लोकसभेसाठी एकनाथ शिंदेचा प्रभाव कमी दिसला म्हणून अजित पवारांना भाजपने जवळ केलं का?

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार

फोटो स्रोत, facebook

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरच्या कॅबिनेट हॉलमध्ये मधोमध मुख्यमंत्र्यांची खुर्ची होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे बसले होते. वर्षभरानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीत दोन उपमुख्यमंत्री बसले होते. बैठकीच्या सुरवातीला राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांचं फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केलं.

मुख्यमंत्र्यांच्या बाजूला पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. मंत्र्यांच्या खुर्च्यांच्या पहिल्या खुर्चीत नवे उपमुख्यमंत्री बसले होते. अजेंडावर असलेल्या विषयांची चर्चा सुरू झाली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा संवाद खेळीमेळीचा होता. पण मुख्यमंत्री मात्र शांत होते.

राज्यातील ग्रीन हायड्रोजन धोरणावर चर्चा सुरू होती. पहिलीच कॅबिनेट त्यातही बिनखात्याचे मंत्री अजूनही अजित पवारांनी या धोरणाबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या विषयावर मुद्दे उपस्थित करत होते.

पण मुख्यमंत्री त्यांच्या तुलनेत शांत होते. निर्णय झाला. अजित पवार आणि त्यांच्या गटाने कॅबिनेट बैठकीचा घेतलेला ताबा आणि शांत असलेले मुख्यमंत्री याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये दिवसभर सुरू राहीली.

या चर्चेचा संदर्भ देण्याचा उद्देश हा की, अजित पवार हे एकनाथ शिंदेंपेक्षा प्रशासनात, निर्णयक्षमतेत अधिक प्रभावी असल्याचं अधोरेखीत होतं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांकडे पक्षाची संघटना बांधण्याचं कौशल्य आहे.

पण भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, “मागच्या वर्षभरात एकनाथ शिंदेंचा संघटनेचा प्रभाव मुंबई आणि ठाण्याच्या पलीकडे इतर महाराष्ट्रात फारसा दिसत नव्हता. लोकसभेत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 45 जागा निवडून आणण्याचं लक्ष्य भाजपचं आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवार यांचा फायदा भाजपला अधिक होऊ शकतो”.

एकनाथ शिंदेंचा प्रभाव भाजप श्रेष्ठींसमोर कमी पडला का?

एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरेंसोबत असताना ठाणे जिल्हा राजकीयदृष्ट्या काबीज करण्यात यशस्वी ठरले. कोरोनाच्या काळात तत्कालनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदारांना पुरेसा वेळ देत नसल्यामुळे एकनाथ शिंदेंमार्फत जास्तीतजास्त आमदारांचे प्रश्न सोडवले जात होते.

त्यातून आमदारांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्यात शिंदे यशस्वी ठरले. त्यानंतर आमदारांसोबत बंड मुख्यमंत्री पद आणि वर्षभराचा कालावधी सर्वांसमोर आहे. यात आमदारांची कामं मार्गी लावली असली तरी मंत्री पदाबाबत आमदारांमध्ये नाराजी कायम आहे.

अजित पवार शपथविधी

फोटो स्रोत, facebook

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माध्यमांसमोर एकाच पक्षातील आमदारांनी वेगवेगळी भूमिका मांडणे, अधिकाऱ्यांना मारहाण, महिला खासदाराला शिवीगाळ, भर रस्त्यात गोळीबार अशी अनेक प्रकरणं शिंदेच्या शिवसेनेतून समोर येत होती. त्यामुळे पक्षाची रूपरेषा नीट नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं.

याचा फायदा उध्दव ठाकरे गटाला होत होता. मतदारांमध्ये गद्दार , खोके, बाळासाहेबांची शिवसेना चोरल्याची सतत विधानं करून उध्दव ठाकरेंना सहानुभूती मिळत होती.

शरद पवारांची रणनिती, ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि कॉंग्रेसची स्थानिक मतांची गणितं यामुळे महाविकास आघाडी मजबूत बनत होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या संघटनात्मक मर्यादा भाजप श्रेष्ठींच्या लक्षात येत होत्या.

अजित पवार गट 2 जुलैला सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो ही बातमी एक दिवस आधी लोकमतचे सहयोगी संपादक यदु जोशी यांनी दिली होती.

ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाबद्दल सांगतात, “ फक्त शिंदेंना सोबत घेऊन 42 चा जादुई आकडा गाठता येत नाही. हे विविध सर्वेक्षणांद्वारे लक्षात आल्यानंतर अजित पवार यांना जवळ करण्यात आले. शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यांच्या पक्षाचे 40 आमदार आहेत आणि 10 अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत.

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार

फोटो स्रोत, facebook

"भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या भागात नेते निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते शिवसेनेत ती कधीही नसते. त्यामुळे इतक्या वर्षात फक्त मातोश्री, जय भवानी जय शिवाजी, सेना भवन आणि शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांच्या भोवतीच हा पक्ष फिरत राहिला.

