'इंटरमिटेंट फास्टिंग' म्हणजे काय? हे डाएट करताना काय खबरदारी घ्यायला हवी?

फोटो स्रोत, BHARTI SINGH FB
कॉमेडियन भारती सिंह हिने आपण 15 किलो वजन कमी केल्याचं म्हटलं होतं. भारतीने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, मी 'इंटरमिटेंट फास्टिंग' करतीये. माझं वजन एवढं कमी झालंय याचं मलाच नवल वाटतंय.
भारतीने सांगितलं, "माझं वजन 91 किलोंवरून 76 किलो झालं आहे. मला आता दम नाही लागत. शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. माझा अस्थमा आणि डायबेटीस पण नियंत्रणात आला आहे. मी सध्या 'इंटरमिटेंट फास्टिंग' करतीये. मी संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत काहीही खात नाही."
भारतीप्रमाणेच अनेक जण वजन कमी करण्यासाठी 'इंटरमिटेंट फास्टिंग'चा मार्ग अवलंबत आहेत. पण वजन कमी करण्याचा, डाएटिंगचा हा नेमका प्रकार काय आहे?
'इंटरमिटेंट फास्टिंग' म्हणजे काय?
उपवासाबद्दल, व्रतामध्ये ठराविक वेळांमध्येच खाण्याबद्दल आपल्याला माहिती असते, पण 'इंटरमिटेंट फास्टिंग' म्हणजे ठराविक तासांमध्ये अजिबात काहीही न खाणं.
जॉन हॉपकिन्स मेडिसिन ही आरोग्य क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. त्यांच्या मते डाएटमध्ये काय खायचं आणि काय नाही, हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं, पण 'इंटरमिटेंट फास्टिंग'मध्ये केव्हा खायचं याला जास्त महत्त्व आहे.

फोटो स्रोत, THE WASHINGTON POST
'इंटरमिटेंट फास्टिंग'मध्ये तुम्ही दिवसातल्या ठराविक तासांमध्येच खाऊ शकता. 'इंटरमिटेंट फास्टिंग'मध्ये दिवसात ठराविक वेळ ठरवून खायचं असतं आणि त्यानंतर कित्येक तास तुम्ही काही खात नाही. याचा उपयोग तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला होतो.
जॉन हॉपकिन्समध्ये न्यूरो शास्त्रज्ञ असलेल्या मार्क मॅटसन यांनी गेली 25 वर्षं 'इंटरमिटेंट फास्टिंग' चा अभ्यास केला आहे.
हॉपकिन्समेडिसिन डॉट ओआरजीवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ते सांगतात, की अनेक तास किंवा अगदी काही दिवसही जेवण नाही मिळालं तरी तग धरू शकेल अशाच पद्धतीनं आपलं शरीर विकसित झालं आहे. जेव्हा मनुष्य शेती करत नव्हता त्या काळाचा दाखला ते देतात. शिकारी अवस्थेत असताना माणूस अनेक तास बिना अन्न घेता तगून राहू शकत होता.
जॉन हॉपकिन्समध्येच डायटिशियन असलेल्या क्रिस्टी विल्यम्स यांच्या मते 'इंटरमिटेंट फास्टिंग' चे अनेक प्रकार आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे डाएट पाळायला हवं.
'इंटरमिटेंट फास्टिंग' मध्ये एक प्रकार आहे 16/8- ज्यामध्ये तुम्ही दिवसातले 16 तास खाण्यापासून दूर राहता आणि उरलेल्या 8 तासांतच जेवण करता. क्रिस्टी यांच्यामते अनेक लोक हाच पॅटर्न फॉलो करतात. कारण तो अधिक काळापर्यंत करणं शक्य आहे.

फोटो स्रोत, REDA&CO
'इंटरमिटेंट फास्टिंग'चा दुसरा प्रकार आहे 5/2. यामध्ये तुम्हाला आठवड्यातले पाच दिवस नॉर्मल डाएट घ्यायचं असतं. मात्र आठवड्यातले उरलेले दोन दिवस मात्र शरीराला केवळ 500 ते 600 कॅलरी मिळतील एवढाच आहार घ्यायचा. शिवाय हे दोन दिवस सलग येता कामा नयेत. म्हणजे या दोन दिवसांच्या मध्ये किमान एक दिवस तरी नॉर्मल डाएटचा (ज्यादिवशी तुम्ही रोजचा आहार घेता) असायला हवा.
खूप जास्त काळासाठी 24, 36, 48 किंवा 72 तास खाणं न मिळणं हे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं असा इशाराही क्रिस्टी देतात. कारण खूप जास्त वेळ न खाल्ल्यामुळे भूकेनंच तुमच्या शरीरात फॅट जमा व्हायला सुरुवात होते.
त्यामुळेच तुम्ही जेव्हा खात नसाल तेव्हा पाणी तसंच झीरो कॅलरीवाल्या पेयांचं (उदाहरणार्थ - चहा किंवा ब्लॅक कॉफी) सेवन करत राहण्याचा सल्ला डॉ. क्रिस्टी विल्यम्स देतात. खाणं योग्य आणि आरोग्यदायी असावं यावरही त्या जोर देतात.
कोणते पदार्थ खायला हवेत?
'इंटरमिटेंट फास्टिंग'मध्ये तुम्ही जेवणाच्या ज्या वेळा निश्चित केल्या आहेत, त्याच वेळेस तुम्ही जेवण कराल याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉ. शिखा शर्मा सांगतात.
वैदिक शास्त्रांमध्येही सूर्यास्तानंतर खाऊ नये. कारण त्यानंतर जेवण पचत नाही असं सांगितल्याचंही डॉ. शिखा नमूद करतात.

