You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान असं कोणतं मिसाईल तयार करत आहे, जे अमेरिकेला त्यांच्यासाठी धोका वाटत आहे?
अणुशक्ती संपन्न पाकिस्तान आता लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय.
हे मिसाईल दक्षिण आशिया ओलांडून पार अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचेल, एवढ्या लांब पल्ल्याचं असल्याची माहिती आहे.
एकेकाळी पाकिस्तानच्या पाठिशी राहणारा अमेरिका आता स्वतःच या मिसाईलवर टीका करतोय.
एवढ्या लांब पल्ल्याचं हे मिसाईल नेमकं कुणाला लक्ष्य करण्यासाठी तयार केलं जात आहे, असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार जॉन फायनर विचारतायत. 'कार्नेगी एन्डाऊन्मेंट फॉर इंटरनॅशनल पीस' या संस्थेच्या एका कार्यक्रमात फायनर बोलत होते.
"पाकिस्तानच्या या कृतीकडे अमेरिकेविरोधात असलेला धोका याशिवाय दुसऱ्या कोणत्याही नजरेतून पाहता येत नाही," असं ते म्हणाले.
उपलब्ध अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तान बॅलिस्टिक मिसाईलची उपकरणं तयार करतंय. मोठ्या रॉकेट्सच्या मोटर्स यात तपासता येतात, असं फायनर सांगतात.
"ज्यांची आण्विक शस्त्रास्त्र आणि मिसाईल अमेरिकेपर्यंत पोहोचतील असे हातावर मोजण्यासारखे देश आहेत. त्यांच्यापासून अमेरिकेला धोका आहे. रशिया, उत्तर कोरिया आणि चीन हे ते देश आहेत," असं फायनर म्हणाले.
पाकिस्तानवर मर्यादा
पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईलच्या उपक्रमावर अतिरिक्त मर्यादा घालत असल्याचं, अमेरिकेनं बुधवारी जाहीर केलं.
अमेरिकेनं याआधीच मिसाईल निर्मिती करणाऱ्या चार कंपन्यांवर निर्बंध लावले होते. त्या चारही कंपन्या बॅलिस्टिक मिसाईल निर्मितीसाठीचे साहित्य आणि सुटे भाग पुरवत होत्या.
पाकिस्तान सातत्यानं लांब पल्ल्याचं मिसाईल निर्माण करण्याच्या प्रयत्नांत असल्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेने म्हटलं.
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार कार्यकारी आदेश 13382 अंतर्गत या कंपन्यांवर निर्बंध लावले जात आहेत.
सामुहिक विनाशाच्या उद्देशानं तयार केल्या जाणाऱ्या मोठ्या शस्त्रांची निर्मिती आणि पुरवठा रोखण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
विल्सन सेंटर या वॉशिंग्टनमधील संस्थेच्या साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक मायकल कुगलमॅन यांनी या प्रकरणाबद्दलची प्रतिक्रिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिली.
"अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फायनर म्हणतायत की, पाकिस्तानकडे अमेरिकेपर्यंत हल्ला करण्याची क्षमता येऊ शकते. ही आश्चर्यकारक बाब आहे. यातूनच अमेरिकेने पाकिस्तानी कंपन्यांवर निर्बंध का लावलेत याचा अंदाज येतो," असं ते सांगतात.
सप्टेंबर महिन्यात अमेरिकेने चीनच्या एका संशोधन संस्थेवर आणि काही कंपन्यांवर निर्बंध लावले होेते.
अमेरिकेच्या निर्बंधांवर पाकिस्तानची प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या समा या वाहिनीच्या एका कार्यक्रमात राजकीय विश्लेषक नजम सेठी म्हणाले की, "अमेरिका आमच्यावर जेवढा दबाव आणेल तेवढे आम्ही चीनच्या जवळ जाऊ. अमेरिका भारताबरोबर जाणार असेल तर आम्ही चीनबरोबर जाऊ. भारत रंजक खेळ खेळतोय. तो अमेरिका आणि रशिया दोन्ही देशांशी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय."
पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंधात ग्वादर आणि सीपॅक सारख्या काही मुद्द्यांवरून तणाव आहेत.
त्यावर तोडगाही अजून निघालेला नाही. तर दुसरीकडे भारत अमेरिकेतले संबंध सुधारत आहेत, असंही नजम सेठी पुढे म्हणाले.
"पुढच्या वर्षी म्हणजे 2025 ला अमेरिका आणि इस्रायल यांचं इराणवर लक्ष असेल. तिथे सत्ताबदल करण्याचा आणि अण्विक कार्यक्रम बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल," असंही सेठी म्हणाले.
"असं झालं तर 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांचं लक्ष पाकिस्तान आणि त्यांच्या अण्विक उपक्रमांवर असेल," असंही ते पुढे म्हणाले.
चीन पाकिस्तानला सहाय्य करत असून, अमेरिका ते थांबवू शकणार नाही, असंही सेठी पुढं म्हणाले.
ट्रम्प आल्यानंतर काय होणार?
पाकिस्तानवर लागलेल्या या निर्बंधांबाबत अमेरिकेतल्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली जातेय.
"पाकिस्तानावर याआधीही अनेकवेळा निर्बंध लावले गेलेत. 1965 मध्यल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या सैन्याला मदत करणं बंद केलं होतं. पुढे 1971 मध्येही निर्बंध लावले होते," असं नजम सेठी याबाबत बोलताना म्हणाले.
अमेरिकेनं त्यानंतर 1977 आणि 1990 मध्येही पाकिस्तानात सत्ताबदल होत असतानाही कठोर निर्बंध लादले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
पण, त्यानं फार काही परिणाम होणा नाही, असंही ते पुढे म्हणतात. पाकिस्तान आधी जे करत होता, तेच करत राहील. अमेरिकेनं इराणवरही असेच कडक निर्बंध लावले. पण इराण म्हणून इराणने स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणं बंद केलं का? असा प्रश्न सेठी विचारतात.
संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलेल्या डॉक्टर मलिहा लोधी याही समा टीवीच्याच एका कार्यक्रमात बोलत होत्या.
"बायडन प्रशासनात पाकिस्तानच्या मिसाईल कार्यक्रमांवर सहा ते सातवेळा निर्बंध लावले गेलेत. ही नवी गोष्ट नाही. सुरुवातीपासूनच पाकिस्तानचा अण्विक आणि मिसाईल निर्मिती कार्यक्रम कमजोर करण्याचा, बंद करण्याचा किंवा त्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आहे," त्या म्हणाल्या.
पण, पाकिस्तानने याबाबतीत अमेरिकेचा नेहमी विरोध केलाय आणि हे उपक्रम पाकिस्तान स्वसुरक्षेसाठी करत असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेचेही स्वतःचे कायदे आहेत. त्यातंर्गत ते अशी पावलं उचलत राहतात, असंही लोधी पुढे सांगत होत्या.
"अमेरिकेने चीनवरही निर्बंध लावलेत, असं करत अमेरिका स्वतःच स्वतःलाच विश्वास देत असतो. या वेळी लावलेल्या निर्बंधांनी आमच्या उपक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही," असंही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.