You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
- Author, जेमा क्रू आणि गॅब्रियेला पॉमरॉय
- Role, बीबीसी न्यूज
स्वित्झर्लंडमधील एका स्की रिसॉर्टमधील बारला लागलेल्या भीषण आगीत किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 115 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या सेलिब्रेशनदरम्यान रात्री दीड वाजता आग लागली. क्रा-मोंटानामधील ले कॉन्स्टेलेशन नावाच्या बारमध्ये ही घटना घडली.
तपास अधिकाऱ्यांनी अद्याप आगीच्या कारणाची पुष्टी केलेली नाही. पण कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची शक्यता मात्र पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे.
दुर्घटनेत अनेक देशांतील नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस कमांडर फ्रेडरिक गिस्लर यांच्या मते, काही दिवसांत मृतांची ओळख पटवण्याला प्राधान्य असेल. त्यानंतरच मृतदेह लवकरात लवकर कुटुंबांच्या ताब्यात दिले जाऊ शकतील.
वेले हा परिसर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या भागात घडलेल्या आगीच्या या घटनेनंतर रात्री मदत आणि बचाव कार्यासाठी 13 हेलिकॉप्टर्स, 42 रुग्णवाहिका आणि 150 आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
गव्हर्नर मॅथियस रेनार्ड यांनी बहुतांश जण गंभीर होरपळले असल्याचं सांगितलं. 60 जणांना वॅलेमधील झिओन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आङे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
आगीबद्दल आतापर्यंत काय माहिती मिळाली?
रेनार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील आयसीयू रुग्णांनी पूर्णपणे भरला आहे.
"मृत आणि जखमींची ओळख पटविण्यासाठी कुटुंबांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल याची जाणीव आहे," असं ते म्हणाले.
जखमींपैकी काहींना स्वित्झर्लंडमधील इतर रुग्णालयांत पाठवण्यात आलं आहे. आगीत होरपळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष युनिट असलेल्या लुसाने आणि झुरिकमधील हॉस्पिटल्सचा त्यात समावेश आहे.
लॉझेन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याठिकाणी 22 रूग्णांवर उपचार केले जात आहेत, तर 12 रुग्णांवर झुरिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
काही रुग्णांना जिनिव्हा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्येही पाठवण्यात आलं आहे. तिथं गंभीर भाजलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
बीबीसीच्या वर्ल्ड टुनाईट कार्यक्रमात बोलताना डॉ. रॉबर्ट लारिबो म्हणाले की, "हे रुग्ण खूप कमी वयोगटातील (अंदाजे 15 ते 25) आहेत".
डॉ.लारिबो यांच्या मते, "आग एवढी भयंकर होती की, भाजलेल्या जखमा या आतपर्यंत असू शकतात. विषारी धूर लोकांच्या फुफ्फुसात शिरला आहे," असंही ते म्हणाले.
'फ्लॅशओव्हर इफेक्ट'
युके असोसिएशन ऑफ फायर इन्व्हेस्टिगेटर्सचे अध्यक्ष रिचर्ड हेगर यांच्या मते आग लागल्यानंतर ती अधिक धोकादायक बनण्यामागं 'फ्लॅशओव्हर इफेक्ट" हे महत्त्वाचं कारण आहे.
"सुरुवातीला आग लागते, ज्वाला आणि उष्णता छतापर्यंत जाते आणि नंतर सर्वत्र पसरते. उष्णता कमी होऊन फर्निचर, टेबल यासारख्या गोष्टी गरम होतात. त्यामुळं तापमान इतकं वाढतं की या गोष्टींमधून ज्वलनशील वायू बाहेर पडायला सुरुवात होते," असं हेगर म्हणाले.
"त्यानंतर हा गॅस खूप लवकर जळू लागतो. काही सेकंदात, संपूर्ण खोली आगीच्या कचाट्यात सापडते."
इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयानं बीबीसीला सांगितलं की, त्यांचे 16 नागरिक अद्याप बेपत्ता असून 12 ते 15 जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांचे आठ नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. मृतांमध्ये फ्रेंच नागरिकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
फ्रेंच माध्यमांच्या माहितीनुसार, जखमींपैकी किमान दोन फ्रेंच नागरिक आहेत.
