You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
घोड्यावरुन वरात काढली म्हणून दलित नवरदेवाला मारहाण
लग्नसमारंभादरम्यान घोड्यावर स्वार झाल्याने दलित वराला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरात मधील गांधीनगर जिल्ह्यातील चडासना गावात घडलीय. यावेळी हल्लेखोरांनी वराला जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही त्याने या तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हल्लेखोरांविरुद्ध ॲट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
नवरदेवाची आई हर्षिदा चावडा म्हणाल्या, "हत्ती, घोड्यांवर बसण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, जे माझ्या मुलासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये."
संबंधित नवरदेव लग्नानिमित्त घोड्यावर स्वार झाला होता. तेथून आपल्या नातवाईकांसह तो वधूच्या गावातील घराकडे जात होता.
त्यावेळी चार जणांनी येऊन नवरदेवाचा घोडा थांबवला आणि त्याला खाली उतरवून मारहाण केली.
यावेळी हल्लेखोरांनी नवरदेवाला जातिवाचक शिवीगाळ करत केवळ आमच्या समुदायातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात असं म्हणत नवरदेवाला मारहाण केली.
या घटनेनंतर वधूचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नवरदेवाला घोड्याऐवजी मोटारीतून लग्नस्थळी नेले. आणि इथेच लग्न पार पडलं.
दलित समाजातील लोकांच्या सांगण्यानुसार, हा नवरा मुलगा कलोल शहरातील आहे. गावातील काही तरुणांनी या नवरदेवाच्या घोड्यावर बसण्याला आक्षेप घेतला आणि ही घटना घडली.
बीबीसीने या गावातील ठाकूर समाजातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण गावातील बहुतेक ज्येष्ठांना पोलिसांनी अटक केल्याचं तेथील रहिवासी सांगतात.
वधूचे काका देवेंद्र सोलंकी या घटनेबाबत सांगतात की, "नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय कलाल शहरातून चडासना गावात आले. नवरदेव घोड्यावर बसला तोच गावातील ठाकूर समाजाचे काही लोक तिथे आले. त्यांनी घोड्यावर बसू नका असं सांगत नवरदेवाला मारहाण केली. डीजे सुद्धा बंद करायला लावला."
"आम्ही सर्वजण घरी होतो. या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी गेलो पण तिथे कोणीच नव्हतं. आम्ही नवरदेवाला घरी आणलं आणि लग्नसमारंभ उरकला. नंतर या घटनेविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही पोलिसात गेलो.
नवरदेव विकास चावडा यांनी सांगितलं की, "वरात निघत असताना पिवळा टी शर्ट घातलेला एक इसम माझ्या दिशेने धावला आणि त्याने मला कानाखाली मारली. आणि माझ्या जातीबद्दल, समाजाबद्दल अपशब्द काढून अश्लील शेरेबाजी केली."
आम्हाला आधीच माहिती असती तर आम्ही पोलीस संरक्षण घेतलं असतं. पण या घटनेमुळे लग्नाच्या आनंदाच्या क्षणावर विरजण पडलं.
कलोल विभागाचे उपायुक्त पी. डी. मन्वर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "संबंधित घटनेत चार आरोपींना ताब्यात घेतलं असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता समिती गठीत करण्यात आली आहे."
याआधी देखील गुजरातमध्ये असे प्रकार घडले आहेत. ज्या ठिकाणी दलित युवकांना विविध कारणांसाठी मारहाण करण्यात आली आहे. कधी दलित युवकांनी मिशी ठेवली म्हणून तर कधी युवकाने आपला थकलेला पगार मागितला म्हणून युवकाला मारहाण करण्यात आली होती.