निमिषा प्रिया : येमेनमधील तुरुंगात जाऊन भेट घेतल्यानंतर तिच्या आईनं काय सांगितलं?

- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
निमिषा प्रिया येमेनमधल्या तुरुंगात आहेत, हे वाक्य उचारतानाही निमिषा यांच्या आईंचे डोळे पाणावतात आणि हुंदका दाटून येतं. प्रेमा कुमारी असं निमिषा यांच्या आईचं नाव आहे.
प्रेमा कुमारी यांनी येमेनमधील तुरुंगात जाऊन मुलीची म्हणजे निमिषा प्रिया यांची भेट घेतली. या भेटीत निमिषा यांनी आईच्या तब्येतीची चौकशी केली आणि काळजीही व्यक्त केली.
गेल्या काही दिवसात भारतात निमिषा प्रिया हे नाव सर्वत्र पोहोचलं आहे.
मूळची केरळमधील असलेल्या निमिषा प्रिया सध्या येमेनमधील तुरुंगात आहेत आणि एका हत्येच्या आरोपात त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
2017 मध्ये निमिषा प्रिया यांच्यावर तलाल अब्दो महदी या एका येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे.
निमिषा यांच्या आई प्रेमा कुमारी केरळमध्ये मोलकरीण म्हणून काम करतात.
मागच्या आठ महिन्यांपासून त्या येमेनची राजधानी सना येथे राहत आहेत. सना शहरावर सध्या येमेनमधल्या हूती या बंडखोर गटाचं नियंत्रण आहे.
प्रेमा कुमारी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, त्या येमेनला गेल्यापासून फक्त दोनवेळा निमिषा प्रिया यांना भेटल्या आहेत.


निमिषा यांच्या आईने आणखी काय सांगितलं?
प्रेमा कुमारी जेव्हा मुलीला म्हणजे निमिषा प्रिया यांना भेटल्या, तेव्हा निमिषा यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीची विचारपूस केली. तसंच, प्रेमा कुमारी यांना काळजी घेण्यासही सांगितलं.
प्रेमा कुमारी म्हणाल्या की, "नेमकं काय घडलं होतं हे निमिषाने मला सांगितलं. ती अशक्त झाली असल्याचं तिने मला सांगितलं. निमिषाने मला संयम ठेवायला सांगितला आणि म्हणाली की, देव तिचं रक्षण करेल आणि तू निराश होऊ नकोस."
एप्रिल 2024 मध्ये स्वतःच्या मुलीवर कोसळलेल्या संकटाबाबत बोलताना प्रेमा कुमारी यांनी सांगितलं होतं की, "मी येमेनला जाऊन त्यांच्याकडे दयेची याचना करेन. मी त्यांची माफी मागेन, तिच्याऐवजी माझा जीव घ्या, अशी विनंती त्यांना करेन. तिला एक लहान मुलगी आहे आणि त्या मुलीला तिच्या आईची गरज आहे."
प्रेमा कुमारी यांनी सांगितलं की, त्या दुसऱ्यांदा निमिषा यांना भेटायला गेल्या त्यावेळी त्यांच्यासोबत 'सिस्टर्स ऑफ द पूअर्स' या संस्थेच्या दोन महिला सोबत आल्या होत्या. ही संस्था मदर तेरेसा यांची आहे. या भेटीत त्यांनी निमिषा यांच्या सुटकेसाठी प्रार्थनाही केली होती.

येमेनमध्ये निमिषा यांची सुटका व्हावी, यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी सॅम्युएल जेरोम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, प्रेमा कुमारी आणि निमिषा यांची पहिली भेट झाली, तेव्हा त्या दोघीही त्यांत भावुक झाल्या होत्या.
सॅम्युएल जेरोम म्हणाले की, "निमिषा तुरुंगात नर्स म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे मोबाईल आहे आणि तुरुंगात त्यांना चांगली वागणूक दिली जात आहे."
ते पुढे म्हणाले, "निमिषा यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीपासून प्रेमा कुमारी शांतच राहतात. त्या मला काहीही सांगत नाहीत."
प्रेमा कुमारी येमेनमध्ये सॅम्युएल यांच्याच घरी राहतात. सॅम्युएल त्यांना 'अम्मा' (आई) म्हणून हाक मारतात. सॅम्युअल जेरोम हे येमेनमधील विमानचालन सल्लागार आहेत. तसेच ते समाजसेवा देखील करतात. त्यांनीच निमिषा प्रिया यांचं प्रकरण भारतासमोर पहिल्यांदा मांडलं होतं.
निमिषा प्रिया कोण आहेत?
34 वर्षीय निमिषा प्रिया यांना 2017 मध्ये येमेनचे नागरिक असलेल्या तलाल अब्दो महदी यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तलाल अब्दो महदी हे त्यांचे व्यावसायिक भागीदार देखील होते.
निमिषा यांच्यावर महदी यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेल्या औषधाचा ओव्हरडोस दिल्याचा आणि महदी यांच्या शरीराचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकल्याचा आरोप आहे.
बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांच्या डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, प्रशिक्षित नर्स असलेल्या निमिषा प्रिया 2008 मध्ये केरळहून येमेनला गेल्या होत्या. येमेनची राजधानी असलेल्या सनामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना काम मिळालं होतं.
सध्या निमिषा येमेनची राजधानी सना मध्ये असलेल्या केंद्रीय कारागृहात आहेत. येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद मुहम्मद अल-अलीमी यांनी 30 डिसेंबर रोजी निमिषा प्रिया यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजुरी दिली.

