सर्वांत वेगवान धावपटूंच्या वेगाचं काय रहस्य असतं, आपण सुद्धा तितकं वेगात धावू शकू का?

उसेन बोल्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उसेन बोल्ट - रिओ ऑलिंपिक 2016 - 100 मीटरमध्ये सुवर्णपदक
    • Author, अ‍ॅनाबेल बॉर्न

ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धांचं दर चार वर्षांनी आयोजन केलं जातं. या स्पर्धांमध्ये जगाच्या विविध भागात राहणाऱ्या खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचं दर्शन घडतं.

अफाट शारीरिक क्षमतांच्या जोरावर हे खेळाडू असे पराक्रम करतात की, अनेकांसाठी त्यांची ही कामगिरी स्वप्नवतच असते.

सर्व क्रीडा प्रकारांत धावण्याची स्पर्धा सर्वांत थरारक असते. जगभरातील धावपटू जेव्हा ट्रॅकवर येतात तेव्हा अनेकांचा श्वास थांबलेला असतो.

ऑलिंपिकमधील इतर क्रीडा प्रकारांमध्येही अशी चित्तवेधक स्पर्धा रंगलेली आपल्याला दिसते. अशावेळी या स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीची आपल्याला काहीअंशी तुलनाही दिसून येते.

स्प्रिंट्स म्हणजेच कमी अंतराच्या शर्यतीतीत धावपटूला धावण्यासाठी स्वतंत्र लेन असते, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, असं ऑलिपिंक पदक विजेता इलिध डॉयलनं म्हटलं.

इलिध 400 मीटर शर्यत आणि अडथळ्यांच्या शर्यतींमध्ये निपुण आहे. त्यानं 2016 च्या रिओ ऑलिपिंकमध्ये 4 x 400 मीटर रिले स्पर्धेत ग्रेट ब्रिटनसाठी कांस्य पदकाची कमाई केली.

ग्राफिक

फोटो स्रोत, Serenity Strull/BBC/Getty Images

इलिध म्हणाला की, "स्प्रिंट्स 1500 मीटर शर्यतीसारख्या नसतात. कारण अशा जास्त अंतराच्या शर्यतीत इतर धावपटूंच्या डावपेचांचा तुमच्यावर थेट परिणाम होऊ शकतो. पण स्प्रिंट्समध्ये तुम्ही तुमच्या लेनमध्ये उभं राहिल्यानंतर क्षमता असेल तर ठरवलं ते करून दाखवू शकता. कारण तिथं तुमच्या मध्ये दुसरं कोणीही येण्याची शक्यता नसते."

स्प्रिंटिंगचं कोडं उकलण्याचं एक साधं समीकरण आहे. धावण्याचा वेग हा दोन पावलांतील अंतर गुणिले पावलं टाकण्याची वारंवारता याच्या एवढा असतो.

एक तर तुम्ही लांब-लांब पावलं टाकायला हवी किंवा त्याचा वेग वाढवायला हवा. या अगदी साध्या गोष्टीत याचं गमक आहे, असं मत दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील बायोमेकॅनिक्स, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचे संशोधक सॅम ग्लेडहिल म्हणाले.

यातील महत्त्वाचं म्हणजे या दोन्हीपैकी एकामध्ये आपण सुधारणा केली तरी, दुसऱ्यावर त्याचा काही परिणाम होऊ नये असं वाटत असतं.

पावलांची वारंवारता किंवा संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला तर दोन पावलांमधली लांबी कमी होते, किंवा त्याच्या उलटही घडू शकतं. म्हणजे पावलांमधली लांबी वाढवली तर संख्या कमी होऊ शकते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धावपटूनं या दोनपैकी कशावर अवलंबून राहायचं हा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो.

"ऑलिपिंकच्या 100 मीटरच्या अंतिम फेरीतही, धावपटूंमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स पाहायला मिळतात," असं ग्लेडहिल म्हणतात.

