शरद पवार आणि अजित पवार यांची 'राष्ट्रवादी' एकत्र येईल का?

अजित पवार आणि शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

8 मे रोजी शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचा स्वत:चा पक्ष आणि अजित पवारांची 'राष्ट्रवादी काँग्रेस' यांच्याबद्दल जे म्हटलं, त्यानं गेल्या काही दिवसांपासून जी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, ती अगदी जाहीरपणे सुरू झाली.

त्या चर्चेचा विषय : शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष, म्हणजे दोघांची स्वतंत्र' राष्ट्रवादी काँग्रेस, एकत्र येईल का? त्याचा दुसरा कंगोरा, पवारांची 'राष्ट्रवादी' अजितदादांच्या तुलनेनं मोठ्या असलेल्या 'राष्ट्रवादी'त विलीन होईल का?

ते होईल किंवा नाही, याबद्दल बोलण्याअगोदर, शरद पवार या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले, हे बघू.

प्रश्न: तुम्ही तुमच्या पक्षाचं काय भवितव्य पाहता आहात?

उत्तर: पक्षांतर्गत दोन दृष्टिकोन आहेत. एक गट म्हणतो की आपण (अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'सोबत) पुन्हा एकत्र आलं पाहिजे. दुसरा गट म्हणतो आहे की आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, कोणत्याही प्रकारे, भाजपासोबत जाऊ नये. आपण 'इंडिया' आघाडीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि विरोधकांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे.

प्रश्न: पण तुम्ही अगोदरच 'इंडिया' आघाडी'त आहात ना?

उत्तर: 'इंडिया' आघाडी आता कार्यरत नाही. आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल. पक्षही उभारावा लागेल. नव्या तरुणांना पक्षात आणावं लागेल आणि काम करावं लागेल.

प्रश्न: तुम्ही तुमचे पुतणे अजित पवार यांना गेल्या आठवड्यात दोनदा भेटला?

उत्तर: ते भेटणं राजकारणासाठी नव्हतं. अनेक संस्था आहेत जिथं आम्ही एकत्र काम करतो किंवा 'एनडीए'च्या लोकांसोबत वा डाव्या पक्षांसोबत एकत्र काम करतो. ते पुढंही करणं आम्ही चालू ठेवू.

प्रश्न: सुप्रिया सुळे यांच्याबाबत काय?

उत्तर: तिलाही भूमिका घ्यावी लागेल. हे ठरवावं लागेल की संसदेत विरोधी बाकांवर बसायचं किंवा नाही.

शरद पवार आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवारांच्या या मुलाखतीतल्या विधानांनी एक स्पष्ट झालं की, गेला काही काळ जी केवळ एक चर्चा अथवा अफवा होती की त्यांच्या पक्षातल्या काहींना पुन्हा सत्तेत आलेल्या अजित पवारांशी जुळवून घ्यायचं आहे, ती खरी आहे.

स्वत: पवारांनीच ते मान्य केलं आहे. प्रत्यक्ष राष्ट्रवादी फुटण्याअगोदर काही मुलाखतींमध्ये त्यांनी हे मान्य केलं होतं की त्यांच्या काही सहकाऱ्यांना भाजपासोबत जायची इच्छा होती. पुढे काय झालं हे सगळ्यांनी पाहिलंच.

मग आता जेव्हा पवार असा 'एकत्रित राष्ट्रवादी'चा दृष्टिकोन काही जणांचा आहे असं म्हणत आहेत, त्यानंतर खरंच भविष्यात हे दोन पक्ष एकत्र येतील का?

गेल्या काही काळात वाढलेली जवळीक

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटल्यानंतर, त्यांनी एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवण्याचं निश्चित झाल्यावर, या सगळ्या काळात प्रत्येक पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली. इथं आपण 'राष्ट्रवादी'बद्दल बोलतो आहोत, म्हणून केवळ त्यांच्याबद्दल सीमित राहू.

इथे पक्षातली आणि कुटुंबातलीही फूट मोठी होती. नेहमी एकत्र असणारं पवार कुटुंब या काळातल्या दिवाळीला पहिल्यांदा एकत्र नव्हतं.

अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्यापर्यंत आणि सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभेला सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवण्यापर्यंत ही फारकत होती. त्यावेळेस कुटुंबाअंतर्गत म्हणता येतील अशा प्रकारचेही आरोप-प्रत्यारोप झाले.

शरद पवार आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे ज्या सहकाऱ्यांना राजकारणात आणण्यापासून ते प्रस्थापित होण्यापर्यंत शरद पवारांनी सगळं केलं, त्या सगळ्यांना निवडणुकीत पाडा किंवा धडा शिकवा असा प्रचार करण्यापर्यंत पवारांना जावं लागलं.

लोकसभा आणि विधानसभा, दोन्ही निवडणुकांच्या काळात जसा प्रचार झाला तो पाहिल्यावर, ज्यांना 'राष्ट्रवादी'तली फूट खरी आहे हे पटत नव्हतं, त्यांनाही ते खरं आहे, हे जणू पटलं.

पण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसला, स्पर्धेव्यतिरिक्त नियमित व्यवहार सुरू झाले आणि त्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही गटांमधली वाढू लागलेली जवळीक पुन्हा चर्चेचा विषय बनली.

8 मे रोजी शरद पवार यांनी एक मुलाखत दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 8 मे रोजी शरद पवार यांनी एक मुलाखत दिली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एका बाजूला हे दोन एक गट एकत्र येतील का आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि अजित पवार यांचं अनेकदा एका मंचावर येणं. गेल्या महिन्यात अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला. त्यावेळेस निवडणुकीच्या काळात वेगळं दिसलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं.

पूर्वी एका मंचावर न येण्याचा प्रयत्न करणारे अजित पवार आणि शरद पवार गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सार्वजनिक मंचांवरही एकत्र आले. 21 एप्रिलला पुण्याच्या 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'च्या कार्यक्रमात एका मंचावर आले. त्यावेळेस त्यांच्यत एक बैठक झाल्याची चर्चा बराच काळ होती. 'शेतीतल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या प्रयोगांबद्दल ही बैठक होती' असं म्हणून नंतर स्पष्टिकरण देण्यात आलं, पण ते एकत्र आले हे खरं होतं.

त्याच्या आसपासच 'रयत शिक्षण संस्थे'च्या बैठकीला पुन्हा एकदा दोघे एकत्र आले. 'शरद पवार अध्यक्ष आहेत आणि मी विश्वस्त आहे. त्यामुळे एकत्र यावंच लागतं' असं स्पष्टीकरण अजित पवारांनी पुन्हा दिलं.

आज पुन्हा एकदा 'रयत'च्या एका पुरस्कार समारंभासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. त्यांच्या एकत्र येण्याची वारंवारता वाढली आहे, हे कोणाच्याही नजरेतून सुटलं नाही.

त्यानंतर शरद पवारांची ही मुलाखत आली आणि यात त्यांनी आपल्या पक्षातला एक गट 'अजित पवारांसोबत जाऊ' या मताचा आहे, हे स्पष्टच म्हटलं.

पवारांची मुलाखतीतली उत्तरं आणि निर्माण झालेले प्रश्न

आपल्या पक्षात दोन वेगवेगळ्या मतांचे गट आहेत हे शरद पवारांनी सांगितलं, पण त्यांचं स्वत:चं मत काय आहे ते मात्र सांगितलं. आजवर त्यांनी 'भाजपासोबत जाणार नाही' ही त्यांची भूमिका राजकीय निर्णयात कायम ठेवली आहे.

