You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वयाच्या पाचव्या वर्षी आई गमावली, दहाव्या वर्षी एक हात निकामी; सांगलीच्या सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार जाहीर
- Author, संपत मोरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातला पॅराअॅथलिट सचिन खिलारीला क्रीडाक्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरिसच्या पॅरालिंपिक स्पर्धेत सचिन खिलारीनं देशाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा मानानं फडकावला होता.
सचिननं गोळाफेक या क्रीडाप्रकारात भारतीय पथकाला आणखी एक रौप्य पदक मिळवून दिलं होतं.
पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सचिननं F46 प्रकारात हे यश मिळवलं. सचिननं 16.32 मीटरवर गोळाफेक करत दुसरं स्थान मिळवलं. सचिन या कॅटेगरीत एवढ्या लांब थ्रो करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला.
सचिन मूळचा सांगलीतल्या आटपाडीमधल्या करगणी गावचा रहिवासी आहे. पुण्यात आझम कँपस इथे तो सराव करतो. 2015 ला सुरुवात केलेल्या सचिननं पॅरालिंपिक पदक मिळवत क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धेत यश मिळवलं.
सचिननं भारताचा पॅरालिंपिकमधील गोळाफेकीच्या पदकाचा 40 वर्षांचा दुष्काळ संपवला. 1984 नंतर पॅरालिंपिकमध्ये गोळाफेकीत भारताला पदक मिळाले नव्हते. सचिनने ते मिळवून दिलं.
या यशानंतर बीबीसी मराठीनं सचिन खिलारीशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी सचिननं त्याचा संघर्ष आणि त्या संघर्षातून प्रेरणा घेत पॅरालिंपिक स्पर्धेतील पदकापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
आई जाण्याचा आघात...
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या तालुक्यातील करगणी नावाच्या लहानशा गावात सर्जेराव खिलारी यांच्या कुटुंबात 23 ऑक्टोबर 1989 रोजी सचिनचा जन्म झाला.
दुष्काळी तालुका आणि शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन. त्यामुळं प्रचंड कष्ट हे सुरुवातीपासून सचिननं पाहिले. वडिलांचं कष्ट पाहून सचिनलाही तसे कष्ट करण्याची सवय लागली आणि त्याचा आताही फायदा होत असल्याचं सचिननं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
पण सचिनचं बालपण हे भावनिकदृष्ट्या अतिशय खडतर होतं.
"मी पाच वर्षाचा असताना आई गेली. काकू आणि वहिनी यांनी माझा सांभाळ केला. आईशिवाय जगण्याचे दिवस वाट्याला येणं, हा मोठा आघात लहानपणी झाला. आई जाण्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं? अगदी कळायला लागण्यापूर्वी हे दुःख नशिबी आलं," असं सचिन म्हणाला.
पण आई गेल्यानंतर सचिननं वडिलांचा संघर्ष, त्यांचे कष्ट जवळून पाहिले. दुष्काळी भाग असूनही वडिलांनी शेतीत अनेक प्रयोग केले. त्यांनी अनेक वर्षे खर्ची घालत माळरानाचा कायापालट करत मळा बनवला. त्यांच्या सततच्या कष्टानं मला प्रचंड प्रेरणा दिली, असं सचिन सांगतो.
एका दुष्काळी तालुक्यातील या शेतकऱ्यानं डाळींब पिकाचं विक्रमी उत्पन्न घेत कृषिभूषण पुरस्कार मिळवला होता, असंही सचिननं सांगितलं.
सायकवरून पडण्याचे निमित्त...
सचिनला आलेल्या अपंगत्वाची संपूर्ण कहाणी अत्यंत दुर्दैवी म्हणावी अशीच आहे. त्याचं कारण म्हणजे लहानपणी सायकलवरून पडल्यानं झालेल्या एका छोट्या अपघाताचा हा दुष्परिणाम होता.
सचिन अवघ्या 10 वर्षांचा असताना ही घटना घडली होती. सचिन त्यावेळी सायकल शिकत होता. सायकल शिकत असतानात तो खाली पडला आणि त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला मार लागला होता.
सचिनला हाताला छोटीशी जखम झाली होती. पण नंतर त्याचं गँगरीनमध्ये रुपांतर झालं. डॉक्टरांनी तेव्हाच उपचार शक्य नसून हात काढावा लागेल,असा सल्ला दिला होता.
पण सिचनच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. विविध ठिकाणी उपचार घेऊन हात पूर्ववत व्हावा यासाठी झटले. या उपचारांनी सचिनचा हात वाचला पण त्याच्या हालचाली दुसऱ्या हातासारख्या किंवा पूर्णपणे होत नव्हत्या.
सचिनच्या हातावर अनेक शस्त्रक्रियांद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण गँगरीन आणि नस दुखावली गेलेली होती, त्यामुळं त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.
