राजकारणी, ज्योतिषी आणि एक हत्या, ज्यामुळे 'या' देशाला आणावा लागला नवीन कायदा

फोटो स्रोत, Family handout
- Author, सोफी अब्दुल्ला आणि असिमबत टोकोएवा
- Role, बीबीसी न्यूज
कझाकस्तानमधील एका माजी मंत्र्याने केलेल्या हत्येच्या हाय-प्रोफाईल खटल्यामुळे संपूर्ण देशातील घरगुती हिसेंच्या समस्येला उघड केलं.
एका ऐतिहासिक निकालात देशात कधीकाळी अतिशय शक्तिशाली असलेल्या एका राजकारण्याला पत्नीच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि घरगुती हिंसा थांबवण्यासाठी एक नवीन कायदा आणण्यात आला.
याचप्रकारे इतर पीडितांच्या प्रकरणांमध्येदेखील न्याय मिळू शकेल का, असा प्रश्न या प्रकरणातून उभा राहिला.
हे प्रकरण माजी मंत्र्याशी संबंधित आहे. या मंत्र्यानं त्याच्या पत्नीची हत्या केली होती.
न्यायालयानं या खटल्यात ज्या पुराव्यांवर लक्ष दिलं ते खूपच भयानक होते.
कझाकस्तानच्या माजी अर्थमंत्र्यानंच त्याची पत्नी सल्तनत नुकेनोवा हिची मारहाण करून हत्या केली होती. या घटनेच्या काही भागाचं सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंग झालं होतं.
(पूर्वसूचना : या लेखात महिलांवर करण्यात आलेल्या हिंसेबद्दलची विचलित करू शकणारी माहिती आहे.)
कझाकस्तानची राजधानी असलेल्या अस्तानामधील एका रेस्टॉरंटमधून मिळालेल्या फुटेजमधून समोर आलं की स्थानिक वेळेनुसार 7:15 वाजता कुआंडिक बिशिम्बायेव त्यांच्या पत्नीला लाथांनी आणि हाताने मारहाण करत होते आणि तिचे केस धरून तिला फरफरटत होते.
मात्र या घटनेनंतर 12 तासापर्यत काय झालं ही बाब पुरेशी स्पष्ट नाही. याच कालावधीत त्यांच्या मोबाईलमधून काही फुटेज मिळाले. त्याला न्यायालयात सादर करण्यात आलं, मात्र सार्वजनिकरित्या दाखवण्यात आलं नाही.
एका ऑडिओमध्ये ऐकू येतं की कुआंडिक बिशिम्बायेव दुसऱ्या एका पुरुषाबाबत सल्तनतला प्रश्न विचारत होते आणि तिचा अपमान करत होते.
न्यायालयानं या ऑडिओत ऐकलं की कुआंडिक बिशिम्बायेवने अनेक वेळा एका ज्योतिषाला फोन केला. त्यावेळेस त्यांची पत्नी व्हीआयपी खोलीत बेशुद्ध पडलेली होती. तिथे कोणताही कॅमेरा नव्हता.
शेवटी 20:00 वाजता एक अॅम्ब्युलन्स बोलण्यात आली. तोपर्यत सल्तनत यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टमच्या अहवालनुसार त्यांचा मृत्यू सहा ते आठ तासांआधीच झाला होता.
न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालात म्हटलं होतं की सल्तनतच्या डोक्यात खोल जखम झाली होती. डोक्यात 230 मिली रक्त गोळा झालं होतं. न्यायालयाला माहिती देण्यात आली की त्यांचा गळा दाबल्याच्याही खुणा मिळाल्या होत्या.
24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
ज्या रेस्टॉरंट किंवा फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली त्याचे संचालक बाखित्जान बैझानोव हे बिशिम्बायेव यांचे नातेवाईक आहेत. गुन्हा लपवण्यासाठी त्यांना चार वर्षांची शिक्षा झाली.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान बैझानोव यांनी दावा केला की बिशिम्बायेव यांनीच त्यांना फुटेज डीलीट करण्यास सांगितलं होतं.
13 मे ला अस्ताना मध्ये सर्वोच्च न्यायालयानं 44 वर्षांच्या कुआंडिक बिशिम्बायेव यांना 31 वर्षांच्या सल्तनत नुकेनोवा यांचा क्रूरपणे खून करण्याच्या प्रकरणात 24 वर्षांची शिक्षा सुनावली.

