तिरुपती लाडू प्रसाद : भेसळ प्रकरणी चार जणांना अटक, तुपात प्राण्यांच्या चरबीचा झाला होता आरोप

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी तेलुगु
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.
याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं चा मुख्य आरोपींना अटक केली आहे.
प्रसादाच्या लाडूंमध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. मात्र, वायएसआर पक्षाने हे आरोप फेटाळून लावले होते.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) चे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी प्रसाद तयार करण्यासाठी तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं सांगितलं.
पण आधी फक्त वनस्पती तुपाच्या भेसळीबाबत सांगणाऱ्या श्यामला राव यांनी या तुपातही प्राण्यांची चरबी असल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
आंध्र प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर श्यामला राव यांना टीटीडीचे कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात आलं होतं.
बीबीसी तेलुगूच्या माहितीनुसार याप्रकरणी एसआयटीनं विपिन जैन (45) आणि पोमिल जैन (47) यांना अटक केली आहे. हे दोघं उत्तराखंडमधील ररकीच्या भोलेबाबा ऑर्गेनिक डेअरीचे संचालक आहेत.
त्याशिवाय तिरुपती जिल्ह्यातील वैष्णवी डेअरी स्पेशलिटिज लिमिटेडचे सीईओ अपूर्व विनयकांत चावडा (47) आणि तमिळनाडूतील डिंडीगुलमधील एआर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक राजू राजशेखरन (69) यांनाही अटक झाली आहे.
23 जुलैच्या पत्रकार परिषदेत श्यामला राव यांनी वनस्पती तेलाची भेसळ असल्याचं म्हटलं होतं. पण गुरुवारी त्यांनी चरबीबाबत दुजोरा दिला. लॅब रिपोर्ट यायला उशीर लागल्याचं ते म्हणाले.
तुपाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला इशारा दिला होता. तरीही त्यांनी बदल केला नाही तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं ते म्हणाले.
यापूर्वीही तुपाचे अनेक टँकर टीटीडीने परत पाठवले आहेत. पण त्याचे नेमके आकडे उपलब्ध नाहीत.
पण टीटीडी गव्हर्निंग काऊन्सिलचे अनेक सदस्य आणि अध्यक्ष यांनी वायसीपी आणि टीडीपी (तेलुगू देशम पार्टी) सरकारांच्या कार्यकाळात खराब दर्जामुळं गावरान तुपाचे अनेक टँकर परत पाठवल्याचं म्हटलं आहे.
चंद्राबाबू नायडूंचा आरोप
एनडीए आघाडीच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी मागील सरकारवर टीका केली. आधीच्या सरकारने तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ केल्याचा गंभीर आरोप केला.
चंद्राबाबू म्हणाले, “तिरुपती देवस्थानात अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रसाद तयार केला जायचा. याबाबत आम्ही आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसादच नव्हे तर ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याचा दर्जाही खालावला होता. त्यांनी देवस्थानातील पावित्र्य घालवलं."

फोटो स्रोत, Chandrababu Naidu
" प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. आम्ही यात सुधारणा केलीय. आमचं सरकार आल्यापासून प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या अन्नदानाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे”, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.


वायएसआरसीपीने काय उत्तर दिलं?
वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे अध्यक्ष असलेले वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी चंद्राबाबूंच्या आरोपांचं खंडन केलं.
चंद्राबाबूंनी तिरुपती मंदिराचे पावित्र्य आणि हिंदू भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवून मोठे पाप केले आहे, असं सुब्बारेड्डी म्हणाले.

फोटो स्रोत, RAJESH
“चंद्राबाबूंनी तिरुपती मंदिरातील लाडूंबाबत अत्यंत घाणेरडे आरोप केले आहेत”, असं त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोणी काय प्रतिक्रिया दिली?
मात्र, तेलुगु देसम पार्टी (TDP) सरकारच्या स्थापनेनंतर 23 जुलै रोजी पार पडलेल्या पत्र परिषदेत तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी (TTD EO) यांनी प्रसादातील भेसळीबाबत भाष्य केले होते.
प्रसाद तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात मार्जरीनसारख्या वनस्पती तुपाचा वापर करण्यात आल्याचं ते म्हणाले होते. प्रसादासाठी लागणाऱ्या तुपाचा पुरवठा करणाऱ्या पाच पुरवठादारांपैकी एकाने ही चूक केल्याचे त्यांनी सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
तर, तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातील माजी सदस्यांपैकी एक असलेल्या रामन्ना यांनी चंद्राबाबू यांच्या आरोपांचं समर्थन केलं. त्यांनी वायएसआरसीपी सरकारच्या काळात मंदिरात तयार होणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचं मान्य केलं.
सीबीआय चौकशी करावी – एपीसीसी अध्यक्ष वायएस शर्मिला

