केसीआर यांना निजामाच्या काळातला अखंड हैदराबाद हवा आहे? महाराष्ट्राच्या दृष्टिने याचा अर्थ काय?

फोटो स्रोत, ANI
- Author, इमरान क़ुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, बंगळुरूहून
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) त्यांच्या 'भारत राष्ट्र समिती' (बीआरएस)चं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार असा मोठा ताफा घेऊन पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला रस्त्यामार्गे प्रवास करत येतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे पाऊसकाळ चांगला यावा म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाला साकडं घालतात, पण तेलंगणाचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच सीमोल्लंघन करत पांडुरंगाला राजकीय साकडं घालण्याच्या पावित्र्यात दिसतात.
थोडक्यात केसीआर यांचा हा महाराष्ट्र प्रवेश मोठा गंभीर राजकीय विषय झाला आहे.
निजामाच्या काळातील अखंड हैदराबाद निर्माण करून राष्ट्रीय राजकारणात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ची पाळंमुळं रोवण्याचा त्यांचा प्रयत्न यातून दिसतोय.
विशेष म्हणजे के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला जशी भेट दिली तशीच भेट त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरालाही दिली.
या वर्षी डिसेंबरमध्ये तेलंगणात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. शिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकाही जवळ आल्याने केसीआर यांचा महाराष्ट्र प्रवेश विरोधी पक्षांना हैराण करणार नाहीये.
भाजपचे प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्यांना सोपा रस्ता निवडायचा आहे. त्यांना महाराष्ट्रात संधी दिसते आहे कारण इथं त्रिकोणीय राजकारण आहे. आणि निवडणुकीत इथल्या काही जागा मिळवण्यासाठी ते स्वतःला शेतकर्यांचा मित्र म्हणून समोर आणतायत."
"खरं तर त्यांना निजामाप्रमाणे हैदराबाद-दख्खन असं अखंड राज्य निर्माण करायचं आहे."
एकीकडे केसीआर आणि त्यांच मंत्रिमंडळ महाराष्ट्रात पंढरपूरची वारी करत आहेत, अब की बार किसान सरकारच्या घोषणा देत इथे पक्षविस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्याच वेळेस तिकडे तेलंगणामध्ये बीआरएस समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ते आव्हान कॉंग्रेसनं उभं केलं आहे.
केसीआर पंढपरपुरच्या वाटेवर असतांना त्यांच्या पक्षातल्या काही आजी-माजी खासदार-आमदारांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्ये तेलंगणात कॉंग्रेसमध्ये बरेच पक्षप्रवेश होणार आहेत अशा बातम्या आहेत.
पण महाराष्ट्रात मात्र केसीआर यांचं भव्य असं स्वागत झालं. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वागताचं आयोजन शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी केलं होतं.

फोटो स्रोत, ANI
दिवंगत शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते आणि एकेकाळी या संघटनेचा बराच दबदबा होता.
अलीकडच्या काळात या संघटनेचे बहुतेक सदस्य बीआरएसमध्ये सामील झालेत.
बीआरएस महाराष्ट्राचे नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "इतक्या वर्षात आम्ही वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेले होतो. आम्हाला असं वाटत होतं की, शेतकऱ्यांची सुटका ही आंदोलनांवर नाही तर राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असते."
"इथे तिथे आंदोलनं करून आम्ही सत्ता काबीज करू शकत नाही. राजकीय शक्तीनेच धोरणांमध्ये बदल होऊ शकतो."
तेलंगणा मॉडेल
धोंगडे आणि बीआरएसचे प्रवक्ते दोसाजू श्रवण सांगतात की, महाराष्ट्रातील पक्षाचं मुख्य आकर्षण म्हणजे तेलंगणा सरकारतर्फे तेलंगणात राबवल्या जाणा-या अनेक योजना. विशेषत: शेतकरी आणि गरीब वर्गासाठी.
श्रवण सांगतात, "एप्रिल 2014 मध्ये चंद्रशेखर राव सत्तेवर आल्यापासून तेलंगणात बरेच मोठे बदल घडले. शेतकरी अनुकूल धोरणांमुळे नापीक जमिनी सुपीक झाल्या."
चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाच्या निर्मितीवेळी जी आश्वासनं दिली होती, सत्तेवर आल्यानंतर लगेचच ती पूर्ण करायला सुरुवात केली.
तेलंगणा सरकारनं 2018-19 च्या खरिप हंगामापासून ‘रायथू बंधू’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरी 5-5 हजार रुपयांची मदत खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामावेळेस दिली जाते. पेरणीपूर्व खते, बियाणे, कीटनाशकांच्या खरेदीसाठी ही मदत दिली जाते.
दलितांना लघु उद्योग (दलित बंधू) सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची मदत, सर्वात मागासवर्गीयांसाठी एक लाख रुपये प्रोत्साहन कर्ज, जे कर्ज परत केलं नाही तरी चालतं अशा अनेक योजना त्यांनी सुरू केल्या.

