तुरुंगात प्रेयसीची हवी तेव्हा भेट, पाहिजे तेव्हा अंमली पदार्थ; चार्ल्स शोभराजने कसं केलं तिहारवर 'राज्य'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
अनेक वर्ष तिहार तुरुंगाचे प्रवक्ते आणि कायदा सल्लागार म्हणून काम केलेले सुनील कुमार गुप्ता यांची तिहारशी ओळख पहिल्यांदा 8 मे 1981 रोजी झाली. या तिहार तुरुंगात सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. आपलं नियुक्तीचं पत्र घेऊन ते तिहारचे तुरुंग अधीक्षक बी एल विज यांच्या कार्यालयात पोहचले.
याआधी ते भारतीय रेल्वे खात्यात नोकरी करत होते. पण तिहार तुरुंगात सहायक पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाल्यावर त्यांनी आपल्या रेल्वे विभागातील नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी सुनील कुमार यांचं वय होतं अवघे 24 वर्ष.
7 मे ला रेल्वे विभागानं त्यांना नोकरीतून मुक्त केलं आणि पुढच्याच दिवशी मोठ्या उत्साहाने ते नव्या नोकरीत रुजू व्हायला तिहार तुरुंगात येऊन पोहचले.
सुनील कुमार यांना आपल्या नोकरीचा हा पहिला दिवस अजूनही तितकाच स्पष्ट आठवतो. ते सांगतात, "तुरुंग अधीक्षक बी. एल. विज यांनी माझ्याकडे एकदा नजर फिरवली आणि सरळ म्हणाले की 'इथे सहाय्यक पोलीस अधीक्षकची नोकरी वगैरे काही उपलब्ध नाही. निघून जा.'
त्यांचं हे बोलणं ऐकून मी तर चक्रावलोच होतो. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की 'माझी या पदासाठी निवड झालेली आहे.' त्यांना माझं नियुक्ती पत्र देखील दाखवलं. यावर ते उद्दामपणे म्हणाले की 'रेल्वेतील नोकरी सोडण्याआधी तू मला विचारायला हवं होतं.' त्यांचं हे उत्तर ऐकून मी तर उडालोच. हताश होत मी कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबलो. आता काय करावं? हा प्रश्न माझ्या डोक्यात घोंघावत होता."
सुनील कुमार सांगतात की तुरुंगाच्या आवारात ते निराश होऊन बसलेले असताना त्यांची नजर भरजरी कोट आणि टाय घातलेल्या एका रुबाबदार व्यक्तीवर पडली. ही व्यक्ती कोण आहे, याची सुनील कुमार यांना काही कल्पना नव्हती. पण त्याचं व्यक्तिमत्त्वच इतकं धारदार आणि प्रभावी होतं की त्याला बघितल्यानंतर बसलेले सुनील कुमार आपोआप उठून उभा राहिले.

कोट आणि टाय मधल्या त्या माणसानं इंग्रजीत सुनील कुमारला इकडे तुरूंगात येण्याचं कारण विचारलं. सुनील कुमारने यांनी झालेला सगळा घटनाक्रम त्याला सांगितला. सुनील कुमार यांचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती त्यांना म्हणाला की, "काही चिंता करू नका. मी तुमची मदत करेल." इतकं बोलून तो माणूस सरळ बी एल विज यांच्या कार्यालयात गेला.
साधारणतः तासाभराने ती व्यक्ती बी. एल. विज यांच्या कार्यालयातून बाहेर आली. त्याच्या हातात आता सुनील कुमार हे तिहार तुरुंगाचे नवे सहायक पोलीस अधीक्षक असल्यावर शिक्कामोर्तब करणारं नियुक्ती पत्र होतं. बाहेर येऊन ते नियुक्ती पत्र त्याने सुनील कुमारच्या हातात सोपावलं आणि तो निघून गेला.
या सगळ्या घटनाक्रमाने सुनील कुमारही अचंबित झाले. हा माणूस नेमका कोण आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्याबद्दल विचारलं. उत्तर आलं, "तो चार्ल्स शोभराज आहे. या तुरुंगाचा सर्वेसर्वा. इथला सगळा कारभार हा त्याच्याच मर्जीने चालतो."
अशोका हॉटेलमधील सोन्याच्या दुकानातील चोरी
गुरमुख चार्ल्स शोभराजचा जन्म 6 एप्रिल 1944 रोजी व्हिएतनाममधील सैंगोन इथे झाला. त्यावेळी ती फ्रेंचांची वसाहत होती. त्याचे वडिल भारतीय वंशाचे तर आई व्हिएतनामी वंशाची होती.
चार्ल्स शोभराजचा जन्म एका फ्रेंच वसाहतीत झाल्यानं त्याला फ्रान्सचं नागरिकत्व मिळालं होतं. चार्ल्सच्या वडिलांनी त्याच्या आईसोबत लग्न करायला आणि चार्ल्सचं पालकत्व घ्यायला नकार दिला. त्यामुळे चार्ल्सचा सांभाळ त्याच्या आईने व सावत्र वडिलांनी केला.


'द बिकिनी किलर' या चार्ल्सच्या आयुष्यावरील पुस्तकाचे लेखक डेव्हिड मॉरिसी लिहतात की, या असामान्य परिस्थितीमुळे चार्ल्सचं बालमन हलाखीचं गेलं. आई वडिलांचं प्रेम न मिळाल्याचा मोठा परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला. तरूण वयातच तो छोट्या मोठ्या चोऱ्या करू लागला.
वयात आल्यानंतर त्याची ओळख चँटल कोम्पगोन या फ्रेंच तरुणीशी झाली आणि या दोघांमध्ये प्रेम फुललं. चार्ल्सने तिला लग्नाची मागणी देखील घातली. पण या दोघांचं लग्न ठरलेल्या दिवशीच चोरीची गाडी चालवल्याबद्दल पोलीसांनी त्याला अटक केली. आठ महिन्याचा हा पहिला तुरुंगवास भोगून चार्ल्स बाहेर आला आणि चँटल सोबत त्याचं लग्न झालं.
