इम्रान खान यांना तुरुंगात विष दिलं जाऊ शकतं, पत्नी बुशरा बीबी यांचा गंभीर आरोप

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

"पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला तुरुंगात धोका आहे आणि त्यांना अटक तुरुंगात विष दिलं जाऊ शकतं," असा दावा इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीवी यांनी केला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बुशरा बीबी यांनी इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत पंजाबच्या गृह सचिवांना शनिवारी (19 ऑगस्ट) पत्र लिहिलंय.

पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, बुशरा यांनी इम्रान यांच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीची दखल घेऊन त्यांना तुरुंगात बी-क्लास सुविधा देण्याची मागणी केली आहे.

बुशरा यांनी आपल्या पत्रात लिहिलंय की, "इम्रान यांच्या जीवाला अजूनही धोका आहे आणि अटक तुरुंगात त्यांना विष दिलं जाण्याची भीती आहे."

या महिन्याच्या सुरुवातीला बुशरा यांनी पती इम्रान खान यांची अर्धा तास भेट घेतली. इम्रान यांना त्रासदायक परिस्थितीत ठेवण्यात आलं आहे आणि त्यांना सी-क्लास सुविधा देण्यात आल्या आहेत, असं त्यांनी भेटीनंतर सांगितलं होतं.

कैद्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं?

पंजाबच्या तुरुंगात तीन श्रेणींमध्ये कैद्यांना ठेवलं जातं.

खून, दरोडा, चोरी, मारामारी आणि इतर किरकोळ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना ‘सी’ किंवा सामान्य श्रेणीमध्ये ठेवलं जातं.

'बी' किंवा बेटर श्रेणीमध्ये अशा कैद्यांना ठेवलं जातं जे खून आणि मारामारीच्या प्रकरणात गुंतलेले असतात. पण, चांगल्या कुटुंबातील असतात.

पदवी उत्तीर्ण कैद्यालाही 'बी' श्रेणीमध्ये ठेवलं जाऊ शकतं.

उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री आणि जास्त कर भरणाऱ्या कैद्यांना 'ए' श्रेणीमध्ये ठेवलं जातं, असं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Imran Khan

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इम्रान खान

इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनातोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे.

या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील.

मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात.

अटकेनंतरही शांतता

खरंतर अटकेनंतर घरी बसून राहू नका, शांततेत निषेध व्यक्त करा या त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही.

सरकारचा दावा आहे की, लोकांना इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ अर्थात पीटीआय या पक्षासोबत जायचं नाहीये.

तर तज्ज्ञांच्या मते यामागे वेगळी कारणं आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इम्रान सत्तेत आले, तेव्हा पाकिस्तानातल्या एस्टॅब्लिशमेंटचा म्हणजे लष्कर आणि गुप्तहेर संस्थेतील लोकांचा पाठिंबा लाभला होता.

पण या दोन्हींसोबतचं त्यांचं नातं बिघडत गेलं, तसं त्यांना सत्ताही गमवावी लागली असं काही जाणकार सांगतात.

इम्रान पंतप्रधानपदी असतानाच हे नातं बिघडत गेलं होतं. पण पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट न पाहता, त्यांनी पाकिस्तानी लष्करावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली.

मे महिन्यात त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी लष्कराच्या इमारतींवरही हल्ला केला होता.

प्रत्युत्तर म्हणून लष्करानं त्यातल्या हजारो समर्थकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर मिलिट्री कोर्टात कारवाई केली.

मानवाधिकार संघटनांनी याला विरोध केला. पण या कारवाईनं इम्रान यांच्या पक्षाचा कणाच मोडला आहे.

पाकिस्तानी मीडियातील काहींनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार लष्करानं इम्रान खान यांच्याविषयीच्या बातम्यांवरही निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला होता.

या सगळ्या प्रकारामुळे खान यांच्या काही पाठिराख्यांनीही सोशल मीडियावर इम्रान खान यांच्याविषयी लिहिणं, पाहणं, बोलणं बंद केलं.

Imran Khan

फोटो स्रोत, Getty Images

5 ऑगस्टला इम्रान यांना अटक झाली, त्यानंतर सरकारनं म्हटलं होतं की शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ते अटक करणार नाहीत.

पण इम्रान यांच्या घराबाहेर जमलेल्या समर्थकांना पोलिसांनी पकडून नेल्याचं बीबीसी उर्दूच्या पत्रकारांनी पाहिलं. या समर्थकांना अटक झाली होती की नुसतंच ताब्यात घेतलं होतं, हे स्पष्ट नाही.

नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिस अधिकाऱ्यांनी बीबीसीला माहिती दिली आहे की त्यांनी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाच्या शंभर समर्थकांना अटक केली आहे. कुठेही इम्रान यांचे समर्थक एकत्र जमा होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

इम्रान यांचं पुढे काय होईल?