"ख्रिश्चन कोलमनसारखा पिळदार स्नायू असलेला धावपटू एकदम वेगानं सुरुवात करतो. तो बराच वेळ वेग कायम ठेवू शकतो. दुसरीकडे उसेन बोल्टसारखा उंच आणि लांब पाय असलेला धावपटू लांब आणि मोठी पावलं टाकतो."

बोल्टच्या वेगामागचं प्रमुख कारण ही त्याच्या पावलांमधली लांबी आणि ग्राऊंड रिअॅक्शन फोर्स हे आहे. धावताना निर्माण होणाऱ्या फोर्समुळे त्याच्या पुढच्या पावलांतील लांबी वाढते. बोल्टने 9.58 सेकंदांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केलेल्या शर्यतीत त्याच्या दोन पावलांमधील सर्वाधिक अंतर 2.872 मीटर (9.5 फूट) पर्यंत होतं.

या अभ्यासामागचे पुरावे पुरेसे आश्वासक नाहीत. पण संशोधनानुसार, महिला धावपटूंचा वेग हा पावलांच्या वारंवारतेवर किंवा संख्येवर अवलंबून असतो. तर पुरुष धावपटूंचा वेग पावलांच्या लांबीवर अधिक अवलंबून असतो. पायांच्या लांबीमुळं दोन पावलांतील अंतरावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, हेही त्यामागचं कारण असू शकतं.

आपल्या पावलांच्या लांबीवर अवलंबून असलेल्या धावपटूंना पायाची क्षमता, भरपूर शक्ती आणि कंबरेत किंवा हिपच्या भागात लवचिकता राखणं गरजेचं असतं. यामुळं पायांचा जमीनीवर राहण्याचा वेळ कमी होतो.

नॉन-स्प्रिंटर्सच्या तुलनेत, स्प्रिंटर्समध्ये हिप आणि नी फ्लेक्सर मसल्स हे मोठ्या आकाराचे असतात. पाच आघाडीच्या पुरुष धावपटूंच्या अभ्यासात, टेन्सर फॅसिआ लॅटे, सार्टोरियस आणि ग्लूटियस मॅक्सिमस (हिप मसल्स) 11 इतर पुरुष धावपटूंपेक्षा मोठे होते. संशोधकांच्या टीमला असं आढळून आलं की, मोठ्या हिप फ्लेक्सर्सने पाच आघाडीच्या महिला धावपटूंच्या स्प्रिंट कामगिरीमध्ये 17 इतर धावपटूंच्या तुलनेत 47.5% फरक स्पष्ट दिसून आला.

दुसरीकडे, स्टेप फ्रिक्वेंसी ही मोटर न्यूरॉन एक्सायटिबिलिटी, इंटर अँड इंट्रामस्क्यूलर को-ऑर्डिनेशन आणि न्यूरल फटिगद्वारे ठरते.

स्टेप फ्रिक्वेंसीवर अवलंबून असलेल्या धावपटूंना पायाच्या वेगवान हालचालींसाठी धावण्याआधी हाय न्यूरल अॅक्टिविटी (मज्जातंतूच्या तीव्र हालचाली) आवश्यक असतात.

परंतु, पावलांची फ्रिक्वेंसी किती प्रमाणात सुधारली जाऊ शकते याबद्दल काही प्रश्न आहेत.

ग्राफिक

फोटो स्रोत, Serenity Strull/BBC/Getty Images

फोटो कॅप्शन, आघाडीच्या धावपटूंमध्ये ते वापरत असलेल्या तंत्रांमध्ये भरपूर फरक आहेत

ग्रीसमधील ॲरिस्टॉटल युनिव्हर्सिटी ऑफ थेस्सालोनिकी येथील बायोमेकॅनिक्सचे सहाय्यक प्राध्यापक वॅसिलोस पनौतसाकोपॉलोस म्हणतात की, "माझ्या दृष्टिकोनातून, पावलांची लांबी सुधारण्यावर अधिक अवलंबून राहावं लागेल. स्टेप फ्रिक्वेन्सी ही अशी गोष्ट आहे, जी प्रौढ झाल्यानंतरही बदलत नाही."

