महिला बेपत्ता की नवऱ्याकडून तिची निर्घृणपणे हत्या? या प्रकरणाची का होत आहे सर्व देशभर चर्चा?

फोटो स्रोत, UGC
- Author, अमरेंद्र यारलागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
( सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
हैदराबादमधील एक महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने केवळ आंध्रप्रदेश-तेलंगानातच नाही तर सर्व देशभरात चर्चा होत आहे.
माधवी असं या महिलेचं नाव होतं. माधवी मीरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कथितपणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण सुरुवातीस अगदी सामान्य वाटत असले तरी खूप अस्वस्थ करणारी माहिती पुढे आली आहे. ही नेमकी घटना काय, पोलिसांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊया.
माधवीचा पती गुरुमूर्ती याच्यावर तिच्या हत्येचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्समधून या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत.
स्थानिक मीडिया, राष्ट्रीय मीडिया आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
या महिलेच्या पतीने तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले, असंही वृत्त विविध माध्यमांतून व्हायरल झालंय.
मात्र, पोलिसांनी अद्याप माधवीच्या हत्येला किंवा मीडिया रिपोर्ट्समध्ये नमूद केलेल्या कोणत्याही माहितीला दुजोरा दिलेला नाही, अशी माहिती सूत्राच्या हवाल्यातून मिळतेय.
पोलिसांना काय सांगितलं?
पुट्टा गुरुमूर्ती आणि व्यंकट माधवी हे गेल्या पाच वर्षांपासून हैद्राबादच्या जिल्लेलागुडातील न्यू वेंकटेश्वर कॉलनीतील प्लॉट क्रमांक 3 मध्ये राहत होते. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.
गुरुमूर्ती आणि माधवी राचरला मंडलच्या जेपी चेरुवू गावातील आहेत. जवळपास 13 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं.
गुरुमूर्तीने सैन्यात सेवा बजावली आहे. सध्या तो खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय, अशी माहिती मीरपेटचे पोलीस निरीक्षक कीसरा नागराजू यांनी दिली.

एलबीनगर डीसीपी प्रवीण कुमार बीबीसी तेलुगुसोबत बोलताना म्हणाले की, बेपत्ता व्यक्तीच्या शोधरुपात ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.


गुन्हा केव्हा दाखल झाला?
18 जानेवारी रोजी माधवीची आई उप्पला सुब्बम्मा यांनी मीरपेट पोलिस ठाण्यात माधवीच्या बेपत्ता होण्याची हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
सुब्बम्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "16 जानेवारीला सकाळी माझी मुलगी माधवी आणि तिचा पती गुरुमूर्ती यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं. यानंतर ते दोघेही मला न सांगता दुपारी कुठेतरी बाहेर गेले होते. मी त्या दोघांना शेजारीपाजारी, नातेवाईकांकडे शोधलं. ओळखीच्या ठिकाणी शोधाशोध केली, परंतु मला ते कुठेच गवसले नाहीत."
माधवीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजही तपासले.

फोटो स्रोत, UGC
इन्स्पेक्टर नागराजू यांनी बीबीसीला सांगितलं की, "माधवी आणि गुरुमूर्ती 15 तारखेला घरी आले होते. त्यानंतर माधवीचा कोणताही मागमूस लागला नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र, त्यातही काही आढळून आलं नाही."
"माधवीच्या पालकांची चौकशी केली असता त्यांनी गुरुमूर्तीवर संशय व्यक्त केला. त्यांच्या संशयाच्या आधारे आम्ही तपास सुरू केला. सध्या या प्रकरणाची बेपत्ता व्यक्तीच्या आधारावर तपासाची नोंद करण्यात आली आहे."
बीबीसीने माधवीच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वृत्त लिहेपर्यंत गुरुमूर्ती यांच्या कुटुंबीयांशीही दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत आम्ही काही शेजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.
गुरुमूर्ती सध्या जेथे काम करतोय त्या ठिकाणीही बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडूनही अद्याप कोणती प्रतिक्रिया मिळालेली नाही.
स्थानिक मीडिया काय म्हणतोय?
स्थानिक मीडियातील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गुरुमूर्ती यानेच पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते फेकून दिले.
अशा अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या असून त्यात गुरुमूर्तीने पत्नीच्या मृतदेहासोबत काय केले याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
मात्र, पोलिसांनी या गोष्टींना दुजोरा दिलेला नाही.
एलबी नगरचे डीसीपी प्रवीण कुमार यांनी बीबीसीला फोनवरून सांगितलं की, "गुरुमूर्ती ने त्याच्या जबाबात माधवीच्या बेपत्ता होण्यामागे दोन-तीन कारणं दिली आहेत. त्या आधारे आम्ही तपास करत आहोत."
डीसीपी प्रवीण कुमार यांनीही बीबीसीला सांगितलं की, माधवीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. चौकशीनंतर संपूर्ण सत्य बाहेर येईल, असंही त्यांनी सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळून आलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माधवी घराच्या आत जाताना दिसत आहे, पण त्यानंतर ती घरातून बाहेर पडताना कुठेही दिसून येत नाही. याच गोष्टीमुळं विविध शंका उपस्थित होत आहेत.

फोटो स्रोत, UGC
याबाबत डीसीपी प्रवीण कुमार म्हणाले की, गुरुमूर्तीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत, त्याअनुषंगानं त्याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, शरीराचे अवयव ठेचून जवळच्या तलावात किंवा नाल्यात फेकल्याचा कोणताही पुरावा त्यांना अद्याप सापडला नसल्याचं पोलिस निरीक्षक नागराजू यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, त्यानंतरच सर्व बाबींचा उलगडा होईल, असंही ते म्हणाले.
माधवीच्या घरात काय आढळून आलं?
गुरुमूर्ती यांचे कुटुंब राहत असलेल्या घराची बीबीसीने पाहणी केली. घरावर आणि बाहेरील सुरक्षा दरवाजावर कुलूप लागले होता.
घराची एक खिडकी खुली होती, त्यातून आत डोकावलं असता एक छोटा कुकर, चिकन किंवा मटण शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे एक लहान लाकडी भांडे दिसत होते. यासह एक दारूची बाटली आणि बादलीही दिसून आली.

प्रथमदर्शी पाहिल्यास यात काहीच संशयास्पद असल्याचं दिसून आलं नाही.
या घरामध्ये तळमजला आणि पेंटहाऊससह दोन मजले आहेत. सद्यस्थितीत या संपूर्ण परिसरात कोणीही नाही. तर, जेव्हा बीबीसीची टीम इथे पोहोचली तेव्हा त्याला कुलूप होते.
अनेक प्रश्न अनुत्तरित
पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील, असे मीरपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी सांगतात.
दरम्यान, हे प्रकरण आता देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. पण, सुरुवातीपासून आतापर्यंतच्या गोष्टींवर नजर टाकल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात.
- माधवी बेपत्ता झाली की तिचा खून झाला? या प्रकरणावर विविध शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामागचे कारण काय?

- माधवी घराबाहेर पडली नाही, असं पोलिसांनी सुरुवातीला सांगितलं होतं, की मग ती गेली कुठे?
- सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे?
- माधवीचा पती गुरुमूर्ती मुख्य संशयित आहे का?
या प्रकरणाबाबत विविध अफवा उडल्या, यावर पोलिसांनी काय भूमिका वठवली, असाही प्रश्न उपस्थित होतो. यासह अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधावी लागणार आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











