'लव्ह जिहाद'च्या विरोधात 'भगवा लव्ह ट्रॅप'? बीबीसी व्हेरिफायने जाणून घेतलं काय आहे सत्य

TWITTER/X

फोटो स्रोत, TWITTER/X

    • Author, श्रुती मेनन
    • Role, बीबीसी व्हेरिफाय, दिल्ली

सोशल मीडियावर काही ग्रुप्समध्ये अशी चर्चा आहे की, काही हिंदू पुरुष मुद्दाम मुस्लिम महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडियावर याला 'भगवा लव्ह ट्रॅप' असं म्हटलं जातंय. मात्र असं प्रकरण कुठे घडल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

मरियम (नाव बदललेलं आहे) ही उत्तर भारतात राहणारी मुस्लीम महिला आहे. ऑनलाइन येणाऱ्या अपमानास्पद मेसेजेसविषयी सांगताना ती म्हणते, "ते खूप घृणास्पद होतं. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता."

मरियम डॉक्सिंगची शिकार बनली आहे. डॉक्सिंग म्हणजे दुर्भावनापूर्ण हेतूने एखाद्याची गोपनीय माहिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उघड करणे.

हिंदू पुरुषांसोबत उभ्या असलेल्या मरियमचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कॉपी करण्यात आले होते. तिचे आंतरधर्मीय संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या पूर्णपणे खोट्या पोस्टवर अश्लील कमेंट्स यायला सुरुवात झाली.

नेमके काय आरोप होते?

फोटोमध्ये दिसणारे पुरुष तिचे मित्र होते. त्यातला कोणताही पुरुष तिचा प्रियकर नव्हता.

मरियम म्हणते, "शिवीगाळ करणाऱ्यांनी माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ केली, मी हिंदू पुरुषांसोबत झोपते असे आरोप केले."

ज्या अकाउंटवरून मरियमवर डॉक्सिंग झालं ते अकाउंट मुस्लीम पुरुषाचं असावं असं मरियमला वाटतं. कारण मरियम 'भगवा लव्ह ट्रॅप' च्या जाळ्यात अडकला आहे असं त्या पुरूषांना वाटत होतं.

हॅशटॅग #भगवालव्हट्रॅपसोबत पोस्ट केलेला एक व्हीडिओ

फोटो स्रोत, YOUTUBE

फोटो कॅप्शन, हॅशटॅग #भगवालव्हट्रॅपसोबत पोस्ट केलेला एक व्हीडिओ

हिंदुत्वाला मानणारे पुरुष मुस्लीम महिलांना फूस लावण्याचा प्रयत्न करून त्यांना जाळ्यात ओढतात याला 'भगवा लव्ह ट्रॅप' सिद्धांत मानलं जातं.

हे पुरुष मुस्लीम महिलांना त्यांच्या समाजापासून दूर नेत असल्याचं मुस्लीम पुरुषांना वाटतं. यापैकी बऱ्याच जणांना भीती आहे की असं खरंच घडत असावं.

बीबीसीने केली पडताळणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हा सिद्धांत खरा आहे असं मानणाऱ्या काही अकाउंट होल्डरशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या उदाहरणांचा आढावा घेतला. यामध्ये असा कोणताही कट रचला जातोय अशी माहिती आम्हाला मिळाली नाही.

मात्र ही गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. या वर्षी मार्च महिन्यापासून जवळपास दोन लाखांहून अधिक वेळा 'भगवा लव्ह ट्रॅप' हा शब्द ऑनलाईन वापरला गेला आहे.

हा एक असा सिद्धांत आहे ज्याला कोणताही आधार नाही. पण त्याच्याशी संबंधित सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे लोकांच्या वास्तविक जीवनावर विपरित परिणाम होत आहे.

या वर्षी मे महिन्यात मध्यप्रदेशात चित्रित केलेला एक व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता. यात वैद्यकीय विद्यार्थी असलेली एक मुस्लीम महिला आणि एक हिंदू पुरुष स्कूटरवरून त्यांच्या विद्यापीठात परतत असल्याचं दाखवलं होतं.

