अवकाळी पाऊस : पीक विम्याचा दावा करताना 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

अवकाळी पाऊस
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालतोय.

या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्येही गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.

6 मार्चला साक्रीमध्ये रस्ते, शेतं गारांनी भरून गेल्याचं दृश्यं दिसलं. अनेक शेतकरी आपल्या शेतातल्या गारा गोळा करून बाहेर फेकताना दिसले.

विदर्भात वर्ध्यातही अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला. इथल्या कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांची संत्री झाडावरून गळून पडली.

अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती आल्यास पीक विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. पण, पीक विमा भरताना आणि नुकसानीच्या भरपाईचा दावा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी

1. पावसात खंड पडल्यास विमा मिळणार नाही

पावसात काही दिवस खंड पडल्यास आणि त्यामुळे पिकांची वाढ बाधित झाल्यास, पीके सुकल्यास तर पीक विमा मिळेल असं शेतकऱ्यांना वाटतं.

अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे
फोटो कॅप्शन, अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे

त्यामुळे या नुकसानीविषयी शेतकरी कंपनीला माहिती देतात. पण, अशाप्रकारच्या नुकसानीसाठी पीक विम्याची भरपाई मिळत नाही.

2. कीड व रोगांमुळे नुकसान झाल्यास विमा मिळणार नाही

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोगलगायींनी सोयाबीन पिकाचं नुकसान झालं.

याशिवाय पिकांचं कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याचं नुकसान होत असतं. पण, या बाबी नैसर्गिक आपत्तीत येत नाही.

त्यामुळे या बाबींविषयी शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली तरी त्याची भरपाई मिळत नाही.

अविवृष्टीमुळे कपाशीची बोंडं सडली आहेत.

फोटो स्रोत, Sandip autade

फोटो कॅप्शन, अविवृष्टीमुळे कपाशीची बोंडं सडली आहेत.

3. विमा भरण्याची तारीख सगळ्यात महत्त्वाची

शेतकरी एखाद्या पिकाचा विमा ज्या तारखेस उतरवतात ती तारीख सगळ्यात महत्त्वाची असते.

पीक विमा ज्या दिवशी भरला जातो, त्या दिवसापासून त्याचं कव्हरेज सुरू होतं.

समजा तुम्ही 15 जुलै रोजी पीक विमा भरला आणि तुमच्या भागात 13 जुलैला पाऊस झाला, तर अशावेळी हे नुकसान पीक विम्यासाठी कव्हर केलं जात नाही.

म्हणजे 15 जुलैनंतर झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठीच तुम्ही अर्ज करू शकता.

4. नुकसान झाल्यानंतर 72 तासांची मुदत

पूर, ढगफुटी, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत त्याच्या माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.

ही माहिती देण्यासाठी चार पर्याय उपलब्ध असतात.

  • केंद्र सरकारच्या पीक विम्याच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर नुकसानीची माहिती नोंदवता येते.
  • समजा शेतकऱ्याकडे मोबाईल नसेल तर विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ही माहिती नोंदवता येते.
  • तेही शक्य नसेल तर विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जाऊन तिथं सूचना फॉर्म भरता येतो.
  • तेही शक्य नसल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ज्या बँकेतून विम्याची रक्कम भरलीय, त्या बँकेत ही माहिती देता येते.
पावसातली पिकं

फोटो स्रोत, Sandip autade

5. पीक विमा मिळणार हे असं ठरतं....

एकदा का शेतकऱ्यानं त्याच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवली की मग नुकसान भरपाईसाठीची प्रक्रिया सुरू होते.

विमा कंपनी, कृषी विभाग यांचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करतात. यात तीन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात.

  • नैसर्गिक आपत्तीमुळे किती क्षेत्र बाधित झालं त्याची टक्केवारी निश्चित केली जाते.
  • त्यामुळे मग त्या शेतकऱ्याच्या उत्पादनात किती घट होईल, हे पाहिलं जातं.
  • आणि मग पीक वाढीची अवस्था काय आहे ते पाहिलं जातं. पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्च बदलत असतो.

ही पाहणी केल्यानंतर मग त्यानुसार नुकसान भरपाईचा दावा निश्चित केला जातो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)