फोटो स्रोत, ANI
काही दिवसांपूर्वी केसीआर यांची महाराष्ट्रातली तिसरी सभा झाल्यावर मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले होते की, "मराठवाडा आणि हैदराबाद संस्थान यांच्यात पूर्वीचा कनेक्ट तर आहेच. याशिवाय मराठवाडा आणि हैदराबादमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार सारख्याच प्रमाणात आहेत. आधी ओवेसी यांचा एमआयएम नांदेडमार्गे संभाजीनगरला आले. मग या पक्षाने इथे नगरसेवक, आमदार, खासदारही मिळवले. आता त्याच मार्गाने बीआरएस येऊ पाहत आहे."
तसंच, भालेराव पुढे म्हणाले की, "बीआरएसचा डोळा दलित मतांवर असू शकतो. राज्यात आंबेडकर, आठवले आणि काँग्रेस यांच्या दलित मतांमध्ये विभाजन करणे हा बीआरएसचा अजेंडा असू शकतो. तेलंगणातील 'दलित बंधू' योजनेची ज्या प्रकारे जाहिरात केली जात आहे, त्यातुन केसीआर यांना दुसरे आंबेडकर असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे दलितांच्या मतावर काही प्रमाणात फरक पडू शकतो."
मात्र केसीआर आणि त्यांच्या पक्षाच्या दावा आहे की त्यांचं तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात त्यांना जम बसवून देईल.
श्रवण सांगतात, "महाराष्ट्र आणि तेलंगणाची परिस्थिती एकसारखीच आहे. इथे पाणी तर भरपूर आहे पण जमिनी सुपीक नाहीयेत. तेलंगणाप्रमाणे या जमिनींना ही नवसंजीवनी मिळावी, हा त्यांचा विचार आहे."
"केसीआर यांनी दौरे केलेली शहरं निजाम काळात हैद्राबाद संस्थानांचा भाग जरी असले तरी मध्यप्रदेशातूनही बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत."
1956 नंतर निजाम संस्थानात उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड (आता महाराष्ट्रात) आणि गुलबर्गा आणि रायचूर (कर्नाटकातील हैदराबाद-कर्नाटक प्रदेश) यांचा समावेश होता.
कृष्णसागर राव सांगतात, "तेलंगणात आता त्यांची मुळ घट्ट झाली असल्याचा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आता त्यांना आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात आपला प्रभाव वाढवायचा आहे."
केसीआर यांचे बदलणारे राजकीय डावपेच?
बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास केसीआरच्या यांच्या विस्तार योजनांवर परिणाम होईल का?
बीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख एम कृशांक सांगतात, "याचा आमच्यावर अगदीच किरकोळ परिणाम झालाय. कारण जे पक्ष सोडून गेलेत त्यांच्यापैकी काहींनी पोटनिवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केलं होतं."
पण काँग्रेस मात्र तीन कारणांनी खूश आहे. एकतर जे नेते पक्षात आलेत त्यांन निवडणुकीची पार्श्वभूमी आहे आणि त्यांना जमिनीवरील राजकारण माहिती आहे.
तेलंगणा काँग्रेसच्या सरचिटणीस कोटा नीलिमा यांनी सांगितल्याप्रमाणे, "तिसरं कारण म्हणजे एकीकडे ते स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या पाठिंब्यावर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत."
तिसरं कारण त्या सांगतात की, "त्यांच्या कुटुंबातील सदस्याचं (के कविता) दिल्लीच्या दारू घोटाळ्यात नाव पुढे आल्यावर त्यांनी भाजपऐवजी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मागील 40 दिवसातील त्यांचं वागणं बोलणं बघा. आज केसीआर मैदानात उतरले आहेत. त्यांचा पक्ष एमआयएम-2.0 (ओवेसींचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष) झालाय. त्यांना धर्मनिरपेक्ष मतं खायची आहेत. ही भाजपची बी टीम आहे.

