उपराष्ट्रपती पदासाठी बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उमेदवार, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

विरोधकांनी उपराष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याने ही लढत आता आणखी रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या हाकेसह विरोधकांनी ही निवडणूक वैचारिक लढाई असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यापूर्वीच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं होतं. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि याआधी ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्षही होते.

जगदीप धनखड यांनी मागील महिन्यात आरोग्याचं कारण देत अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर आता 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याचा 21 ऑगस्ट हा अखेरचा दिवस आहे.

पत्रकार परिषदेत खरगे म्हणाले की, "सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एकच सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विरोधी पक्ष एकजुटीने लढायला तयार आहेत."

"बी. सुदर्शन रेड्डी हे भारतातील काही पुरोगामी न्यायमूर्तींपैकी एक आहेत," असंही ते यावेळी म्हणाले.

माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, "सर्व विरोधी पक्षांनी मिळून उपराष्ट्रपती पदासाठी एकच उमेदवार निवडला आहे. मला आनंद आहे की, सर्व पक्ष एकजुटीने तयार झाले, सहमती दर्शवली.

हे लोकशाही आणि संविधानासाठीचं मोठं यश आहे. जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात येतं, तेव्हा आपण सर्वजण मिळून ते वाचवण्यासाठी लढतो. या निवडणुकीत असा उमेदवार उभा करायचा ठरवलं आहे, जो देशासाठी चांगलं काम करेल."

ते म्हणाले, "आपण सगळे जाणतो की, ते नेहमी गरीबांच्या पाठीशी उभे राहिले आणि संविधानाचं रक्षण केलं. ही एक वैचारिक लढाई आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली. म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत."

बी. सुदर्शन रेड्डी हे 21 ऑगस्ट रोजी आपलं नामांकन दाखल करतील, असं खरगे यांनी सांगितलं.

तत्पूर्वी, बुधवारी (20 ऑगस्ट) सर्व विरोधी पक्षाचे खासदार दुपारी एक वाजता संसदेच्या सेंट्रल हॉल येथे एकत्रित येणार आहेत.

"आम आदमी पक्षासह सर्व विरोधी पक्ष एकत्रित आहेत," असं पत्रकार परिषदेदरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन म्हणाले.

द्रमूकचे खासदार तिरुची शिवा म्हणाले, "सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित चर्चा करून बी. सुदर्शन रेड्डी यांचं नाव निश्चित केलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी सर्व बाजू लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे."

काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल म्हणाले, "ही एक वैचारिक लढाई आहे. देशाला अजूनही माहीत नाही की त्यांनी (जगदीप धनखड) उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा का दिला?"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.