फोटो स्रोत, FB/Sharmila
दुसरीकडे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी (APCC) च्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी टीडीपीसह वायसीएम दोन्ही पक्षांवर हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय कमिटी नेमण्याची किंवा प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याची मागणी केली.
तपासणीनंतर प्रसादात फक्त तुपाचा वापर – टीटीडी युनियन लिडर्स
तिरुमला तिरुपती देवस्थानमचे लेबर युनियनचे माजी हंगामी अध्यक्ष कंदारापु मुरली म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी तिरुपती देवस्थानातील प्रसादाबाबत केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांनी टीटीडी कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत."
"तिरुपती देवस्थानातील लाडू टीटीडीच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच तयार केले जातात. त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळादेखील आहे, जेथे प्रसादासाठी लागणारा प्रत्येक घटक तपासल्यानंतरच पुढची प्रक्रिया पार पाडली जाते. आणि हे सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीखाली पार पडतं, असं कंदारापु मुरली म्हणाले.
टीटीडीच्या पुष्टीनंतरच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू कर्मचाऱ्यांकडे पाठवल्या जातात", असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर यांनी टीटीडीचं एक जुनं ट्विट शेअर केलंय. या ट्विटमधील फोटोमध्ये श्यमला राव दिसत आहेत. जून 2024 मध्ये श्यामला राव यांची टीटीडीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
21 जूनरोजी टीटीडीच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून काही फोटो शेअर करत - शुद्ध तुपात बनवण्यात आलेल्या लाडूंचे सँपल ट्राय केले, असं लिहिण्यात आलंय. या पोस्टमध्ये शुद्ध तूप आणि बेसनापासून लाडू तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
मोहम्मद जुबेर यांनी ही जुनी पोस्ट रिट्विट करत त्यावर “टीडीपी सरकारने 14 जून 2024 रोजी श्यामला राव यांना नियुक्त केले होते. 21 जून ला त्यांनी मंदिरातील प्रसाद शुद्ध तुपापासून तयार होत असल्याचे म्हटले आहे”, अशी कमेंट केलीयं.