यानंतर आपल्या पत्नीसह चार्ल्स फ्रान्सबाहेर पडला आणि 1970 साली भारतात पोहचला. इथेही छोट्यामोठ्या चोऱ्या आणि गुन्हे करायला सुरुवात केली. भारतात फिरायला आलेल्या परदेशी पर्यटकांना गंडा घालून लुबाडणे, हा त्याचा मुख्य धंदा होता.
1971 साली भारतात पहिल्यांदा मुंबईमध्ये त्याला अटक झाली. दिल्लीतील अशोका हॉटेलमधील सोन्याच्या दुकानात चोरी केल्याच्या प्रकरणात तो पकडला गेला.
विशेष म्हणजे चार्ल्सनं अशोका हॉटेलमध्ये ही चोरी तेव्हा केली जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसींजर नेमके दिल्लीत अशोका हॉटेलमध्येच मुक्कामाला होते.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीतील या चोरीबद्दल मुंबईमध्ये त्याला अटक करणारे पोलीस अधिकारी मधुकर झेंडे सांगतात की, "अशोका हॉटेलमधील एका कॅबरे डान्सर सोबत मैत्री करून चार्ल्सने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं.
"अशोका हॉटेलमधील सोने जवाहिरांची चोरी करण्यासाठी तिचा वापर चार्ल्स करणार होता. त्यासाठी त्याने तिला लग्नाचं आमिष देखील दिलं. सोन्याच्या दुकानाच्या मालकाला सांगितलं की मी नेपाळचा राजकुमार आहे. तुमच्या दुकानातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिणे हॉटेलमधील माझ्या खोलीत पाहण्यासाठी पाठवा.
"ज्यावेळी दुकानातील कामगार हे सोने - हिरे दाखवण्यासाठी चार्ल्सच्या खोलीत आला तेव्हा चार्ल्सनं त्याला गुंगीचं औषध मिसळलेली कॉफी पाजून बेशुद्ध केलं आणि त्याने आणलेले सोने - हिरे घेऊन हॉटेलमधून तो पसार झाला," झेंडे सांगतात.
बराच वेळ झाला तरी आपला कामगार परत आलेला नाही म्हणून दुकानाचा मालक स्वतः चार्ल्सच्या खोलीवर गेला. पण दार वाजवूनही अर्थात दार कोणी उघडलं नाही. त्यामुळे दुसरी चावी घेऊन त्याने चार्ल्सच्या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्याच्या दुकानातील कामगार खोलीत बेशुद्ध पडलेला होता.
चार्ल्स सोने आणि हिरे घेऊन यशस्वीपणे पळून गेला असला तरी एक घोडचूक त्याच्या हातून घडली. ती म्हणजे आपला पासपोर्ट तो या हॉटेलच्या खोलीतच विसरून गेला होता. या पासपोर्टवर चार्ल्स शोभराज हे नाव लिहिलेलं होतं.
एक कैदी ज्याने तिहारवरच केलं 'राज्य'
अशोका हॉटेलमधील या चोरीत पासपोर्ट विसरण्याच्या या चुकीमुळे 1973 साली चार्ल्स शोभराज पकडला गेला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. पण पोलीस फार काळ त्याला गजाआड ठेवू शकली नाही.
आपली पत्नी चँटलच्या मदतीने त्याने सुटकेचा एक कट रचला. गजाआड असताना आजारी पडायचं नाटक करून तो वेलिंग्टन रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयातून मग पोलिसांना चकवा देत त्याने पलायन केलं.
तुरुंगातून पसार झाल्यानंतर चार्ल्सचं गुन्हेगारीचं चक्र पुन्हा सुरू झालं. 1976 साली भारतात आलेल्या फ्रेंच पर्यटकांना गुंगीचं औषध देऊन त्यांचे पासपोर्ट पुढच्या गुन्ह्यांसाठी हस्तगत करायची योजना त्याने आखली. अशा प्रकारे लोकांचे विशेषतः परदेशी पर्यटकांचे पासपोर्ट चोरून ते इतर गुह्यांसाठी वापरणं ही त्याची पद्धतच होती. पण यावेळेस त्याचा हा प्रयोग फसला.
दिल्लीतील विक्रम हॉटेलमध्ये या फ्रेंच पर्यटकांना गुंगीचं औषध देऊन चार्ल्सनं त्यांचे पासपोर्ट हडप केले खरे पण कदाचित औषधांचा म्हणावा तितका परिणाम झाला नसावा आणि या पर्यटकांना वेळेआधीच शुद्ध आली. त्यांनी प्रतिकार करून गोंधळ घालायला सुरुवात केल्याने चार्ल्सचा प्रयोग फसला. पोलिसांनी चार्ल्सला पुन्हा पकडलं आणि यावेळी त्याची रवानगी दिल्लीतील तिहार तुरुंगात झाली.
त्यावेळी तिहार हा भारतातील सर्वात कुख्यात तुरूंग होता. तिहारमध्ये कैदी म्हणून आलेल्या चार्ल्सने या तुरुंगालाचा आपलं साम्राज्य बनवलं.

फोटो स्रोत, Getty Images
तिहारमधील चार्ल्सचा वावर नेमका कसा होता याचं वर्णन सुनील गुप्ता आपल्या पुस्तकात अतिशय विस्ताराने करतात.
"चार्ल्सला कधीच कोठडीत बंद केलं जायचं नाही. तो बहुतांशी तुरुंगाच्या प्रशासकीय कार्यालयात एखाद्या साहेबासारखा बसलेला असायचा. त्याचे तुरुंगातील किस्से मला अनेकांनी चवीने रंगवून सांगितले होते. पण माझी इथे नियुक्ती होण्यामागेही तोच कारणीभूत होता. माझ्यावरही एखादा त्याची कृपादृष्टी झाली होती, ही गोष्ट कोणाला माहित नव्हती," सुनील कुमार लिहितात.
