शेतकरी लाँग मार्चबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या 9 गोष्टी..

कांद्याला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफीशी संबंधित मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
आपल्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च पायी मोर्चा काढण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे.
मंगळवारी (14 मार्च) रोजी शेतकऱ्यांच्या मोर्चाला नाशिकहून सुरुवात झाली. सध्या हा मोर्चा श
आज मोर्चाचा तिसरा दिवस असून सध्या हा मोर्चा नाशिक-ठाणे सीमेवर शहापूरजवळ असल्याचं वृत्त आहे.
या मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा मोर्चा पाच वर्षांनी पुन्हा एकदा नाशिकवरून मुंबईच्या दिशेने सुरू झाल्याचं दिसून येतं.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या लाँग मार्च संदर्भात या 9 गोष्टींची माहिती आपल्याला असणं महत्त्वाचं आहे.

1. मोर्चा कुठून कुठे जाणार?
शेतकऱ्यांचा हा मोर्चा नाशिकच्या दिंडोरीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मुंबईत विधानभवनासमोर या मोर्चाची सांगता होईल.
दिंडोरी ते नाशिकवरून इगतपुरी, कसारा, शहापूर, वासिंद, वळशिंद, रांजनोळी, माणकोली, कळवा, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, सायनमार्गे हा मोर्चा मुंबईत दाखल होईल.
हे अंतर सुमारे 210 किलोमीटर इतकं आहे.
2. मोर्चाचं आयोजन कुणाकडून?
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा हे पक्ष आणि संघटना, तर माजी आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे आणि डॉ. डी. एल. कराड हे नेते या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत.
त्याशिवाय, विविध राजकीय पक्ष आणि राज्यभरातील शेतकरी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच मोर्चा मार्गावरील गावांमधूनही लाँग मार्चला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

3. लाँग मार्च किती दिवस चालणार?
या मोर्चाची सुरुवात नाशिकच्या दिंडोरीमधून रविवारी (12 मार्च) दुपारी दोन वाजता झाली.
सुरुवातीला हा मोर्चा 23 मार्चपर्यंत विधानभवनासमोर पोहोचवण्याचं नियोजन पूर्वी करण्यात आलं होतं.
मात्र, नंतर 20 मार्चपर्यंत मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेवर धडकण्याचं नियोजन आयोजकांनी केलं आहे.

4. मोर्चा नाशिकमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न अपयशी
मोर्चा नाशिकमध्येच थांबविण्याच्या दृष्टीने गावित यांच्याशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रयत्न केले.
परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय घेतल्याशिवाय मोर्चा थांबणार नसल्याचा निर्धार गावित यांनी व्यक्त केला. त्यामुळे मोर्चा नाशिकमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रश्न अयशस्वी ठरल्याचं चित्र आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि किसान सभेचे शिष्टमंडळ यांच्यात तब्बल 4 तास झालेली बैठक 'लाँग मार्च'ला थांबवू शकली नाहीये. त्यामुळे मोर्चा मुंबईत धडकणार, हे निश्चित झाले आहे.
मार्च नाशिकमध्येच थांबवावा असे शासनाचे प्रयत्न होते. त्यासाठी सोमवारी (13 मार्च) पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला होता.
पण जोपर्यत मागण्या मान्य होत नाही, किंवा यशस्वी तोडगा निघत नाही, तोपर्यंत हा मार्च चालणार आहे, त्यामुळे दुसर्यांदा निघालेल्या या मार्च विषयी उत्सुकता आहे.

5. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
नाशिकहून मुंबईला निघालेल्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत -
- कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधार मात्र 2 हजार रुपये निश्चित करून लाल कांद्याला 500 ते 600 रूपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी आहे.
- जमीन कसणाऱ्यांच्या कब्जात असलेली 4 हेक्टरपर्यंतची वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून 7/12 वर नाव लावावे, ही सर्व जमीन कसण्यालायक आहे, असा शेरा मारावा.
- वन जमिनींचे अपात्र दावे मंजूर करावे.
- देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत, ती घरे नियमित करावीत.
- शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज दिवसा सलग 12 तास उपलब्ध करून द्यावी, शेतकन्यांची थकीत वीज बिले माफ करावीत.
- शेतकऱ्यांची शेती विषयक संपूर्ण कर्जमाफ करून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा.
- अवकाळी पावसाने आणि वर्षभर सुरु असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एनडीआरएफमधून तात्काळ भरपाई द्या. पीक विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडा.
- बाळ हिरडा पिकाला प्रतिकिलो किमान 250 रुपये हमी भाव देऊन हिरड्याची सरकारी खरेदी योजना सुरु ठेवा. 2020 च्या निसर्ग चक्रीवादळी पावसात हिरडा पिकाच्या नुकसानीच्या झालेल्या पंचानाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना देय असलेली भरपाई तत्काळ दया.
- दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर आणि वजन काट्यांची नियमित तपासणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारा. मिल्कोमिटर निरीक्षकांची नियुक्ती करा. दुधाला एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. गायीच्या दुधाला किमान 47 रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान 67 रुपये भाव द्या.
- सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवा.
- महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केरळच्या धर्तीवर मोबदला दया. योग्य पुनर्वसन करा. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करा.

6. वयोवृद्धांचा लक्षणीय सहभाग
नाशिक ते मुंबई शेतकरी लाँग मार्चमध्ये वयोवृद्धांचता लक्षणीय सहभाग दिसून येतो. उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत.
सदर मोर्चामध्ये 10 हजार जणांचा सहभाग असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार, ही संख्या 6 हजार इतकी असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.
7. लाँग मार्चच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
शेतकऱ्यांचा मोर्चा थांबवण्याच्या दृष्टीने पालकमंत्री दादा भुसे आणि शिष्टमंडळात झालेल्या चर्चेत 7 विभागाचे मंत्री व सचिव, मुख्यमंत्री अशी बैठक ठरली आहे.
ही बैठक आज (गुरुवार, 16 मार्च) दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, मोर्चा 2 दिवसासाठी स्थगित करावा ही मागणी भुसे यांनी केली होती. पण तोडगा निघेपर्यंत लाँग मार्च पुढे चालत राहील असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शेतकरी मोर्चाबाबत म्हणाले की, "या संदर्भात बैठक नियोजित केली आहे. या बैठकीला सर्व संबंधित अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीला शेतकरी मोर्चाचे शिष्टमंडळ देखील असणार असेल. या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मुंबईत यावे लागणार नाही."
मुख्यमंत्र्यांच्यासोबतच्या बैठकीसाठी किसान सभेच्या 12 जणांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीस दाखल झालं आहे. यामध्ये माजी आमदार जे. पी. गावित, इरफान शेख, इंद्रजित गावित, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले, उदय नारकर, उमेश देशमुख, मोहन जाधव, अर्जुन आडे, किरण गहला, रमेश चौधरी आणि मंजुळा बंगाळ यांचा समावेश आहे.

8. शेतकरी लाँग मार्चवरून विरोधकांची टीका
शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. बजेटमध्ये मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर शेतकरी आंदोलन झालं नसतं, असं जयंत पाटील म्हणाले.
तसेच, या मोर्चामागे कुणी शक्ती असल्याची शंका असेल तर हुडकून काढा असं आव्हान जयंत पाटलांनी दिलं.
2005 नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. तसेच समाज कल्याण विभागातील कर्मचान्यांना वेतन श्रेणी लागु करा, अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मंजुर करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करून त्यांना शासकीय वेतन श्रेणी लागू करावी, या मागण्यासांठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

9. शेतकरी लाँग मार्च 2018 ची आठवण
शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई लाँग मार्चची घोषणा केल्यानंतर सर्वांना स्वाभाविकपणे 2018 च्या शेतकरी लाँग मार्चची आठवण आली. त्यावेळचाही मोर्चा मार्च महिन्यातच नाशिकवरून मुंबईला निघाला होता. या मोर्चात त्यावेळी सुमारे 30 हजार शेतकरी सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं होतं.
त्यावेळी रक्ताळलेल्या पायांनी मोर्चात सहभागी झालेल्या शेकूबाई वागले यांची बीबीसी मराठीने केलेली बातमी प्रचंड व्हायरल झाली होती.
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा, बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रुपये भरपाई द्यावी, वीज बीलमाफी मिळावी, ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा, पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावं, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशा मागण्या त्यावेळी शेतकऱ्यांनी केल्या होत्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