मुस्लीम पुरुषांच्या जमावाने त्याला घेरल्याचं यात दिसतं. तर त्या महिलेची खरडपट्टी काढली जात होती की, तिने तिच्या धर्माची लाज घालवली.

अशात गर्दीतील एक माणूस ओरडतो की, "तुम्हाला कोणीही इस्लामचा अवमान करू देणार नाही."

नंतर काहीजण त्या हिंदू व्यक्तीवर हल्ला करतात.

भोपाल का वीडियो इस साल मई में सोशल मीडिया पर आया था

फोटो स्रोत, TWITTER/X

फोटो कॅप्शन, भोपाळचा हा व्हीडिओ या वर्षी मे महिन्यात सोशल मीडियावर आला होता.

बीबीसीने भारतात अशा प्रकारच्या दंग्यांचे जवळपास 15 हून अधिक व्हीडिओ पाहिले आहेत. या सर्व घटना एकाच साच्यातल्या आहेत. हा सिद्धांत खरा आहे असं सांगणारे हे व्हिडिओ यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक कोटीहून अधिक वेळा पाहिले गेलेत. यामध्ये #भगवालव्हट्रॅप हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

हा सिद्धांत 'लव्ह जिहाद' या जुन्या आणि प्रचलित थियरीच्या अगदी उलट आहे. 'लव्ह जिहाद'चा आरोप करणाऱ्यांचा दावा आहे की, मुस्लीम पुरुष हिंदू महिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटना याचा ऑनलाइन प्रचार करत आहेत. मात्र 'भगवा लव्ह ट्रॅप' सिद्धांताप्रमाणे 'लव्ह जिहाद' सिद्धांताचीही अशी कोणती मोहीम संघटित पद्धतीने राबविली जात असल्याचे पुरावे सापडत नाहीत.

भारतात आंतरधर्मीय विवाहाचं प्रमाण फारच कमी आहे. बहुतेक मुलं त्यांच्या आई वडिलांनी निवडलेल्या ठिकाणी लग्न करतात.

दोन भारतीय माध्यम संस्थांनी केलेल्या स्वतंत्र तपासणीत या सिद्धांताचे समर्थन करणारे पुरावे सापडले नाहीत.

भाजप आणि लव्ह जिहाद

असं असूनही, हा तथाकथित 'लव्ह जिहाद' भारतातील राजकीय वादांचा एक भाग आहे. भाजपचे नेते आणि हिंदुत्व विचारसरणीचं पालन करणाऱ्या काही सदस्यांनी याबाबत जाहीर चर्चा केली आहे.

सोशल मीडियावरील निनावी अकाउंटद्वारे 'भगवा लव्ह ट्रॅप' सिद्धांताचा प्रचार करण्यात आलाय. नावाला मोठं वलय असलेल्या मुस्लीम नेत्यांनी देखील यावर चर्चा केलेली दिसते.

राष्ट्रीय माध्यमांमध्ये हा सिद्धांत लोकप्रिय करण्याचं श्रेय इस्लामिक विद्वान आणि टीव्ही न्यूज चॅनेलवर दिसणारे शोएब जामई स्वतःला देतात.

ते म्हणतात, "मुस्लीम समाजातील जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मी पाठिंबा देत नाही. हा देश कायद्याद्वारे चालवला जातो."

पण शोएब यांचा या सिद्धांताच्या सत्यतेवर विश्वास आहे.

ते दावा करतात की, "मुस्लीम महिलांना जाळ्यात अडकवण्यासाठी 'हिंदुत्व ब्रिगेड' हिंदू तरुणांचे 'ब्रेनवॉश' करत आहे."

'भगवा लव्ह ट्रॅप'चे समर्थक

शोएब आणि या सिद्धांताचे इतर समर्थक आपल्या दाव्याला आधार म्हणून ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या व्हीडिओचे दाखले देतात.

