ICMR - पॅनेशियाची डेंग्यू विरोधी लस काय आहे? डेंग्यूची लस विकसित करण्यात काय आव्हानं आहेत?

एडिस इजिप्ती डास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एडिस इजिप्ती डासाद्वारे डेंग्यू पसरतो.
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय.

ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत.

1943 साली पहिल्यांदा जपानच्या नागासाकीमध्ये डेंग्यूच्या व्हायरसचा शोध लागला. 2023 च्या अखेरपर्यंत जगातल्या 129 देशांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले.

मग शोधाला 81 वर्षं उलटूनही डेंग्यूवरची परिणामकारक लस का विकसित करता आली नाही?

डेंग्यू कसा होतो?

एडिस इजिप्ती (Aedes aegypti) आणि एडिस अॅल्बोपिक्ट्स (Aedes albopictus) प्रजातीच्या डासांमुळे डेंग्यू होतो. हा डास प्रदूषित पाण्यापेक्षा स्वच्छ, साठलेल्या पाण्यात जास्त आढळतो.

डेंग्यू (Dengue) किंवा डेंगी हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतून. 'Ka-dinga pepo' या शब्दांवरून.

याचा अर्थ होतो - cramp-like seizure म्हणजे पिळवटून दुखणं.

या अर्थाप्रमाणेच डेंग्यूच्या तापामध्ये हाडं आणि स्नायू खूप दुखतात.

डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत - Dengue Fever DF आणि Dengue Hemorrhagic Fever DHF.

पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात.

दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे अर्थात DHFमुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसू शकतात.

अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते. पण डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषधं उपलब्ध नाहीत. लक्षणांनुसार उपचार केले जातात.

लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

डेंग्यूची लक्षणं

लस विकसित करण्यातील आव्हाने

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार आहेत :

  • DENV1
  • DENV2
  • DENV3
  • DENV4

डेंग्यूची साथ पसरते तेव्हा ती डेंग्यूच्याच वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे पसरलेली असू शकते. त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एका प्रकारचा डेंग्यू होऊन गेला तर त्यामुळे तुमच्या शरीरात या विषाणूशी लढणारी रोगप्रतिकारक शक्ती मिळेल आणि इतर प्रकारच्या डेंग्यूपासून काहीसं संरक्षण (Immunity) मिळत नाही.

एका डेंग्यू विषाणू संसर्गानंतर इतर तीन प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊन डेंग्यू होण्याचा धोका राहतोच. आणि दुसऱ्यांदा डेंग्यू झाला तर तो अधिक धोकादायक आणि जीवघेणा ठरू शकतो.

हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे. कारण डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही.

त्यातही या व्हायरसचा स्ट्रेन बदलत राहत असल्याने त्याविरोधातली लस तयार करणं कठीण आहे.

जगभरात वापरता येऊ शकेल अशी लस शोधणं हे अजूनही एक आव्हान आहे आणि ते तेवढंच गरजेचं देखील आहे कारण कोणत्या देशात, कोणत्या प्रकारच्या डेंग्यूची साथ पसरेल हे सांगता येत नाही.

2015 मध्ये पहिल्यांदा डेंग्यूवर Dengvaxia ही लस तयार करण्यात आली, पण चारही प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात ही लस अपयशी ठरली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

डेंग्यूची लस विकसित करणं कठीण का आहे, याविषयी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "डेंग्यूने व्यक्ती बाधित झाल्यानंतर 20 पैकी 1 रुग्णामध्ये याची लक्षणं दिसून येतात. बाकीच्या 19 रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळत नाहीत. त्यामुळे या आजारासाठीची लस तयार करण्यासाठी जे रक्त लागतं, त्याचंही प्रमाण खूप कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंग्यू झाल्यानंतर आपल्या शरीराची प्रतिकार प्रणाली म्हणजे Immune Response तपासणं, त्याचं मोजमाप करणं, तो कोणत्या प्रकारचा आहे याचा अभ्यास खूप अपुरा आहे. यामुळेच यापूर्वीची Dengvaxia नावाची लस होती, तिचा परिणाम फारसा झाला नाही."

लस तयार केल्यानंतर तिच्या चाचणीचा पहिला टप्पा प्रयोगशाळेत पार पडतो. पण दुसऱ्या टप्प्यातलं Animal Model म्हणजे प्राण्यांवर चाचणी केल्यानंतरचे परिणाम अजून नीट विकसित झालं नसल्याचंही डॉ. भोंडवे सांगतात. ते म्हणतात, "लस प्राण्याला दिल्यानंतर, ससे किंवा उंदीर यासाठी वापरले जातात. त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर होणारे परिणाम फारसे नीटसे दिसले नाहीत. त्यामुळे ही लस तयार करणं आतापर्यंत खूप कठीण गेलं.

कोणत्याही लशीच्या चाचण्यांदरम्यान ती व्यक्तींना देऊन त्याचे परिणाम तपासले जातात. पुरेसे स्वयंसेवक मिळत नसल्याचा परिणाम लशींच्या विकासावर होत असल्याचं डॉ. भोंडवे म्हणतात.

