You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलं जन्माला घातल्यानं महिलांचं आयुष्य घटतं का? उत्क्रांतीच्या अभ्यासातून काय उलगडलं?
- Author, केट बॉवी
- Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
जेव्हा मुलं खोडकर वागतात, ती जेवायला किंवा झोपायला नकार देतात, किरकिर करतात, तेव्हा सामान्यत: त्यांच्या आया गंमतीनं अथवा बरेचदा त्राग्यात म्हणतात की, 'ही मुलं तर माझं रक्त आटवत आहेत.' अर्थात, ही मुलं माझं आयुष्यचं कमी करत आहेत, असंच त्यांना एकप्रकारे त्राग्यात म्हणायचं असतं.
मात्र, एका नवीन अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, कठीण परिस्थितीत जगणाऱ्या महिलांसाठी हा त्रागा खरं तर वास्तवाच्या अधिक जवळचाच असू शकतो.
ऐतिहासिक नोंदींचं विश्लेषण असं दर्शवतं की, काही महिलांचं आयुर्मान त्यांना प्रत्येक मूल होण्यासह सुमारे सहा-सहा महिन्यांनी कमी झालेलं आहे. विशेषतः, सर्वात कठीण परिस्थितीत राहणाऱ्या महिलांना याचा फटका बसला आहे.
उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी पॅरिश रेकॉर्डचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये लोकसंख्येतील जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवली जाते.
या नोंदींमध्ये 1866 ते 1868 या दरम्यान फिनलंडमधील महादुष्काळातून वाचलेल्या 4,684 महिलांची माहिती समाविष्ट होती.
या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगन विद्यापीठाचे डॉ. युआन यंग म्हणाले की, हा युरोपच्या अलीकडच्या इतिहासातील 'सर्वात वाईट दुष्काळांपैकी एक' होता.
डॉ. यंग आणि त्यांच्या टीममधील प्रोफेसर हन्ना दुग्डेल, प्रोफेसर विरपी लुम्मा आणि डॉ. एरिक पोस्टमा यांना असं आढळून आलं की, दुष्काळात आई झालेल्या महिलांचं आयुर्मान प्रत्येक मुलाच्या जन्मासह सहा-सहा महिन्यांनी कमी झालेलं आहे.
या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, यामागचं कारण असं असू शकतं की, या मातांनी त्यांची बरीचशी ऊर्जा आपल्या पेशी दुरूस्त करण्यामध्ये घालवण्याऐवजी प्रजननात लावलेली आहे.
त्यामुळे, नंतरच्या काळात त्यांना आजारांचा धोका अधिक वाढलेला आहे.
मात्र, या संशोधनामध्ये, महिलांनी दुष्काळाआधी अथवा नंतर माता होण्यामध्ये आणि त्यांच्या आयुर्मानामध्ये बदल होण्यामध्ये कोणताही सहसंबंध आढळलेला नाही.
"दुष्काळाच्या कालावधीत, त्यांच्या आयुष्यातील बाळंतपणाच्या काळात असलेल्या महिलांमध्येच आम्हाला ही समस्या आढळते,"असं डॉ. यंग म्हणतात.
यावरून असं लक्षात येतं की, बाळंतपणाच्या काळात महिला ज्या वातावरणात राहत होत्या, तो एक महत्त्वाचा घटक होता.
आई झाल्यानंतरचे परिणाम
पण मग असं का झालं?
एक कारण असंही असू शकतं की, मुलं होण्याचे आरोग्यावर होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम हे कठीण परिस्थितीमध्ये आणखीनच मोठ्या स्तरावर होतात.
वजन वाढणं आणि वाढत्या शारीरिक ताणामुळे मातांना हृदय आणि चयापचयाशी संबंधित रोगांचा धोका जास्त असतो, ही फार पूर्वीपासूनच ज्ञात झालेली गोष्ट आहे.
"या काळात मुलांचं संगोपन, स्तनपान करणं आणि गर्भधारणेच्या प्रक्रियेमुळे आईच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होणं, हे आणखी एक संभाव्य कारण असू शकतं," असं डॉ. यंग म्हणतात.