तुरुंगात असला तरी चार्ल्स कैदी कधीच वाटायचा नाही. तुरुंगाच्या आवारात त्याचा वावर अगदी ऐटीत असायचा. जणू काही तुरूंग अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणेच तो एक साहेब होता. याचं कारण म्हणजे त्याचं संमोहित करणारं व्यक्तीमत्व. लोकांना तो अतिशय गूढ आणि तितकाच आकर्षणही भासायचा. याशिवाय सगळे अधिकारी सुद्धा त्याला दचकून असण्याचं आणखी एक मुख्य कारण होतं.
तुरुंगात त्याला भेटायला त्याच्या प्रेयसीसुद्धा यायच्या. अनेकदा या प्रेयसींना तुरूंगातील पोलिसांसोबत तो एकट्यात शय्यासुखासाठी पाठवायचा. या त्याच्या प्रेयसी पोलीस अधिकाऱ्यांसोबत असताना त्यांचा खासगी संवाद चार्ल्सनं दिलेल्या टेप रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करून ठेवायच्या. मग याच टेप रेकॉर्डची धमकी देत तो अधिकाऱ्यांना आपल्या तालावर नाचवत असे.
त्याच्या मर्जीने तुरूंगात हवं त्याप्रमाणे वावरत असे. भीतीपोटी पोलीस त्याच्यावर कुठलीच रोख लावू शकणार नव्हते. लाच मागण्यापासून पोलीसांच्या इतर सगळ्या गैरकृत्यांचा पुरावा असणारा हा टेप रेकॉर्डर हातात घेऊन तो मोठ्या ऐटीत तुरूंगाची हवा खात होता.
'चार्ल्स साहब'चा तुरूंगातील दबदबा
त्यावेळी तुरूंगातच पोलीस प्रशासक म्हणून कार्यरत असलेले सुनील कुमार चार्ल्सच्या तुरूंगातील मुक्कामाबाबत सांगतात, "शोभराज 10 बाय 12 फूटच्या सेलमध्ये एकटा राहायचा. सी क्लास मधील कैदी जणू काही नोकर असल्याप्रमाणे त्याची सेवा करायचे. राजेशाही थाटात चार्ल्सची मालीश करण्यापासून त्याच्यासाठी जेवण बनवणं आणि त्याचे कपडे धुण्याचं काम इतर कैदी करत असत."
चार्ल्सच्या तुरूंगातील खोलीत एक पुस्तकांचं कपाट होतं. याशिवाय त्याला एक पलंग, टेबल आणि खुर्चीसुद्धा देण्यात आली होती. तुरुंगातील त्याची खोली जणू एक स्टुडिओ अपार्टमेंट प्रमाणे होती. तुरुंगातील इतर कैदी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं याचिका लिहून देण्याचंही काम चार्ल्स करायचा.

फोटो स्रोत, Getty Images
चार्ल्सचं कायद्याचं ज्ञान आणि लिखाणातील कौशल्य इतकं वादातीत होतं की त्यानं लिहिलेल्या या याचिका एका पट्टीच्या वकिलानं लिहिलेल्या याचिकेपेक्षा जास्त प्रभावी ठरायच्या. अनेक कैदी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यानं या याचिका लिहून पूर्ण करून घेतल्या.
यासोबतच कुठल्या कैद्याला पैशांची किंवा अन्य कुठली निकड असेल तर तो ती पूर्ण करायचा. त्याच्या या प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे तो एक प्रमाणे स्वतःला तुरुंगातील कैद्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा नेता समजत असे.
तिहार तुरुंगात चार्ल्सचा दराराच इतका होता की लोक त्याला 'चार्ल्स साहेब' म्हणून हाक मारत असत.
पोलीस तुरुंग अधीक्षकासोबतच हातमिळवणी
1981 सालच्या सप्टेंबर महिन्यात इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली. या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. चार्ल्स शोभराज हा गुन्हेगार तिहार तुरुंगात कैदी नव्हे कसा राजासारखा राहतो, याचा भांडाफोड अतिशय रसरशीत शब्दातून या बातमीत केला गेला.
त्यानंतर काही दिवसांनी पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) या संस्थेनं एक सविस्तर अहवालच प्रसिद्ध केला. चार्ल्स शोभराज आणि त्याचे तुरुंगातील मित्र यांनी कशा प्रकारे तिहारला आपला अड्डा बनवला आहे आणि तिहार तुरुंगात कैदी असलेले हे पट्टीचे गुन्हेगार तुरुंगात बसून आपलं बाहेरील गुन्हेगारीचं जाळं कसं बिनदिक्कत विणत आहेत, याचं इत्यंभूत वर्णन या अहवालात करण्यात आलं होतं.
चार्ल्स शोभराज आणि त्याच्या मित्रानी तिहार तुरुंगाचा कारभार जणू आपल्या हातात घेतला होता. बँकेमध्ये दरोडा टाकल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले सुनील बत्रा, विपीन जग्गी आणि रवी कपूर हे आरोपी तुरूंगात असताना चार्ल्सचे मित्र बनले होते. या सगळ्यांचा तिहार मध्ये इतका दरारा होता की ते सांगतील त्या प्रमाणेच बाकीच्यांना वागावं लागायचं. जर कोणी विरोध केलाच तर त्याला मारहाण करायलाही चार्ल्स व त्यांचे मित्र मागेपुढे पाहत नसत.