त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांना भेटण्यावरून, उद्योगपती अदानी यांची पाठराखण करण्यावरून, सरकारच्या काही निर्णयांना पाठिंबा देण्यावरून कायम वाद आणि चर्चा झाली आहे. पण त्या भूमिका आणि राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, असं ते नेहमी म्हणत आले आहेत. त्यामुळेच पक्षात दोन गट असले तरीही स्वत:चं मत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

शरद पवार आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

"शरद पवार माझ्या मते, अंदाज घेत आहेत की पुढे काय होईल, म्हणून नेमकं आता त्यांनी हे विधान केलं आहे. ते स्वत:च्या भूमिकेबाबत काही सांगत नाहीत, पण पक्षातल्या इतरांची काय आहे ते सांगत आहेत. अगोदर कन्फ्यूज करणं आणि मग अंदाज घेऊन पुढची पावलं टाकणं हे ते करत आले आहेत," राजकीय पत्रकार संजय जोग म्हणतात.

जोग यांच्या मते, "अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपासोबत जाणं हे स्पष्ट आहे. पण मला वाटत नाही की तशी पवारांची मानसिकता झाली आहे. कारण मग हा प्रश्न वारंवार येणार की असंच करायचं होतं तर 2023 सालीच का नाही केलं? त्यासाठीच अजित पवारांना हा निर्णय घ्यावा लागला ना? त्यामुळे लगेच सगळं होईल असं नाही."

दुसरीकडे, 'इंडिया आघाडी सध्या कार्यरत नाही आणि पुन्हा एकत्र करावी लागेल' असं म्हणून सध्याच्या राजकीय अपरिहार्यतेचाही ते उल्लेख करत आहेत. म्हणजे 'इंडिया आघाडी' हा विरोधकांचा गट कार्यरत नाही म्हणून काहींना सत्तापक्षाकडे जावं वाटतं आहे, अशी स्थिती पवार दाखवू पाहत आहेत का?

शरद पवार आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात इथे या पर्यायाचे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेणं आणि दुसरा भाग म्हणजे भाजपाप्रणित 'एनडीए'ला पाठिंबा देणं. हे दोन्ही पर्याय एकत्रच शक्य आहेत किंवा वेगवेगळे असू शकतात? भाजपासोबत जाऊ नये यावर मतैक्य नसल्यानंच राष्ट्रवादीत फूट पडली होती. मग आता ज्यांना अजित पवारांसोबत जायचं आहे, त्यांना भाजपासोबतही जायचं आहे का?

शिवाय जे एकत्र व्हावं या मताचे आहेत, ते शरद पवारांचं नेतृत्व सोडून अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या मताचे आहेत का? कारण राष्ट्रवादीतला संघर्ष हा नेतृत्वाचा प्रश्नही होता. शरद पवारांच्या पक्षाचे प्रमुख असण्यालाच न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं. त्यामुळेच जर एकत्र येणं हा पर्याय असेल तर नेतृत्वाचा प्रश्नही कायमचा सुटला आहे की त्यात काही तडजोड अपेक्षित आहे?

या मुलाखतीत शरद पवारांनी निर्णयाचा अधिकार सुप्रिया सुळेंना दिला आहे. 'सुप्रिया सुळेंनी ठरवावं विरोधी बाकांवर बसावं किंवा नाही' असं म्हणत सुळे यांच्यावरही जबाबदारी दिली आहे. आजपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय निर्णय एकच असंच परसेप्शन सर्वत्र आहे आणि तसंच कायम घडलं आहे. 2019 ची फूट असो वा 2022 ची, सुप्रिया सुळे या कायम शरद पवारांच्या राजकीय निर्णयासोबतच राहिल्या आहेत. मग आता पवार त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असं का म्हणत आहेत?

सुप्रिया सुळेंनी सध्या तरी स्वत:ला या चर्चेपासून वा निर्णयापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की मी सगळ्यांशी बोलेन, कोणाची काय मतं आहे ते बघेन आणि आम्ही एकत्र निर्णय घेऊ. "अजून माझं कोणाशीही बोलणं झालं नाही. मी दिल्लीत होते आणि बैठकांमध्ये होते. त्यामुळे सगळ्यांशी बोलल्यावर समजेल की नेमकं काय होतं आहे," सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

पवार पुन्हा संभ्रम निर्माण करत आहेत का?

शरद पवारांच्या राजकारणाची ही ख्याती कायम राहिली आहे की अगोदर संभ्रम निर्माण करून मग प्रतिक्रियांचा अंदाज घेतात. या वेळेस पण त्यांनी हेच केलं आहे का?