फोटो स्रोत, Supreme Court of Kazakhstan/Telegram
मात्र, कझाकस्तानमध्ये दरवर्षी शेकडो महिला आपल्या पतीच्या हातून मृत्यूमुखी पडत असताना या प्रकरणात शिक्षा सुनावणं सोपं नव्हतं.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, कझाकस्तानमध्ये होणाऱ्या घरगुती हिंसेचं चारपैकी फक्त एक प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचतं.
सल्तनतच्या भावाचं म्हणणं आहे की, कझाकस्तानमधील महिला यांनी आधीपासूनच याविरुद्ध आवाज उठवला आहे, मात्र त्यांच्याकडे कधीही लक्ष देण्यात आलं नाही.
ज्योतिषाबद्दलचं वेड
सल्तनत यांचं बालपण कझाकस्तान-रशिया सीमेजवळ असणाऱ्या पावलोदार शहरात गेलं होतं. शालेय शिक्षणानंतर त्या कझाकस्तानची पूर्वीची राजधानी असलेल्या अल्माटीमध्ये गेल्या होत्या.
तिथे त्या काही दिवस त्यांचा एकमेव भाऊ ऐटबेक अमानगेल्डी याच्यासोबत राहिल्या.
ऐटबेक सांगतात की, या काळात दोघा भाऊ आणि बहिणीतील नात अधिक घट्ट झालं.
दुर्दैवानं लग्नानंतर एका वर्षाच्या आत सल्तनत नुकेनोवा यांची हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, Family handout
समोर आलेल्या बातम्यांनुसार बिशिम्बायेवला 2017 मध्ये लाच घेण्याच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची सुटका झाली होती.
त्या काळात सल्तनत एक ज्योतिषी म्हणून काम करत होत्या. त्यांच्या भावानं सांगितलं की, त्या जेव्हा 9 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या गॉडमदरनं त्यांना ज्योतिषशास्त्राशी संबंधित एक पुस्तक दिलं होतं. तेव्हापासूनच सल्तनतला या विषयात विशेष आवड निर्माण झाली होती.
ते सांगतात की, त्यांची बहीण खूपच हसतमुख होती आणि स्वत:ची ज्योतिष शाळा सुरू करण्याचं तिचं स्वप्नं होतं.

फोटो स्रोत, Family handout
सल्तनत यांचा भाऊ म्हणतो, "वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकलेल्या महिलांना सल्तनत मदत करायची. मग ती कौटुंबिक समस्या असो की लग्नासंदर्भातील अडचण असो की लहान मुलांची समस्या असो."
बिशिम्बायेवशी भेट कशी झाली?
ऐटबेक यांनी सांगितलं की, बिशिम्बायेव यांनी सल्तनतला भेटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिने नकार दिला होता.
ऐटबेकने दिलेल्या माहितीनुसार, "बिशिम्बायेव यांनी कुठूनतरी सल्तनतचा फोन नंबर शोधला. ते खूप जिद्दी होते."
ऐटबेक सांगतात, सल्तनतने त्यांचे अनेक मेसेज दाखवले. ज्यात बिशिम्बायेव यांनी तिला भेटण्याचा आग्रह केला होता आणि त्यांच्याबद्दल लिहिण्यात आलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवण्यासाठी सल्तनतचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.

फोटो स्रोत, Supreme Court of Kazakhstan/YouTube
या भेटीनंतर काही महिन्यांच्या आत दोघांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर लगेच काही दिवसांत अडचण येण्यास सुरुवात झाली. सल्तनतने जखमा झालेले आपले अनेक फोटो आपल्या भावाला पाठवले आणि अनेक वेळा आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा प्रयत्नदेखील केला.
ऐटबेक यांनी सांगितलं की, सल्तनतने आपल्या आवडीची नोकरी सोडल्यानंतर बिशिम्बायेव तिला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत होते.
न्यायमूर्तींनी शिक्षा सुनावताना या हत्येला क्रौर्य असं म्हटलं. बिशिम्बायेव यांनी मारहाण केल्याची आणि शारीरिक इजा पोहोचवल्याची गोष्ट मान्य केली. यामुळेच सल्तनतचा मृत्यू झाला. मात्र, आपला हत्या करण्याचा हेतू नव्हता या गोष्टीवर ते ठाम होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान बिशिम्बायेव यांनी ज्यूरींनी तटस्थ असण्याची अपील केली होती आणि त्यांच्या वकिलानं ऐटबेक यांच्याशी सल्तनत यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले होते आणि ऐटबेक यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला होता.
हिसेंविरोधात उभं राहणं ही धाडसी बाब
पूर्व युरोप आणि मध्य आशियासाठी अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या उपसंचालक डेनिस क्रिवोशीव म्हणतात, "पीडित व्यक्तीलाच दोषी ठरवलं जाऊ शकतं की तिनेच असं वर्तन केलं की ज्यामुळे गुन्हेगारावर असं वागण्याची वेळ आणली. तिला कुटुंब नष्ट करण्याचा किंवा पती, आरोपी आणि सासू-सासरे यांचा आदर न केल्याचा दोष देखील दिला जाऊ शकतो."
त्यांच्या मते, "घरगुती हिंसेची तक्रा करणं हे धाडसाचं काम आहे आणि या प्रकारच्या फारच थोड्या तक्रारी नोंदवल्या जातात यामध्ये काहीच शंका नाही."
संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की दरवर्षी जवळपास 400 कझाक महिलांचा घरगुती हिंसेमुळे बळी जातो.
कझाकस्तानच्या गृहमंत्रालयानुसार 2018 ते 2022 दरम्यान घरगुती हिंसेमध्ये 141.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