वॉशिंग्टनच्या विल्सन सेंटर थिंक टँकमध्ये दक्षिण आशिया विभागाचे संचालक मायकल कुगलमन सांगतात, “9 मे रोजीच्या आंदोलनानंतर जे पडसाद उमटले, ते पाहिल्यावर इम्रान यांच्या पाठिराख्यांना सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नाही आहे. येत्या काही काळात ते रस्त्यावर उतरतील की मतदानातच याचं प्रतिबिंब पडेल हा प्रश्नच आहे”

इम्रान यांच्याविरोधात वेगवेगळ्या कोर्टांमध्ये अनेक खटले सुरू आहेत आणि त्यातल्या काही खटल्यांत इम्रान यांना दिलासा मिळवून देण्यात वकिलांना यश आलं आहे.

आताही त्यांची टीम कारावासाच्या शिक्षेविरोधात कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. पण पुढे काय होईल हे सांगता येणार नाही.

इम्रान यांची शिक्षा कायम राहिली आणि ते कुठलीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले, तर त्यांच्या पक्षाचं काय होईल हा मोठा प्रश्नच आहे.

इम्रान यांच्या पक्षाचं काय होईल?

कोर्टात कारवाईला सामोरं जावं लागलेले इम्रान खान हे एकटेच पाकिस्तानी पंतप्रधान नाहीत. अलीकडच्या काळात नवाझ शरीफ, बेनझीर भुट्टो आणि लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्यावरही काही ना काही कारवाई झाली होती.

BBC

राजकीय विश्लेषक झैनब समनताश सांगतात, “नवाझ शरीफ यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी संघर्ष सुरु ठेवला. पण इम्रान खानना घराणेशाही मंजूर नाही, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पक्षाची धुरा कोण सांभाळेल हा प्रश्नच आहे.”

पीटीआय पक्षाचे अध्यक्ष परवेझ इलाही आधीच अटकेत आहेत. त्यामुळे इम्रान यांच्या गैरहजेरीत पक्षाचे व्हाईस चेयरमन शाह महमूद क़ुरैशी नेतृत्त्व करत आहेत.

पण इम्रान यांच्या बाजूनं आणि लष्कराविरोधात मोठं आंदोलन उभारणं त्यांना जमेल का याविषयी राजकीय विश्लेषक सलमान गनी यांना शंका वाटते.

ते सांगतात, “पाकिस्तानातले राजकारणी पक्षाला चालना देत नाही, तर केवळ नेता म्हणून आपली छबी मोठी करण्यावर भर देतात. त्यामुळे इम्रान यांचा पर्याय केवळ इम्रान खानच आहेत. त्यांच्या गैरहजेरीत पीटीआय पक्षाकडे असा कुणी नेता नाही ज्याच्यात नेतृत्त्वाची क्षमता किंवा पक्षाच्या समर्थकांना जोडून ठेवण्याची ताकद असेल.”

Imran Khan

फोटो स्रोत, Getty Images

इम्रान खान यांच्या पहिल्या अटकेनंतरच्या काळात त्यांच्या पक्षातले अनेक वरिष्ठ राजकीय नेते एकतर पक्ष सोडून गेले आहेत, अटकेच्या सावटाखाली आहेत किंवा दडी मारून बसले आहेत. त्यामुळे यातून सावरणं इम्रान यांच्यासाठी सध्यातरी कठीण दिसतंय.

राजकीय विश्लेषक डॉ. हसन अस्कारी रिझवी सांगतात की काही काळासाठी पीटीआय पक्ष संकटात सापडला आहे आणि इम्रान यांची शिक्षा कायम राहिली तर काही काळासाठी तो बाजूलाही पडू शकतो. पण म्हणजे इम्रान खान यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत झाला, असं म्हणता येणार नाही असंही ते सांगतात.

“इम्रान यांची व्होट बँक त्यांच्या सोबत राहील आणि ती वाढूही शकते. इतिहासात याआधी असं घडलं आहे.

“1985 साली जनरल झिया सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकून राहणं अशक्य वाटत होतं. पनामा पेपर्स प्रकरणी नवाझ शरीफ यांना अयोग्य ठरवण्यात आलं, तेव्हा पीएमएल-एन पक्षावरही हीच वेळ आली होती.

“पण या देशात सत्तेत असलेले लोक अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या नावाखाली राजकीय प्रतिस्पर्ध्यांना राजकारणापासून दूर करतात तेव्हा अनेकदा त्यांचे फासे उलटे पडताना दिसतात.”

(रिपोर्टिंग - शुमाईला जाफ्री, कॅरोलिना डेव्हिस)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)