फोटो स्रोत, Getty Images
यादरम्यान चार्ल्सचा तुरुंगातील सहकारी राकेश कौशिक यानं चार्ल्सच्याच सांगण्यावरून तुरुंग प्रशासनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान इंटरपोलच्या यादीत असलेल्या एका निष्णात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची देखील चर्चा झाली. हा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द चार्ल्स शोभराजच आहे, हे स्पष्ट होतं.
दिल्ली उच्च न्यायालयानं आपल्या सुनावणीत हे उघड केलं की, "या विदेशी कैद्यानं तुरुंगाचे अधीक्षक आणि उप अधीक्षक यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या खोलीत चार्ल्स बाहेरून आलेल्या लोकांशी भेटत असतो. यात चार्ल्सच्या प्रेयसीचाही समावेश होता. ही खोली तुरुंगातील पोलीस अधिकारी चार्ल्सला समागमासाठी देखील वापरायला देत आहेत. तिहार तुरुंग हा जणू चार्ल्ससाठी एक अड्डा बनला आहे."
न्यायालयानं हे देखील मान्य केलं की पोलीस अधिकारी, कैदी असलेल्या चार्ल्सवर उगंचच इतकी मेहरबानी करणार नाहीत. त्यासाठी चार्ल्सकडून सहाजिकच त्यांनी मोठ्या प्रमाणात लाच देखील घेतली असावी.
चार्ल्सकडे तुरुंगात असताना देखील पैशांची कमतरता नव्हती. आधीच्या चोऱ्या आणि गुहेगारीतून मिळालेले पैसे तर त्याच्याकडे होतेच शिवाय तुरुंगात बसून तो जे लिखाण करायचा, त्याची पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर त्याचा बक्कळ मोबदला त्याला प्रकाशकाकडून मिळत असे.
देशाच्या गृहमंत्र्यांनी तुरुंगात जाऊन घेतली होती चार्ल्सची भेट
चार्ल्स शोभराज तिहारमध्ये कारावासात असतानाही त्याच्या प्रणयलीला काही थांबल्या नव्हत्या. त्यावेळी शिरीन वॉकर ही त्याची एक प्रेयसी होती. चार्ल्सनं तिला भारतात बोलावलं होतं. ती जेव्हा दिल्लीत येत असे तेव्हा फाईव्ह स्टार हॉटेलात तिचा मुक्काम असायचा. ती वारंवार चार्ल्सला भेटायला तिहारला येत असे.
"ती तिहारमध्ये आल्यावर चार्ल्स तिला थेट तुरुंगाच्या पोलीस अधीक्षकांच्या खोलीत घेऊन जात असे. तिथे हे दोघे प्रियकर तासनतास एकांतातील सहवासाचा आनंद घेत असायचे," असा खुलासा पीयूसीएलनं आपल्या अहवालातून केला होता.
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला एक निष्णात आरोपी आपल्या प्रेयसीला तुरुंगात बोलावतो आणि थेट तुरुंगातील पोलीस अधीक्षकाच्याच खोलीत प्रणयक्रीडेत रममाण होतो, ही बातमी जेव्हा इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केली तेव्हा देशभरात एकच खळबळ माजली. कायदा सुव्यवस्था आणि गृहखात्याच्या कारभारावरच गंभीर प्रश्न उभे केले जाऊ लागले.
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ग्यानी झैल सिंग यांना या घटनेची नोंद घ्यावी लागली. वाढत्या दबावामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतः तिहार तुरुंगाला अचानक भेट देण्याचं ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
सुनील गुप्ता सांगतात की, "1 सप्टेंबरच्या संध्याकाळी साधारण साडेसात वाजता तुरुंगाचा एक सुरक्षारक्षक धावतपळत माझ्याकडे आला आणि म्हणाला की "गृहमंत्री प्रवेशद्वारावर येऊन थांबलेले आहेत. त्यांना आत यायची परवानगी देऊ का?"
त्याच्या या प्रश्नावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच सुनील कुमार यांना क्षणभर कळालं नाही. तिहारच्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाला कडक शब्दात चेतावणी देण्यात आली होती की वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही बाहेरील व्यक्तीला तुरुंगाच्या आवारात प्रवेश द्यायचा नाही. आता ही सूचना हा सुरक्षारक्षक एवढ्या गंभीरपणे घेईल आणि थेट गृहमंत्र्यालाच गेटवर अडवून ठेवेल, यावर आज विश्वास बसणं कठीण आहे. पण तेव्हाची तिहारमधली परिस्थितीच तशी होती.
आधीच तिहार तुरुंग इथल्या वेगवेगळ्या घटनांमुळे बाहेर बदनामी आणि चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे तिहारची सुरक्षा व्यवस्था प्रशासनानं इतकी कडक ठेवली होती.
सुनील कुमार पुढे सांगतात की, " मी धावतपळत गेटवर पोहचलो आणि गृहमंत्र्यांचं स्वागत केलं. गृहमंत्र्यांनी मला पहिला आदेश दिला तो म्हणजे चार्ल्स शोभराजच्या सेलकडे घेऊन जाण्याचा. शोभराजची भेट झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याला हिंदीत प्रश्न विचारला की 'कसा आहेस?' इथे तुला काही अडचण आहे का?' चार्ल्सला अर्थात हिंदी नीट समजत नव्हती. मी गृहमंत्र्यांचा प्रश्न इंग्रजीत अनुवाद करून त्याला विचारला. चार्ल्सनं इंग्रजीतच 'मी ठीक आहे. आणि मला तुरुंगात कसलीही अडचण अथवा त्रास नाही,' असं उत्तर दिलं."
सुनील गुप्ता यांचं निलंबन
चार्ल्सची भेट झाल्यानंतर सुनील गुप्ता गृहमंत्र्यांना तुरुंगातील पुढच्या प्रभागात घेऊन गेले तेव्हा भज्जी आणि दीना या दोन कैद्यांनी अचानक 'चाचा नेहरू जिंदाबाद' अशा घोषणा मोठ्याने द्यायला सुरुवात केली. हे सगळं गृहमंत्र्यांचं लक्ष्य वेधून घेण्यासाठी त्यांनी केलं होतं.
