कपूर कुटुंबातली ‘ती’ व्यक्ती जी ‘फिल्मस्टार’ झाली नाही पण, आता 67व्या वर्षी ग्रॅज्युएट झाली

'शिकण्याचं कोणतंही वय नसतं' हे वाक्य तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. एखाद्याला जर खरोखर शिकण्याची आणि पदवी मिळवण्याची इच्छा असेल तर कोणत्याही वयात तो ते करू शकतो.

शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांनी अशीच एक कामगिरी केली आहे. तब्बल 67 व्या वर्षी त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय.

फिलॉसॉफीमध्ये पदवी मिळवलेल्या आदित्य राज कपूर यांनी 59 टक्के मिळवून त्यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय.

आदित्य म्हणतात की,"मी वयाच्या सोळाव्या वर्षीच आरके स्टुडिओमध्ये काम करून पैसे कमवायला सुरुवात केली होती. त्यावेळी मला शिकण्याची इच्छा नव्हती पण आता अचानक शिकावं वाटलं. सुरुवातीला थोडासा अवघडलेपणा आला होता पण माझी मुलगी तुलसी माझ्यासाठी उभी राहिली.

तिने अक्षरशः माझा हात पकडून मला शिक्षणाचा मार्ग दाखवला. माझ्याकडे पदवी नव्हती म्हणून अनेक बँकांनी मला कर्जच दिलं नाही, पण आज मी एक पदवीधर असल्याचं मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. आता सत्तराव्या वर्षी मला मास्टर्स करायची माझी इच्छा आहे."

16 व्या वर्षी आरके स्टुडिओमध्ये काम सुरु केलं

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून आदित्य राज कपूर यांनी बी.ए.ची पदवी मिळवली आहे. फिलॉसॉफीमध्ये पदवी मिळवल्यानंतर केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झालाय.

आदित्य एक निवृत्त व्यावसायिक असून ते एक बाईकरही आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोव्यात राहतात.

बीबीसी हिंदीसोबत बोलतांना ते म्हणाले की, "मला शिकण्याचा अनेक संधी मिळाल्या होत्या पण मी त्या संधींचा कधीच फायदा घेऊ शकलो नाही.

16 व्या वर्षी मी नोकरी सुरु केली होती. मी आरके स्टुडिओत काम करायचो. माझे भोले बाबा ज्यांना मी माझे गुरु मानतो. त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यावर माझ्यात बदल होत राहिले. मी फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडून बिझनेस लाईनमध्ये आलो.

व्यवसाय करणं अभिनय क्षेत्रात मी केलेल्या नोकरीपेक्षा संपूर्णपणे वेगळं होतं. मी तिथे वेगळ्या लोकांना भेटू शकलो, वेगळ्या विषयांवर चर्चा करू शकलो.

वेगळे कपडे घालू शकलो. मी माझे केस वाढवणं बंद केलं, मी शर्ट इन करून घालू लागलो. बेल्ट वापरू लागलो. थोडा शिष्टाचार मला तिथे शिकता आला.

या प्रवासात मी अनेक ठिकाणी नोकरी केली. बऱ्याच नोकऱ्याही बदलल्या, हे असं सगळं चालू होतं, आयुष्य पुढे सरकत होतं आणि अचानक माझ्या आयुष्यात मला एक रितेपण जाणवायला लागलं.

त्यावेळी दोन दोन पदव्या मिळवलेल्या माझ्या मुलीने, म्हणजेच तुलसीने मला मार्ग दाखवला. त्यावेळी मी निवृत्त झालो होतो आणि दिवसभर घरीच बसायचो.

माझ्या मुलीच्या मदतीने मी पदवीला प्रवेश मिळवला आणि माझ्या शिक्षणाचा दरवाजाच पुन्हा उघडा झाला."

पदवी नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या

आदित्य सांगतात की, "ज्यावेळी मी चित्रपट क्षेत्र सोडून नियमित नोकरी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मला बरंच भटकावं लागलं. नोकरी शोधायला जायचो तेंव्हा लोक मला माझ्या शिक्षणाबद्दलची प्रमाणपत्र विचारायचे.

ते मला म्हणायचे अरे तुझ्याकडं तर काहीच नाही मग आम्ही तुला कशी नोकरी देऊ? एवढंच काय मला बँकाही त्यांच्या दारात उभं करत नव्हत्या कारण माझ्याकडे पदवीचा कागद नव्हता."

