पैसे नसतात.

येमेनमध्ये दर दोन तासाला एक मातामृत्यू होतो. हे मातामृत्यू टाळण्यासारखे असतात असं संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडचे हिकॅम नाहरो म्हणतात.

नाहरो म्हणतात की इथल्या दुर्गम भागातल्या महिलांची नियमितपणे तपासणी होत नाही किंवा त्यांना प्रचंड वेदना किंवा रक्तस्राव सुरू झाला की मगच त्या दवाखान्याची वाट धरतात त्यामुळे अनेकांचे मृत्यू होतात.

अर्ध्याहूनही कमी प्रसुती प्रशिक्षित डॉक्टरच्या हातून होतात आणि फक्त एक तृतीयांश प्रसुती आरोग्य केंद्रात होतात असं संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडचं म्हणणं आहे. येमेनची दोन पंचमांश लोकसंख्या जवळच्या हॉस्पिटलपासून साधारण 1 तासाच्या अंतरावर राहाते.

येमेनची जर्जर झालेली आरोग्यव्यवस्था युद्धाच्या आधीपासूनच मोडकळीस आली होती. गृहयुद्धामुळे येमेनचे दवाखाने, हॉस्पिटल्स आणि रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना दवाखान्यापर्यंत पोचणंच अतिशय मुश्कील होतं.

हॉस्पिटल्समध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणं आणि औषधंही नाहीयेत. रस्तेबांधणीचं काम थांबलंय.

संयुक्त राष्ट्र पॉप्युलेशन फंडच्या एका आकडेवारीनुसार येमेनमधल्या दर पाच पैकी फक्त एकाच आरोग्यकेंद्रात विश्वासार्ह आरोग्यसुविधा मिळतात.

‘मला वाटलं संपलं सगळं’

मोनाची कहाणी तिथल्या अनेक गरोदर मातांच्या कहाणीपैकी एक आहे. तिथल्या सामान्य माणसांना कार परवडूच शकत नाही कारण येमेनची 80 टक्के जनता मदतीवर अवलंबून आहे.

बानी सादसारखे दवाखाने आता आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.

फोटो स्रोत, SADAM ALOLOFY/UNFPA

फोटो कॅप्शन, बानी सादसारखे दवाखाने आता आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.

हालियाच्या नवऱ्याने सौदी अरेबियात काम करून काही पैसे साठवले होते. ते पैसे त्याने आपल्या बायकोला दवाखान्यात नेण्यासाठी एक मोटारसायकल भाड्याने घेण्यात खर्च केले.

जेव्हा तिला कळा सुरू झाल्या तेव्हा तिच्या दिराने तिला मोटारसायकलला बांधलं आणि दवाखान्याच्या दिशेने निघाला. पण रस्त्यात ती पडली.

जेव्हा ती धामर भागातल्या हाडाका आरोग्य केंद्रात पोचली तेव्हा तिला तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यावं लागलं.

“मला वाटलं आता सगळं संपलं. मी आणि माझ्या पोटातलं बाळ काही वाचू शकत नाही,” 30-वर्षांची हालिया सांगते.

तिला तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच सांगण्यात आलं होतं की बाळाला घरी जन्म देण्याचा पर्याय तिच्याकडे नाही कारण अतिरक्तस्राव होऊ शकतो किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.

आरोग्य केंद्रातले डॉक्टर म्हणतात की हालियाला अगदी शेवटच्या क्षणी वाचवण्यात यश आलं.

तिने आपल्या मुलीचं नाव अमल ठेवलंय ज्याचा अरेबिकमध्ये अर्थ होतो ‘आशा’.

“या शापित युद्धामुळे मी माझा आणि माझ्या बाळाचा जीव गमावल्यात जमा होता. पण या छकुलीने मला नवी आशा दिली आहे,” ती म्हणते.

आता आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ आटला आहे. त्यामुळे बानी सादसारखे दवाखाने आर्थिक चणचणीचा सामना करत आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांना बाळांच्या आणि त्यांच्या आयांच्या भविष्याची चिंता आहे कारण पुढे जाऊन त्यांना सगळ्यांना वाचवता येणार नाही.

(फौद राजेह आणि मोहम्मह अल क्वालिसी यांनी दिलेल्या अधिक माहितीसह)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)