इटलीचे गुइडो बर्टोलासो यांच्या मते, इटलीच्या तीन नागरिकांना मिलानच्या निगुआर्डा रुग्णालयात नेलं जात आहे. तिथं भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक मोठं युनिट आहे.
"रुग्णांच्या शरीराचा 30 ते 40 टक्के भाग भाजला आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत," असं ते म्हणाले.
मृतांची आणि जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या नागरिकत्वाबाबत अद्याप स्पष्ट महिती मिळालेली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी यात अनेक देशांतील लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.
आगीच्या वेळी बारमध्ये किती लोक होते हे माहिती नसल्याचं, अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत म्हटलं.
पत्रकारांनी फ्लेअर्स असलेल्या शॅम्पेनच्या बाटल्या आगीचे कारण असू शकतात का? आणि बारच्या पायऱ्या अरुंद असल्याच्या वृत्तांबाबत विचारलं.
त्यावर तपास सुरू आहे तोपर्यंत काहीही निश्चित सांगता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. पत्रकार अरुंद दिसत असल्या तरी त्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार होत्या की नाही, हे तापसलं जाईल असंही अॅटर्नी जनरल बिएत्रिस पिलुड म्हणाले.
पिलुड यांच्या मते, आगीच्या कारणांबाबत अनेक शक्यता समोर आल्या आहेत. पण सध्या तरी छोट्या आगीनं मोठं रुप धारण केल्याच्या सिद्धांताचा सध्या सर्वाधिक विचार केला जात असल्याचं ते म्हणाले.
अनेक प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात आली असून तपासासाठी मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
हल्ल्याची कोणतीही शक्यता नसल्याचंही पिलुड यांनी स्पष्टपणे सांगितलं.
पीडितांची ओळख पटविण्याचं आणि त्यांचे मृतदेह लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले.
"यासाठी मोठं आणि गुंतागुंतीची प्रक्रिया राबवावी लागेल. त्यासाठी संपूर्ण परिसर बंद करावा लागेल," असंही ते म्हणाले.
आग लागली ती जागा कशी आहे?
इटलीचे स्वित्झर्लंडमधील राजदूत जियान लोरेंझो कोर्नाडो यांनी मृतांची ओळख पटण्यास अनेक आठवडे लागण्याची शक्यता व्यक्त केली.
स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलेन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, ही आग म्हणजे देशाने अनुभवलेल्या सर्वात वाईट शोकांतिकांपैकी एक आहे.
क्रॉस-मोंटाना हे एक लक्झरी स्की रिसॉर्ट असून 1980 च्या दशकात इथं वर्ल्ड कप स्कीइंगचं आयोजन करण्यात आलं होतं.
'ले कॉन्स्टेलेशन' बार अनेक दशकं जुना आहे. इथं वरच्या मजल्यावर टीव्ही स्क्रीन आहेत. तिथं लोक फुटबॉल सामने पाहण्यासाठी जातात. तर तळमजल्यावर ड्रिंक्स आणि डान्ससाठी मोठा बार आहे.
अनेक देशांनी व्यक्त केला शोक
ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयानं या 'भयावह' दुर्घटनेतील मृत आणि जखमींप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. कॉन्सुलर कर्मचारी याचा फटका बसलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी या दुर्घटनेमुळं त्यांना आणि पत्नी राणी कॅमिला यांना 'खूप दु:ख' झाल्याचं म्हटलं. "तरुण आणि त्यांच्या कुटुंबांसाठी उत्सवाची ही रात्र एक भयावह दुर्घटनेत बदलली हे मन हेलावून टाकणारं आहे," असं त्यांनी म्हटलं.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी, फ्रान्स जखमी झालेल्या लोकांना उपचारांसाठी त्यांच्या रुग्णालयात दाखल करत असल्याचं सांगितलं.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी युरोपियन युनियनच्या नागरी संरक्षण यंत्रणेद्वारे पीडितांना वैद्यकीय मदत देण्यासाठी युरोपियन युनियन स्विस अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचं सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.