माझ्या पिढीतलं कुणी कॉलेजला गेलंच नाही

कपूर कुटुंबीय आणि शिक्षण यांच्या नात्यावरही त्यांनी सांगितलं. या नात्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, "माझे आजोबा पृथ्वी राज कपूर कॉलेजला गेले आणि माझे वडील शम्मी कपूर दुसऱ्या वर्षापर्यंत कॉलेजला गेले, त्यानंतर माझ्या पिढीतील कोणीही कॉलेजला गेले नाही कारण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र झाला होता. पूर्वी स्टुडिओमध्ये खूप काम असायचं.

पृथ्वी थिएटरमध्ये लोकांची कमतरता होती, तेव्हा आम्ही मुलं याच कामात मदत करायचो. आम्हाला शिक्षण घेण्यापासून कुणी अडवलं होतं अशी परिस्थिती नव्हती पण, आम्ही स्वतःच शिकलो नाही.

आज हे सांगायला मला लाज वाटते की मी आधी शिकलो नाही. माझ्या कुटुंबात अभिनय आणि दिग्दर्शनाचंच वातावरण होतं.

माझे वडील शम्मीजी मला लहानपणी अनेकदा पुस्तकं वाचायला सांगायचे, त्यांनाही पुस्तकं वाचण्याची आवड होती. ते मला नेहमी म्हणायचे की एक चुकीचं पुस्तक वाचलं असशील तर दहा योग्य पुस्तकं तू वाचली पाहिजेत.

त्यांच्यामुळेच मला पुस्तकं वाचण्याची सवय लागली, ज्यामुळे मला महाविद्यालयीन पुस्तकं वाचण्यास मदत झाली. माझी दुसरी आई नीला देवी प्रथम श्रेणीसह महाविद्यालयीन पदवीधर झाली होती.

माझी पहिली आई गीता बाली फक्त 6 वी पर्यंत शिकली होती आणि त्यानंतर तिला आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवण्यासाठी अभिनय करावा लागला आणि नंतर तिने माझ्या वडिलांशी लग्न केलं परंतु त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा एक तत्वज्ञ होते."

कपूर कुटुंबाला भेटल्यावर विचित्र वाटायचं

माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की प्रत्येक अडीच पिढ्यानंतर काही ना काही बदल व्हायला हवेत. असं गरजेचं नाही की घरातल्या प्रत्येकाने तेच काम केलं पाहिजे.

मी माझ्या कपूर कुटुंबातील इतर सदस्यांना भेटायचो तेंव्हा मला प्रचंड विचित्र वाटायचं. मी हाच विचार करायचो की हे सगळे किती वेगळे आहेत आणि मी किती वेगळा आहे.

पृथ्वीराज कपूर नेहमी म्हणायचे की जरी तुम्ही वेगवेगळे राहत असाल तरी जेवण मात्र एकत्र बसूनच केलं पाहिजे.

म्हणूनच आम्ही सगळे एकमेकांना भेटतो आणि एकत्र जेवणही करतो. आम्ही अजूनही एकमेकांशी तेवढेच जोडलेले आहोत त्यामुळेच जेंव्हा मी माझ्या कुटुंबियांना सांगितलं की मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे, तेंव्हा सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला होता.

वडिलांना माझ्या निर्णयाचा धक्का बसला होता

त्यांचे वडील शम्मी कपूर यांच्यासारखा अभिनय करण्याचा विचार मनात आला नाही का? या प्रश्नाचं उत्तर देतांना आदित्य कपूर म्हणतात की, "हो माझ्या डोक्यात हा विचार आला होता. एवढंच काय तर मी 19 वर्षांचा होईपर्यंत आरके स्टुडिओमध्ये काम करायचो.

राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटामध्ये मी सहाय्यक म्हणून काम केलं होतं. धरम करम या चित्रपटामध्येही मी सहाय्यक म्हणून काम केलं होतं.

सत्यम शिवम सुंदरम यानंतर एका चित्रपटामध्ये मी हिरो म्हणून लाँच होणार होतो. पण, माझ्याजागी दुसऱ्या व्यक्तीला मी नायक म्हणून घेतलं. माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं की मी अभिनय करावा.

पण व्यवसाय करण्याच्या माझ्या निर्णयामुळं त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यांना वाटलं होतं अभिनय करणाऱ्या कुटुंबात जन्मलेला हा पोरगा कसा व्यवसाय करू शकेल.