"त्यामुळे त्या तोडीचे नेते निर्माण होऊ शकले नाहीत. स्वतः शिंदे असो की आता त्यांच्यासोबत असलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंत्री असो ते आपापल्या जिल्ह्यापुरते किंवा मतदारसंघांपुरतेच प्रभावी आहेत. त्यांचा पूर्ण महाराष्ट्रभर प्रभाव नाही.” असंही ते पुढे म्हणाले.

फक्त शिंदे गटासोबत लोकसभा निवडणूकीत 48 पैकी 45 चा आकडा गाठता येईल याबाबत प्रश्नचिन्ह होतं. त्यासाठी महाविकास आघाडी कमकुवत करणं गरजेचं होतं. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस होता.

शरद पवार देशपातळीवर विरोधी पक्षाची मोट बांधत आहेत. त्याला छेद देण्याचा प्रयत्न भाजप निश्चितपणे करेल असं बोललं जात होतं. अजित पवार यांच्या गटाला फोडून शरद पवार यांना धक्का देण्याचा प्रयत्न केंद्रीय भाजपने केला.

याबाबत यदु जोशी पुढे सांगतात, “ एकदा केंद्रामध्ये सत्ता आली की राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो . हे भाजपाचे धोरण आहे आणि त्यादृष्टीनेच राज्यातील अलीकडचा भूकंप करण्यात आला. भाजप शिंदे असे समीकरण घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास फटका बसेल.

महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत केली पाहिजे. कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार राहिले आहेत आणि ते लोकसभा निवडणुकीतदेखील कसेही करून विरोधी पक्षांची मोट बांधतील असे भाजपच्या श्रेष्ठींना वाटत होते तेव्हा त्यांना घरातच दणका दिला गेला.

आता पवार यांना महाविकास आघाडीची मोट बांधायला वेळ मिळणार नाही कारण स्वतःचे घर सावरण्यात आणि घरातच शह देण्यात त्यांचा वेळ जाईल.”

अजित पवारांचा भाजपला फायदा होईल का?

महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं नुकसान करू शकते अशी माहिती काही सर्व्हेमधून समोर आली. महाविकास आघाडीतील सर्वात शक्तीशाली पक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेस होता. त्यातला अजित पवार गट फुटून आता सरकारमध्ये सहभागी झाला.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 4 खासदार निवडून आले. त्यापैकी सुनिल तटकरे हे अजित पवार गटात सहभागी झाले. तीन खासदार हे शरद पवार यांच्यासोबत असले तरी त्यांच्या मतदारसंघात अजित पवार यांच्यामार्फत प्रवेश करण्यासाठी भाजपला कठीण जाणार नाही.

देवेंद्र फडणवीस अजित पवार

फोटो स्रोत, facebook

त्याचबरोबर अजित पवार गटात सामिल झालेले आमदार यांनी वर्षानुवर्ष त्यांचे मतदारसंघ बांधले आहेत. त्यांच्या संघटनात्मक बांधणीचा लोकसभेच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो हे गणित भाजपच्या गोटातून समोर आलं.

सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे, बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही मतदारसंघात अजित पवार गटामुळे भाजपला शिरकाव करता येईल.

याचं उदाहरण द्यायचं झालं तर बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुप्रिया सुळे करतात. त्याअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

त्यापैकी राष्ट्रवादीकडे दोन, भाजपकडे दोन आणि कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी अजित पवार आणि इंदापूरचे दत्ता भरणे यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे मिळून चार आमदार भाजपसाठी काम करतील.

कॉंग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि भोरचे संग्राम थोपटे यांची सुप्रिया सुळे यांनी जरी सुप्रिया सुळे यांना मदत केली तरीही संख्याबळाच्या दृष्टीने भाजपचं पारडं जड झालं आहे.

संख्याबळाचं पारडं भाजपकडे जास्त असलं तरी मतदारांचं काय?

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “एकनाथ शिंदे यांनीही मोठं संख्याबळ भाजपकडे आणून दाखवलं. शिंदे मुख्यमंत्री झाले. उध्दव ठाकरेंना एकटं पाडण्यात , शिवसेना पक्ष स्वतःकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले.

पण शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी मतदार विभागला गेला नसल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे भावनिक आवाहन करून सहानुभूती उध्दव ठाकरेंनी वर्षभर टिकवून ठेवली. पण आता उध्दव ठाकरेंसोबत शरद पवारही हेच सहानुभूतीचं कार्ड खेळतील.

या वयात शरद पवारांना अश्या पध्दतीने धक्का देणं हे मतदारांना पटलं आहे का? शरद पवारांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो? यावर सगळं अवलंबून आहे. संख्याबळ असलं तरीही मतदार कोणासोबत राहतो यावर अजित पवार यांचा फायदा होईल की नाही हे भविष्यात कळेल.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)