पाकिस्तानच्या फतेह-2 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या अडचणी वाढणार? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, उमर फारूक आणि नियाज फारूकी
- Role, बीबीसी उर्दू . कॉम
27 डिसेंबर 2023 रोजी पाकिस्तानने एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रं डागण्यास सक्षम असलेल्या 'फतेह 2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (आयएसपीआर) दिलेल्या माहितीनुसार, 400 किमीचा पल्ला गाठणाऱ्या या क्षेपणास्त्रात आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता आहे.
यापूर्वी 24 ऑगस्ट 2021 रोजी देशातच विकसित केलेल्या फतेह वन रॉकेट प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती.
फतेह-2 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय ?
आयएसपीआर नुसार, फतेह-2 क्षेपणास्त्र प्रणाली मध्ये प्रगत उड्डाणाची क्षमता असून लक्ष्य गाठण्यासाठी हे क्षेपणास्त्र सुसज्ज आहे.
आयएसपीआरने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, फतेह-2 हे एक अद्वितीय क्षेपणास्त्र असून त्याच्याकडे लक्ष्य भेदण्याचं अचूक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या उपग्रहाशी जोडलेल्या क्षेपणास्त्राची हवेत मारा करण्याची क्षमता अधिक प्रभावी बनली आहे.
आयएसपीआरने केलेल्या दाव्यानुसार, या घटकांमुळे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर आपलं लक्ष्य अचूकपणे भेदण्याची आणि लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
लष्करी शस्त्रास्त्रांचे तज्ञ फतेह टू विषयी सांगतात की, हे 'फ्लॅट ट्रॅजेक्टोरी व्हेईकल' आहे. म्हणजे ते रडारवर दिसत नाही.
संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर (निवृत्त) साद मोहम्मद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, फतेह हे एक ट्रॅजेक्टरी वाहन आहे जे रडारवर शोधणं आणि नष्ट करणं कठीण असतं.
ते सांगतात, "बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा स्वतःचा एक मार्ग असतो. ते अंतराळात जातात आणि नंतर पृथ्वीवर परत येतात. या कालावधीत शत्रूचं रडार त्याचं स्थान शोधून काढून त्याला प्रत्युत्तर देतात. मग याचा मार्ग पुन्हा बदलतो."
भारताची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली
काही तज्ञांच्या मते, भारताच्या सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेपणास्त्र कार्यक्रमाविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणून फतेह टू चा वापर होऊ शकतो.
मागील बऱ्याच दिवसांपासून भारत आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करत आहे.
लांब पल्ल्याच्या S-400 ट्रायम्फ व्यतिरिक्त, भारताने आपल्या संरक्षण प्रणालीमध्ये स्वदेशी विकसित कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश केला आहे.
हे क्षेपणास्त्र अगदी कमी अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहेत. ही क्षेपणास्त्रे सागरी आघाडीवर प्रभावी आहेत.
भारतातील 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारत 'एलआर सॅम' नावाची संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहे. या प्रणालीमध्ये रशियाच्या S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालीची क्षमता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रणालीमुळे दूरवर देखरेख करता येईल आणि त्यात रडार नियंत्रण क्षमता असेल. 150, 250 आणि 350 किलोमीटर अंतरावरील क्षेपणास्त्रे शोधण्याची आणि त्यांना रोखण्याची क्षमता यात असेल.
भारत आपल्या संरक्षण प्रणालीमध्ये कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून आपले सैन्य, आण्विक सुविधा आणि प्रमुख शहरांचे संरक्षण करण्याच्या धोरणावर काम करत आहे.
भारताला बऱ्याच काळापासून इस्रायलची आयर्न डोम मिसाईल डिफेन्स सिस्टिम हवी आहे. जुलै 2023 मध्ये, द टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने भारताला हे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची सहमती दिली आहे. आणि त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि संरक्षण विश्लेषक एच एस पनाग म्हणतात की, प्रत्येक देशाला आयर्न डोम मिसाईल डिफेन्स सिस्टिम बनवण्याची इच्छा आहे. पण यासाठी पैसा आणि तंत्रज्ञानाची गरज आहे.
ते म्हणतात, "तुमच्याकडे पैसा आणि तंत्रज्ञान आल्यास तुम्ही ते स्वतः तयार करू शकता. पण सोबतच या वृत्तांकडे सावधगिरीने लक्ष दिलं पाहिजे."

फोटो स्रोत, ISPR
त्यांच्या मते, "आपण जर माहिती नीट तपासली तर समजेल की, भारताकडे संरक्षण तंत्रज्ञानाचा अभाव आहे. पण वृत्तपत्रात रोज नवी वृत्त, नवे दावे केले जातात की आमच्याकडे हे आहे ते आहे. पण वास्तव तर अगदी वेगळंच आहे."
संरक्षणतज्ज्ञ राहुल भोसले म्हणतात की, "राजधानी दिल्ली किंवा व्यावसायिक केंद्र असलेल्या मुंबईसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचं संरक्षण करण्यासाठी भारताला अशा प्रणालीची आवश्यकता असू शकते. पण आम्हाला तितका धोका नाही, कारण ही प्रणाली हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांविरोधात चांगलं काम करते."
