रोज वेळेवर झोपण्याचा आणि आतड्यांमधल्या जीवाणूंचा नेमका संबंध काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिलिपा रॉक्सबी
- Role, आरोग्य प्रतिनिधी
“आज हवं तितकं जागू शकतो. उद्या सुटीच आहे त्यामुळे उशिरा उठलो तरी फरक पडणार नाही.”
वीकेंडपूर्वी हे वाक्य तुमच्या तोंडून अगदी सर्रास निघत असेल किंवा तुम्ही इतरांना असं म्हणताना ऐकत असाल. सुटी आली रे आली की आपण नाईट आऊट्स किंवा त्यासारखे प्लॅन करायला लागतो. पण झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा सारख्या सारख्या बदलल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो का?
कामाच्या आणि सुटीच्या दिवशी वेगवेगळ्या वेळी झोपल्यामुळे आपल्या आतड्यातील जीवाणूंमध्ये अपायकारक बदल होऊ शकतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
युकेमधील संशोधकांनी याचा संबंध ‘सोशल जेटलॅग’शी जोडला आहे. आपण झोपण्याच्या वेळा आपल्या शरीराच्या गरजेनुसार नाही तर आपल्या कामाच्या किंवा सुटीच्या वेळेनुसार ठरवतो याला युकेमध्ये 'सोशल जेटलॅग' असं नाव दिलं गेलं आहे.
खूप तुटक झोप, शिफ्टमध्ये काम करणे या सगळ्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळांमध्ये सातत्य राखणं आणि संतुलित आहार घेणं यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी करता येऊ शकतो.
किंग्ज कॉलेज लंडन येथील शास्त्रज्ञांनी 1 हजार प्रौढांचा अभ्यास केला, यावरून त्यांच्या असं लक्षात आलं की, एका सर्वसामान्य आठवड्यात तुमच्या झोपण्याच्या वेळेत 90 मिनिटांचा जरी फरक पडत असेल तरी तुमच्या आतड्यांमधील जीवाणांवर याचा परिणाम होतो.
मानवी पचनसंस्थेत विविध प्रकारच्या प्रजातींचे जीवाणू आवश्यक असतात. यातील काही जीवाणू इतर जीवाणूंपेक्षा अधिक उपयुक्त असतात हे खरं असलं तरी या सर्वांचा योग्य समतोल आजारपण रोखण्यात महत्त्वाचा ठरतो.

फोटो स्रोत, iStock
झोई या आरोग्य विज्ञानावर काम करणाऱ्याकंपनीतील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ आणि या शोधनिबंधाच्या लेखिका केट बर्मिंघम सांगतात, "सोशल जेटलॅगमुळे मायक्रोबायोटा प्रजातींना चालना मिळते, त्या तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात."
आवड्यात (कामाच्या दिवशी) एका वेळी झोपी जाणं आणि उठणं आणि सुटीच्या दिवशी (वीकेंडला) वेगळ्या वेळी झोपी जाणं आणि उठणं म्हणजे सोशल जेटलॅग असं त्या सांगतात.
युकेतील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर याचा परिणाम होत असल्याचं हा संशोधनातून समोर आलं. किशोरवयीन तसंच युवा प्रौढांमध्ये याचं प्रमाण अधिक दिसतं, वय वाढतं तसं याचं प्राबल्य कमी होत गेल्याचंही ते सांगतात.
युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांच्या झोपेचं आणि रक्ताचं विश्लेषण केलं गेलं. त्यांचे रक्त आणि लघवीचे नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले. तसंच त्यांनी काय काय खाल्लं याची सविस्तर नोंद केली गेली.
सोशल जेटलॅग असलेल्या लोकांमध्ये (16%) बटाटे खाण्याचं प्रमाण, चिप्स आणि तळलेले पदार्थ, तसंच कृत्रिम साखर असणारी पेयं खाण्याचं प्रमाण अधिक होतं. फळं तसंच सुका मेवा खाण्याचं प्रमाण अल्प होतं.

फोटो स्रोत, iStock
यापूर्वी केलेल्या संशोधनांमधून समोर आलं होतं की झोपेच्या वेळा नियमित असलेले लोक तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात खातात, पण सोशल जेटलॅग असलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण कमी होतं. सोशल जेटलॅगचा वजन वाढीशी तसंच आजारपण आणि मानसिक थकव्याशी संबंध असल्याचंही यापूर्वी संशोधनांमधून समोर आलं आहे.
"झोप नीट झाली नसेल तर त्याचा आपल्या निर्णयशक्तीवर परिणाम होतो. लोकांना अधिक कार्ब्स (कर्बोदकं जसं की बटाटे, ब्रेड, मका यांसारख्या गोष्टी) आणि कृत्रिम साखरयुक्त पेयं पिण्याची इच्छा होते." डॉ. बर्मिंघम म्हणतात.
असंतुलित आहाराचा आतड्यातील जीवाणूंवर परिणाम
सोशल जेटलॅग असलेल्या लोकांच्या आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेल्या मायक्रोबायोटाच्या तीन प्रजातींचा संबंध चुकीचा आहार, लठ्ठपणा आणि सूज तसंच हृदयविकाराच्या धोक्याशी आहे.
झोप, आहार आणि आतड्यातील जीवाणूंमधील नातं खूप गुंतागुंतीचं आहे आणि आणखी अनेक गोष्टींबाबत संशोधन होणं बाकी आहे असं या संशोधकांनी म्हटलं आहे.
पण आठवडाभर आपल्या झोपण्या उठण्याच्या सवयींमध्ये सातत्य ठेवण्याचा सल्ला त्यांनी आवर्जून दिलाय.
"झोपेच्या वेळा पाळणं, जेणेकरून रोज एकाच वेळेला तुमचं शरीर सरावेल, हा आपल्या जीवनशैलीत अगदी सहज करता येणारा एक बदल आहे. याचा तुमच्या पोटावर, आतड्यांवर आणि पर्यायाने तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो," किंग्ज कॉलेज लंडनच्या डॉ. साहा बेरी यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण आरोग्यपूर्ण आहार नेमका कोणता?
युकेची नॅशनल हेल्थ सर्व्हिस – NHS सांगते:
- युकेची नॅशनल हेल्थ सर्व्हिस – NHS सांगते:
- दररोज विविध फळं आणि भाज्यांचे पाच भाग खा.
- बटाटे, ब्रेड, भात किंवा पास्त्यासारखे भरपूर स्टार्च असलेले पदार्थ खा.
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, किंवा दुधाचे पर्याय आहारात असू द्या. कमी फॅट्स असलेले तसंच कमी साखर असलेले पदार्थ अधिक चांगले.
- शेंगा, डाळी, मासे, अंडी आणि इतर प्रथिनं खा.
- भरपूर प्रमाणात पाणी प्या (दिवसाला किमान सहा ते आठ पेले)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