"हे मला निश्चित दिसतं आहे की, अजूनही पवार सगळ्यांना गोंधळवून टाकू पाहत आहेत. ते अजूनही लोकांना स्पष्ट काय ते सांगत नाही. त्यांना संभ्रमावस्था हवी असते. आता सगळे हाच विचार करतील की कोणाला हे जुळवून घ्यायला हवं आहे? प्रश्न असा आहे की 2023 मध्ये ज्यांना भाजपासोबत जायचं नव्हतं ते पवारांसोबत राहिले. त्यातले काही निवडून आले. मग त्या गटात ही भावना का तयार झाली? ते कोणामुळे झालं?," असं राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात.

"हे खरं आहे की पक्षातल्या किमान अर्ध्या आमदारांना हे वाटतं आहे की, अजित पवारांशी जुळवून घ्यावं. त्याचं कारण मुख्यत: अडलेली विकासकामं, कमी मिळणारा निधी अशी आहेत. आपल्याला सत्तेत असायला हवं असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळेच पवारांनी ही जाहिररित्या मान्य केलं आहे," असं संजय जोग म्हणतात.

राजकीय निरिक्षकांना यावेळेस हे महत्वाचं वाटतं आहे की, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे जबाबदारीसाठी बोट दाखवलं आहे. त्यांनी तसं का केलं असेल?

"हे निश्चित आहे की राष्ट्रवादीच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ भावा-बहिणीचा राहिला नाही. इतर नेते आणि कार्यकर्त्यांचं पण मत तेवढंच महत्वाचं आहे. शिवाय निवृत्तीच्या दिशेला जाणाऱ्या पवारांना आता सुप्रिया सुळे यांच्या भविष्याचं काही ठरवायचं आहे. त्यामुळेच सुप्रिया यांनी काही निर्णय घेतला तर सगळे मान्य करतील का, याची चाचपणीही ते करत आहेत. म्हणून सुप्रिया यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असं ते म्हणाले आहेत," असं संजय जोग यांना वाटतं.

शरद पवार आणि अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

सुधीर सूर्यवंशी यांना वाटतं की, आता कोणत्या दिशेला जायचं याचा निर्णय आणि त्याची जबाबदारी शरद पवार सुप्रिया सुळेंकडे देत आहेत.

"यावेळेस जर असं काही झालं तर आपल्यावर अपयशाचं श्रेय न येता त्यांनी सुप्रिया सुळेंवर त्याची जबाबदारी दिली. स्वत:ला मोकळं केलं आहे असं मला दिसतं. अजित पवारांनी गेल्या वेळेस जे म्हटलं होतं की तुम्ही निवृत्त व्हा, सुप्रिया सुळे अध्यक्ष होतील आणि आम्ही एकत्र ठरवून निर्णय घेऊ, या ओरिजिनल फॉर्म्युलाकडे जात आहेत. मग प्रश्न हा आहे की ते तेव्हाच का नाही केलं?", सूर्यवंशी विचारतात.

पण अर्थात हा निर्णय केवळ एकत्रित राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाचं नसेल तसंही काहींना वाटतं. "पण इथे भाजपाला काय हवं हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न ठरेल. भाजपाला हे दोघं एकत्र येणं मान्य असेल का? ते कशा प्रकारे यावेत असं ते ठरवतील? त्यामुळे महाशक्ती आपल्याला सामावून घेईल का, याचाही शरद पवार अंदाज घेत असावेत," संजय जोग म्हणतात.

"शरद पवार भविष्यात पुढे काय घडू शकतं याचा अंदाज घेऊनही आता चाली रचत असतात. बिहारच्या निवडणुका जवळ आहेत. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात काही नवं घडलं तर काही संधी असेल का, याची विचार ते करत असतील, यावर शंका घेता येणार नाही," सूर्यवंशी म्हणतात.

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगली होती. आता पवार बंधू-भगिनी एकत्र येऊ शकतील का, ही चर्चा खुद्द पवारांनीच सुरू करून दिली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)