ते म्हणतात की, 'पाकिस्तानमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता आहे, पण त्यातून त्यांना काय फायदा होणार आहे? कारण समोरून डागलेली क्षेपणास्त्रं देखील तितकीच तीव्र असतील.'
राहुल भोसले म्हणतात की, "ही एक महाग प्रणाली आहे. आणि भारतासमोरील धोके पाहता भारताकडे ही प्रणाली आधीपासूनच अस्तित्वात आहे."
पाकिस्तानातील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांचे तज्ञ सय्यद मोहम्मद अली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, भारताला तीन कारणांसाठी इस्रायली आयर्न डोम तंत्रज्ञान हवं आहे.
एक कारण म्हणजे भारताकडे प्रचंड मोठा भूभाग आहे आणि तो इस्रायलपेक्षा खूप मोठा आहे. आयर्न डोम इस्त्रायल सारख्या छोट्या देशासाठी प्रभावी आहे पण भारतासारख्या मोठ्या देशासाठी ते फारसं प्रभावी नाही.
ते सांगतात की, "हमासचे क्षेपणास्त्र रोखण्यासाठी इस्रायल आयर्न डोमचा वापर करत आहे. पण ही क्षेपणास्त्र जुन्या पद्धतीची आहेत, दुसऱ्या महायुद्धात याचा वापर जर्मन लोकांनी केला होता."
सय्यद मोहम्मद अली म्हणतात की, "पण भारताच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना चीन आणि पाकिस्तानकडून मोठ्या आणि प्रगत शस्त्रास्त्रांचा सामना करावा लागेल. भारताकडे अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्रेही आहेत, पण तीदेखील पाकिस्तानी क्षेपणास्त्रांपासून संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाहीत."
फतेह टू मुळे पाकिस्तान आघाडीवर
काही भारतीय संरक्षणतज्ज्ञांचं असं मत आहे की, फतेह 2 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षेत्रात, विशेषत: पल्ल्याच्या बाबतीत एक धार दिली आहे.
भारताच्या संरक्षणविषयक मुद्द्यांवर लिहिणाऱ्या पोर्टल इंडियन डिफेन्स रिसर्च विंगचं म्हणणं आहे की, पाकिस्तानचे हे नवीन क्षेपणास्त्र पल्ल्याच्या बाबतीत भारतापेक्षाही पुढे आहे. आणि पाकिस्तानी सैन्यासाठी हे फायदेशीर आहे.
बीबीसीशी बोलताना भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडियर राहुल भोसले म्हणाले, 'हा विकास क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.'
त्यांनी सांगितलं की, फतेह-2 हे भारताच्या पनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरसारखं आहे आणि यातून पाकिस्तानची क्षमता वाढेल.

फोटो स्रोत, ISPR
त्यांच्या मते, हा विकास दोन्ही देशांसाठी सामान्य आहे कारण भारतासह जगातील सर्व देश मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टम तयार करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धात या यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणतज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने जी चाचणी करण्यात आली त्यात फतेह 2 चाचणीचा समावेश आहे.
18 ऑक्टोबर 2023 रोजी पाकिस्तानने मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र अबाबिलची चाचणी देखील केली होती. हे दक्षिण आशियातील पहिले क्षेपणास्त्र आहे ज्यातून अनेक अण्वस्त्र वाहून नेता येतात.
अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे तज्ञ सय्यद मोहम्मद अली यांच्या मते, अबाबिल आणि फतेह 2 च्या चाचण्या पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या मुख्य आवश्यकता पूर्ण करतात.
ते या प्रणालीवर बराच काळ काम करत होते, यावेळी त्यांना या क्षेपणास्त्राची विश्वासार्हता तपासायची होती. तांत्रिक गरजा पूर्ण केल्यानंतर, त्यांना आता ही शस्त्रे लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द करायची आहेत.
मोहम्मद अली म्हणतात की, "भारतात यंदा लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यात भाजपची युद्धखोर मानसिकता दिसून आली आहे. याचा अंदाज आपल्याला त्यांच्याकडून दररोज येणाऱ्या वक्तव्यांवरून लावता येतो. मला वाटतं की भारतात निवडणुकीपूर्वी एखादी खोटी मोहीम उकरून काढली जाते, पण पाकिस्तानची ही नवीन लष्करी क्षमता तुम्ही यावेळी लक्षात ठेवा असं पाकिस्तानला त्यांना सांगायचं आहे."
दक्षिण आशियात सुरू आहे शस्त्रास्त्रांची शर्यत
ब्रिगेडियर (निवृत्त) साद मुहम्मद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'ही शस्त्रास्त्रांची शर्यत नवी नसून 1947 पासून सुरू आहे.'
सय्यद मोहम्मद अली यांच्या म्हणण्यानुसार, जगात जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र विकसित करण्याची स्पर्धा खूप जुनी आहे. आता दक्षिण आशियामध्ये या स्पर्धेची पुनरावृत्ती सुरू झाली आहे.
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी विकासाबाबत अतिशय संवेदनशील आहेत. या दोन्ही देशांनी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर देशांशी भागीदारी करून स्वतःची क्षमता विकसित केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