गृहमंत्र्यांच्या सचिवांनी मग हस्तक्षेप केला आणि त्या दोन कैद्यांना ते वेगळीकडे घेऊन गेले. भज्जी आणि दीना यांनी गृहमंत्र्यांसमोर तिहार तुरुंग प्रशासनाचा सगळा भांडाफोड केला. तुरुंगात काय काय गैरप्रकार चालू आहेत, हे सगळं त्या सचिवाला सांगितलं. कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तुरूंगात दारूपासून अंमली पदार्थांपर्यंत जे हवं ते कसं सहज उपलब्ध आहे, याचा खुलासा त्यांनी केला.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात तर बातमीही छापून आली की या दोन कैद्यांनी पुराव्यादाखल गृहमंत्र्यांच्या सचिवाला तिथे पडलेली दारूची एक रिकामी बाटली देखील दाखवली. तिहार तुरुंगात दारू किंवा अन्य कुठलीही बेकायदेशीर वस्तू कैदी इतक्या सहज मिळवू शकतात, ही गोष्ट चक्रावून टाकणारी होती. जणू काही हे कैदी शिक्षा भोगायला नव्हे मजा करायला तुरुंगात आलेले आहेत, असं वाटावं इतकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
इतक्या मोठ्या खुलाशानंतर तिहार तुरुंग प्रशासनावर कारवाई होणं अपेक्षितच होतं. कारण थेट गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर या प्रकरणानं सवाल उपस्थित केले होते. झालंही अगदी तसंच. कारवाई दाखल गृह मंत्रालयानं तिहार तुरुंगाच्या सहा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं.
या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये सुनील कुमार गुप्ता यांचाही समावेश होता. या कैद्यांनी घातलेल्या राड्यात किंवा एकूणच तुरुंगात होत असलेल्या गैरप्रकारात आपली काहीही भूमिका नाही, असं सुनील कुमार यांनी निक्षून सांगितलं. तेव्हा कुठे दीड महिन्यांनी निलंबन मागे घेऊन त्यांना नोकरीवर पुन्हा रुजू होण्याची परवानगी दिली गेली.
दीड महिना सुनील गुप्ता निलंबित होते. या काळात चार्ल्स शोभराज कायम त्यांच्या संपर्कात होता. अडचणीच्या काळात मदत करायचं आमिष दाखवून संबंध प्रस्थापित करून त्याचा गैरफायदा उचलण्यात चार्ल्सचा हातखंडा होता. सुनील कुमार यांनाही आर्थिक मदतीचं आमिष त्याने दाखवलं. पण सुनिल कुमार यांनी चार्ल्स शोभराज कडून कधीच कुठली मदत अथवा लाच स्वीकारली नाही.
तिहारमधून पलायन
16 मार्च 1986 रोजी रविवारी चार्ल्स शोभराजनं तिहारमधील सगळ्याच सुरक्षा रक्षकांना चकवा देत तुरुंगातून पलायन केलं.
चार्ल्स शोभराज आणि सोबत इतर काही कैदी सुद्धा तुरुंगातून पसार झाल्याचं पोलीस शिपाई आनंद प्रकाश यांच्या लक्षात आलं. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तुरुंगाजवळ अधिकारी राहत असलेल्या घरांजवळ ते पोहचले तेव्हा त्यांचा चेहरा मोठ्या कपड्याने झाकलेला होता. उप अधीक्षक सुनील कुमार यांच्या कार्यालयाची बेल वाजवली तेव्हा तो अतिशय बिथरलेला होता. भीतीने थरथरत असताना आनंद प्रकाश यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.
"लवकर चला". तो फक्त इतकंच बोलला.
थोड्या वेळाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वी डी पुष्करणा यांनी झालेला सगळा प्रकार सुनील कुमार यांच्या जवळ नमूद केला. "तुरुंगाचे सगळे दरवाजे उघडे होते. तुरूंगातील सगळे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, इतकंच काय ड्यूटीवर रुजू असलेले अधिकारी शिवराज यादव देखील अर्धवट झोपलेल्या किंवा बेशुद्ध अवस्थेत होते.
तुरुंगाच्या मुख्य दरवाजाची चावी ठरलेल्या ठिकाणी नव्हती. ज्यांना जाग आली होती ते जे दिसतंय त्यावर विश्वास बसत नसल्यानं फक्त आ वासून उभे होते."
तुरुंगातील बहुतांश पोलीस कर्मचारी हे तामिळनाडूचे होते. याचं कारण असं की उत्तर भारतातील हिंदी भाषिक पोलिसांसोबत चार्ल्स व इतर कैद्यांना जवळीक साधता येऊ नये. कारण अशी जवळीक साधून त्याचा फायदा कसा उठवायचा हे या चलाख कैद्यांना चांगलंच ठाऊक झालं होतं. हे सगळे तामिळ पोलीस कर्मचारी आता बेशुद्ध पडलेले होते.
तिहार तुरुंगातील 900 कैद्यांपैकी 12 कैदी सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत पसार झाले होते. चार्ल्स शोभराज हा त्यातला एक होता.
मिठाईत गुंगीचं औषध मिसळून दिला चकवा
ज्या दिवशी चार्ल्सनं इतर कैद्यांसह तिहारमधून पलायन केलं तो दिवस सुनील कुमार यांच्या चांगलाच लक्षात आहे. "घटना घडली तेव्ही मी घरी दूरदर्शनवर एक चित्रपट बघत होतो. तेव्हा चालू चित्रपट थांबवून दूरदर्शनवर सूचना दिली गेली की, तिहारमधून चार्ल्स शोभराजनं पलायन केलं आहे. ही बातमी ऐकून मी तातडीनं तिहारला निघालो. पोहचलो तेव्हा जे मी बघितलं ते दृश्य एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षाही अधिक नाट्यमय होतं. आमचे सगळे पोलीस कर्मचारी बेशुद्ध होऊन पडले होते आणि प्रत्येकाच्या हातात 50 रूपयांची नोट होती," सुनील गुप्तांनी घटनाक्रम सांगितला.
