जगभरातील महोत्सवात गाजलेलं हे 'स्थळ' कदाचित तुम्हाला माहिती नसेल? जाणून घ्या

'स्थळ' चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Courtesy: Sthal

    • Author, गीता पांडे,
    • Role, बीबीसी न्यूज

लग्नगाठी स्वर्गातच बांधल्या जातात असं म्हणतात. पण, आपल्या देशात अनेक लग्नं ही स्थळ पाहून जुळवून आणली जातात. पण, ही लग्न जमवण्याची प्रक्रिया त्या लग्नाळू मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबीयांना कधी कधी नरकासारखीही वाटू शकते.

हेच वास्तव 'स्थळ – अ मॅच' या मराठी चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटानं देश-विदेशात चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकले आहेत. आज 7 मार्चला महिला दिनाच्या एका दिवसापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झालाय.

पितृसत्ताक समाजात शिक्षण आणि करिअरसाठी झटणारी एक तरुणी आणि आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधण्याचा प्रयत्न करणारे गरीब कापूस उत्पादक शेतकरी दौलतराव वांढरे यांच्याभोवती हा चित्रपट फिरतो.

पिकाला चांगली किंमत आणि मुलीसाठी चांगला जोडीदार या शेतकरी बापाला हवा असतो, असं दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर सांगतात.

लग्न जुळवतानाच्या प्रथा, परंपरांबद्दल अनेक चित्रपट आहेत. पण, हा चित्रपट सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो. कारण, लग्नासाठी स्थळ पाहायला येणं आणि पुढे सगळी लग्न जमवण्याची प्रक्रिया यामधून अनेक तरुणींना येणारे अपमानास्पद अनुभव निर्भिडपणे दाखवण्यात आले आहेत.

हा चित्रपट विशेष असण्याचं आणखी एक कारण म्हणजे या चित्रपटातील सगळे कलाकार नवीन आहेत.

चित्रीकरण झालेल्या गावामधून कलाकार निवडण्यात आले आहेत. या चित्रपटात सविताची भूमिका साकारणाऱ्या नंदिनी चिकटेला उत्कृष्ट अभिनयासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत.

अपमास्पद वागणुकीची मालिका

नायिका सविता एका भावी वराला प्रश्न विचारताना या चित्रपटाची सुरुवात होते. तिच्या घरातील महिला मंडळी आणि मैत्रिणींसोबत ती मुलगा बघायला जाते. मुलगा हातात पाण्याचा ट्रे घेऊन येताना ती त्याला बघते. ती त्याला प्रश्न विचारते, तेव्हा तो गोंधळतो. त्यामुळे सगळ्याजणी त्याच्यावर हसतात.

पण हे स्वप्न असतं. सविताला स्वप्नातून जागी होताच 'पोरी पाहायला पाहुणे येत आहे घरी, तयारी कर' असं तिला सांगितलं जातं.

सवितानं बघितलेल्या स्वप्नापेक्षा प्रत्यक्षात सगळ उलट घडत असतं. दोन तासांच्या या चित्रपटात अनेकदा असं दृश्य दाखवलंय ज्यात सविताचा अपमान होताना ठळकपणे जाणवतं.

'स्थळ' चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Courtesy: Sthal

सविताचे वडील आणि तिच्या घरातले पुरुष मंडळी बघायला आलेला मुलगा आणि पाहुण्यांचं स्वागत करतात. त्यांना चहा आणि नाश्ता दिला जातो. थोड्या चर्चा झाल्यानंतर सविताला बोलावतात.

खाली मान घातलेली सविता साडी नेसून पाहुण्यांच्या बैठकीत येते आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या समोर ठेवलेल्या लाकडी स्टूलवर खाली मान घालून बसते.

तुझं नाव, पूर्ण नाव, जन्म, मामकूळ, उंची, शिक्षण, छंद अशा अनेक प्रश्नाचीं सरबत्ती तिच्यावर होते.

मध्येच बैठक थांबवून चर्चा करण्यासाठी काही पुरुष पाहुणे मंडळी घराबाहेर जातात. एकजण म्हणतो, "पोरगी थोडी काळसर वाटली, चेहऱ्याले मेकअप केला होता, पण तिचं ढोपर नाय पायलं का?", दुसरा म्हणतो, 'हाईटमधी मार खाते पोरगी' त्यावर सगळ्यांचं एकमत होतं.

आम्ही काही दिवसांत आमचा निर्णय सांगतो असं म्हणून मुलगा आणि पाहुणे मंडळी जातात.

'स्थळ' चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Courtesy: Sthal

हा सविताला बघायला आलेला चौथा किंवा पाचवा मुलगा असतो. प्रत्येक बैठकीत मुलीला नकार मिळाला. त्यामुळे तिच्या वडिलांनाही निराशा यायला लागली आहे, असं दाखवलं जातं.

पण चित्रपटातलं हे दृश्य वास्वत आहे. आपल्या देशात मुलगी कशी हवी, तिला काय काय यायला हवं अशा सगळ्या अपेक्षांची मुलांकडे एक लांबलचक यादी असते. मॅट्रीमोनियल साईट्स आणि वर्तमानपत्रातील जाहिरातींवर नजर टाकल्यास त्याठिकाणी दिसतं की प्रत्येकाला मुलगी उंची, गोरीपान, दिसायला देखणी मुलगी लग्नासाठी हवी असते.

घरचे मुलाच्या होकारासाठी वाट बघत असताना सविता "मला लग्न करायचं नाही. आधी माझं शिक्षण पूर्ण करून मला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. मला माझं करिअर घडवायचं आहे" असं सांगतेय. पण, मुलीसाठी सगळ्यापेक्षा लग्न महत्वाचं मानणाऱ्या या समाजात तिच्या स्वप्नाला काहीही एक महत्त्वं नसतं.