ते सांगतात, "साधारणतः 9 ते 46 वर्षांचेच व्हॉलेंटियर्स मिळाल्याने यापूर्वीची लस 9 - 46 या काळातच दिली जाते. त्याच्यामुळे 9 वर्षांपेक्षा छोट्या मुलांमध्ये किंवा तरूण व्यक्तींमध्येही पुरेसे स्वयंसेवक यासाठी मिळत नाहीत. त्यामुळे संशोधनाला खीळ बसते. त्याचप्रमाणे गरोदर माता, स्तनदा मातांवरही ही ट्रायल घेतली जाऊ शकत नाही."

ICMR - पॅनेशियाची डेंग्यू विरोधी लस काय आहे?

ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक विकसित करत असलेल्या डेंग्यूवरच्या लशीचं नाव आहे - DengiAll

हे एक Tetravalent Dengue Vaccine आहे. म्हणजे डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंची तीव्रता कमी करून, त्यांना एकत्र आणून तयार करण्यात येणारी लस आहे.

रोहतकमधल्या पं. भागवत दयाळ शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडकल सायन्सेसमध्ये चाचणीत सहभागी असणाऱ्या एका व्यक्तीला लस टोचून तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आली.

ही लस तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेला व्हायरस strain - TV003/TV005 हा अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH)ने विकसित केलेला आहे. जगभरात सध्या या व्हायरसवरच क्लिनिकल रिसर्च आणि ट्रायल्स घेण्यात येतायत.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

ICMRच्या सोबत आता भारतातल्या 18 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 19 जागी लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या होतील. यामध्ये 10,335 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असेल. पुढची दोन वर्षं या लोकांवर लक्ष ठेवलं जाईल.

जगातल्या निम्म्या लोकसंख्येला आता डेंग्यू होण्याचा धोका असून दरवर्षी 10 ते 40 कोटी लोकांना दरवर्षी डेंग्यूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने म्हटलंय.

2023 या वर्षात डेंग्यूची आजवरची सर्वोच्च जागतिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. या वर्षात जगातल्या 80 देशांमध्ये डेंग्यूचे 65 लाख रुग्ण आढळले. तर डेंग्यूमुळे 7300 मृत्यू नोंदवण्यात आले. पण बहुतेकांमध्ये डेंग्यूची लक्षणं सौम्य असल्याने आणि त्यावर अनेकजण घरीच उपचार घेत असल्याने प्रत्यक्षातला रुग्णांचा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार जून 2024 अखेरपर्यंत भारतात डेंग्यूचे 32,091 रुग्ण आढळले. तर या वर्षी आतापर्यंत 32 जणांचा डेंग्यूने मृत्यू झालाय.

2023 वर्षात भारतात डेंग्यूचे 2,89,235 रुग्ण आढळले होते आणि या काळात 485 जणांचा मृत्यू झाला.

एडिस अल्बोपिक्ट्स डास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एडिस अल्बोपिक्ट्स डासाद्वारेही डेंग्यू पसरतो.

डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव हा आतापर्यंत ऊष्ण कटिबंधात आढळून येत होता. पण डेंग्यूचे डास आता थंड प्रदेशांतही आढळले आहेत. जागतिक पातळीवरही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय.

दुसरी गोष्ट म्हणजे डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी लक्षणं दिसायला लागतात आणि पुढचे 2 ते 7 दिवस ही लक्षणं टिकतात. त्यातही प्रचंड पोटदुखी, उलट्या होणं, धाप लागणं, हिरड्यांमधून रक्तस्त्राव, थकवा, उलटी वा शी मधून रक्तस्त्राव होणं अशी काही गंभीर लक्षणं ताप येऊन गेल्यानंतर येतात. त्यामुळे डेंग्यूचं निदान होण्यात वेळ जातो. अशा लोकांना तातडीने उपचार मिळणं गरजेचं असतं.

डेंग्यूवरची लस या सगळ्यांना संरक्षण देऊ शकते.

इतर कोणत्या कंपन्या डेंग्यूची लस विकसित करत आहेत?

भारतामधलीच आणखी एक कंपनी - Indian Immunological Limited डेंग्यूवरची लस विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहे. ही कंपनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या मालकीची सबसिडरी कंपनी आहे. 2026 च्या मध्यापर्यंत डेंग्यूवरची लस बाजारात आणण्याचं आपलं उद्दिष्टं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

कोव्हिड विरोधातली लस तयार करणारी पुण्यामधली सीरम इन्स्टिट्यूटही Dengusiil नावाची डेंग्यूच्या विरोधातली लस विकसित करत आहे. या लशीची पहिल्या टप्प्यातली ट्रायल ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वीपणे घेतल्यानंतर ती भारतातही सुरू करण्यात येत होती.

तर डेंग्यूवरची लस विकसित करण्यासाठी जपानच्या ताकेडा (Takeda) आणि भारतातल्या Biological E कंपनीने करार केलाय.