फोटो स्रोत, Dr. Shikha Sharma
उन्हाळ्यात सूर्यास्त सात किंवा साडे सातपर्यंत होतो. थंडीच्या दिवसांत सूर्यास्त अगदी साडेपाच-सहालाच होतो. म्हणजे तासांचं गणित बदलतं. असावेळी तुम्ही आठ तासांमध्ये काय खात आहात याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं शिखा म्हणतात.
त्या सांगतात, "जर तुम्ही बर्गर किंवा पिझ्झा खाल्ला, खूप साखर असलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? त्यामुळे आठ तासांमध्ये जो आहार घ्याल तो योग्य आणि संतुलित असावा याचीही काळजी घेतली पाहिजे."
डॉ. शिखा या पोषक आहार घेतला पाहिजे यावर जोर देतात. त्या म्हणतात की, 'इंटरमिटेंट फास्टिंग'बद्दल बोलताना कधी खाल्लं पाहिजे याबद्दलच जास्त बोललं जातं, पण काय खाल्लं पाहिजे यावर चर्चा होत नाही.
त्या पुढे सांगतात, की 'इंटरमिटेंट फास्टिंग'करणारे अनेक लोक सकाळी नाश्ता करू शकत नाहीत तसंच त्यांचं दुपारचं जेवणही होत नाही. मात्र, या दरम्यान ते चहा-बिस्कीट वगैरे खातात. मग संध्याकाळी खूप भूक लागली की कँटिनमधून काहीतरी मागवलं जातं आणि रात्रीचं जेवण एकदम भरपेट घेतलं जातं. दुसऱ्या दिवशीही हेच चक्र. यामुळे शरीराचं नुकसानच होतं.

फोटो स्रोत, LAURA CHASE DE FORMIGNY FOR THE WASHINGTON POST V
"जेव्हा तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया प्रचंड गतिमान असते, तेव्हा तुम्ही शरीराला उपाशी ठेवलेलं असतं आणि ज्यावेळेस ती मंदावत असते, तेव्हा तुम्ही पोटभर खात असता. यामुळे लठ्ठपणा, पोषक तत्त्वांची कमतरता जाणवणं आणि अधाशीपणा हे तीन दोष तुमच्या शरीरात काम करायला लागतात," असं डॉ. शिखा म्हणतात.
डॉ. शिखा सल्ला देतात की, जर तुम्ही 16/8 या पद्धतीची इंटरमिटेंट फास्टिंग करत असाल, तर 16 तासांमध्ये तुम्ही ग्रीन टी, भाज्यांचे ज्यूस वगैरे घेऊ शकता आणि उरलेल्या आठ तासांमध्ये तुम्ही अन्नपदार्थ खाऊ शकता. ब्राउन राइस, पोहे, इडली, ओट्स, दलिया, म्युसली असे पदार्थ आठ तासांत खाता येतील. साखर टाळून त्याऐवजी गुळाचा वापर करायला हवा.
त्यांच्यामते, कोणताही डाएट प्लॅन हा वजन कमी करण्याचा एक 'शॉर्ट कट' असतो. तुम्ही जेव्हा हे डाएट फॉलो करणं थांबवता, तेव्हा त्याचे दुष्परिणामही समोर येतात. तुम्ही जेव्हा योग्य आणि संतुलित आहार घेत असता, तेव्हाच तुमचं वजन नियंत्रणात राहत असल्याचंही त्या आवर्जून सांगतात.
जॉन हॉपकिन्समधील न्यूरो शास्त्रज्ञ मार्क मॅटसन यांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापून आलेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे की, इंटरमिटेंट फास्टिंगमुळे शरीराला फायदाही झाला आहे. टाइप 2 डायबेटिस, हृदयविकार, पित्ताचे विकार असे अनेक जुनाट आजार इंटरमिटेंट फास्टिंगमुळे नियंत्रणात आल्याचं दिसलं आहे.
डॉ. शिखा शर्मा सांगतात, की लोक वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लॅन अंमलात आणतात. पण वजन कमी झालं की पुन्हा नेहमीचं खाणं सुरू होतं आणि वजन पुन्हा वाढायला सुरूवात होते. कारण अनेकदा लोक खाण्याच्या सवयींमध्ये मुलभूत बदल करत नाहीत, तर केवळ वजन घटविण्याचा झटपट मार्ग अवलंबतात. त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