त्याचं झालं असं की चार्ल्सनं बऱ्याच दिवसांपासून ही पलायनाची योजना बनवली होती. आपला वाढदिवस असल्याचं सांगून सगळ्या पोलिसांना तो साजरा करण्यासाठी 50 रूपये आणि खायला मिठाई त्याने देऊ केली. या मिठाईत त्याने गुंगीचं औषध मिसळलं होतं. त्यामुळेच हे सगळे जण आता बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते.
त्यावेळचे दिल्ली पोलीस उपायुक्त अजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित माहिती दिली. पलायनाच्या वेळी वार्डनची ड्यूटी पोलीस अधिकारी शिवराज यादव करत होते. चार्ल्सनं वार्डन यादवला पटवून आपला वाढदिवस असल्याचं खोटंच सांगितलं.
वार्डनसह पाच अन्य सुरक्षारक्षकांना गुंगीचं औषध मिसळलेली मिठाई खाऊ घातली आणि त्याचा फायदा घेऊन तो पसार झाला. काही तासांनी या सगळ्या पोलिसांना शुद्ध आली. पण तोपर्यंत चार्ल्स फरार झालेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
ही पलायनाची योजना चार्ल्स शोभराजनं कशी आखली आणि विशेष म्हणजे ती प्रत्यक्षात कशी आणली याचा तपास करण्यासाठी एक विशेष चौकशी समिती नेमली गेली. चौकशी समितीच्या अहवालातून असं लक्षात आलं की डेव्हिड हॉल नावाचा एक ब्रिटिश नागरिक तिहार मध्ये कैदेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.
अंमली पदार्थ आणि औषधांची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. तो कैदेत असताना चार्ल्सनं त्याच्याशी मैत्री केली. त्याची जामिनाची याचिका चार्ल्स शोभराजनंच लिहिली होती. त्यामुळे डेव्हिड हॉल शोभराजचा कृतज्ञ होता. याच उपकाराची परतफेड म्हणून चार्ल्सच्या पलायनाच्या योजनेत गुंगीचं औषध पुरवण्याचं सहाय्य त्याने केलं.
हा कट शोभराजने अनेक दिवस योजना बनवून रचला होता.
जामिनावर सुटका होण्याआधी डेव्हिड हॉल चार्ल्सला भेटला होता. त्याने एक पाकिट चार्ल्सला दिलं ज्यात अर्थातच गुंगीचं औषध होतं. गुंगीचं औषध नीट काम करतंय की नाही हे तपासण्यासाठी चार्ल्सने आधी एका कुत्र्यावरही त्याचा प्रयोग करून पाहिला होता.
तिहार मधून बाहेर पडल्यानंतर एक गाडी शोभराजची वाट बघत होती. तो डेव्हिड हॉलच होता. जामीन मिळाल्यानंतर कुठलाही कैदी सहसा घरी परततो. पण हॉल आपल्या मित्राला तुरुंगातून सोडवण्यासाठी पुन्हा तिहार मध्ये आला होता.
तिहार मधून बाहेर पडताना चार्ल्सनं तुरूंगातील एका शिपायाचं अपहरण करून त्यालाही आपल्या सोबत नेलं. जेणेकरून तिथे तैनात असलेल्या तमिळनाडूच्या सुरक्षा रक्षकांना वाटावं की पोलिसांच्या सहमतीने चार्ल्स कुठेतरी बाहेर जात आहे. अशा प्रकारे आपला मित्र डेव्हिड हॉलला सोबत घेऊन चार्ल्स शोभराज तिहारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
गोव्यामध्ये पुन्हा अटक
एक अहवाल असंही सांगतो की चार्ल्स शोभराजने पोलिसांना बेशुद्ध करण्यासाठी लार्पोज या झोपेच्या 820 गोळ्या मिठाईत मिसळण्यासाठी वापरल्या होत्या.
चार्ल्स शोभराजच्या तिहार मधून पलायनच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ माजली. दिल्लीचे उपराज्यपाल एच के एल कपूर आणि पोलीस आयुक्त वेद मारवा यांनी तिहार तुरुंगाला भेट दिली. वी डी पुष्करणा आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व त्यांच्या अटकेचे आदेश दिले गेले.
इतकी सगळी योजना बनवून हा कट प्रत्यक्षात आणल्यानंतरही चार्ल्स फक्त पुढचे 23 दिवस तुरुंगाबाहेर राहू शकला. मुंबई पोलिस विभागातील पोलीस निरीक्षक मधुकर झेंडे यांनी गोव्यामधील एका रेस्टॉरंटमध्ये पुन्हा चार्ल्सला अटक केली.
चार्ल्स शोभराज त्या दिवशी गोव्यातील ओकोकेरा रेस्टॉरंटमध्ये येऊ शकतो, असा सुगावा पोलिसांना टेलिफोन एक्सचेंजमधून मिळाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
चार्ल्स कसा पकडला गेला याबद्दल झेंडे सांगतात की, "6 एप्रिलला रात्री साडेदहा वाजता टीव्हीवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हॉकीचा सामना सुरू होता. हे रेस्टॉरंट बरंच अलिशान होतं. रेस्टॉरंटमध्ये एक आतली खोली सुद्धा होती. आम्ही चार्ल्सची वाट बघत तिथेच बसलो होतो. इतक्यात हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दोन व्यक्ती टॅक्सी मधून उतरत असल्याचं मी पाहिलं.
