You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधी जयंतीच्या काही दिवस आधीच पुतळ्याची विटंबना, काय आहे प्रकरण?
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नायक असलेल्या महात्मा गांधीजींच्या लंडनमधील पुतळ्याची अज्ञात लोकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. या अज्ञात लोकांवर 'तत्काळ कारवाई' करण्याची मागणी भारतानं केली आहे.
लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरमध्ये 1968 साली गांधीजींचा कास्य पुतळा उभारण्यात आला होता.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये महात्मा गांधी कायद्याचे विद्यार्थी होते. त्यांच्या या कालखंडाला आदरांजली देण्यासाठी म्हणून हा पुतळा बांधण्यात आला होता.
"ही फक्त पुतळ्याची विटंबना नाही, तर अहिंसेच्या विचारांवर हिंसक हल्ला आहे," असं भारताच्या उच्चायुक्तालयानं एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही 'लज्जास्पद' कृती असल्याचं भारताच्या उच्चायुक्तालयानं म्हटलं आहे.
या कृत्यामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र यासंदर्भात अद्याप कोणत्याही व्यक्ती किंवा गटाची ओळख पटलेली नाही.
बीबीसीनं या स्थळाला भेट दिली तेव्हा सफाई पथकं पुतळ्याची सफाई करत होती.
नेमकं काय घडलं?
महात्मा गांधींच्या पुतळा ज्या चबुतऱ्यावर आहे त्यावर काळ्या रंगानं 'दहशतवादी' असं लिहिण्यात आलं होतं. त्यासोबत 'गांधी, मोदी आणि हिंदुस्तानी (इंडियन्स)' असंही लिहिलेलं होतं.
भारताच्या उच्चायुक्तालयानं पुतळ्याचे विटंबनाच्या स्थितीतील फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र एक्सवरील अनेक अकाउंट्स आणि भारतीय मीडियानं पुतळ्याची विटंबना दाखवणारे फोटो आधीच दाखवले होते.
मेट्रोपोलिटन पोलीस आणि कॅम्डेन कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी पीटीआय या भारतीय वृत्तसंस्थेला सांगितलं होतं की ते पुतळ्याच्या विटंबनेच्या वृत्तांची चौकशी करत आहेत. मेट्रोपोलिटन पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की ते लवकरच एक निवेदन जारी करतील.
भारताच्या उच्चायुक्तालयानं म्हटलं आहे की त्यांची टीमदेखील घटनास्थळी पोहोचली होती आणि "पुतळ्याला त्याच्या मूळ प्रतिष्ठेत पुन्हा आणण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधत आहे."
यापूर्वीही लंडनमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना
येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची 156 वी जयंती आहे. त्याच्या काही दिवस आधीच ही घटना घडली आहे. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून देखील साजरा केला जातो.
गांधीजींचा हा कास्य पुतळा पोलंडचे शिल्पकार फ्रेडा ब्रिलियंट यांनी 1968 मध्ये घडवला होता. या पुतळ्यात महात्मा गांधी हे शांत अवस्थेत मांडी घालून बसलेले आहेत आणि पुतळ्याच्या चबुतऱ्यावर महात्मा गांधी, 1869-1948 असं कोरलेलं आहे.
महात्मा गांधीजींच्या वाढदिवशी सहसा पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून आणि त्यांची आवडतं भजनं सादर केली जातात.
युकेमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याची ही पहिलीच घटना नाही.
2014 मध्ये लेस्टरमधील गांधीजींच्या एका पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये युकेच्या काही भागांमध्ये गांधीजींचा पुतळा काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या मोहिमा चालवण्यात आल्या आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.