याला व्यवसायातलं थोडंही काही कळत नाही. माझा अभिनयाचा वारसा कोण चालवेल याची चिंता त्यांना त्यावेळी सतावत होती.

पण, मला नोकरी करण्याची हौस आहे आणि व्यवसायात मेहनत घेत आहे हे पाहून त्यांनी मला आशीर्वाद दिले.

अभिनय असो किंवा क्रिकेट काहीही केलं तरी अभ्यास करणं गरजेचं

कपूर कुटुंबातल्या भावी पिढीसोबत म्हणजे करिष्मा, करीना, रणबीर यांच्यासोबत कधी 'शिक्षणाचं महत्त्व' या विषयावर चर्चा केलीय का?

यावर बोलताना आदित्य म्हणाले की, "मी माझ्या पिढीच्या रणधीर, ऋषी, राजीव कपूर तसेच शशी कपूर यांची मुलं कुणाल आणि करण यांना नेहमी भेटायचो.

आम्ही एकत्र जेवायचो, एकत्र खेळायचो पण एकेमकांच्या कामात ढवळाधवल करत नव्हतो. ते त्यांची कामं करायचे आणि मी माझं काम करायचो.

जर एखाद्या व्यक्तीला अभिनय किंवा दिग्दर्शन शिकायचं असेल तर कपूर कुटुंबियांएवढी भारी जागा त्याला सापडणार नाही. माझ्यानंतरच्या पिढीचा विचार केला तर ही सगळी मुलं लहान असतांनाच अभिनय क्षेत्राकडं वळली होती.

जसजसं वय वाढत जातं तसतशी माणसं पुढे जात राहतात. माझ्या भावी पिढीतली मुलं लहानपणापासून फिल्मलाईन मध्ये गेले, मी पण वयाच्या 16 व्या वर्षी तिकडे गेलो होतो, पण माझ्या सुदैवानं माझ्या गुरुजींनी मला वेगळा मार्ग दाखवला.

आता मला बघून जर माझ्या कुटुंबातल्या कुणाला शिकावं वाटलं तर यापेक्षा जास्त मला काय हवंय? हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असला तरी माझे आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबत असतील.

पण 67 व्या वर्षी माणूस शिकतो आहे हेतरी किमान ते बघतील. मी फक्त नदीचा मार्ग सांगू शकतो, त्यांना पाणी पाजू शकत नाही. त्यांना स्वतःहूनच ते करावं लागेल.

अभिनयासाठी शिक्षण गरजेचं नसलं तरीही अभिनय असो वा क्रिकेट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिकावं तर लागतंच.

अभिनय असो किंवा क्रिकेट, जे करायचे ते करा, पण आधी तुमचा अभ्यास पूर्ण करा. शिक्षण तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला चांगलं बनवेल

70च्या आधी मला मास्टर्स आणि पीएचडी करायची आहे

आदित्य पुढे म्हणतात की, " पदवीनंतर मला वयाच्या 70 वर्षापूर्वी मास्टर्स करायचं आहे, त्यासाठी मी प्रवेशही घेतलाय. त्यानंतर मला पीएचडी करायची आहे.

fundamentalspace.today याचा वापर करून मी लोकांना सांगतो की माणसाला आयुष्यात काय गरजेचं असतं. लोकांना आनंदाचे मार्ग मी सांगत असतो, सध्या मी हेच करतोय.

दिग्दर्शनाचा प्रयत्नही आदित्य कपूर यांनी केलाय

आदित्य यांनी अभिनय आणि दिग्दर्शनातही हात आजमावला होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी 1973 मध्ये बॉबी या रोमँटिक चित्रपटात त्यांचे काका राज कपूर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

यानंतर त्यांनी 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम, 1985 मध्ये अटक, 1991 मध्ये साजन, 1993 मध्ये दिल तेरा आशिक, 1996 मध्ये पापी गुडिया आणि 1999 मध्ये आरजू मध्येही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

आदित्य कपूर यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट म्हणजे जगमोहन मुंध्रा यांनी दिग्दर्शित केलेला 'चेस' हा होता. याशिवाय त्यांनी 'दिल तेरा आशिक' मध्ये छोटी भूमिका केली होती.

त्यांनी या चित्रपटांमध्ये काम केलं, पण कपूर घराण्याच्या परंपरेनुसार त्यांना अभिनेता म्हणून कधीही लोकांसमोर येता आलं नाही.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)