या निर्णयानंतर लगेचच निमिषा प्रिया यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी 'दिया' किंवा ब्लड मनी गोळा करण्यास सुरुवात केली. येमेनमध्ये शरिया कायदा लागू आहे. त्यानुसार पीडित कुटुंबाला त्यांच्याकडून माफी मागण्यासाठी 'ब्लड मनी'ची रक्कम दिली जाते.
येमेनच्या कायद्यानुसार निमिषाचे कुटुंब पीडितेच्या कुटुंबाशी थेट संपर्क साधू शकत नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांना मध्यस्थ नियुक्त करावे लागतील. भारत सरकारने पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी वकिलांची व्यवस्था केली आहे.
सेव्ह निमिषा इंटरनॅशनल ॲक्शन कमिटी कौन्सिलने पीडित कुटुंबाच्या आणि त्यांच्या जमातीच्या सदस्यांना त्यांच्या प्रवास खर्चासाठी दोन टप्प्यांमध्ये 20 हजार डॉलर (19 लाख रुपये) पाठवले आहेत. शेवटचा हप्ता गेल्या आठवड्यातच पाठवला होता.
तोडगा निघायला उशीर का होतोय?
निमिषा प्रिया यांच्या प्रकरणात तोडगा न निघण्याची दोन मुख्य कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली जाणारी रक्कम घेऊन जाणाऱ्या पथकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून जावं लागतं आणि मग शेवटी ती रक्कम कुटुंबीयांपर्यंत पोहोचते.
या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे ही रक्कम येमेनची राजधानी सना येथे पोहोचते. मात्र, सध्या या शहरावर येमेनमधल्या हूती या बंडखोर गटाचं नियंत्रण आहे. त्यानंतर ही रक्कम अल बयादा प्रांतातील सुवादिया येथे घेऊन जावी लागते, इथेच तलाल अब्दो महदी यांची हत्या झाली होती. शेवटी ही मदत घेऊन जाणाऱ्या पथकाला धमार प्रांतातील महदी कुटुंब ज्या शहरात राहतं तिथे जावं लागतं.
सॅम्युएल जेरोम म्हणतात की, "वाटाघाटीसाठी नियुक्त केलेल्या लोकांना या तीन ठिकाणी जाऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबांची भेट घ्यावी लागते. या सगळ्या कुटुंबीयांची या शहरांमध्ये राहण्याखाण्याची सोया करावी लागते. अरब देशांमध्ये अशी सोय करणं अवघड आहे कारण यासाठी फक्त एक किंवा दोन व्यक्ती येत नाहीत, तर मृत व्यक्तींच्या कुटुंबातील 15 ते 20 लोकांची सोय करावी लागते. त्यांना मेजवानी द्यावी लागते आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात होते."
सॅम्युएल यां वाटतं की ब्लड मनीचा दुसरा टप्पा ( 20 हजार डॉलर) यायला उशीर झाल्यामुळे देखील या वाटाघाटींना विलंब झाला.
ते म्हणाले, "इथे चर्चा पुन्हा एकदा सुरु होण्याचा मुद्दा नाहीये. फाशीला संमती मिळविण्यासाठी, सरकारी वकिलांच्या कार्यालयाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बोलावलं जातं. त्यानंतर हे कुटुंब त्यांना फाशीची संमती देतं. त्यामुळे या टप्प्यावर मृताच्या कुटुंबियांना फाशीला संमती न देण्यासाठी तयार करणं हे आव्हान असतं. त्यांनी फाशीला संमती नाकारली की मग त्यांना निमिषा यांना माफी देण्यासाठी मंजूर करावं लागतं. एकूणच काय तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत."

सॅम्युएल जेरोम यांनी हेही सांगितलं की, येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी फाशीची परवानगी दिल्यानंतर एक महिन्याची मुदत देण्याची तरतूद येमेनमध्ये नाही.
ते म्हणाले की, "जर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी फाशीला संमती दिली तर आरोपीला फाशी कधी दिली जाईल, याबाबत कुणीही काही सांगू शकत नाही. कुटुंबीयांच्या संमतीनंतर एका आठवड्यात, दोन आठवड्यात किंवा तात्काळ देखील फाशी दिली जाऊ शकते. जर मृताच्या कुटुंबीयांनी निमिषा यांना माफ केलं तर फाशी रद्द होईल. त्यामुळे आता आमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे."
सॅम्युएल जेरोम यांना महदी यांचे कुटुंबीय फाशीला तयार होतील असं वाटत नाही. कारण याआधी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी असे कोणतेही संकेत दिलेले नसल्याचं ते सांगतात.
एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या रकमेला ब्लड मनी म्हटलं जातं. ब्लड मनी हा एकप्रकारचा माफीनामा आहे. सामान्यतः आरोपीला माफी मिळाल्यानंतर ब्लड मनीची चर्चा सुरु होत असते.
मागच्या काही दिवसांपासून भारतीय अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबासोबत पुन्हा एकदा नव्याने चर्चेला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