शाळेतील सरांनी दाखवला मार्ग
शारीरिक अपंगत्व आलं असलं तरी सचिनला वडिलांकडून मिळालेला कष्टाचा वारसा त्याला प्रेरणा देत होता. त्यामुळं सचिन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत होता.
सचिनच्या शाळेत उत्तम घेरडे नावाचे शिक्षक होते. शाळेत अभ्यासाबरोबरच शारीरिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून ते मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दयायचे.
"घेरडे सर विद्यार्थ्यांना रांगेत उभं करायचे. मुलांच्या इच्छेनुसार त्यांना थाळीफेक किंवा गोळाफेक जे आवडेल त्याचा सराव घ्यायचे. तिथूनच घेरडे सरांनी माझ्यातील खेळाडू ओळखला आणि मला घडवण्याची सुरुवात केली. तिथून पुढे मला आत्मविश्वास येत गेला," असं सचिन म्हणाला.
त्यानंतर अकरावीला बारामतीला विद्या प्रतिष्ठानला लक्ष्मण मेटकरी यांनी सचिनला मार्गदर्शन केलं. तिथूनच त्याला राज्यपातळीवर जाण्याची संधी मिळाली. नंतर बालेवाडीतील स्पर्धेत राज्यपातळीवर यश मिळवत पदक मिळवलं, त्यानंतर मोठा आत्मविश्वास निर्माण झाला, असं सचिन म्हणाला.
देवेंद्र झाझरियाची प्रेरणा
सचिन शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आल्यानंतर आझम कॅम्पसच्या पी. ए. इनामदार यांनी त्याला खूप मदत केली. याठिकाणी अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरु झाला.
कॅम्पसमध्ये सराव करताना पावसाचा अडथळा येत होता. त्यामुळं त्याच्यासाठी खास छत तयार करून देण्यात आलं होतं. गुलशन शेख यांनीही सचिनला खूप मदत केली. हे सुरू असताना सचिनला देवेंद्र झाझरियाकडून प्रेरणा मिळाली.
"देवेंद्र झाझरियांना वयाच्या आठव्या वर्षी वीजेचा शॉक लागून अपंगत्व आलं होतं. पण त्यांनी त्यावर मात करत पॅरालिंपिक भालाफेकमध्ये यश मिळवलं होतं. त्यांच्याबद्दल वाचून माझ्याही मनात एक जिद्द निर्माण झाली. आपणही हे करू शकतो असं मला वाटलं, असं सचिननं सांगितलं.
त्यानंतर सचिननं मागे वळून पाहिलं नाही. अत्यंत कठोर परिश्रम घेत सचिननं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ठसा उमटवला आणि पॅरालिंपिकपर्यंत मजल मारत तिथंही यश मिळवलं.
हे सुरू असताना सचिननं अभ्यासातही सातत्य ठेवलं. त्यानं मॅकेनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. अनेक संस्थांमध्ये तो अध्यापनाचं काम करतो. तसंच एमपीएसची आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तो मार्गदर्शन करतो.
सलग दोन वर्षे जागतिक स्पर्धेत सुवर्ण
2015 मध्ये सचिननं खेळायला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये पहिल्यांदा जयपूरमध्ये पॅरा-नॅशनल गेम्समध्ये तो सहभागी झाला. तिथं त्यानं सुवर्ण पदक मिळवलं. नंतर प्रशिक्षक सत्यनारायण यांना भेटल्यानंतर त्यांनी त्याला मार्गदर्शन केले आणि पूर्णवेळ क्रीडा क्षेत्रात जाण्याचा निर्णय सचिननं घेतला.
2017 मध्ये जयपूर नॅशनलमध्ये 58.47 मीटर फेक करून पहिले सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 16.21 मीटरच्या नवीन आशियाई विक्रमासह त्याने पहिले जागतिक पॅरा विजेतेपद जिंकले. यानंतर त्याने हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये 16.03 मीटर फेक करून विजेतेपद पटकावले.
34 वर्षीय सचिनने याआधी पॅरा ॲथलेटिक्सच्या जागतिक स्पर्धेत 2023 आणि 2024 अशी दोनदा सुवर्णपदकं मिळवली आहेत. तर 2023 मध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही त्यानं सुवर्णपदक मिळवलं होतं.
सांगलीतील सचिनचं मूळ असलेल्या आटपाडी भागाला माणदेश असंही म्हणतात. मराठी साहित्यात 'सतत दुष्काळाशी संघर्ष करून झगडत राहणारी माणसं' असं माणदेशातील लोकांचं वर्णन केलं आहे.
सचिन खिलारीच्या प्रवासाकडे पाहता, हे वर्णन किती चपखल आहे, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)