दोघांनीही दुपारी उन्हात वापरायची टोपी (सन हॅट) घातली होती. त्यामुळे मला थोडी शंका आली की इतक्या रात्री सन हॅट घालून ही दोघं का आली असतील? तो व्यक्ती थोडा पुढे आल्यानंतर मी पाहिलं तेव्हा तो चार्ल्स शोभराजसारखाच दिसत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र डेव्हिड हॉल सुद्धा होता. त्यांना बघितल्यानंतर पहिल्यांदा माझ्या छातीत धडकीच भरली."
त्यानंतर स्वत:ला सावरत झेंडे पुढे आले. त्यांनी मागून चार्ल्सला धरलं आणि जोरात ओरडले 'चार्ल्स'. प्रत्युत्तर आलं. कोण चार्ल्स? आपली ओळख लपवून पोलिसांना पुन्हा चकवा देण्याच्या विचारात चार्ल्स होता. त्यामुळे मी चार्ल्स नसून तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, अशी धांदल तो करू पाहत होता. पण झेंडे म्हणाले की 71 साली तुला ज्या पोलीसाने पकडलं होतं तो मीच आहे. मला मूर्ख बनवू नकोस,' तेव्हा मग चार्ल्सने हार मानली. त्याने शरणागती पत्करली.
"आम्ही तिथे तर काही हातकडी घेऊन गेलो नव्हतो. मग हॉटेल मधल्या कर्मचाऱ्यांनाच सांगितलं की आम्ही पोलीस आहोत. जितक्या काही दोऱ्या वगैरे असतील लगेच आणा. दोऱ्या आल्यावर या दोऱ्यांंनी चार्ल्सला आवळलं. पोलीस आयुक्तांना फोन करून कळवलं की आम्ही चार्ल्सला पकडलं आहे," चार्ल्सच्या गोव्यातील अटकेचा सगळा जिवंत देखावा पोलीस निरीक्षक मधुकर झेंडे यांनी उभा केला.
तिहारमधील राजेशाही थाट बंद, चार्ल्सच्या मुसक्या आवळल्या
दिल्ली पोलीस उपायुक्त अमोल कंठ यांनी मधुकर झेंडे यांच्याकडून चार्ल्सचा ताबा घेतला. त्यानंतर विशेष विमानानं चार्ल्सला दिल्लीमध्ये आणलं गेलं.
काही जण असं सुद्धा मानतात की तुरूंगातून पलायना बरोबरच नंतर पुन्हा गोव्यात पकडलं जाणं हा सगळा घटनाक्रम चार्ल्सचा गाफीलपणा नव्हे तर त्याने आखलेली अतिशय धूर्त आणि नियोजनबद्ध चाल होती.
याला बराच तार्किक आधार देखील आहे. कारण चार्ल्स शोभराजनं जेव्हा दिल्लीतील तिहार तुरुंगातून पलायन केलं तेव्हा त्याची तुरुंगवासाची शिक्षा काही फार दिवस उरली नव्हती. तसाही तो काही काळात आपली शिक्षा पूर्ण करून तुरूंगाबाहेर पडणारच होता.
पण भारतीय कायद्या अंतर्गत इथली शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याचं प्रत्यार्पण थायलंडला होणार होतं. कारण थायलंडमध्ये सुद्धा चार्ल्सनं दोन खून केले होते. आणि थायलंडच्या कडक कायद्यानुसार त्याला तिथे फाशीचीच शिक्षा झाली असती.
हे प्रत्यर्पण रोखण्यासाठी चार्ल्सनंच तिहार तुरुंगातून पलायनाचा आणि नंतर पुन्हा पकडलं जाण्याचाही कट रचला, असं मानलं जातं. कारण तुरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायद्याने चार्ल्सची भारतातील तुरुंगवासाची शिक्षा वाढली. तो आता आणखी काही वर्ष भारतातील तुरुंगातच राहणार होता. त्यामुळे त्याचं थायलंडला होणारं प्रत्यर्पण थांबलं आणि चार्ल्स मृत्यूदंडापासून वाचला.

फोटो स्रोत, Facebook
पण तिहारमध्ये परतल्यावर आता चार्ल्स शोभराजचे तुरुंगातील सगळे फाजील लाड बंद केले गेले. तो आता तिहारचा सम्राट नव्हे कुख्यात गुन्हेगार म्हणूनच वागवला जाऊ लागला. त्याला इतर कैद्यांपेक्षाही अधिक जाचक शिक्षा दिली गेली. तो इतर कैद्यांपासून वेगळा आणि कायम हातकड्यांमध्ये बांधून ठेवला जाऊ लागला.
आधीसारखं तुरुंगाच्या आवारातील त्याचा मुक्त वावर पूर्णपणे बंद करण्यात आला. सुरक्षा रक्षक सोबत असल्याशिवाय आता त्याला हलायलाही परवानगी नव्हती. आपल्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात जाणं - येणं होत असतानाच फक्त त्याच्या बेड्या काढल्या जायच्या आणि त्याला बोलायला परवानगी असायची.
त्यामुळेच चार्ल्सला आता जास्तीत जास्त वेळ न्यायालयातच घालवायला आवडायचं. तिथे एक तर तो हातकड्यांमध्ये बंदिस्त नसायचा. शिवाय सुनावणीदरम्यान त्याला त्याच्या आवडीचं जेवण दिलं जायचं. खटला चालू असताना फिर्यादी म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत जेवायला चिकन बिर्याणी आणि प्यायला लिम्का पेय तो मोठ्या ऐटीत मागवत असे.

फोटो स्रोत, Getty Images
या सुनावणीच्या निमित्ताने तुरुंगातील बंदिस्त खोलीतून बाहेर पडत त्याला आजूबाजूच्या लोकांशी बोलायला मिळायचं. त्यामुळे आपली वकील स्नेह सेंगरला सांगून तो काही ना काही निमित्ताने नवीन फाईल बाहेर काढून सतत नवा खटला न्यायालयात दाखल करत असे. जेणेकरून तुरुंगाबाहेर पडून त्याला न्यायालयाची मुक्त स्वारी करता येईल.