फोटो स्रोत, Family handout
क्रिवोशीव यांचं म्हणणं आहे की, अजूनही घरगुती हिंसेबाबत खूपच सोशीकपणा आहे. मात्र आता हा सोशीकपणा कमी होतो आहे.
मात्र, सल्तनत यांच्या अंतिम क्षणांची माहिती न्यायालयातील सुनावणीच्या लाईव्ह स्ट्रीमद्वारे देशासमोर आल्यानंतर सरकारला कठोर पावलं उचलावी लागली.
सोशल मीडियावर या मुद्द्याबाबत चर्चा सुरू झाली. घरगुती हिंसेविरोधातील कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दीड लाख लोकांनी सह्या केल्या.
2017 मध्ये घरगुती हिंसेला शिक्षामुक्त करण्यात आलं होतं. मात्र 15 एप्रिलला राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकायेव यांनी कडक कायद्यावर सही केली.
घरगती हिंसेसंदर्भात काय आहे कायदा?
नवीन 'सल्तनत कायद्या'मुळे आता घरगुती हिंसा हा गंभीर गुन्हा आहे. याआधी याला सामान्य गुन्हा मानलं जायचं. आता या प्रकारच्या प्रकरणांमध्ये पीडितेनं तक्रार केलेली नसली तरी देखील खटला चालवला जाऊ शकतो.
घरगुती हिंसा आणि बलात्कार यांच्या पीडितेला मदत करण्यासाठी एक संस्था चालवणाऱ्या स्माइलोवा म्हणतात की कायदा कडक करणं हे पुरेसं नाही.
त्या म्हणतात, "जर महिला किमान 21 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली नसेल तर याला किरकोळ जखम मानली जाते. हाड मोडणं, नाकाचं हाड तुटणं आणि जबडा तुटण्यास किरकोळ जखम मानली जाते."

फोटो स्रोत, Family handout
स्माइलोवा यांनी 2016 मध्ये आपल्या संस्थेची सुरूवात केली होती. थोड्याच दिवसांमध्ये त्यांना शेकडो महिलांचे संदेश मिळाले. यात त्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या घरगुती हिंसा, त्याची माहिती देण्यास आणि तक्रार करण्यास मनाई करण्यात आल्याची बाब त्यांना सांगितली होती.
त्या सांगतात की सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास त्यांची संस्था मागील आठ वर्षांमध्ये झालेल्या हिंसेच्या गंभीर प्रकरणांना प्रकाशित करणार आहे.
त्या स्वत: कझाकस्तानमध्ये राहत नाहीत. कारण चुकीची माहिती पसरवणं, प्रायव्हसीचं उल्लंघन करणं आणि फसवणूक केल्याचा आरोप लावून कझाकस्तानच्या प्रशासनानं त्यांचं नाव वॉंटेड लिस्टमध्ये समाविष्ट केलं आहे.
अर्थात सल्तनत यांचा भाऊ ऐटबेक यांचं म्हणणं आहे की, हा कायदा पुरेसा नाही. मात्र किमान याची सुरुवात तरी झाली आहे. लोकांना यामुळे हे तरी कळालं की सर्वात शक्तीशाली व्यक्तीला देखील शिक्षा होऊ शकते.
ते म्हणतात, "कझाकस्तानमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे आणि न्यायालयासमोर सर्वजण सारखेच आहेत, ही गोष्ट या खटल्यामुळे लोकांना कळेल."