फोटो स्रोत, ANI
बीआरएसच्या महाराष्ट्र प्रवेशाने कॉंग्रेस, राष्ट्रवादीला धास्ती, भाजपाला फायदा? बीआरएस खरंच भाजपची बी टीम आहे का?
'बीआरएस'च्या या नव्या प्रवेशानं महाराष्ट्राची समीकरणं कशी बदलतील, बिघडतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्याबद्दल एक कयास पहिल्यापासून लावला जातो आहे की या तोटा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल. एक तर 'बीआरएस'चा प्रभाव पडू शकतो तो भाग या दोन पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. शिवाय ज्या विविध गटांच्या, समाजांच्या मतदानावर त्यांचं लक्ष आहे ते महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे मतदार मानले जातात.
केसीआर यांची राजकीय दिशा ही हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे या विचारधारेनं राजकारण करण्याच्या भाजपापेक्षा कॉंग्रेस राष्ट्रवादीचे मतदार त्यांच्याकडे झुकू शकतात, हा तर्क. शिवाय केसीआर जागा जिंकण्याइतपत मतं घेऊ शकले नाहीत, तरी ते जी मतं घेतील ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी वा महाविकास आघाडीची जागा पडण्यास पुरेशी ठरतील अशी धास्ती या पक्षांना आहे.
त्यामुळेच अजित पवारांनी अगोदरच धोक्याची सूचना दिली आणि या पक्षांकडून भाजपा-बीआरएसचं संगनमत आहे असे आरोपही सुरु झाले आहेत.
यावर बीबीसी तेलुगु'चे संपादक जी एस राममोहन सांगतात की, "भाजपा आणि 'बीआरएस'मध्ये काही आतून ठरलं आहे का अशी चर्चा तेलंगणातही सुरु आहे. पण मला वाटतं की सध्या ती केवळ एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. ते सिद्ध करण्यासाठी हातात काही नाही. हे झालं आहे की केसीआर यांची मुलगी कविता हिच्याविरुद्ध सुरु असलेली केंद्रीय यंत्रणांची चौकशी तूर्तास थंड आहे आणि तेलंगणातही भाजपाचा त्यांच्याविरुद्ध आक्रमकपणा कमी झाला आहे. पण त्यातून निश्चित सांगता येणार नाही. माझ्या मते राष्ट्रीय स्तरावर आपली दखल घेतली जावी यासाठी राव यांनी प्रयत्न सुरु केले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रात जाणं त्यांना योग्य वाटलं, असंच याकडे पाहता येईल."

फोटो स्रोत, ANI
बीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख एम कृशांकही 'बीआरएस ही भाजपची बी टीम' असल्याच्या आरोपांचं खंडन करतात. ते म्हणतात की, केसीआर यांनी नेहमीच भाजप आणि काँग्रेसवर सातत्याने हल्ला केला आहे.
"कविता यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीमुळे डावपेच बदलले आहेत असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. खरं तर आम्ही तेलंगणात काँग्रेसला नाही तर भाजपला आव्हान म्हणून बघतोय."
कृशांक पुढे सांगतात, "काँग्रेसची आता वायएसआर तेलंगणा पक्षाच्या (वायएसआरटीपी) वायएस शर्मिला यांच्याशी जवळीक वाढली आहे. वायएस शर्मिला यांनी तेलंगणाच्या निर्मितीविरोधात लढा दिला होता."
"2018 साली काँग्रेस टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंसोबत गेली होती. आता 2023 मध्ये त्यांनी वायएस शर्मिला यांच्याशी संधान साधलंय. शर्मिला यांचे कौटुंबिक कलह घेऊन काँग्रेस तेलंगणात येऊ इच्छित आहे."
केसीआर आपले हातपाय का पसरत आहेत?
तेलंगणा जनसमितीचे प्राध्यापक एम कोदंडराम यांनी तेलंगणा हे वेगळं राज्य बनविण्यासाठी केसीआर यांना साथ दिली होती.
ते केसीआर यांचे सल्लागार देखील होते. पण त्यांच्यात धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद झाल्यावर ते वेगळे झाले.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्यांचा महाराष्ट्रात जाण्याचा पहिला उद्देश म्हणजे स्थानिक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करून ते राष्ट्रीय मुद्द्यांकडे वळवणं. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी जर लोकसभेच्या काही जागा जिंकल्या तर 2024 मध्ये भलेही कोणतंही सरकार येऊ दे त्यांना राजकीय सौदेबाजीत वरचढ ठरता येईल."
"आणि तिसरं म्हणजे भाजपला खूश करण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांची मतं खातील."
ते पुढे सांगतात, "दिल्लीतील दारू घोटाळ्यात कविताचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी आपली बाजू बदललेली नाही हे सिद्ध करणं कठीण आहे. बहुसंख्य लोकांना वाटलं होतं की तिला अटक होईल पण तसं काही घडलंच नाही. म्हणजे त्यांनी भाजपशी संधान साधलंय हे स्पष्ट आहे."
"भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ईडीला सक्रिय केलं होतं तशी कारवाई इथं दिसून येत नाही. कारण कवितावर कारवाई झाली तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असं कदाचित भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला वाटत असावं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