त्यांचं म्हणणं आहे की, हिंदुत्ववादी नेते मुस्लीम महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी हिंदू पुरुषांना सक्रियपणे प्रोत्साहित करत आहेत.

यातील एका व्हीडिओमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2007 च्या सभेत बोलताना दिसत आहेत.

ते म्हणतात, "जर मुस्लिमांनी 'एक हिंदू मुलगी घेतली' तर 'आपण शंभर मुस्लीम मुली घ्याव्यात."

यावर जमाव जल्लोष करतो.

त्यानंतर आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. बीबीसीने त्यांना विचारलं की ते अजूनही त्यांच्या विधानावर ठाम आहेत का? यावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

भाषण देणारे योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, HINDUTVA WATCH

फोटो कॅप्शन, भाषण देणारे योगी आदित्यनाथ

आम्ही जामई आणि 'भगवा लव्ह ट्रॅप' सिद्धांताच्या इतर समर्थकांनी सादर केलेली उदाहरणांची सत्यता तपासली. त्यांचा दावा आहे की, हिंदू पुरुषांनी मुद्दाम मुस्लीम महिलांशी संबंध प्रस्थापित केले आहेत जेणेकरून त्यांचं धर्मपरिवर्तन करता येईल.

आम्हाला जी उदाहरणं देण्यात आली ती सर्व हिंदू पुरुष आणि मुस्लीम महिलांमधील संबंधांची होती. दोन प्रकरणांमध्ये महिलांनी धर्मांतर केलेलं नव्हतं.

इतर सहा प्रकरणांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, हिंदू पुरुषांनी धर्मामुळे त्यांच्या साथीदारांची हत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, यापैकी चार प्रकरणं पैसे किंवा घरगुती वादाशी संबंधित आहेत. इतर चार प्रकरणांमध्ये नेमकं काय झालं याची पडताळणी करता आली नाही.

मात्र, भगव्या लव्ह ट्रॅप सिद्धांताचा या घटनांशी काही संबंध आहे असा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

त्याचप्रमाणे, असा दावा करणाऱ्या व्हीडिओंची मालिका खोटी असल्याचं 'बूम लाइव्ह' या भारतीय तथ्य तपासणी वेबसाइटने म्हटलं आहे.

विश्व हिंदू परिषदेचं यावर काय म्हणणं आहे?

मुस्लीम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा कोणताही कट सुरू असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटना नाकारतात.

विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख आलोक कुमार म्हणतात, "हिंदूंकडून असं कोणतंही षड्यंत्र चालवलं जात नाही, आणि तसा कोणता पुरावाही नाही."

मात्र 'लव्ह जिहाद' हा सिद्धांत खरा असल्याचं आलोक कुमार म्हणतात. ते म्हणतात, "मुस्लीम पुरुषांचा एक मोठा वर्ग हिंदू महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे."

'भगव्या लव्ह ट्रॅप'बद्दल लिहिणाऱ्या पहिल्या पत्रकारांपैकी एक असलेल्या फातिमा खान म्हणतात, "लव्ह जिहादला मोठा राजकीय पाठिंबा आहे."

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार

लव्ह जिहादच्या सिद्धांताला समर्थन देणाऱ्या भाजप समर्थकांकडे त्यांनी इशारा केलाय. दुसरीकडे, 'भगवा लव्ह ट्रॅप' हा पूर्णपणे नवीन सिद्धांत आहे, ज्याला कोणतंही राजकीय समर्थन नाही.

'डॉक्सिंग'ची शिकार ठरलेली मरियम त्या मेसेजेसमुळे इतकी अस्वस्थ झाली की, तणाव टाळण्यासाठी तिला कामावरून सुट्टी घ्यावी लागली.

ती म्हणते, "पहिल्यांदाच मला माझ्या शेजारी असुरक्षित वाटलं. मी खरोखर घाबरले होते. मला बाहेर जायलाही भीती वाटत होती ट्रोल्सच्या तर्काला आव्हान देत ती म्हणते की, तुम्ही महिलांच्या संरक्षणाचा दावा करता, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)