धावण्याची कामगिरी किंवा क्षमता ही अनुवांशिकता आणि आजूबाजूच्या घटकांमुळेही प्रभावित होते. परंतु, स्टेप फ्रिक्वेन्सीमध्ये अनुवांशिकता मोठी भूमिका बजावू शकते. कारण ते मोटर न्यूरोन एक्सायटिबिलीटीशी संबंधित आहे. नैसर्गिकरीत्या जलद चालण्याची प्रवृत्ती असलेले लोक चांगले धावपटू देखील असू शकतात.

ज्यात सुधारणा केली जाऊ शकते त्यालाच टेक्निक किंवा तंत्र म्हणतात. पनौतसाकोपॉलोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं आढळून आलं की, तरुण धावपटू हे अधिक अनुभवी आणि प्रौढ धावपटूंच्या तुलनेत सपाट पायाचे असतात.

"आम्हाला आढळलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली मुलांमध्ये पंजे उचलण्याची क्रिया दिसून येत नाही," असे पनौतसाकोपौलोस म्हणतात. "तरुण धावपटू फक्त पाय उचलतात."

ग्राफिक

फोटो स्रोत, Serenity Strull/BBC/Getty Images

फोटो कॅप्शन, जेव्हा तुमचा पाय ताकदीने जमिनीवर आदळतो तेव्हा निर्माण होणाऱ्या गतीने तुमच्या धावण्याचा वेग वाढू शकतो

पनौतसाकोपौलोस यांनी एक चपखल उदाहरण दिलं आहे. धावताना बदकाप्रमाणे चपटे पाय न ठेवता घोड्याप्रमाणे पंजे जमिनीवर आले पाहिजेत.

स्प्रिंटच्या इतर तंत्रांमध्ये जमिनीशी संपर्क साधून आणि स्प्रिंटच्या सुरूवातीस धड पुढे झुकवून बल निर्माण होते आणि वेग वाढतो.

"ऑलिंपिक स्प्रिंटर्स जेव्हा ब्लॉक्समधून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या पायाचे भाग आडवे असतात किंवा ट्रॅकच्या बाजूने असतात," असे ग्लेडहिल म्हणतात.

वारंवार धावण्याचा सराव करणं हा वेग वाढवण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु आपल्या हालचाली बदण्यासाठी आणि तंत्र सुधारण्यासाठी काही व्यायामही आहेत.

"उंच गुडघे असणारे बरेच लोक चुकीची पद्धत अवलंबतात, असं मला वाटतं," असं डॉयल म्हणतात, "जेव्हा तुम्ही धावता, तेव्हा तुम्ही गुडघे समोरून वर उचलत नाही. तुमची टाच तुमच्या हिपजवळ येते आणि असं केल्यानं तुमचा गुडघा बाहेर जातो."

सक्षमपणे धावण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी समन्वय, स्थिरीकरण, मज्जासंस्था सक्रिय करणे आणि स्नायूंच्या वापरासाठी अनेक वर्षे प्रशिक्षण घ्यावं लागतं.

परंतु असे काही छोटे बदल आहेत की प्रत्येकजण असे प्रयत्न करू शकतात, जसं की पाय जास्त वाकवणे, वेग वाढवताना पुढं झुकणं किंवा शक्य तितक्या कमी वेळेत जमिनीला स्पर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणं.

प्रत्येकाची स्वतःची एक शरीररचना आहे. कोणाचे पाय लांब आहेत तर काहींचे छोटे. त्यामुळं आपल्याला कोणत्या शैलीत वेगानं धावायचं यासाठी आपण प्रयोग करणं फायदेशीरच ठरतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.