फोटो स्रोत, ANI
कायदेशीर कारवाई करण्यात यावी – भाजप
या प्रकरणावर बोलताना भाजप खासदार आणि ओबीसी मोर्चाचे नेते लक्ष्मण म्हणाले, "देवस्थानातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर हे भयंकर कृत्य आहे. यामुळे लाखों हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्यात. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे केली."
प्रयोगशाळेतील चाचणीतून काय समोर आलं?
तेलुगु देसम पार्टीचे प्रवक्ते अनम वेंकट रमना रेड्डी म्हणाले, तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून पाठविण्यात आलेले प्रसादाचे नमुने गुजरातमधील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (National dairy development board, Gujarat) पाठवण्यात आले आहेत. यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
अहवालानुसार जर 'एस'चे मूल्य निर्धारित मर्यादेत नसेल तर ते फॉरेन फॅट मानले जाते. मानक 'एस'चे मूल्य सुमारे 95.68 ते 104.32 असावे. सोयाबीन, सूर्यफूल, ऑलिव्ह, फिश ऑइल, पाम तेल यापासून बनवलेल्या पदार्थांना फॉरेन फॅट मानले जाते. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या या वृत्ताला बीबीसीने दुजोरा दिलेला नाही.
चंद्राबाबू काय म्हणाले?
या प्रकरणावर चंद्राबाबू नायडूंनी गुरुवारी (19 सप्टेंबर) भाष्य केले होते. ते म्हणाले, “तिरुपती देवस्थानातील प्रसाद पवित्र आहे. लाखों हिंदू भाविकांच्या भावनांशी जुळलेला आहे. मात्र, प्राण्यांच्या चरबीचा वापर करून या प्रसादाचं पावित्र्य घालवण्यात आलं. आम्ही यात सुधार केला असून आता शुद्ध घटकांपासून उच्च प्रतीचा प्रसाद भाविकांसाठी तयार करण्यास सुरुवात केली आहे.” या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही नायडू म्हणाले.
तिरुपती बालाजी मंदिर आणि लाडू वाटपाचा इतिहास
सेशाचालम पर्वतावर स्थित तिरुमला तिरुवती देवस्थान देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक श्रीमंत तीर्थस्थळांपैकी एक आहे. मुख्य मंदिर परिसर भक्कम भिंतींनी वेढला असून मंदिराच्या आत फोटोग्राफीची परवानगी नाहीये.
हे मंदिर राजा थोंडमन यांनी बांधलं होतं. तर, प्राणप्रतिष्ठा 11 व्या शतकात रामानुजाचार्य यांनी केली होती. कालांतराने चोल, पंड्या आणि विजयनगरच्या राजांनी मंदिरात वेळोवेळी सुधारकार्य केले.
तिरुपती मंदिरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोनं चढवलं जातं. दररोज जवळपास एक लाखांहुन अधिक भाविक येथे दर्शनासाठी असून मोठ्या प्रमाणात दानदेखील करतात.
मंदिरातील दानपेट्यांमध्ये लाखों रुपयांची देणगी जमा होतेच सोबतच दानस्वरुपात मोठ्या संख्येने दागदागिनेही चढवले जातात.

फोटो स्रोत, RAJESH
तिरुपती मंदिरात वर्षाला जवळपास एक टन सोनं दानस्वरुपात मिळत असल्याचं सांगितलं जातं.
तिरुपती मंदिरात प्रसादात मिळणारा लाडू हा अत्यंत लोकप्रिय आहे. हे लाडू मंदिरातील स्वयंपाकघरात बनवले जातात. या स्वयंपाकघराला ‘पोटू’ असं म्हटलं जात.
दररोज साढे तीन लाख लाडू येथे बनवले जातात. बेसन, लोणी, साखर, काजू-किशमिश आणि वेलचीपासून लाडू तयार केले जातात. लाडवांची पाककृति ही तब्बल 300 वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जात.
लाडवांव्यतिरिक्त वडा, अप्पम, मनोहरम आणि जिलब्यांचा प्रसादही तयार करून वाटप केला जातो. गेल्या 300 वर्षांपासून लाडू प्रसादरुपात वाटल्या जातात. 2009 साली तिरुपती मंदिरातील या लाडवांना ‘जीआय टॅग’ म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेटरही देण्यात आलंय.
लाडूवरून याआधीही झाले होते वाद
सप्टेंबर 2024 पासून प्रसादातील लाडूंसाठी टोकन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकाला एक लाडू प्रसाद स्वरुपात दिला जातो. मात्र, त्याहून जास्त लाडू हवे असल्यास प्रति लाडू 50 रुपये किंमत आहे.
मंदिरात भाविकांसाठी 7500 मोठे लाडू व 3500 वडे तयार केले जातात.
2008 पर्यंत एका लाडूपेक्षा जास्त लाडू हवे असल्यास 25 रुपयांत दोन लाडू मिळायचे. त्यानंतर ही किंमत 50 रुपये करण्यात आली.

2023 मध्ये प्रसादाचा लाडू ब्राह्मणांच्या हस्ते तयार करण्यात येण्याबाबतच्या एका अधिसूचनेवरूनही वाद झाला होता.
याबाबत इतिहासकार गोपी कृष्णा रेड्डी बीबीसीशी बोलताना म्हणाले, “कोणत्या जातीच्या लोकांनी लाडू बनवावे आणि कोणी बनवू नये याचा उल्लेख कुठेच आढळून येत नाही. सुरुवातीला तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम बांधवदेखील होते. अजूनही असू शकतात.” सर्व प्रकारच्या लोकांचा यात सहभाग असायला हवा, असंही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