तुरुंगात यावेळेस इतकी कडक निगराणी आणि देखरेखीखाली असूनसुद्धा चार्ल्स काही सुधारला नव्हता. एका तपासणीत त्याच्याकडे गांजा सापडला. अवलिया चार्ल्स दोन ब्रेडच्या कापांमध्ये लपवून गांजा आणत असल्याचं नंतर कळालं. यावेळेस मात्र या हलगर्जीपणाबद्दल तत्काळ कारवाई केली गेली.
तुरुंगात कैदी (तो सुद्धा आधीच एकदा पळून गेलेला चार्ल्स शोभराज) बाहेरून गांजा आणून त्याचं सेवन करतो, ही बाब पोलीस प्रशासनानं यावेळेस खपवून घेतली नाही.
चार्ल्सवर नजर ठेवण्याचं काम दिलं गेलेल्या दोन पोलीस शिपायांना यासाठी पहिल्यांदा काही काळासाठी निलंबित आणि नंतर थेट नोकरीवरूनच काढून टाकण्यात आलं.
चार्ल्सला सहानुभूती दाखवल्याबद्दल किरण बेदींवर देखील झाली होती कारवाई
तिहार तुरुंगातून किरण बेदी यांची कारवाई अंतर्गत जी तडकाफडकी बदली करण्यात आली त्याचं कारण देखील चार्ल्सच होता, अशी माहिती सुनील गुप्ता यांनी दिली.
त्यावेळी तिहार तुरुंगाचा कारभार आयपीएस किरण बेदी चालवत होत्या. किरण बेदींनी चार्ल्स शोभराजप्रती थोडी सहानुभूती दाखवली. त्याला आपल्या लीगल सेलला लागून असलेली खास खोली देऊ केली. शिवाय कैद्यांच्या याचिका टाईप करण्यासाठी टाईप रायटरदेखील पुरवला.
खरंतर यात काही बेकायदेशीर नव्हतं. विशेष तरतुदीखाली तुरुंग अधीक्षकांना एखाद्या कैद्याला अशी मुभा देण्याचा अधिकार होताच.
पण चार्ल्सचा इतिहासच इतका रंजित होता की आता पुन्हा त्याच्यामुळे तिहार प्रशासन अथवा पोलिसांची बदनामी व्हावी, अशी कोणाचीच इच्छा नव्हती. त्यामुळे चार्ल्सला यावेळेस कुठलीच सूट देऊ नये आणि त्याच्यासोबत अगदी कडक शिस्तीचा व्यवहार व्हायला हवा, हेच सगळ्यांचं मत होतं. अपवाद फक्त किरण बेदी. ही छोटीशी सूट दिल्याबद्दल किरण बेदींवर मग कारवाई झाली.

फोटो स्रोत, Getty Images
चार्ल्स शोभराजला टाईपरायटर देऊ करणं किरण बेदींंना भलतंच महागात पडलं. टाईपरायटर ही काही गरजेची नव्हे तर विलासी उपभोगाची वस्तू आहे. आणि या टाईपरायटरचा वापर चार्ल्स फक्त याचिका नव्हे तर आपली पुस्तकं लिहण्यासाठी करतो आहे. आणि या पुस्तकांमधून आपल्या चुकीच्या कृत्यांचं समर्थन करत स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्याचा वापर करतो आहे, हे कारण देत किरण बेंदीवर कारवाई झाली. तिहार मधून त्यांना हटवण्यात आलं.
तिहारला आदर्श तुरुंग बनवण्यासाठी किरण बेदींनी तिथे अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या या मोहीमेचं बरंच कौतुक देखील झालं पण बऱ्याच वेळा कैद्यांना जास्त सूट दिल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. अशाच पद्धतीनं चार्ल्स शोभराजला दिलेली सूट किरण बेदींना दिल्लीतून हटवलं जाण्याचं कारण बनलं.
नेपाळमध्ये सुद्धा भोगला 19 वर्षांचा तुरुंगवास
अशा पद्धतीने तिहारमध्ये तब्बल 20 वर्ष तुरुंगावास भोगल्यानंतर 17 जानेवारी 1997 ला चार्ल्स शोभराजची मुक्तता करण्यात आली. पूर्ण शिक्षा भोगून तिहारमधून बाहेर पडताना आता चार्ल्स 53 वर्षांचा झाला होता.
पुढची काही वर्षे तो फ्रान्समध्ये मुक्तपणे राहिला. पण 2003 साली काही कामानिमित्त नेपाळला आला. त्याच्या दुर्देवानं ज्या मोजक्या देशांमध्ये तो अजूनही कायदेशीर गुन्हेगार होता त्यामधला एक नेपाळ देश होता. तिथे एका पत्रकाराने माग काढल्यानंतर तो पकडला गेला आणि 2003 साली त्याला आता नेपाळमध्ये अटक झाली. पुन्हा पुढची 19 वर्ष त्याला नेपाळमधील तुरुंगात काढावी लागली.
21 डिसेंबर 2022 रोजी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याचं वाढतं वय आणि आधीच 19 वर्ष काढलेला तुरुंगवास लक्षात घेऊन त्याला मुक्त करण्याचा निर्णय दिला. नेपाळमधील शिक्षा पूर्ण भोगल्यानंतर वृद्ध चार्ल्स फ्रान्समध्ये परतला.
आजघडीला तो आपलं वृद्धापकाळातील उर्वरित निवृत्तीचं आयुष्य फ्रान्समध्येच व्यतित करत आहे. पण यावेळेस आपलं प्रायश्चित्त भोगून आलेला कायद्याच्या नजरेतील निर्दोष नागरिक बनून.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