हुंड्याच्या विषयावर भाष्य

आपल्या समाजात लग्नाला खूप महत्व दिलं जातं. एकदा मुलीचं लग्न झालं की, आपण जबाबदारीतून मोकळे झालो असं आई-वडिलांना वाटतं. पण, आता हे चित्र बदलण्याची गरज आहे, असं नंदिनी चिकटे बीबीसीसोबत बोलताना म्हणाल्या.

पाहुण्यांच्या बैठकीत तिला समोर बसवून तिच्या रंगाबद्दल झालेली चर्चा ही फार अपमानास्पद वाटली. पण, याच बैठकीत नवऱ्या मुलाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असं ती म्हणाली.

मी फक्त अभिनय करते होते. पण, चित्रपट जसा जसा पुढे गेला तसं तसं मी सविताचं जीवन जगले. मला या जगण्याचा, परिस्थितीचा राग येत होता. मला प्रत्येकवेळी अपमान आणि अनादर झाल्यासारखं वाटलं.

हुंड्यासारख्या वाईट प्रथेवर देखील या चित्रपटातून भाष्य करण्यात आलंय. गेल्या 60 वर्षांपासून हुंडा घेणे बेकायदेशीर आहे. पण, अजूनही भारतीय लग्नांमध्ये सर्रास हुंडा दिला आणि घेतला जातो.

'स्थळ' चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Courtesy: Sthal

फोटो कॅप्शन, दिग्दर्शक सोमलकर

यासाठी मुलींचे वडील कर्ज काढतात, शेतजमीन, घर गहाण ठेवतात, प्रसंगी विकतात. पण, मुलीसाठी हुंडा देतात. तरीही मुलगी सुखी राहील याची शाश्वती नसते. कारण, दरवर्षी हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून हजारो मुलीचा बळी जातो.

या चित्रपटातही सविताचे वडील दौलतराव यांची शेती हेच एकमेव उपजिविकेचं साधन आहे. पण, ते विक्रीसाठी काढतात.

अनुभवातून सुचली कथा

दिग्दर्शक सोमलकर म्हणतात, माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला या चित्रपटाची कथा सूचली. मला दोन लहान बहिणी आणि पाच चुलत बहिणी आहेत. त्यांना लग्नासाठी मुलगा बघायला यायचा तेव्हा या सगळ्या प्रक्रियेतून मी गेलोय. पण, लहान असताना या परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता आलं नाही, असं ते म्हणाले.

ते पुढे सांगतात की, "माझ्या चुलत भावासाठी मुलगी बघायला गेलो तेव्हा मला या चित्रपटाची कल्पना सूचली. त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच मुलगी बघायला गेलो होतो.

मुलगी बाहेर आली आणि समोर येऊन स्टूलवर बसली. तिला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मला विचित्र वाटत होतं. बैठकीतून चर्चेसाठी बाहेर पडलो तेव्हा मला तिची उंची आणि रंगावर झालेली चर्चा आक्षेपार्ह वाटत होती."

'स्थळ' चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Courtesy: Sthal

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सोमलकर यांनी बैठकीतून घरी आल्यानंतर त्यांच्या भावी वधूसोबत या विषयावर चर्चा केली होती. तेव्हा या विषयावर काहीतरी करायला हवं असं त्यांनी सोमलकर यांना सूचवलं.

भारतात अजूनही 90 टक्के लग्न कुटुंबीय जुळवून आणतात. त्यावर प्रकाश टाकणारा स्थळ हा एकमेव चित्रपट नाही. गेल्या दोन दशकांत बॉलीवूड आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित झालेले 30 चित्रपट आयएमडीबीवर आहेत.

अलिकडच्या काळात लोकप्रिय झालेला नेटफ्लिक्सवरील शो इंडियन मॅचमेकींग यामधून लग्नासाठी वर शोधण्याच्या प्रथेवर प्रकाश टाकला होता.

पण, लग्नातील विधींना पडद्यावर अत्यंत आकर्षक पद्धतीनं दाखवलं जातं. भारतीय लग्नांबद्दल बोलतो तेव्हा भरपूर मज्जा आणि ग्लॅमरनं भरलेल्या भव्य-दिव्य लग्नाचा विचार डोक्यात येतो.

हम आपके हैं कौन या चित्रपटाचा विचार येतो, असं म्हणत सोमलकर 90 च्या दशकातील भारतीय लग्नाच्या परंपरा साजरे करणाऱ्या बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा उल्लेख करतात.

पुढे ते म्हणतात, नेटफ्लिक्सवरील इंडियन मॅचमेकींग हा शो फक्त सुशिक्षित, श्रीमंत आणि ज्या महिला स्वतः निर्णय घेऊ शकतात अशा एका विशिष्ट वर्गातील लोकांशी निगडीत होता.

पण, इतर भारतीयांसाठी वास्तव वेगळं आहे. अनेकदा पालकांना आपल्या मुलीचं लग्न ठरवताना प्रचंड वाईट अनुभव येतात.

महिलांना लग्न आणि करिअर यापैकी एक निवडण्याचं स्वातंत्र्य खूप कमी आहे. त्यातही त्यांच्याकडे वस्तू म्हणून बघितलं जातंय. अशा ज्या प्रथा आहेत त्याबद्दल विचार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

एक पुस्तक किंवा एक चित्रपट एका रात्रीतून बदल घडवू शकत नाही हे मला माहिती आहे. पण, ही सुरुवात आहे, असाही विश्वास ते व्यक्त करतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.