गरोदरपणा आणि स्तनपानासाठी खूप ऊर्जेची आवश्यकता असते. याचा अर्थ असा आहे की, दुष्काळाच्या काळात, नवजात मातेला तिच्या शरीराचं कार्य योग्य प्रकारे सुरू ठेवण्यासाठी फारच कमी प्रमाणात ऊर्जा शिल्लक राहिलेली असते.
त्यामुळे नंतरच्या आयुष्यात महिलेला आजारांपासून स्वत:चा बचाव करणं कठीण होऊन जातं.
"या लोकसंख्येमध्ये, महिलांना खूप मुलं होत होती आणि कदाचित बाळंतपणादरम्यान त्यांना बरं होण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नव्हता, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम वाढत होते, असंही असू शकतं," असं डॉ. यंग म्हणतात.
पण ते असंही सांगतात की, या अभ्यासामध्ये प्रयोगशाळेतील नवीन प्रयोगांमधून तयार केलेल्या नव्या डेटाचं नव्हे तर ऐतिहासिक डेटाचं विश्लेषण करण्यात आलेलं असल्याने, तो पूर्णपणे खात्रीलायकच असेल, असं नाही.
संतती आणि आयुर्मानाचं 'संतुलन'
डॉ. यंग यांच्या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, ज्या महिलांना अनेक मुलं होती त्यांच्यामध्ये हा परिणाम अधिक सुस्पष्टपणे दिसत होता, परंतु त्याचा सर्व महिलांवर समान परिणाम झालेला नाही.
"या मुळात दोन संकल्पना आहेत - खूप मोठी कुटुंबं आणि दुष्काळासारख्या घटना," असंही ते सांगतात.
गेल्या काही दशकांपासून, शास्त्रज्ञ याच गोष्टीवर विचार करत राहिलेले आहेत की, काही प्रजाती जास्त संतती का निर्माण करतात आणि त्यांचं आयुष्यही कमी का असतं? जसं की उंदीर आणि कीटक होय.
तर, दुसऱ्या बाजूला, काही प्रजातीचं आयुष्य जास्त असतं आणि त्यांची संतती कमी असते. जसं की, हत्ती, व्हेल आणि मानव.
एक प्रमुख सिद्धांत असाही आहे की, पेशी दुरुस्तीपासून पुनरुत्पादनाकडे ऊर्जा वळवली जाते. त्यामुळे ती वृद्धत्वाला कारणीभूत ठरते.
आधुनिक महिलांवरही परिणाम?
पण 200 वर्षांपूर्वीच्या महिलांवरील संशोधनाचे हे निष्कर्ष 21 व्या शतकातील मातांनाही लागू होऊ शकतात का?
"त्या काळात आधुनिक आरोग्यसेवेची यंत्रणा इतकी मजबूत नव्हती, हे त्या ऐतिहासिक काळाच्या संदर्भात समजून घेणं फार महत्त्वाचं आहे," डॉ. यंग म्हणतात.
"त्या वेळी, महिलांना सरासरी चार ते पाच मुले होत होती. ही संख्या आजच्या कुटुंबांतील मुलांपेक्षा खूपच जास्त आहे." 1800 पासून जगभरातील कुटुंबांमध्ये मुलांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे.
2023 पर्यंत, हे प्रमाण प्रति महिला सरासरी दोन मुलांपेक्षा थोडंसं जास्त झालेलं होतं. शिक्षण, रोजगार, गर्भनिरोधकांची वाढलेली उपलब्धता आणि बालमृत्यूंमधील घट यामुळे हा बदल झाला.
मात्र, नायजर, चाड, सोमालिया आणि दक्षिण सुदान यांसारख्या काही देशांमध्ये महिलांना अजूनही किमान चार मुलं असतात.
मात्र, डॉ. यंग म्हणतात की, या विषयावर अधिक संशोधनाची आवश्यक आहे. परंतु, हे निष्कर्ष आजही जगाच्या काही भागांमध्ये लागू होऊ शकतात, असे संकेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)